आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापडपाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाचं आणि कांदा भजी, वाफाळता चहा किंवा कॉफी (किंवा रमसुद्धा चालेल म्हणा), मक्याची भाजलेली कणसं, यांचं नातं जितकं अतूट आहे, तितकंच किंवा त्याहूनही अधिक अतूट नातं आहे ते पावसाचं आणि कवितांचं. (तुंबलेली गटारं, जाम झालेले खड्डेयुक्त रस्ते, गळकी छपरं, फाटक्या-मोडक्या छत्र्या, साथीचे रोग वगैरेंचंही तसं पावसाशी अतूट नातं असतं, पण त्याचा उल्लेख करणं नॉन-पोएटिक असल्यानं तूर्तास ते पेपरांतल्या ‘वाचकांची पत्रे’मध्ये पत्रं लिहिणाऱ्या किंवा ट्विटर-फेसबुकवर पोस्टी टाकणाऱ्या लोकांसाठी राहू देत.)
पावसाचं रसिक मनावरचं हे गारूड ‘इज्जत पापड’ या पापड उत्पादन करणाऱ्या नामांकित कंपनीनं केव्हाच ओळखलं होतं. म्हणूनच गेली कित्येक वर्षं पावसाळ्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या मराठी पेपरांतल्या त्यांच्या जाहिरातींमध्ये एका नामांकित कविवर्यांनी रचलेली एक पाऊसकविता असायचीच. किंबहुना कित्येकदा ती जाहिरात आल्याशिवाय पाऊसदेखील पडत नसे. लोकांनाही त्या कवितांची एवढी सवय झाली होती की, ‘इज्जत पापड’च्या जाहिरातीतली कविता वाचल्याशिवाय त्यांच्यानं ताटातला पापड मोडवत नसे.
या वर्षी मात्र ‘इज्जत पापड’च्या मुख्यालयात सचिंत वातावरण होतं. कारण गेल्याच वर्षी पाऊसकविता लिहिणाऱ्या कविवर्यांचं दुःखद निधन झालं होतं. पावसाळा येऊन ठेपला होता. वर्षानुवर्षं चालत आलेली परंपरा या वर्षी खंडित होते की काय, या विचारानं सारे काळजीत पडले होते. कंपनीत पापडांचा भरपूर साठा होता. यंदा कवितायुक्त जाहिरात आली नाही, अन् त्यामुळे पाऊसच आला नाही तर? त्याहून वाईट म्हणजे पापड विकलेच गेले नाहीत तर? तशात आधीच्या कवींच्या तोलामोलाचा कवीदेखील आढळेना. काय करावं बरं? टेन्शन, टेन्शन!
या समस्येवर ब्रेनस्टॉर्मिंग करण्यासाठी कंपनीच्या सर्व एक्झिक्युटिव्ह्जची मीटिंग बोलावण्यात आली. बराच काथ्याकूट झाला. मग नव्यानंच रुजू झालेल्या एका एक्झिक्युटिव्हच्या डोक्यात एक आयडिया आली. कवींची स्पर्धा घेऊन सर्वोत्कृष्ट पाऊसकविता जाहिरातीत का छापू नये? सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली. त्याप्रमाणे स्पर्धा जाहीर करण्यात आली. घसघशीत बक्षीसदेखील ठेवण्यात आलं. ‘इये महाराष्ट्रदेशी’ बहुतांश भागात दुष्काळू असला, तरी पावसावर कविता रचणाऱ्या कवींचा मात्र सुकाळू असल्यानं भरपूर प्रवेशिका आल्या.
त्यांतल्याच काही कविता ‘लीक’ होऊन आमच्या हाती लागल्या. (त्यात काय मोठंसं? विद्यापीठांतल्या पेपरांना कडेकोट बंदोबस्तातूनही पाय फुटू शकतात, तिथं कविता क्या चीज है?) त्यांतलेच काही मासले ‘रसिक’च्या वाचकांसाठी अंशरूपाने इथे सादर करीत आहोत.
ग्रीष्माचा अतिदाह साहुनि धरा जेव्हां सुकू लागली।
शीतल काव्यजला विदग्ध जनता तेव्हा मुकू लागली॥
येई पाऊस मग सुरताल धरुनी, झरझर पडे बापडा।
रात्रीच्या चखण्यास जनहो, खा ना गडे पापडा॥
- पंतकवी बोरोपंत झिंगले
-----------------------
भडक जांभळं भरलं आभाळ
बशीतल्या पापडाला पिवळी भोवळ
त्याच्यामधी खमंग बाई मच्छीचा दरवळ
सांजच्या पारी गं पाऊसयेळेला
प्याल्यातल्या अमृतानं पडावी भूल
बशीतल्या पापडाला पिवळी भोवळ
- निसर्गकवी धो. धो. महापूर
-----------------------
विश्रब्धाचा भाजुन पापड
सखी निघाली आभाळावर
कोरतील मग गोंदणनक्षी
कोण प्रियेच्या मृदु गालावर?
बैराग्याचे भीषण प्राक्तन
चर्चबेलची घणघण नाजुक
मठात निजल्या पाउसधारा
कोसळती कधि होउन साजुक?
- गूढकवी ‘स्ट्रेस’
-----------------------
मानवतेच्या सरणावर
मतलबाचा पापड भाजणाऱ्या
बुभुक्षितांनो
जरा कळ काढा
लवकरच जमतील
क्रांतीच्या आकाशात
ढग विद्रोहाचे
मग कोसळेल पाऊस
धो धो क्रांतीचा
अन् त्या लोंढ्यात
वाहून जातील
तुमचे विकृत मनसुबे
जरा कळ काढा!
- विद्रोही कवी सामदेव रसाळ
-----------------------
मेघ केव्हाच सर्दावला यार हो
या, नवा मेघ आणू चला यार हो
पावसाची नको एवढी कौतुके
बरसणे ही अघोरी कला यार हो
लोक रस्त्यावरी खावया लागले
पापडांचा अता फैसला यार हो
Á गझलकार रमेश खट
-----------------------
पावसा पावसा पड
तुला देतो पापड
पापड राहिला कच्चा
पाऊस आला सच्चा
- बालकवी कु. सुदीप खोटे
-----------------------
आरं खुशीत खातोय पापड
माज्या गालावर लाली
आन ढगात भरलंय वारं
ही पावसाची बाधा झाली
आता अधीर झालोया
बग बधीर झालोया
भर पावसामंदी भिजून
चिंबाट मागं आलोया
आन रिमझिम बुंगाट झरझर चिंगाट
जोरात पडतंया
पाऊस झिम झिम झिम झिम
झिम झिम झिम्माट
झिम झिम झिम झिम झिम झिम झिम्माट
झिम झिम झिम झिम झिम झिम झिम्माट
झिम झिम झिम झिम झिम
- सुसाटकवी संजय-विपुल
-----------------------
प्रवेशिकांच्या पावसानं ‘इज्जत पापड’चं ऑफिस सध्या ओसंडून वाहतंय. लवकरच आपल्याला त्यांच्या जाहिरातीतून नवी पाऊसकविता वाचायला मिळेल. तोवर वाट पाहू या.
गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...