आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासातही घरचं सुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरायला घराबाहेर पडल्यावर घरगुती जेवण, व्यवस्था हवीशी वाटते? मग हे वाचाच...
आपलं घर सोडून दुसऱ्या गावात वा शहरात जायचं म्हटलं की, पहिला प्रश्न येतो प्रवास कसा करायचा हा. आणि दुसरा असतो, राहायचं कुठे हा. खऱ्या भटक्यांची अपेक्षा असते, स्वच्छ जागा व साधं जेवण. त्यांना पंचतारांकित सुखसुविधा नको असतात. पंचतारांकित हॉटेल दिल्लीत असेल वा पणजीत, मॉस्कोत असेल वा सिडनीत, सगळीकडे सारखंच. त्या त्या ठिकाणचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव हवा असेल तर खरी मजा आहे एखाद्या घरात राहण्याची. आता
असं कोणीही कोणा अनोळखी व्यक्तीला आपल्या घरी का बरं राहायला देईल? पण अनेकांना असं राहायला आवडतं, हे जाणून अशी सोय करणाऱ्या काही वेबसाइट्स तयार करण्यात आल्या आहेत. यात रात्रीचं जेवण, झोपायची सोय, सकाळी नाष्टा पुरवले जातात. (दिवसभर भटके लोक घरात बसून राहात नाहीत ना!) त्याला म्हणतात बेड अँड ब्रेकफास्ट. या वेबसाइटवर आपण यजमान म्हणून नोंदणी करून आपल्या घरात पाहुण्यांची सोय करू शकतो. आणि
पाहुणे म्हणून असे यजमान शोधून त्यांच्याकडे राहण्याचा आनंद घेऊ शकतो. वेबसाइटवर घरातल्या सोयींची नोंद असते, तसंच यजमान व पाहुणे दाेघांच्याही सरकारी वैध ओळखपत्रांच्या प्रतीही बुकिंगच्या वेळी पाहिल्या जातात, जेणेकरून फसवाफसवी होऊ नये.
अमेरिकेत याची सुरुवात झाली. भारतातही अनेक छोट्यामोठ्या गावा-शहरांमधून अनेक यजमानांनी अशी नोंदणी केली आहे. त्यामुळे कमी पैशांत चांगल्या सुविधा मिळणे शक्य झाले आहे. घरगुती जेवण हा यातला आणखी एक फायदा. म्हणजे गोव्याला गेल्यावर खास गोवन पद्धतीचं जेवण मिळेल, तर केरळात गेल्यावर केरळी पद्धतीचं. हाॅटेलांमधून तसं म्हटलं तर त्याच चवीचे पदार्थ मिळतात. तसेच अनेक कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोतही यातून िमळू लागला आहे. दोन कुटुंबांची यातून मैत्रीही होऊ शकते. हाॅटेलमधला नाष्टा असतो शेफने बनवलेला आणि इथला असतो आपण ज्या घरात राहतोय त्या घरातल्या व्यक्तीने बनवलेला. दोन्हींतल्या चवींत फरक तर असणारच.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अशी सोय घरांघरांतून होत असते, विशेषत: कोकणात. पण भारतात वा जगभरातल्या ८० देशांमध्ये अशी घरगुती राहण्याची सोय आता होऊ शकते. हे आपल्या पाकिटालाच नव्हे तर मनालाही सुखावणारं आहे. अशी सुविधा देणाऱ्या काही वेबसाइट‌्स - www.airbnb.com, www.bedandbreakfast.com, www.delhibedandbreakfast.com अशा आहेत. यातील airbnbचा फायदा ७० ते ८० लाख लोकांनी घेतलेला आहे.
http://www.maharashtratourism.gov.in या महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाच्या वेबसाइटवरही न्याहारी व निवासाच्या सोयींची नोंद आहे.