आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे ओशाळला शेरलॉक होम्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. वॉटसन यांच्या दैनंदिनीतील एक अप्रकाशित नोंद
----------------------------------------------------------
माझ्या वैद्यकीय व्यवसायाचा जम बसू लागला होता. मध्यंतरी माझा विवाहदेखील झाल्यानं मी माझा २२१-बी बेकर स्ट्रीटवरील मुक्काम हलवून दुसरीकडे घर घेतलं होतं. आठवडेच्या आठवडे शेरलॉक होम्सची भेट होत नसे. होम्स आता केवळ लंडन किंवा इंग्लंडमधलाच नव्हे, तर संपूर्ण जगातला सर्वाधिक मागणी असलेला डिटेक्टिव्ह बनला होता. शिवाय ‘युनेस्को’नं त्याचं नाव जगातला सर्वश्रेष्ठ डिटेक्टिव्ह म्हणून जाहीर केलं होतं. (त्याच काळात माझ्या ‘वॉटसन’ या नावाचं मूळ ‘वात्स्यायन’ आहे, असं ‘नासा’च्या संशोधनात निष्पन्न झाल्यामुळे माझाही लौकिक वाढला होता. अनेक लोक आपल्या लैंगिक जीवनाबाबत माझं मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागले होते. त्यामुळे माझी प्राप्तीदेखील बऱ्यापैकी वाढली होती.)
मध्यंतरी शेरलॉक होम्स कुठल्याशा गुप्त कामगिरीवर दोनेक महिन्यांसाठी भारतात गेला होता. तो परत आल्याचं कळताच आपल्या जुन्या मित्राला भेटावं, म्हणून एका रविवारी मी २२१-बी बेकर स्ट्रीटच्या त्याच्या घरी गेलो. ते घर आम्ही एकत्र राहात असताना होतं, अगदी तसंच होतं. सगळीकडे नोंदींच्या कागदांचा, वर्तमानपत्रांमधल्या कात्रणांचा पसारा पडला होता. घरभर रसायनांचा उग्र वास भरून राहिला होता. बाजूला टेबलावर शिळ्या अन्नानं भरलेल्या प्लेटी आणि चहाचे कप तसेच पडले होते.
होम्सचं काहीतरी प्रचंड बिनसलंय, हे माझ्या तत्काळ लक्षात आलं. कोचावर अर्धवट पहुडलेल्या अवस्थेत दोन्ही हातांची बोटं जुळवून केस पिंजारलेला होम्स भकास मुद्रेनं छताकडे पाहात होता. त्याच्या तोंडातला पाइप विझला होता, तरी त्यानं तो तसाच तोंडात ठेवला होता. बाजूलाच त्याचं व्हायोलिन पडलं होतं. त्यावर चढलेली धुळीची पुटं सांगत होती की, कित्येक दिवसांत त्यानं व्हायोलिनला हातही लावला नव्हता. त्याच्या कोटाच्या वर सरकलेल्या बाहीतून त्याचा फिकुटलेला हात दिसत होता आणि त्यावर दिसणाऱ्या इंजेक्शनच्या सुईच्या असंख्य खुणा सांगत होत्या, की होम्सनं त्याचं ते कुख्यात कोकेनचं ‘सात टक्के द्रावण’ वारंवार टोचून घेतलं होतं.
मी काही बोलणार, तोच मिसेस हडसन, घरमालकीण, हाती चहाचा ट्रे घेऊन आत आली.
“तुझ्या मित्राला जरा समजाव, वॉटसन,” किटलीतून कपात चहा ओतत मिसेस हडसन मला म्हणाली, “परवा भारतातून परतल्यापासून अन्नाला हातही लावला नाहीये त्यानं. शिवाय वेळीअवेळी पिस्तुल झाडून भिंतीची चाळण केलीये त्यानं…”
“धन्यवाद, मिसेस हडसन,” होम्स ओरडला, “आता जाऊ शकतेस तू!”
स्वतःशीच बडबडत मिसेस हडसन निघून गेली. मी लोणी लावलेला पावाचा तुकडा चावत आणि चहाचा घोट घेत होम्सला विचारलं, “तुझ्या चहात साखर नेहमीइतकीच घालू ना?”
“मोरीत ओत तो चहा!” होम्स चिडून उत्तरला.
“नसेल घ्यायचा चहा तर नको घेऊस, पण असा चिडतोयस का? कितीतरी दिवसांनी भेटतो आहोत आपण. एखाद्या कठीण, गुंतागुंतीच्या केसमध्ये व्यग्रबिग्र आहेस का तू?”
“कठीण? गुंतागुंतीची?” होम्स दीर्घ सुस्कारा टाकून म्हणाला, “त्याहून भयंकर!” मग त्यानं विझलेल्या पाइपातली राख तिथंच फरशीवर झटकली. कोटाच्या खिशातून पाउच काढला आणि त्यातली तंबाखू पाइपात भरून पाइप शिलगावला आणि एक दीर्घ झुरका घेऊन धुराच्या लोटासोबतच आणखी एक सुस्कारा सोडला. समोरच्याची उत्सुकता ताणत वेळ काढण्याची होम्सची सवय मला चांगलीच माहीत असल्यानं मी गप्प राहून चहाचे घुटके घेऊ लागलो.
आणखी दहा-बारा धुराचे लोट आणि सुस्कारे सोडल्यावर होम्स म्हणाला, “वॉटसन, मी या डिटेक्टिव्हच्या व्यवसायातून निवृत्त व्हायचं ठरवलंय!”
“काय??!!” माझ्या हातचा कप खाली पडतापडता राहिला.
“अरे, पण होम्स, मग तू जगणार कसा आता?” मी विचारलं.
“त्यात काय? मी व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम करीन.”
“मला कमाईविषयी काही म्हणायचं नाही. पण मला माहित्येय की, जर तुला अत्यंत किचकट, गुंतागुंतीच्या केसेस सोडवायला मिळाल्या नाहीत, तर तू प्रचंड अस्वस्थ होतोस. अशा परिस्थितीत जगणार तरी कसा तू होम्स?”
“माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच, वॉटसन, मी पुरता नामोहरम झालोय. मोठ्या विश्वासानं कुणीतरी माझ्याकडे एक केस सोपवली होती. मी ती सोडवण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला. पण नाही सोडवू शकलो.” मनोजकुमार नामक एक भारतीय चित्रपट अभिनेता झाकतो तसा होम्सनं आपला चेहरा हाताच्या पंजानं झाकून घेतला. होम्सला एवढं नाउमेद, अगतिक, हताश, निराश झालेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. त्याची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं.
“पण होम्स, तुला नामोहरम करू शकणारी या जगात एकच व्यक्ती होती. मॉरिअ‍ॅर्टी! पण तो तर कधीच मेलाय. मग आता तुलादेखील हरवणारा हा नवा खलनायक कोण उपटलाय?”
“छे छे, तुला नीट कळलं नाहीये, वॉटसन. सविस्तर सांगतो. ऐक. दोन-अडीच महिन्यांपूर्वी काही भारतीय लोक माझ्याकडे आले. ते एका मोठ्या गरीब भारतीय लोकसमूहाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी मला एक शोधमोहीम हाती घेण्याची विनंती केली. मात्र माझी फी देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. लंडनपर्यंतचा प्रवासदेखील त्यांनी लोकवर्गणीतून केला होता. इंग्रजांनी भारत सोडून एवढी वर्षं झालीत. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य ढळला तरी भारतीयांचा इंग्रजांच्या बुद्धिवरचा विश्वास मात्र अजूनही ढळलेला नाही. काही वर्षांपूर्वी ‘बिअरउत्पादक उद्योगपतीच्या पलायनाचं रहस्य’ सोडवण्यासाठी तू आणि मी भारतात गेलो होतो, आठवतच असेल तुला. तर पुन्हा खूप दिवसांनी भारतात जाण्याची संधी मिळतेय तर ती का दवडा असा विचार करून मी त्यांची शोधमोहीम हाती घेतली आणि त्यांच्यासोबत भारतात गेलो.” होम्सनं पुन्हा एक झुरका घेतला.
“पुढं?” मी उत्सुकतेनं विचारलं.
“पुढं कसलं काय, वॉटसन? त्यांना जी वस्तू मला शोधायला सांगितली होती, तिच्यासाठी मी अक्खा भारत आडवा-उभा-तिरपा पालथा घातला. दिल्लीचे राजरस्ते, मुंबईचे महामार्ग, पुण्याचे बोळ अन् पेठा, वाराणसीचे घाट, बंगळुरूची उद्यानं, वृंदावनच्या कुंज-गलियाँ, मदुराईची मंदिरं, लखनऊचे कोठे, नॉइडाचे कारखाने, सगळीकडे वणवणवणवण फिरलो, पण मला ती वस्तू सापडली नाही ती नाहीच वॉटसन. अखेर निराश होऊन मी पराभव स्वीकारला अन् भारतीयांना तसंच त्यांच्या नशिबावर सोडून इथे परतलो.”
“अशी कोणती बहुमोल वस्तू होती ती होम्स? एखाद्या संस्थानाच्या महाराणीचा रत्नजडित हार?”
“नाही.”
“मग मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे?”
“छ्या!”
“मग नक्कीच कुणा अब्जाधीशाचं मूल पळवलं गेलं असणार.”
“छट!”
“मग शोधत तरी काय होतास तू होम्स? माझी उत्सुकता आणखी ताणू नकोस. पटकन सांगून टाक बघू.”
“दोन वर्षांहून अधिक काळ भारतातले लोक जी गोष्ट शोधताहेत तीच, वॉटसन! ‘अच्छे दिन’ शोधण्याची कामगिरी सोपवली होती, त्या लोकांनी माझ्यावर! आणि मी चक्क हरलो!!” होम्सनं पुन्हा चेहरा पंजानं झाकून घेतला आणि तो गदगदून हुंदके देऊ लागला.
“हं… मग तू आता व्हायोलिनवादनाचे एकल कार्यक्रम
करणारेस की, वाद्यवृंदात वाजवणार आहेस, होम्स?” मी हळुवारपणे विचारलं.
गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...