आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संभा'विताचे उपाख्‍यान: बोले तैसा चाले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झालं असं की, १६ वर्षांच्या कोवळ्या वयात सर्व बाबतीत माझा आदर्श असलेल्या एका नातेवाइकाला मी एक दिवस समोरून सिगारेट ओढत येताना बघितलं... अाणि मी हादरलोच. हं, हं हल्ली त्यात काही विशेष नाही वाटणार... पण तेव्हाचे दिवस जरा नजरेसमोर आणा, सज्जनहो. तेव्हा अचंबा, आक्रित, स्वप्नभंग आणि असंच काय काय वाटायचं, असलं काही पाहून. त्याला चक्क सिगारेट ओढताना पाहून मला विलक्षण दु:ख झालं... आणि त्या तिरिमिरीत मी कविता लिहून मोकळा झालो -
स्वप्नस्थ दैवतांनी, म्हटली चटोर गाणी
अज्ञात वेदनेला, भरतीच आली आणि॥
आज मागे वळून बघताना त्या भाबडेपणाचं हसू येतं. आपल्यापैकी बहुतेकांना वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी आपल्या आदरणीय आणि परमप्रिय मातापित्यांनी ‘तसले’ काही केले आणि आपला जन्म झाला, या ज्ञानाने असेच भीषण धक्के बसलेले असतात. एकूणात, आपल्या आदरस्थानांनी आपल्या मनातल्या प्रतिमेला विपरीत कधी काही वागू नये, असं वाटणं हे पौगंडावस्थेतल्या भाबडेपणाचं एक महत्त्वाचं लक्षण असतं. तसंच काहीसं आपलं ‘छापील शब्दांविषयी’ असतं बघा. ‘हम नही कहते, किताबों मे लिखा है यारो।’ यावर आपला ज्याम विश्वास असतो. एखाद्याने काही ‘लिहिलं’ की त्यामागे त्याची आयुष्यभरची तपश्चर्या आणि १०० टक्के कन्व्हिक्शन असतं, ही आपली श्रद्धा. मुद्दा असा आहे की, एखाद्याचे वागणे आणि त्याचे बोलणे यात अंतर पडले की, आपल्याला धक्का बसतो, सहनच होत नाही ते. त्यामुळेच ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ यासारखे सुभाषित आपल्याकडे फार प्रतिष्ठा पावले आहे. (एकूणात सुभाषितांविषयी काही माझं फारसं बरं मत नाहीच, पण ते एक सोडा... त्याविषयी पुन्हा केव्हा तरी बोलू.)
आता हाच विषय जरा साहित्य, पुस्तके यांच्याकडे नेऊ. आमचे आदरणीय लेखक भालचंद्र नेमाडे एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते की, लेखकाने शक्यतो आपल्या अनुभवाबाहेरचे फारसे लिहू नये. मला स्वत:ला यात तथ्य आढळते. अर्थात ‘शक्यतो’ आणि ‘फारसे’ या अटींसकट. तुम्हीच बघा, उगाच एखाद्या शाळामास्तराने अस्सल अनुभव न घेता, पायलटच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यात अर्थ नाही. (म्हणा एखाद्या पायलट किंवा सैनिकाने शाळामास्तराच्या जगण्यावरदेखील लिहू नये... विमान चालवण्याइतके काही ७०-८० पोरांचा वर्ग चालवणे सोपे नसते. असो.)
सांगायचा मुद्दा, आपण जे बोलतो किंवा लिहितो, त्यामागे नेमके काय असते? आपले जगणे? आपले अनुभव? उपदेश तर काय आपण येताजाता करतच असतो. ऐकत तर असतोच असतो. वडील आणि शिक्षक नावाचे गृहस्थ तर काय, आपला जन्मच पोरांना उपदेश करण्यासाठी झाला, असे समजतात. एकूणात सोळाव्या वर्षी प्रत्येकाला आई, वडील आणि शिक्षक हे लोक वैताग उपदेशबाजी करणारे कंटाळवाणे नागरिक वाटतात.
आता काही संभावित, पण खट्याळ प्रश्न विचारतो बरं का.
१. मला सांगा, आपण सोळाव्या वर्षी जे जे केले ते ते आपल्या मुलाने त्याच्या सोळाव्या वर्षी करू नये, असे सांगायचा अधिकार प्रत्येक बापाला असतो काय? (दचकू-बिचकू नका, माझ्यासकट सर्व बाप नेमके हेच करत असतात.)
२. छत्रपती, शास्त्रज्ञ, डॉक्टर, बँकेचा मॅनेजर या क्रमाने उतरत उतरत मास्तर होण्यापर्यंत आपली महत्त्वाकांक्षा खाली आणणाऱ्या गुरुजनांनी श्रेष्ठ व्यक्ती होण्याबद्दलचे महान उपदेश आपल्या विद्यार्थ्यांना दिलेच पाहिजेत काय?
३. तिसरे म्हणजे, आयुष्यभर बायको सोडून दुसऱ्या बाईकडे तिरक्या सोडाच, सरळ नजरेने पाहताना ज्यांची गाळण उडते, अशा मध्यमवर्गीय सदाशिवपेठी लेखकाने व्यभिचारावरची रसरशीत आणि चटकदार कादंबरी लिहावी काय?
४. श्रीमंत आणि देखण्या स्त्रियांकडूनच मठाच्या आतल्या भागात ‘सेवा’ करून घेणाऱ्या कुणा बाबा-बुवाने समोरच्या लाखो लोकांना संयम आणि सद‌्वर्तनाचा सत्संग ऐकवावा काय?
अशा प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल, कारण मुळातच उपदेश करण्याची आवड असणारा प्राणी, अशी माणसाची एक व्याख्या आहेच. सांगायचा मुद्दा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले... ही काय भानगड आहे? सिंपल भाषेत, उपदेश करणाऱ्याने स्वत:च्या जगण्यात तो उपदेश अमलात आणलेला असणे ‘मस्ट’ आहे काय? तरच त्या उपदेशाला अर्थ प्राप्त होतो काय? तरच कुणाला उपदेश करायचा अधिकार मिळतो काय? विनोबांची एक गोष्ट फेमस आहे. ते आपल्या प्रवचनात दारू पिऊ नये, असे सांगत. एकदा एक दारुड्या त्यांना भेटला आणि म्हणाला, तुम्ही दारू प्यायला आहात काय? विनोबा म्हणाले, नाही बुवा. तेव्हा तो दारुड्या म्हणाला, मग तुम्हाला दारूच्या दुष्परिणामांविषयी बोलायचा काय अधिकार? तेव्हापासून म्हणे, विनोबांनी त्या विषयावर बोलणे थांबवले. गोष्ट खरी का खोटी, ते सोडा; पण एकूणातच आपल्याकडे ‘बोले तैसा चाले...’विषयी फार आदर आहे. अशा सत्पुरुषाची पाऊले वंदायला अर्थातच आमची हरकत नाही; फक्त जोे आपल्या उपदेशानुसार चालला आहे, त्याचाच उपदेश ऐकावा काय? यावर आमच्या मनात शंका आहेत.
या सदरात मी नेमके असेच प्रश्न घेतो, की मला स्वत:लाच दोन्ही परस्परविरोधी बाजू पटत असतात. असेच असते आपल्या आयुष्यातदेखील. आईचेही बरोबर असते आणि बायकोचेही पटत असते, तरी M आणि W नेमके एकमेकांच्या उलटेच असतात. थोडक्यात पेच असा आहे की, एखाद्याचा उपदेश ऐकायचा तर त्याचे स्वत:चे वागणे त्याला अनुसरून असणे आवश्यक आहे का? का जसे कलावंत आणि कला यांना स्वतंत्र अस्तित्व द्यावे, तसेच उपदेश करणारा आणि त्याचे शब्द यांच्यामध्ये गल्लत न करता उपदेशाचे मूल्यमापन आपल्या अनुभूतीनुसार करावे? पेच तर मस्त आहे. चल, सांग संभाविता, ऐकव तुझा सल्ला...
संभाविताचा सल्ला : आमचा नि:संदेह सल्ला असा आहे की, फिक्शन किंवा ललित लेखनात लेखकाचे अनुभव त्या लेखनामागे असायला हवेत आणि वैचारिक लेखनात, स्वत: तसे न जगतादेखील चिंतन आणि व्यासंगाच्या आधारे केलेले लेखन सकस असू शकते. म्हणजे असे, की कथा-कादंबरी लिहायची, तर त्यामागे जगण्याचा अनुभव असायला हवा. पण एखादा वैचारिक लेख लिहायचा तर काही तसे प्रत्यक्ष जगलेले असणे आवश्यक नाही. याचे कारण फिक्शन स्वरूपातले ललित साहित्य हे जगण्याचे, वास्तवाचे उत्कट तरीही तटस्थ दर्शन असते, तर वैचारिक लेखन हे वास्तवाने कसे असायला हवे, यावरचे आदर्श जगण्याबद्दलचे विदग्ध आणि प्रतिभावंत स्वप्नरंजन असते. श्याम मनोहर, मकरंद साठे वगैरे लेखकांचे साहित्य मला या अर्थाने वैचारिक साहित्य (इंटलेक्चुअल फँटसी) वाटते. स्वप्नरंजनात १०० टक्के अनुभूतीची अपेक्षाच गलत आहे. तेव्हा उपदेशामागे अनुभूतीचा आग्रह अनाठायीच म्हणायला हवा. तुम्हा-आम्हा तमाम आम जनतेला यानेकी वाचकांना सल्ला असा की, कथा-कादंबरी वाचताना त्यात जगण्याचे अस्सल दर्शन घडून, त्याचे अन्वयार्थ मात्र आपणच काढावे, अशी योजना असेल ते साहित्य ग्रेट. दिवाणखान्यात बसून उत्कृष्ट निसर्गदृश्याची फोटोफ्रेम बघून लिहिलेली निसर्गकविता भंपक. लक्षात घ्या, फँटसी, ऐतिहासिक, पौराणिक वगैरे फिक्शनमध्येदेखील अभिव्यक्तीतच कल्पनाविलास असतो. प्रतिपादनाचा गाभा वास्तवातच असतो. या उलट वैचारिक साहित्य हे वास्तवाचा अभ्यास करून लेखकाने आदर्श नैतिक, सामाजिक वगैरे जग कसे असावे, यावर केलेले भाष्य असते. त्याचे स्वरूप उपदेशात्मक असले तरी, त्याला ‘तो जे जगला’ त्याची कुंपणे नकोच. विचारवंतांचे विचार (किंवा उपदेशदेखील) आपण मात्र आपापल्या वैचारिक क्षमतेनुसार आणि जगण्याच्या आकलनानुसार तपासून मगच विचारात घ्यावे, त्याला त्या विचारवंताच्या प्रत्यक्ष जगण्याचे संदर्भ नसावेत. बोले तैसा चाले वगैरे वंदन करण्यापुरते ठीक आहे; पण ती काही अट नाही, तो जे ‘बोले’ ते आपल्या क्षमतेनुसारच तपासावे आणि पटले तर आपणच ‘तैसे चालावे’. तो तसे चालत असेल वा नसेल; पण तो जे बोलला ते महत्त्वाचे. विचारवंताला आपल्या आदर्श विचारानुसार चालणे जमत नसेल तर फार तर तो विचारवंत भंपक, म्हणून लगेच ते विचार त्याज्य ठरवायची गरज नाही. सांगायचा मुद्दा, बाळ पंडित किंवा हर्ष भोगले या मंडळींना, ‘बापजन्मात कधी हातात बॅट धरली होतीस काय रेऽ?’ असा प्रश्न विचारू नये.
लेखकाचा मोबाइल क्रमांक - ९८२२००३४११
संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...