आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परत कोपच्यात: सप्त(भे) सूर कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या खेपेचं लफडं निस्तरायचंय. ओणमच्या दिवशी मी वामनजयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या ना? आता त्याचं परिमार्जन करावं म्हणतो. येत्या दसऱ्याला मी रावण पुण्यतिथीच्या शुभेच्छा देणाराय!
* स्थळ- पतंजली आश्रम. पात्रे- बाबा रामदेव
आणि न्यूज चॅनेलचा माइकधारी माणूस)
: मी जो आहे तो या ठिकाणी पतंजली आश्रम जो आहे त्या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता की बाबा रामदेव जे आहेत ते या ठिकाणी पद्मासन जे आहे ते घालून बसले आहेत. बाबा रामदेव, आपण भारतावर वारंवार होणारे दहशतवादी हल्ले जे आहेत त्या हल्ल्यांबद्दल काय प्रतिक्रिया द्याल?
: पतंजली का भूरे रंग का आटा और दो साल पुराना बासमती चावल…
: आणि बाबा, आपण विदेशातला काळा पैसा आणण्याबद्दल बोलला होतात त्याचं काय झालं?
: अपना मनी विदेशी कंपनियों को मत लूटने दीजिये…
: बरं ते राहू देत, आजकालची तरुण पिढी जी आहे तिच्यात व्यसनाधीनता जी आहे ती वाढत चालल्याबद्दल आपण काय म्हणाल?
: बच्चों को चॉकलेट की बुरी आदत से बचाएं. उन्हें पतंजली के…
: धन्यवाद बाबा रामदेव, आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. झ टीव्हीसाठी कॅमेरापर्सन अमुकतमुकसोबत मी फलाणाढिकाणा, पतंजली आश्रम.
-----------------------------
* स्थळ- उत्तर प्रदेशातली काँग्रेसची एक निवडणूक सभा. पात्रे- राहुल गांधी आणि एक जख्ख म्हातारा स्थानिक आयोजक
: हे समोर पगड्या घातलेले, हाती लाठ्या घेतलेले, हुक्का ओढणारे एवढे लोक का जमलेत?
: आं? काय बोललात राहुलजी? (कानातलं श्रवणयंत्र घट्ट करतो.)
: (मोठ्याने ओरडून) हे समोर पगड्या घातलेले, हाती लाठ्या घेतलेले, हुक्का ओढणारे एवढे लोक का जमलेत?
: तुम्हीच तर आदेश दिला होतात ना? मोठ्या मेहनतीनं जमवलेत हे लोक कुठून कुठून. हरयाणावाले तर आधी तयारच नव्हते यायला. मग ठर्रा अणि मटनाचं जेवण देण्याचं आश्वासन दिलं तेव्हा कुठं…
: अहो पण कोण लोक आहेत हे?
: खाप पंचायतवाले.
: हे कशाला आलेत इथं?
: अहो, तुम्हीच सांगितलं होतं ना फोनवर मला? तुम्हाला ‘खाप पे चर्चा’ करायचीय म्हणून?
: ‘खाप’ नव्हे, ‘खाट’ म्हणालो होतो मी! ‘खाट’! ‘खाट’!!
: असं होय? हे कानाचं मशीन बदलून घ्यायला पायजे आता.
* राहुलजी स्वतःच्याच डोक्यावर
मोबाइल आपटून घेतात.
-----------------------------
* स्थळ- राजनाथ सिंहांचे घर.
पात्रे- श्री व सौ राजनाथ सिंह
: ग्ल्ग्ल्ग ग्ल्ड्ग्ड्ग्ल्ग्ग्ल् ग्ल्ग्ग्ल्ग्ल्ग्ग्ल्…
: अहो हे कसले विचित्र आवाज काढताय घशातून?
: ग्ल्ग्ल्ग ग्ल्ड्ग्ड्ग्ल्ग्ग्ल् ग्ल्ग्ग्ल्ग्ल्ग्ग्ल्…
: मी काय म्हणतेय ऐकताय ना?
(बेसिनमध्ये चूळ मारतात)
: चुळ्ळ्ळ्ळ्ळळ्ळ्ळ… प्च्यूक्क! ख्रॉक्क्क्क्क्क!
: शी बाई! सक्काळी सक्काळी घसा खरवडताहेत!
: अहो श्रीमतीजी, मीठ घातलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या करतोय मी!
: का? घसा बसलाय की काय बोलून बोलून?
: तसं नव्हे, पण आज प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानला गंभीर आणि स्पष्ट इशारा द्यायचाय. तेव्हा आवाज खणखणीत नको?
: खरंच बाई! आणि खिशात दोन-चार स्ट्रेप्सिल्सदेखील असू देत, बरं का!
-----------------------------
* स्थळ- संसद भवनाची लॉबी.
पात्रे- संजय राऊत आणि भाजपाचे एक खासदार
: मला तुम्हा बीजेपीवाल्यांना काही विचारायचंय.
: विचारा ना राऊत साहेब.
: तुम्हाला शरम नाही वाटत? लाज नाही वाटत?
: अं?
: अरे, ते येतात, हल्ला करून निघून जातात आणि तुम्ही असे नामर्दासारखे फक्त निषेध करत बसता? त्यांना चांगला धडा का नाही शिकवत तुम्ही? त्यांच्या घरात घुसून त्यांना मारत का नाही तुम्ही?
: म्हणजे काय करायला हवं नेमकं?
: अरे, दहशतवाद्यांना जिवंत जाळायला पायजे!
: अगदी योग्य बोललात. तुम्ही पाचसात दहशतवादी पकडून आणा, म्हणजे त्यांना जिवंत जाळू आम्ही. आणखी काही विचारायचंय?
: जेवण झालं का?
-----------------------------
* स्थळ- अमित शाह यांचे कार्यालय.
पात्रे- अमित शाह आणि त्यांचा पीए
: हे बघा, रावणाचा एक छानसा फोटो मिळवा कुठून तरी.
: रावणाचा फोटो नाही मिळणार सर. त्या काळात फोटोग्राफीचा शोध नव्हता ना लागला…
: असं कसं म्हणता? आपल्याकडे तर अगदी वेदकाळातच सारे शोध लागलेत ना? म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथांतच लिहिलंय ना तसं? शिवाय नासा आणि युनेस्कोच्या म्हणण्यानुसार…
: तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण रावणाचा फोटो पाहण्यात नाही माझ्या. बहुधा त्याचा फोटो काढलाच नसावा कुणी.
: का बुवा? मोठ्ठा राजा होता ना तो? मग?
: दहा मुंडकी एकाच फोटोत कशी मावणार सर? म्हणून नसेल काढला फोटो.
: शक्य आहे. मग असं करा. एखाद्या चित्रकाराकडून रावणाचं चित्र काढवून घ्या.
: ते कशाला साहेब?
: मागच्या खेपेचं लफडं निस्तरायचंय. ओणमच्या दिवशी मी वामनजयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या ना? आता त्याचं परिमार्जन करावं म्हणतो.
: ते कसं करणार सर?
: येत्या दसऱ्याला मी रावण पुण्यतिथीच्या शुभेच्छा देणाराय!
-----------------------------
* स्थळ- नितीन गडकरींचा बंगला
पात्रे- नितीनभौ आणि वॉचमन
: साहेब, पोलिसवाले आलेत बाहेर.
: पोलिसवाले?
: सोबत श्वानपथक पण घेऊन आलेत.
: श्वानपथक? ते कशाला आणखी? बंगल्यात आम्ही नसताना चोरीबिरी झाली की काय? तुम्ही वॉचमन लोक झोपा काढता की काय रे?
: ऐकून तरी घ्या साहेब. चोरी वगैरे काही झाली नाहीय. त्यांना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचाय.
: प्रॉब्लेम? माझा कसला प्रॉब्लेम?
: तुम्ही त्या दिवशी एका कार्यक्रमात म्हटलं होतं ना, ‘अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गयी है’ म्हणून?
: मग?
: म्हणूनच तर आलंय श्वानपथक. तुमच्या गळ्यात अडकलेलं हाडूक शोधायला!
-----------------------------
* स्थळ- आदिवासी कल्याण मंत्र्यांची केबिन.
पात्रे- मंत्री आणि आदिवासी भागातील
आश्रमशाळा संचालक
: तुम्ही लोकांनी लाज आणलीय अगदी. कुपोषित भागात प्रॉब्लेम तुम्ही लोक क्रिएट करता आणि मग पत्रकार आम्हाला नाही नाही ते प्रश्न विचारतात. आमचाही जिभेवरचा ताबा सुटतो ना मग! आता राजीनामा मागताहेत विरोधी पक्षवाले.
: सॉरी साहेब, पण आम्ही तरी काय करणार? देवाधर्मापुढं आमचाही नाइलाज होतो.
: सरकारी अनुदानानं मिळालेल्या तांदळात भ्रष्टाचार करण्याचा आणि देवाधर्माचा काय संबंध?
: सध्या पितृपक्ष सुरू आहे ना साहेब!
: मग?
: पितृपक्षात पितरांना पिंडदान करावं लागतं. त्यासाठी भात बनवावा लागतो. भातासाठी तांदूळ लागतात. म्हणून घेतले जरासे तांदूळ आश्रमशाळेच्या भांडारातून, तर काय बिघडतं?
: हो रे हो. खरंय. देवधर्म महत्त्वाचा! मृत पितरं उपाशी राहिली तर पाप नाही का लागणार? योग्यच केलंत तुम्ही. या तुम्ही. मी आणखी अनुदानं मिळवून देता येतात का ते बघतो.
------------------
गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...