आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच अक्षरांची गोष्ट : त्यानं उचललेली कावड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातात कुठलंसं पुस्तक होतं, पण पानावर काही दिसेचना. आजूबाजूचा आवाज, माणसं सारं काही जणू अदृश्य झालं होतं आणि खिडकीतून दिसणारं निळं, निश्चल आभाळ त्या दोघांची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी मला सांगत होतं.
सकाळसारखीच संध्याकाळी परतीची इंद्रायणी पकडली. रिझर्व्हेशन नव्हतेच. समोर येईल त्या डब्यात घुसलो. आजूबाजूच्या गर्दीची, डब्यातल्या केर-कचऱ्याची आणि मुख्य म्हणजे, जागा मिळेल की नाही, याची काही फिकीरच नव्हती. माणसाला भेटायची नशा काही वेगळीच असते. दुर्मीळ होत चाललीत माणसं आजकाल. रामनं त्यांच्याबद्दल सांगितल्यापासून या जोडीला भेटायची ओढ लागली होती. गाडीनं पोफळज वाशिंबे वेगात मागं टाकलं आणि पारेवाडीचा परिसर दिसू लागला. उजनीच्या बॅक वॉटरमुळं हिरवी समृद्धी आलेला भाग...! माझं सारं बालपण या भागात गेलेलं... धावत्या गाडीतून ओळखीच्या खुणा पाहताना उगीच आभाळ भरून आलं...! इंद्रायणीनं भीमेचा प्रवाह ओलांडला. गाडी कुठल्या अनिवार ओढीनं धावत होती, कोण जाणे...! खूप गर्दी होती. मी उभा होतो, खिडकीतून बाहेर पाहात... हातात कुठलंसं पुस्तक होतं, पण पानावर काही दिसेचना. आजूबाजूचा आवाज, माणसं सारं काही जणू अदृश्य झालं होतं आणि खिडकीतून दिसणारं निळं, निश्चल आभाळ त्या दोघांची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी मला सांगत होतं.
...लग्न झालं तेव्हा कशीबशी अठरा वर्षांची असेल ती. अकरावीला असताना तिचं लग्न झालं. तिला कडा आष्टी भागात दिलं होतं. नवी स्वप्नं घेऊन तिनं संसार सुरू केला. लग्न होऊन अजून धड दीड महिनाही झाला नव्हता. एके दिवशी ती स्वैपाक करत असताना मागून कुणीतरी तिच्या डोक्यात लोखंडाची सळई घातली. घाव एवढा प्रचंड होता की, ती बेशुद्ध पडली. हळूहळू सगळा उलगडा झाला. तिच्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालं होतं. चंदाशी लग्न करताना त्यानं ही बाब कुणालाच सांगितली नव्हती. त्याची पहिली बायको नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळं चिडली होती आणि तिनं चिडून चंदाच्या डोक्यात लोखंडी सळई घातली होती. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? संसार तर विस्कटलाच होता, पण चंदा जगेल की नाही, अशी अवस्था झाली होती. तिला डोक्याला जबर मार लागला होता. ती धड शुद्धीवरही नव्हती. उपचार सुरू होते. गावातल्या डॉक्टरांकडून फरक पडेना. चंदाला पुण्याला हलवले. आठ-नऊ महिन्यांनी ती पुरेशा भानावर आली, बरी झाली. शरीरानं ती बरी झाली, पण तिच्या मनावर झालेला आघात भरून यायला तयार नव्हता. पुढं काय, असा प्रश्न अवघ्या विशीत असणाऱ्या चंदासमोर आ वासून उभा होता. तिला परत नांदायला पाठवावं, असं पारंपरिक विचाराच्या कुणाला वाटायचंही; पण जे झालंय ते आठवून कुणाची जीभ रेटायची नाही. आयुष्याची गतीच जणू खुंटली होती. चंदा खोलीच्या एकमेव खिडकीतून तासन‌् तास दूरवर बघत राहायची. सकाळ सरायची, दुपार टळायची, संध्याकाळ व्हायची, पण तिची खिडकी सुटायची नाही. आभाळातला कुठलाच तारा तिच्याकडे बघून हसायचा नाही. पोर वेडी तर नाही झाली, म्हणून आई-बाप-भाऊ काळजी करायचे.
चंदा खरं म्हणजे, केशवच्या सख्ख्या आत्याची मुलगी. केशव उद्धव मंजुळे. २००८मध्ये चंदाचं लग्न होण्यापूर्वी तिचं स्थळ केशवलाच सांगून आलं होतं. पण केशव त्या वेळी एसवायबीएला होता. धाकट्या बहिणीचं लग्न अजून व्हायचं होतं. लग्नाला होकार द्यावा, अशी त्याची परिस्थितीच नव्हती. वडील गवंडी काम करायचे, वयानुसार त्यांना ते होत नव्हतं आता. धाकट्या भावाला शिक्षणात रस नव्हता, तो गॅरेजवर काम करत होता. केशव थोरला, तो आठवी-नववीपासून पडेल ते काम करत शिकत होता. हॉटेलमध्ये काम असो की कुठली मोलमजुरी असू दे, केशवला कामाची लाज कधी वाटली नाही. पण अजून आपण आपल्या पायांवर उभे नसताना लग्न करायचं कसं, म्हणून त्यानं त्या वेळी चंदाच्या स्थळाला नकार कळवला. पण चंदाच्या आईवडिलांना घाई असल्यानं त्यांनी तिचं लग्न जमवलं आणि पुढं सारं हे रामायण घडलं.
चंदा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना केशव तिला बघायला जायचा. ती तर बेशुद्ध होती, बोलणं पाहणं तर दूरच, पण तिची ती अवस्था पाहताना त्याला आतून वाटायचं, ‘हिची ही अवस्था आपल्यामुळं झाली आहे. आपण लग्नाला होय म्हणालो असतो, तर कशाला घडलं असतं असं? चुकलंच आपलं!’ एक गिल्ट त्याचं मन व्यापून टाकायचं. तो तिच्या अवस्थेकडं पाहायचा. लहानपणापासून नातेवाईक या दोघांना नवरा-बायको म्हणून चिडवायचे. केशवला ते आठवायचं, आणि चंदाची परिस्थिती पाहून मनोमन वाईट वाटायचं. ती समोर दिसत होती, बेडवर पडलेली. पण किती अदृश्य भिंती उभ्या होत्या मध्ये...!
आता चंदा बरी झाली होती. केशवचं शिक्षण संपलं होतं. त्यानं हिंदी विषयात पदवी घेतली. अर्थात पदवी घेतली, तरी नोकरी लगेच मिळणार थोडीच? केशवची मोलमजुरी सुरूच होती. अजून धाकट्या बहिणीचे लग्न जमायचे होते. केशवची घालमेल सुरूच होती. त्याला चंदाशी लग्न करायचे होते. पूर्वी तिला नकार देऊन केली चूक त्याला दुरुस्त करायची होती. चंदाला पुन्हा हसरी, आनंदी पाहायचे होते. हे काम त्याच्याशिवाय दुसरे कुणीच करू शकणार नाही, याची त्याला खात्री होती. राम नात्यानं त्याचा काका, पण वयानं मित्रासारखा. त्याचा आधार होता. तो त्याला पुढं जाण्याकरिता धीर देत होता, पण ‘दुसोट्याच्या पोरीसोबत लग्न करायचं कसं?’ मनात लाख प्रश्न होते.
“येडा झालाय का काय केश्या, भडव्या पोरगी कशी सीलबंद पायजेल...!”, पोरं त्याची टर उडवत होती. संधी मिळेल तिथं तोंड घालणारी पोरं त्याला नीतिमत्ता शिकवत होती.
“सेकंड हॅन्ड बायकूऽऽऽ काय लेका मानूस हायेस का कोन तू...! आपल्या वडार समाजात केलंय का कुणी असं? पयलं लगीन हाय तुझं, दुसोट्यावरला नवरदेव असतास तर बात येगळी.” बाई माणूस असते, हे यांना मान्यच नाही. अरे, लग्न करताय की मोटार सायकल खरेदी करतायेत लेकाचे...!
पण, केशवच्या वडलांचा पहिल्यापासून केशवच्या या निर्णयाला पाठिंबा होता. घरं बांधणारा गवंडी माणूस. घरं मजबूत पक्की कशी बांधायची, हे त्यांच्या रक्तातच...! ‘नकू कुनाला पुसत बसू, पोरा. तुजी कावड तुलाच घ्यावी लागंल खांद्यावर,’ वडील सांगत होते. पण ही कावड खांद्यावर घेणं सोपं नव्हतं.
“तुला लाज वाटती का रं कुत्र्या, तू समद्यात मोठा पोरगा हायेस माझा. दीर-नंदांची एवढी लग्नं लावून दिली मी थाटामाटात. तुजं लगीन ह्ये पहिलं कार्य हाय आपल्या घरचं. आरं, मोठी सून म्हणजे सुवासिन असते घराची! तू अशा पोरीला सून करायचं म्हनतूस, जिला चार आयाबाया हळदकुंकवाला पन बोलावणार नायती. आरं, कुठनं बुध्या सुचली तुला असली?” केशवची आई त्याच्याशी रात्र रात्र भांडत होती. ती या लग्नाच्या एकदम विरुद्ध होती.
पण केशवचा निर्णय पक्का होता. त्यानं एके दिवशी चंदाच्या घरी फोन केला. तो चंदाच्या आईशी आणि चंदाशी बोलला. चंदा मनातल्या मनात हरखली. खिडकीच्या दूर, उगवतीच्या कोपऱ्यातून उजेड येताना दिसत होता. केशव समीर आणि हाजीमलंग शेख या आपल्या दोन मित्रांसोबत चंदाच्या घरी गेला. सोबत राम मंजुळे होताच. त्यानं चंदाच्या घरच्यांना आपण चंदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. अजून आईचा या लग्नाला विरोध आहे, पण मी तिची समजूत काढीन, केशवने सांगितले. मात्र हे लग्न दीपाचे, माझ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी करणार नाही, हेही त्याने स्पष्ट केले. आपण असे वेगळ्या पद्धतीचे, दुसोट्याच्या मुलीसोबत लग्न केले आहे, याचा त्रास तिचे लग्न जमवताना होऊ नये, अशी त्याची इच्छा होती.
केशवने निर्णय घेतला, पण तो पार पाडणे सोपे नव्हते. त्याची आणि आईची रोज खडाजंगी चर्चा होत होती. ‘अग, चंदा ही तुझी लेक असती तर तू काय केलं असतंस? तुला काय वाटलं असतं?’ केशव पोटतिडकीनं विचारत होता. हाच प्रश्न त्यानं सुरुवातीला या लग्नाच्या विरोधात असणाऱ्या दीपालाही विचारला. हळूहळू वाटा मोकळ्या होत होत्या. आईला, दीपाला केशवचे म्हणणे पटत होते. चंदाच्या आयुष्यात जे झाले, त्यात तिचा दोष तो काय? आणि जर दुसोट्यावरचा पुरुष लग्न करू शकत असेल तर बाईनं का करू नये? माणूस विचार करू लागला म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी स्वच्छ दिसू लागतात. केशवची आजी म्हणायची, तुला चंदाशी लग्न करायचं असेल तर आधी तुझं लग्न रुईटीच्या झाडाशी लावावं लागंल. म्हातारीनं ह्ये कुठं ऐकलं होतं कोण जाणे? अंध समजांची ही बजबजपुरी माजलेली. वाट त्यातून काढायची होती. केशवचे शिकले-सवरलेले नातेवाईक या लग्नाला विरोध करत होते. सरकारी नोकरी करणाऱ्यांना महात्मा जोतिबा फुल्यांच्या वाटेने चाललेला केशव सहन होत नव्हता. पण केशवनं निर्णय घेतला होता.
१० सप्टेंबर २०१५... सगळ्या विरोधाला न जुमानता केशवनं चिखलठाणच्या कोटलिंग मंदिरात चंदासोबत लग्न केलं. ‘चंदाला मुंडावळ्या बांधू नका, तिला हळद लावू नका,’ असे फुकटचे सल्ले आयाबायांनी केशवच्या आईला दिले होते, पण तिने ते मानले नाहीत. तिच्यातला बदल वरवरचा नव्हता, तो आतून, हृदयातून आला होता. तिनं स्वतःच्या हातानं हळद कुटून सुनेच्या अंगाला लावली, मुंडावळ्या बांधल्या. काही सुशिक्षित नातेवाईक लग्नाला आलेच नाहीत, काही आले तरी न जेवताच गेले, काहींनी नव्या जोडप्याकडून पाया पडून घेणेदेखील टाळले. आपापली वैचारिक उंची!!!
हे सारं ओलांडून केशव-चंदा आज पुढं आले आहेत. त्यांच्या सहजीवनानं मैलाचा पहिला दगड ओलांडला आहे. आजही जेऊरच्या स्टॅण्डवर केशव तुम्हाला एका हॉटेलात काम करताना दिसेल. पण गल्ल्यावर किंमत चुकती करायची सवय असलेल्या आपल्याला केशवची खरी किंमत कळेल का? त्यानं उचललेली कावड झेपेल का आपल्याला? मी स्वतःलाच विचारतो.
परंपरागत दगड फोडणाऱ्या वडार समाजात जन्माला आलेल्या केशवनं अवघ्या समाजालाच नवी वाट दाखवली आहे. योनिशूचितेच्या बेगडी कल्पनांना झुगारून देताना, त्यानं बाईचं माणूसपण ठळक केलं आहे. त्याच्यासोबत उभी असलेली आजची आनंदी चंदा पाहताना, ही मुलगी कधी दीर्घ काळ कोमात होती, हे आपल्याला पटत नाही. कितीतरी काळ सूर्य हरवलेल्या या वस्तीत केशव-चंदानं नवी क्रांती केली आहे. त्यांच्या डोईवरल्या गंजलेल्या पत्र्याला प्रेमाचा मोहोर फुटला आहे.
डॉ. प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...