आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिळगा: नेमेचि येतो मग पावसाळा! चतुर्मासाची बौद्धिके टाळा!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाकाहाराचा अतिरेकी अट्टाहास धरणाऱ्यांच्या प्रचाराला चतुर्मास सुरू होण्यापूर्वी आणि चतुर्मासात कसायाच्या सुरीपेक्षाही बोचरी धार चढलेली असते. माध्यमं बदलली असली, तरी मानसिकता बदललेली नाही. तोच जोश आणि आवेश टिकून आहे.
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!
या काव्य मौक्तिकांच्या चालीवर गेल्या दोनेक हजार वर्षांपासून चतुर्मासाचे कौतुक आणि आचरण चालू असल्याचा अंदाज बांधता येतो. पण गेल्या दोन सहस्रकांत चतुर्मासाची उठाठेव करणाऱ्या ऐदी मानवीसमूहांच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही, ना चतुर्मासाचे कौतुक नसलेल्या बहुमानवी समाजांच्या पिढ्यांच्या मानसिकतेत! शाकाहाराचा अतिरेकी अट्टाहास धरणाऱ्यांच्या प्रचाराला चतुर्मास सुरू होण्यापूर्वी आणि चतुर्मासात कसायाच्या सुरीपेक्षाही बोचरी धार चढलेली असते. माध्यमं बदलली असली, तरी मानसिकता बदललेली नाही. तोच जोश आणि आवेश टिकून आहे. या चार महिन्यांत कांदा-लसणासारखे कंद पचनसंस्थेला वाईट असतात. पावसाळ्यात हवा दूषित आणि कुंद होत असल्याने हलका आणि सात्त्विक आहार घ्यावा. त्यासाठी उपवास आणि लंघनं करावीत. अग्निमांद्य होत नाही वगैरे. मांसाहार न करताही मांसाहाऱ्यांना आयुर्वेदातील दाखले देऊन उपदेश केलेले असतात की, ‘नुकतेच उगवलेले गवत खाल्ल्यामुळे प्राण्यांची पचनसंस्था बिघडलेली असते. क्वचित त्यांच्या आहारात गवतावरचे किडे, अळ्या जातात म्हणून पशूंचे मांस खाऊ नये.’ वगैरे. पण ते पशूंचं दूध मात्र वापरात आणतात, ही गोष्ट वेगळी. मांसाहार करणारे देवाच्या धाकानेही मांसाहार टाळत नाहीत, म्हटल्यावर त्यांना आयुर्वेदाचा धाक दाखवला जातो, हे विशेष.
जैन आणि बौद्ध श्रमणसंघ धर्मप्रचारार्थ, मानवी कल्याणाच्या चिंतनार्थ, हितार्थ देशोदेशी हिंडत असत. या धर्मांच्या उदयानंतरच्या काळातही दळणवळणाची साधनं कमी होती. रस्ते सुरक्षित नव्हते. भिक्षु पायी प्रवास करीत. प्रसंगी सार्थवाहांच्या सह किंवा मार्गाने. पावसाळ्यात व्यापार थंडावे. बहुतेक अर्थव्यवस्था शेतीप्रधान होती. ज्यांना उपदेश करायचा, ते या काळात शेतात राबत असत. शेतीच पिकली नाही तर कुणाला सदुपदेश करणार? शिवाय, पावसाळ्यात जीवनोपयोगी साहित्याची कमतरता भासे. फिरणे तर अडचणींचे आणि अनारोग्याचे होतेच. या सद्हेतूने ते चार महिने निश्चित अशा जागी वास करीत. आहारावर नियंत्रण ठेवीत. मिताहार घेत. उपलब्ध साधनांचा काटकसरीने वापर करीत. अशा या संचयापासून लांब राहणाऱ्या धर्माकडे सर्वसामान्य जनतेचा आणि काही तत्कालीन शासकांचाही झुकणारा कल पाहून वैदिकांमधील ऐद्यांनी मांसाहर त्यागण्याचे जसे नाटक रचले होते, तसेच चतुर्मासाचे सोंग रचले असावे. वर्णाने स्वयंउच्च समजणाऱ्या या मानवी कळपाने चतुर्मास नक्कल करून तर घेतला खरा! पण त्यात आपल्या सोयीनुसार आपल्या जिवाला आणि शरीराला तोशीस लागणार नाही, याची दक्षतापण घेतली. ज्यातून झाला तर पुण्यसंचय गाठीस राहावा आणि शरीर निरोगी, रोगराईपासून मुक्त राहावे, याचं योजन होतं. श्रमणसंघाच्या दुर्गम आणि कष्टप्रद वाटांनी भ्रमंतीचं काम यांनी निक्षून वगळलं. उलट आपापसात पोथ्या वाचणं, धर्मग्रंथांची पारायणं करणं, लाखोळ्या वाहणं किंवा पैसे असतील तर लाखोळ्या वाहण्यासाठी समजातीय ‘मजूर’ लावून पुण्य पदरात पाडून घेणं, असे सोपे उपक्रम राबविले.
सगळ्याच काळात तत्कालीन समाजातील उत्तम प्रतीच्या आहाराचा उपभोग यांनी घेतलेला आहे. त्यामुळे यावनी आणि म्लेंच्छ देशांमधून आलेले पदार्थही यांनी आपल्या नित्य आहारात आणि उपवासात सहज समाविष्ट करून घेतले. वरून आमचाच आहार कसा श्रेष्ठ आणि सात्त्विक असल्याचे पढवित राहिले. दुसऱ्यांच्या ताटामधील बोट्या-हाडांना नावे ठेवीत राहिले. यांच्यासाठीचा सदाकाळचा सर्व प्रकारचा आहार आणि इंधन-ऊर्जा इतरांच्या कष्टातून निर्माण झालेली आहे, याची त्यांना कधी जाणीव झाल्याचे स्मरत नाही. अपवाद फक्त ‘ऋषीपंचमी’चा. बरं यांच्या सात्त्विकास्त्राची बहुसंख्य समाजात इतकी दहशत पसरलेली होती की, आपल्या वाट्याला जो काही आहार आलाय, ते गतजन्माचं फळ या जन्मी भोगणं आपलं इतिकर्तव्य असल्याची भावना दृढ झाली. सगळ्या प्रकारची धान्यं आणि अन्न कष्टाने पिकविणारे मानवी समूह हाती असलेल्या पारंपरिक प्रक्रिया सोप्या करून अन्नाचे सेवन करीत असत. पण हेच दैवैदी याच मातीत इतरांनी पिकविलेले अन्न षड‌्रसाने परिपोषित तयार करून खात. त्यांच्या स्त्रियांना वेळच वेळ होता. शिधा आणण्याची जबाबदारी आणि चिंता पुण्यसंचयाच्या लालसेने इतरेजन वाहात असल्याने स्त्रियांनी विविध प्रकारच्या वेळखाऊ, अवघड पाककृती आणि पदार्थ विकसित केले. आजही त्या पूर्वसंचिताची महती माध्यमांमधून गायली जाते आहे.
त्यातही आणखी एक गोम आहे. भारतातील मूळच्या मुख्य शाकाहारी धर्मांपैकी एक शाखा स्वसमूहापुरती संकोचत जाऊन तीव्र कर्मठ झाली. दुसरी शाखा इथं संकोच पावून बाह्यदेशी बहरली. ही परिस्थिती ऐद्यांना अनुकूल झाल्याने ऐद्यांच्या खाद्यदादागिरीला स्फुरण चढणे क्रमप्राप्त होते. साधारणत: अकराव्या शतकानंतर खाद्यसंस्कृती आणि वर्णव्यवस्थेचा काच वाढत गेला. त्यातून सात्त्विक, राजस आणि तामस हे मंगल-अमंगळ भेदाभेद स्पष्ट झाले. बेटीव्यवहार बंद झालेलेच होते, हळूहळू रोटी व्यवहार वर्णबद्ध आणि जातीबद्ध झाले. ते कायमचेच. रोटीव्यवहार राहिला, पण तो स्थानिक पातळीवर. खालच्या जातीने शिजविले अथवा साधा स्पर्श झालेले अन्न सेवन करणे किंवा ग्रहण करणे हे धर्मविरोधी वर्तन असल्याचे समाजमान्य झाले.
त्यातही एेद्यांनी आणखी एक गोमपद सोडला. ‘कष्टकऱ्यांनी धर्मपालनासाठी चार महिने वाया घालवण्याची गरज नसून, त्यांच्यासाठी श्रावण महिना पाळणे पुरेसे ठरविण्यात आले.’ मग कष्टकरी लोकांनी पुण्यसंचयासाठी आणि धर्मपालनासाठी श्रावणात मांसाहार करणे वर्ज्य केले. मग आहारपालनाबरोबर कुणी श्रावणी सोमवार, शनिवार करू लागले, कुणी एकभुक्त राहू लागले, तर कुणी अनवाणी राहून हजामत आणि श्मश्रू करिनासे झाले. मग हे कष्टकरी श्रावणाअगोदर आषाढात निराकार आणि निसर्ग देवतांचा कोप होऊ नये, म्हणून किमान कोंबड्यांचा पवित्र बळी देऊन देवाला शांत करीत. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून ‘गटारी’ साजरी करणाऱ्या पारंपरिक मांसाहाऱ्यांनी ‘आषाढस्य अंतिम दिवसे’ ‘गटारी अमावस्या’ संबोधल्यामुळे शाकाहाराच्या प्रचाराकांनी ‘दीप अमावास्या’असल्याचे दाखले द्यायला सुरुवात केली. पण त्यांनी कितीही दीप उजळविले तरी गटारीवाले थोड्याच आपल्या धार्मिक परंपरा सोडणार आहेत. (ज्यांची घरं दगडी दिवे परंपरेने एरंड नाहीतर करंजीच्या तेलांनी उजळवायचे, तेही झोपेस्तोवर. नंतर ७०-८० वर्षांपूर्वी घासलेट अवतरलं आणि सोबत पत्र्याच्या चिमण्या आल्या. ज्यांच्या घरात बारमाही अमावास्या वास करायची, त्यांनी कोणत्या धातूंचे दिवे घासायला घ्यावे आणि ही सांस्कृतिक उचलेगिरी करावी? हा अट्टाहास कशासाठी? गटारी आवस साजरी करणारांना का हिणवावे कुणी? यांनी कुणा दिवे पाजळणाऱ्यांना ‘या गटारी साजरी करू’ असं आमंत्रण दिलेलं नाही! परंपरा काय विजेचे दिवे असतात का, खटका चालू-बंद करायला!?) तर इकडे अश्मक प्रदेशात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (आम्ही पोळ्याला बैलपोळा म्हणत नाही. जसा तिकडे बेंदूर तसा इकडे पोळा.) कर साजरी करण्याची प्रथा पाळली जाते. इकडे दोन करी साजऱ्या होतात; पोळ्याची आणि शिमग्याची. (या करींच्या कालवणावरून तर इंग्रजांनी ‘करी’ हा शब्द आणि रेसिपी उचलली नसेल?) श्रावण पाळणाऱ्या अन्नोत्पादकांवर अवलंबून असलेल्या कष्टकऱ्यांना श्रावण पाळण्याचीही तसदी नव्हती. पण आपल्या धन्याला बरे वाटावे, म्हणून काही जण आपल्या सोयीनुसार श्रावण पाळण्याचा प्रयत्न करीत. बरं, त्यांनी श्रावण पाळला काय आणि नाही पाळला काय; त्याच्याशी कुणाला देणेघेणे नव्हते. पाऊसकाल येणार म्हटले की, या वर्णातील जाणत्यांच्या अंगावर काटा उभा राही. झड लागल्यावर भूक कोणता प्रसंग उभा करील, याचा काही नेम नसे. शेतीतील नित्यकामे, शिळ्यापाक्यासाठी लाकडं फोडून देणे, ताकासाठी गवताचे भारे टाकणे आणि प्रसंगी गावकऱ्यांचा आरोग्यासाठी ‘पवित्र’ मृत अपवित्र ढोरं ओढून नेऊन त्यांची ‘सुयोग्य विल्हेवाट’ लावण्याची कामे करावीच लागत. हे काम केले नाही, तर देवाचा कोप व्हायचा नाही; पण धर्मश्रेष्ठी आणि मालकांचा कोप मात्र जरूर व्हायचा. हे पण चतुर्मास पाळणाऱ्यांच्याच धर्मात जन्म घेतलेले जीव असायचे; पण त्यांना त्यांची नित्य कामं सोडून पुण्यसंचयासाठी चतुर्मास पाळण्याची सक्ती केल्याचे एकसुद्धा उदाहरण सापडत नाही. या श्रमिकांचा स्पर्श तर दूरच, पण साधी सावली अंगावर न पडू देणारे धर्मरक्षक यांच्या घामातून आणि कष्टातून पिकलेले अन्न मात्र सेवन करीत. यांनीच पिकवून यांचा स्पर्श झालेले धान्य लांबून पाणी शिंपडून पवित्र करून घेत. म्हणे की, अन्न शिजवून तयार करणाऱ्यांच्या भावना पण अन्नात उतरतात. तर मग त्या कष्टकऱ्यांच्या स्पर्शाने वाढलेल्या पिकात आणि धान्यात यांच्या भावना उतरत नसतील का?
लीळा चरित्रात एका लीळेनुसार : गावीं एकू वसो असे: तो लींगावरीलें फुलें प्रतदीनीं खाए: तो एकू दिसू नीगतां सीरकला: तो सरला: ते देवतेसि पूजापूरस्कारू वर्जला: गोसावियांसि गोमतीएचां तीरीं आसन असे: भोपे आणि माहाजन गोसावीयांपासि आले: दंडवतें केलीं: श्रीचरणां लागले: मग वीनवीलें: “जी जी: वसो देवतेवरीलें फुलें प्रतदीनीं खाए: आणि नीगतां सीरकला: तो सरला: देवतेसी पूजापूरस्कारू वर्जले जी:” मग गोसावी तेथ बीजें केले: गोसावीं खडेन सीतीला: आणि उठीला: तो पौहीबाहीरि जाउनि पडीला: लोकांसि आश्चर्ये जालें:
आणखी एका लीळेनुसार : गोसावी उभया हाटवटीया एत होते: तव स्वान सरलें होते: तें गोसावीं श्रीमुगुटावरि ठेवीले: गावाबाहीरी प्रत्येजीले:
असे चक्रधर प्रत्येक काळात असते तर?
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...