आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटळ वास्तव आणि जगण्‍याचा श्रावण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही ‘सिटी ऑफ गॉड’ हा ब्राझीलचा सिनेमा पाहिलाय का? नाही? बरे झाले. बरं तुम्ही ‘बॅटल रॉयल’ हा जपानी चित्रपट पाहिला आहे काय? तो पण नाही? चला फारच छान झाले. दोन्ही चित्रपटांत आपण ज्यांना ‘देवाघरची पाखरं’ वगैरे म्हणतो, त्या कोवळ्या मुलांनी केलेला अपरिमित हिंसाचार आणि नाही नाही ते गुन्हे दाखवलेले आहेत. (ते पाहताना विल्यम गोल्डिंगच्या ‘गॉड ऑफ द फ्लाइज’ची आठवण यावी) त्यातली कित्येक दृश्ये पाहताना अंगावर काटा येतो. त्याच्यापुढे आपल्या हिंदी सिनेमातल्या मारामाऱ्या म्हणजे ‘टॉम अँड जेरी’ वगैरे कार्टून फिल्ममधल्या गमतीदार मारामाऱ्या वाटतात. आपणच मारलेल्या डासाच्या रक्तानेदेखील भोवळ येणाऱ्या आपल्या मानसिकतेला मुलांनी केलेले, हे रुधिरभीषण हिंसाचार पाहणे अवघड जाते. आपल्याला ‘सून’ म्हणजे डोक्यावर पदर आणि ‘मुले’ म्हणजे देवाघरची फुले, असेच हवे असते. ते तसेच तर आहे, असे ठामपणे (आणि दरडावून) सांगणाऱ्या कथा, कादंबऱ्या, नाटके, सिनेमे वगैरे कलाकृतीच निर्माण व्हाव्या, याची आपले दांभिक समूहमन काळजी घेत असते. (चला कबूल करू या, आपण सगळेच इतरांच्या बाबतीत ‘पहलाज निहलानी’च असतो.) त्यामुळे अगदी आपल्या मायमराठीमध्ये बनवलेला ‘मांजा’ नावाचा राही अनिल बर्वेचा चित्रपट किंवा इरफान खानचा ‘थँक्स माँ’ असे चित्रपट आपण कुणाच्या नजरेलादेखील पडणार नाहीत, याची काळजी घेतो. (तेही तुम्ही बहुतेक पाहिले नसतीलच.) कारण या सिनेमातली आपली भारतीय मराठी लहान लहान मुलं-मुली मोठ्या माणसांच्या कानातले केसदेखील जळून जातील, इतक्या घाण भाषेत बोलतात आणि अश्लीलतम शिव्यांची बरसात करतात. छे! मुलं कशी अशी असू शकतील? आपण सोयीस्करपणे आणि काळजीपूर्वकपणे हे सगळे दिवाणखान्यातल्या गालिच्याखाली दडवून त्या गालिच्यावर मात्र सुबक टीपॉय आणि त्यावर फुलदाणी ठेवून त्यात सुवासिक फुले ठेवतो. नवनवीन आणि उत्तमोत्तम वस्त्रप्रावरणे आणि अलंकार घालूनच आपण आरशात बघतो आणि आपण छानच असतो. छानच दिसतो. समोरून सुंदर तरुणी जाताना ढेरपोट्या माणसाने पोट लपवायला श्वास आत खेचून पोट आत घ्यावे, पण ती तरुणी समोरच बसून राहिली तर मात्र श्वास कोंडावा पण सोडता येऊ नये, अशी आपली स्थिती झाली आहे. आपण बेढब आहोत, हे आपल्याला तर माहीत आहे, पण श्वास सोडून दिला तर ते दिसेल ना! हे आपल्या श्वास कोंडून गुदमरलेल्या समाजाचे खरे चित्र आहे!
हल्ली मी ‘किशोर’ मासिकात लहान मुलांसाठी ‘मोबाइल गँगच्या गोष्टी’ ही कथामालिका लिहितो. मुलांसाठी लिहिणे किती कठीण असते, त्याचा अनुभव दरमहा येतो. मुले कशी विचार करतात, मुलांसाठी नेमके काय लिहावे आणि त्यातले मुलांना काय आवडेल, अशा प्रश्नांनी गोंधळून जायला होते. सिनेमे काय आणि साहित्य काय, आपल्याकडे मुलांसाठी विचारपूर्वक फार कमी केले जाते. अर्थातच, काही अतिशय सन्माननीय अपवाद आहेत. पण आपण हे आता समजून घ्यायलाच हवे, की चिंगी, गोट्या, श्याम किंवा फुलपाखरे, परीराणी आणि राजपुत्र वगैरे हल्लीच्या मुलांच्या भावविश्वात नसतात. लक्षात घ्या सज्जनहो, मुलं बदलत आहेत आणि आपण क्वचितच त्याच्याशी वेग राखायचा प्रयत्न करतो. मुलांना पोकेमॉन आवडतो. त्याहून लहान मुलांना छोटा भीम आवडतो. मुळात समजून घ्या लोकहो, टिल्ल्या टिल्ल्या मुलांना मोबाइल फोन नुसता माहीतच नसतो, तर वापरताही येतो. (म्हणूनच मी निक्की नोकिया, मंटू मोटोरोला आणि सिद्धू सॅमसंग अशी मोबाइल गँग तयार करून त्यांच्या गोष्टी लिहितो.) तर सांगायचा मुद्दा, कालच लिहिलेल्या कथेत मी ‘सिद्धू सॅमसंग’ या पात्राच्या वडिलांच्या तोंडी एक वाक्य लिहिले. सिद्धूचे बाबा सिद्धूच्या आईला म्हणतात, ‘हेदेखील चुकतंच आपलं. आपण आपलं सारखं मुलांपासून हे लपव, ते लपव करत असतो; पण ज्या जगात आपण जगतो, त्याच जगात मुलंही राहतात. त्यांच्यासाठी काही देवानं वेगळं जग नाही निर्माण केलं. त्यांनाही आजूबाजूला दिसतंच सगळं. मघाशी ऐकत होतो मी, त्या निकिताला म्हणे कुणा मुलानं त्रास दिला ना? बारा-तेरा वर्षांची ही मुलं, लवकरच उघड्या जगात जातील. त्यांना आपणच ओळख करून दिली पाहिजे, जगाची.’

आपल्या बहुसंख्य सिनेमातली ती गुणी मुलं आठवून बघा. साखरांब्यात गुलाबजाम घोळून द्यावा तशी गोडगोड असतात सगळी. प्रत्यक्षात मुलं कशी असतात, ते बघतो का आपण? ‘सिटी ऑफ गॉड’ या ब्राझिलिअन सिनेमात दोन मुले एकाच भयानक परिसरात वाढतात, एक होतो छायाचित्रकार तर दुसरा एका ड्रग्ज विकणाऱ्या टोळीत जातो. या कोवळ्या मुलांचे जे महाभयानक दर्शन घडवले आहे, ते बरेचसे सत्यकथेवर आधारित आहे, हे विशेष. ‘बॅटल रॉयल’ या जपानी काल्पनिकेत काही शाळकरी मुलांना एका बेटावर सोडण्यात येतं आणि त्यांचा खेळ काय, तर तीन दिवसांत त्यांनी एकमेकांना मारून टाकायचे आणि शेवटी जो एकटा उरेल, तो जिंकला. त्यानंतर सिनेमाभर ही मुलं पिस्तुली, चाकू, कुऱ्हाडी, बाण, दगड अशा निरनिराळ्या शस्त्रांनी एकमेकांचा बळी घेतात. (जाणकारांनी आणि जिज्ञासूंनी विकिपीडियावर जाऊन या चित्रपटांना मिळालेल्या शंभरेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी पाहावी.)
दुसरीकडे, आपण मुलांसाठी आणि मुलांविषयी या दोन्ही प्रकारात काय करतो? सतत आपण लहान मुलांचं आणि मुलांसाठी एक वेगळं जग आहे आणि ते वॉटरटाइट कंपार्टमेंटसारखं आपल्या जगाहून पूर्णपणे निराळं आहे, असा विचार करत राहतो. एक गमतीदार प्रसंग सांगतो. माझी एक मैत्रीण आजच सांगत होती. कुणाचं तरी लग्न होतं. सगळे गप्पा मारत होते. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा नवऱ्या मुलीच्या मांडीवर बसून खेळत होता. कुणीतरी म्हणालं, अरे तिला त्रास नको देऊस. तिला सवय तरी आहे का मुलांना असं अंगाखांद्यावर घ्यायची? एकुलती एक ती. त्यावर तो मुलगा तिला म्हणाला, तुला ना आता नक्की दहा मुलं होतील. वा! चिमखडे बोल म्हणून सगळे कौतुकानं हसले. पण नवरी नाक मुरडून म्हणाली, ईऽऽऽ मला नको हं इतकी मुलं. त्यावरही सगळे हसले. त्यावर तो मुलगा काय म्हणाला असेल? विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तो मुलगा म्हणाला, बरं बुवा, दोन मुलं झाली की तू निरोध वापर हं. यावर मात्र हसणे सोडाच, सगळ्यांची तोंडं लपवताना गोची झाली. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, हे वास्तव आहे. मुलं टीव्ही बघतात, पेपर वाचतात. आणि एखाद्या मुलानं/मुलीनं, आई बलात्कार म्हणजे गं काय, असं विचारलं तर आपण ज्या तत्परतेने त्याला/तिला ‘उगाच आचरटासारखे प्रश्न विचारू नकोस. अगोचर मेला/मेली.’ असं म्हणून झटकून टाकतो, तेव्हा ते प्रश्न मुलांच्या मनातून मात्र झटकले जात नाहीत. लक्षात घ्या सज्जनहो, तुम्ही एकटेच काही माहितीचे स्रोत नाही तुमच्या मुलांसाठी. प्लीज, प्लीज हे लक्षात घ्या, की इतर मित्रांपासून इंटरनेटपर्यंत शेकडो सोर्समधून मुलं (त्यांना) हवं आणि (आपल्याला) नको ते शिकतच असतात. आहे हे असं आहे. याला तुम्ही समस्या म्हणा किंवा नव्या युगाचं अटळ वास्तव म्हणा! होय, मला ऐकू येतोय, त्या कोपऱ्यातून एक प्रश्न : संभाविता, उगाच नुसते चमत्कारिक आणि काल्पनिक वास्तव सांगून घाबरवू नकोस. सोल्युशन दे बाबा.
संभाविताचा सल्ला : लोकहो, यात घाबरण्यासारखे काही नाही. नवी पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, हे सर्वप्रथम मान्य करा. ज्या जगात आपण राहतो त्याच जगात आपली मुले राहतात, हे त्यानंतर समजून घ्या. आणि मग हे कबूल करा, की भवतालचे जग हे आपल्याला वाटते तितके बेक्कार किंवा होपलेस नाही, हे जरी खरे असले तरी, ते तितकेसे सुंदर आणि स्वप्नवत नाही. खूप काही सुंदर आणि आदर्श जरी असले तरी, या जगात विद्रूप आणि दुष्ट बरेच काही आहे, हे तुमच्या मुलांना कळत असते. फक्त एक समजुतीचा पडदा तयार करून यादेखील जगाची त्यांना ओळख करून द्या. त्यांना समजेल अशा भाषेत करून द्या, पण सारखं ‘तुला काय कळतं’ आणि ‘तू गप्प बैस’ म्हणून त्यांना झटकून दुसऱ्या एखाद्या मार्गाने या अटळ वास्तवाचे ‘डिस्टॉर्टेड’ किंवा ‘अतिरंजित आणि विकृत’ दर्शन घ्यायची वेळ येऊ देऊ नका. त्यासाठी अधिकाधिक वेळ मुलांबरोबर घालवून आधी त्यांची भाषा समजून घ्या. स्मार्ट युगातली असली तरी खूप लहान आहेत ती तुमच्यापेक्षा. तुमच्या परिपक्व प्रेमाने त्यांच्याशी बोलायची भाषा तयार करा आणि त्या भाषेत संवाद साधा. कळू दे त्यांना, आयुष्याचा श्रावण करावा, असं खूप काही आहे या जगात, पण त्यावर काजळी धरणारंदेखील असेल, असू शकेल जगात. खात्री बाळगा, तुमचा हात पाठीवर असेल, तर नक्की मुलं राजहंसच होतील आणि ओळखतील आपला आपणच, कुठला मार्ग जगण्याचा श्रावण करेल ते.
संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
( लेखकाचा मोबाइल क्रमांक - ९८२२००३४११)
बातम्या आणखी आहेत...