आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वगताच्या संगतीनं: कबुलीजबाब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉलस्टॉय यांचे 'कन्फेशन' हे पुस्तक १८८२मध्ये रशियन भाषेत पहिल्यांदा प्रकाशित झाले. या पुस्तकाचा गोपाळ आजगावकर यांनी 'कबुलीजबाब' या नावाने केलेला मराठी अनुवाद लोकवाङ‌्मय गृहाने २००७मध्ये प्रसिद्ध केला. इतक्या वर्षांनीही हे पुस्तक वाचकांना विशेषतः तरुणांना भावते आहे, कारण धर्म आणि त्याबाबत वाढत्या वयानुसार बदलणारी संवेदनशील तरुणांची मतं आजही तशीच आहेत.

नऊ महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधल्या दादरी इथल्या अखलाख हत्या प्रकरणाने परत डोकं वर काढलंय. गोमांसभक्षण करतो आणि घरात गोमांस ठेवलंय, असे आरोप करत हिंसक झालेल्या जमावाने अखलाखच्या घरावर हल्ला केला. या जबर मारहाणीत ५८ वर्षांचा अखलाख जागीच ठार झाला, तर त्याचा २७ वर्षांचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाचे गंभीर पडसाद समाजाच्या सर्वच थरांत उमटले. सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनेक साहित्यिक, विचारवंतांनी पुरस्कार परत केले. सरकारकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळी सापडलेले मांस परीक्षणासाठी पाठवले असता ते गोमांस होते, असा निर्णय नुकताच मथुरेच्या प्रयोगशाळेने दिला आहे.

गोहत्याबंदी असलेल्या उत्तर प्रदेशसारख्या राज्यात गोमांस बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि म्हणून अखलाख हा गुन्हेगार होता, असं या प्रकरणातल्या आरोपींचं म्हणणं आहे. पण म्हणून अखलाखला शिक्षा देण्यासाठी हिंसक होऊन कायदा हातात घेण्याइतका हा जमाव बेभान कसा झाला? असे काय घडले की, या जमावातल्या व्यक्तींचा सारासारविवेक नष्ट झाला आणि त्यांनी एकाला जिवे मारण्याचे निर्घृण कृत्य केले? गोहत्या किंवा गोमांसभक्षण हा एवढा भयंकर गुन्हा आहे का, की त्यासाठी एखाद्याला आपला जीव गमवावा लागेल?

हिंदू धर्मात गाय हा सर्वात पवित्र प्राणी आहे. गायीला माता मानून पुजण्यात येतं. धार्मिक महत्त्व असल्यामुळे गायींची हत्या करण्यात येऊ नये, अशी मागणी जेव्हा झाली तेव्हा अनेक राज्यांनी गोहत्याबंदी जाहीर केली. गोहत्या करावी किंवा करू नये, हा या लेखाचा विषय नाही; तसेच कुठल्या सरकारांनी गोहत्याबंदी लागू केली, कुणी नाही केली, आणि का केली किंवा नाही केली, यावरही इथे चर्चा करायची नाहीये. तर गोहत्येबाबत जी मतमतांतरे आहेत त्या पाठीमागे असलेल्या मानवी प्रेरणा काय आहेत? याचा विचार करताना धर्म आणि त्याचा व्यक्तीवरील प्रभाव याविषयी विचार करावा लागतो. आणि असा विचार करताना जगभरातल्या विचारवंतांसमोर प्रामुख्याने एक नाव येते, ते म्हणजे लिओ टॉलस्टॉय आणि त्यांचं या विषयावरील पुस्तक ‘कन्फेशन’! १८८२मध्ये रशियन भाषेत हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं. या पुस्तकाचा गोपाळ आजगावकर यांनी ‘कबुलीजबाब’ या नावाने केलेला मराठी अनुवाद लोकवाङ‌्मय गृहाने २००७मध्ये प्रसिद्ध केला. इतक्या वर्षांनीही हे पुस्तक वाचकांना विशेषतः तरुणांना भावते आहे, कारण धर्म आणि त्याबाबत वाढत्या वयानुसार बदलणारी संवेदनशील तरुणांची मतं आजही तशीच आहेत. वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या सामाजिक, धार्मिक जाणिवा बदलण्याच्या प्रक्रिया आजही जगभर चालू आहेत.

खरे तर टॉलस्टॉय आपल्याला माहीत असतात ते गांधीजींचे गुरू म्हणून. ‘वॉर अॅन्ड पीस’ या कादंबरीने १९व्या शतकातले सर्वोत्तम कादंबरीकार म्हणून टॉलस्टॉय जगप्रसिद्ध झाले. त्या वेळी ते फक्त ४१ वर्षांचे होते. त्यानंतर अना कॅरनिना ही कादंबरी आणि काही नाटके त्यांनी लिहिली. ते केवळ प्रसिद्ध लेखकच नव्हते तर अतिश्रीमंतही होते. रशियात तब्बल साडेसोळा हजार एकर जमीन असलेले टॉलस्टॉय सुखी, समृद्ध उमरावाचे जीवन जगत होते.
असं सर्व काही आलबेल असताना आयुष्याच्या मध्यावर अचानक टॉलस्टॉय यांना अस्वस्थ वाटायला लागले. या अस्वस्थतेला कारणीभूत ठरला तो एक शिरच्छेदाचा प्रसंग. खरं तर त्या काळी सार्वजनिक जागी छोट्या छोट्या कारणांवरून माणसांना मारून टाकणे, फारच सर्रास घडायचे. सर्व प्रश्नांवर हिंसेतूनच उत्तरे शोधली जायची. पण हिंसा हे कशावरचेच उत्तर असू शकत नाही, हे फार थोड्यांना उमगायचे.

दुसरीकडे धर्माचे माहात्म्य त्या काळी फार म्हणजे फारच होते. माणसाच्या रोजच्या जगण्यातही धर्म आणि धार्मिक नीतिनियमांचे काटेकोर पालन फार महत्त्वाचे मानले जायचे. तसे न करणाऱ्याला मोठी शिक्षा दिली जात असे. टॉलस्टॉयना या सर्वातून नैराश्याने घेरले. आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही त्यामुळे ते संपवावे, असे विचार मनात वारंवार यायला लागले. परंतु, प्रखर बुद्धिमत्ता आणि संवेदनशील मन असल्यामुळे नैराश्यावर मात करून टॉलस्टॉय अखंड लिखाण करत राहिले. नैराश्य आणि अस्वस्थता अनेक प्रश्न घेऊन आलेली होती. या प्रश्नांची उत्तरे शोधताना स्वतःच्या अस्तित्वाच्या अर्थाचा शोध, नैतिक प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हेच त्यांच्या जीवनाचे पुढचे सूत्र बनले. आपल्या नैतिक प्रेरणा त्यांनी धर्मात शोधल्या. त्यांच्या या प्रयत्नाचा पहिला उद‌्गार म्हणजे ‘कबुलीजबाब’ हे पुस्तक होय.

आपण नैराश्यावर कशी मात केली, याचे वर्णन टॉलस्टॉय यांनी या पुस्तकात केले आहे आणि त्या बरोबरच प्रगती या संकल्पनेचा नक्की अर्थ काय, याचाही ऊहापोह केला आहे. प्रगतीबद्दल लिहिताना त्यांनी जे लिहिलंय ते फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते, “आपल्या समाजाचा ‘प्रगतीवर’ फारच आंधळा विश्वास आहे. लोक किंवा समाज जीवनाचं पूर्ण आकलन करून घेत नाहीत आणि हा अभाव ते प्रगतीच्या मागे लागून स्वतःपासून लपवतात.” खरे तर हा टॉलस्टॉयना झालेला हा साक्षात्कारच होता. पुस्तकात पुढे जीवनातील नैतिकता, प्रगती, अस्तित्वाचे प्रयोजन अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कशी शोधता येतील, याचे विवेचन आहे. विज्ञान आणि अमूर्त विज्ञान (ज्याला ढोबळ मानाने अध्यात्म शास्त्र म्हणतात) या दोन्हींच्या तौलनिक अभ्यासाने वरील प्रश्नाची उकल कशी होऊ शकते, याविषयी टॉलस्टॉय यांनी सहज सोपे विवेचन केले आहे. त्यासाठी शोपेनहावर, सॉलोमन, सॉक्रेटिस, आपल्याकडची शाक्यमुनींची मांडणी या सर्वांचे काय विवेचन आहे, तेदेखील या पुस्तकात येते. टॉलस्टॉयचे हे आत्मकथन त्यामुळेच धर्म आणि नीतिमूल्ये या गहन प्रश्नांवर सोप्या भाषेतले भाष्य असल्यासारखे वाटते.

आपल्या पुढील आयुष्यात टॉलस्टॉय यांनी या विषयावर विपुल लेखन केले. तथाकथित धर्माला खऱ्या धार्मिकतेची म्हणजे नैतिकतेची चाड नसते, असे त्यांचे म्हणणे होते. धर्माची चिकित्सा केली म्हणून अर्थातच त्यांना धर्मबहिष्कृत केले गेले. तर दुसरीकडे युरोपातल्या त्या वेळेच्या बुद्धिवाद्यांचाही टॉलस्टॉयना विरोध होता, कारण ते धर्माला कालबाह्य मानत होते. तर टॉलस्टॉयना नैतिकतेची प्रेरणा देणारा आणि जगण्यास अर्थ देणारा या अर्थाने धर्म ही फार महत्त्वाची गोष्ट वाटत होती. याशिवाय सत्य आणि अहिंसा या दोन्ही गोष्टींचा त्यांनी आपल्या लेखनातून सदैव पुरस्कार केला. गांधीजीनी त्यांच्याबद्दल लिहिलंय, ‘टॉलस्टॉय हे आपल्या काळातील सर्वात सत्यवादी पुरुष होते. या युगाने निर्माण केलेले सर्वात महान असे अहिंसेचे प्रेषित होते.’
आज प्रत्येकच धर्म हा धार्मिकतेचे अवास्तव अवडंबर माजवणारा, उन्मादी बनत चाललाय. या पार्श्वभूमीवर खरी धार्मिकता ही प्रेमावर, क्षमाशीलतेवर, अहिंसेवर आधारित असते, असे सांगणारे टॉलस्टॉयचे विचार पुन्हा वाचले पाहिजेत. पुनःपुन्हा वाचले गेले पाहिजेत.
जान्हवी खांडेकर
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...