आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीशी दोन हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न होऊन सासरी सोलापूरला गेल्यावर तिथली परिस्थिती हलाखीची होती. गुजरगोड ब्राह्मण समाजाच्या असल्याने सासरी घुंगट पद्धत होती. विडी कारखाना बंद पडल्याने पतीची नोकरी गेली. पदरी तीन अपत्ये, त्याबरोबरच घरात सासूसासरे, तीन दीर एवढी माणसे. घरातील सर्व कामं सांभाळून दिवसभरात आडाचं पन्नासहून अधिक घागरी पाणी शेंदून ते दुस-यामजल्यापर्यंत नेण्याची कसरतही तेव्हा मी केली आहे. त्यातच मला टीबीने ग्रासले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संसर्गजन्य रोग म्हणून घरापासून बाजूलाच दुस-याखोलीत माझा मुक्काम पडला. बालपणापासून विठुरायाचे वेड होतेच. माझ्या खोलीच्या बाजूला असलेल्या एका मठातील हरिनाम उत्सवामधील विठ्ठलाचे अभंग कानी पडल्यामुळेच एक प्रकारची ऊर्जा मिळाली. त्यामुळेच या रोगातून मी सहीसलामत बाहेर पडले. हा माझा जणू पुनर्जन्मच होता. त्यानंतर मात्र सोलापूर सोडून कायम वास्तव्यासाठी मी पंढरपूरलाच माहेरी दाखल झाले. या काळात आईने दिलेल्या पाच टाळांवर एकवीरा भजनी मंडळाची मी स्थापना केली. नवरात्रांमध्ये भजनी मंडळाच्या कार्यक्रमापासून माझा ख-याअर्थाने भारुड गायनाचा प्रवास सुरू झाला. भजने गाऊन कला जोपासली जात होती. मात्र
पोटाची खळगी भरायची कशी, हा प्रश्न होताच. त्यामुळे या काळात मी शिवण शिवून संसाराचा गाडा ओढला आहे. मी ही कामं करत असताना माझ्या पतींनी स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळली होती, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीर स्त्री असते असे म्हणतात, पण माझ्या बाबतीत हे उलटेच आहे. मला पतींची खंबीर साथ लाभली. त्यामुळेच राजकारणातदेखील मी सहभागी होऊ शकले. कोणत्याही पदावर नसताना अनेक निराधार, गरीब महिलांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून दिला. पंढरपूरपासून जवळच मौजे गोपाळपूर इथे शासनाकडून जागा
मिळवून बेघर व अल्प उत्पन्न महिलांसाठी पंढरपूर अर्बन बँकेच्या साहाय्याने दीडशे घरांची वसाहत उभी केली. या वसाहतीत एका शिक्षण संस्थेचीही उभारणी केली. याचा आत्मिक आनंद माझ्यासाठी मोठा आहे.
अतिथी संपादक भारुडसम्राज्ञी, पंढरपूर
(शब्दांकन : महेश भंडारकवठेकर)
बातम्या आणखी आहेत...