आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्शोध महाभारताचा: महाभारतातील वर्णसंकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतात वर्णसंकर निषिद्ध मानला गेला नसला तरीही त्याचे म्हणून त्या काळच्या प्रथा-परंपरेला अनुसरून यम-नियम होते. अर्थातच ते नियम पाळताना वर्णव्यवस्थेची चौकट
महत्त्वाची मानली जात होती...

महाभारतात अनुशासन पर्वात (अध्याय ४८) ‘वर्णसंकर’ नावाचा अध्यायच आहे. धर्मराजा व भीष्म यांचा संवाद आहे. त्यात स्पष्ट असे म्हटले आहे की, ब्राह्मणाला चारही वर्णाच्या स्त्रिया करण्याचा अधिकार आहे. (आरक्षण) त्यापैकी ब्राह्मण व क्षत्रिय या दोघींपासून होणारी संतती ही ब्राह्मण वर्णाची असते. (नियोगातील पुत्र हा मूळच्या पतीचा पुत्र समजला जातो) विचित्रवीर्याच्या राण्यांना नियोगाने झालेली मुले धृतराष्ट्र व पांडू त्यांचा निर्माता ब्राह्मण व्यास होता, तरीही पुत्र क्षत्रिय ठरले. कारण विचित्रवीर्य क्षत्रिय शंतनुचा औरस पुत्र होता. वैश्य व शूद्र अशा दोघांकडून होणाऱ्या पुत्रांना मातेचा वर्ण प्राप्त होतो. याच नात्याने ब्राह्मण व्यासांना शूद्र दासीपासून झालेला विदुर शूद्र ठरला. अशा पुत्राला ‘पारशव’ म्हणायचे. त्या न्यायाने विदुर जरी शूद्र ठरला, तरी ‘पारशव’ ठरतो. त्याने आपल्या घराण्याची सेवा करावी. धृतराष्ट्राचा सल्लागार असूनही विदुराला ‘क्षता’ म्हणजे सेवक, चाकर असे दुर्योधनाने संबोधले आहे. क्षत्रियाने (ब्राह्मण वगळून) तीन वर्णांच्या स्त्रियांशी विवाह केल्यास क्षत्रिय-वैश्य या दोघींच्या पुत्रांना क्षत्रियच समजायचे. परंतु क्षत्रियाने शूद्र स्त्रीशी विवाह केल्यास शूद्र स्त्रीच्या पुत्राला ‘उग्र’ म्हणायचे. वैश्याने वैश्य व शूद्र या दोघींशी विवाह केलेला चालतो. दोन्ही स्त्रियांचे पुत्र वैश्यच ठरतात. शूद्राची शूद्र स्त्री हीच पत्नी असते. ती शूद्रालाच जन्म देते. असो.
यापेक्षा निराळे वर्तन करणारा म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी ब्राह्मण स्त्रीशी विवाह केल्यास चातुर्वर्ण्याच्या न्यायाने नीच ठरतो. त्यांची संतती वर्णबाह्य ठरते. त्यांना सूत, वैदेहक, चांडाळ इ. नावे दिलेली आहेत. कुलांगार हा अपशब्द त्यांच्यासाठी राखीव आहे. बंदी, मागध, निषाद, आयोगव अशी अन्य नावे आहेत. अशांच्या प्रजा आपापल्या जातींना जन्म देतात. असा अधर्म माजला म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात. स्त्रिया बिघडल्या म्हणजे, वर्णसंकर होतो. वर्णसंकराने सर्व कुलाला नरकवास घडतो (भगवद‌्गीता पहिला अध्याय). आपला प्रश्न शूद्र (कोळी) आईच्या, सत्यवतीच्या पोटी लग्नाआधी, कुवारपणी जन्मलेला पराशरऋषींचा कानिन पुत्र ब्राह्मण कसा, हा आहे.
सत्यवती ही ‘दुशराज’ कोळी राजाची औरस कन्या नव्हतीच. अद्रिका नामक रूपवान अप्सरेला ब्रह्मदेवाच्या शापामुळे मत्स्यरूप धारण करणे भाग पडले. यमुनेच्या पाण्यात संचार करताना उपरिचर राजाचे वीर्य दोन ससाण्यांच्या झटापटीत द्रोणातून यमुनेच्या पाण्यात पडले. सुरकांडी मारणाऱ्या मत्स्यरूपी अद्रिकेने वीर्याने भरलेला द्रोण गट्ट केला. ती गर्भिणी झाली. या अद‌्भुत कथेत उपरिचर राजाने क्षत्रिय वा वैश्य स्त्रीशी (अप्सरा) समागम केला, असे स्पष्ट न म्हणता एक सुरस कथा रचली गेली. उपरिचर वसू राजाला इंद्राने स्फटिकाचे विमान दिले होते व तो मृगयेत रमणारा होता. गर्भिणी मत्स्यनारीला दहावा महिना चालू असता, ती कोळ्याच्या जाळ्यात अडकते. ही स्त्री (अप्सरा) पट्टीची पोहणारी असावी. जाळ्यात सापडल्यावर बेशुद्धावस्थेत वर काढल्यावर एखाद्या सुईणीने तिचे बाळंतपण केले असावे. पोटात जुळे होते. अप्सरेचा शाप मानवी जुळे बाहेर येताच संपला. अप्सरा स्वर्गात जाते, म्हणजे मत्यू पावली असावी किंवा पसार झाली असावी. उपरिचर राजाकडे (जुळ्यांचा पिता) जुळे नेल्यानंतर मुलगा राजाने स्वत:कडे ठेवला व मुलगी कोळी राजाला सांभाळायला दिली. (दत्तक?) म्हणून सत्यवती कोळी राजाची कन्या झाली. क्षत्रिय वा वैश्य कन्येला कोळी (शूद्र) राजाने सांभाळली. त्याच्याकडेच नाजूक पुष्पबीजाचे सुंदर कळीत रूपांतर झाले. यमुनेच्या तीरावर होडी चालवून सत्यवती पित्याला मदत करू लागली. ही सत्यवती क्षत्रिय राजाची आहे, हे फारसे कुणाला समजले नसावे. महाभारतात या मुलीच्या अंगाला माशासारखा वास यायचा, असा उल्लेख आहे. ‘मत्स्यगंधा’ हे नाव त्यामुळे मिळाले. महाभारतात तिचे वर्णन ‘सिद्धांनीदेखील अभिलाष करावा’, अशा सत्यवतीला पराशर ऋषींनी पाहिले. उन्मादक सौंदर्याने बहरलेली कमनीय सत्यवती पाहताच प्रज्ञावंत ऋषी कामलोलुप झाले. होडीत तिच्या जवळ गेले व म्हणाले, ‘माझ्याशी रममाण हो.’ ‘पैलतीरावर ऋषी उभे आहेत. त्यांच्यादेखत समागम कसा शक्य आहे?’ सत्यवतीने रागाने प्रस्ताव झिडकारलेला नव्हता. पराशराने क्षणार्धात होडी दाट धुक्याने वेढून टाकली. मत्स्यगंधा एकाच वेळी विस्मित व लाजेने चूर झाली. ‘आपण कुमारी असून कौमार्यभंग झाल्याने पित्याचे घर बंद होईल व आपल्याबरोबरही मी कशी राहू शकेन?’ सत्यवतीच्या या प्रश्नानंतर पराशर तिच्या अधिकच जवळ जाऊन म्हणाले, ‘तुझे कौमार्य अबाधित राहील. तुला जो वर हवा असेल तो माग. माझा अनुग्रह सफलच होईल.’ ही लालूच होती. पण संधीही होती. शापाची भीतीही होतीच. मुनींचा हा अनुग्रह ऐकून मत्स्यगंधा म्हणाली, ‘माझ्या सर्वांगाला रुचिर सुगंध प्राप्त होऊन त्याचा दरवळ योजनभर पसरेल, असा मी वर मागते.’ मनात थोडा संकोच व भीती होतीच. क्षणातच आसमंत सुवासाने भरून गेला. सत्यवती खरोखरच गंधवती झाली. योजनगंधा सत्यवतीचा पराशरांशी समागम झाला. आजचा कायदाही याला बलात्कार म्हणेल काय? गर्भवती सत्यवतीला पुत्र झाला तोच ‘द्वैपायन कृष्ण’. पराशर म्हणाले होते, तू कुवारच राहशील. याचा अर्थ इतकाच की, अशी गंधवती प्राप्त होणार असेल, तर कोणीही अन्य प्रश्न विचारणार नाही. शंतनूने कोळीराजाच्या सर्व अटी माहीत असूनही सत्यवतीशी विवाह केला. भीष्मच पित्यासाठी मागणी घालायला गेला. सत्यवती भीष्माला सर्व हकीगत सांगताना म्हणाली, ‘मी कुवारपणीच पराशराच्या पुत्राला जन्म दिला. माझा पुत्र महायोगी महर्षी द्वैपायन होय. या माझ्या महर्षीपुत्राने तपश्चर्येच्या बळावर चारही वेदांचे विभाग केले. म्हणून जगात तो ‘व्यास’ नावाने विख्यात झाला. भीष्मा तुझ्या सल्ल्याप्रमाणे महाप्रतापी, सत्यवादी, पापरहित महात्म्याला मी विनंती केली. तुझा भाऊ विचित्रवीर्याच्या भार्यांच्या ठिकाणी तो संतती निर्माण करील. संकटकाळी मला हाक मार, मी धावत येईन, असे म्हणूनच तो पराशराबरोबर अंतर्धान पावला होता. भीष्मा, तुझ्या संमतीने मी कृष्णद्वैपायनाचे नियोगासाठी स्मरण करते.’
त्यानंतरची कथा आपण पूर्वीच पाहिली आहे. सत्यवती उपरिचर वसू राजाची अप्सरेच्या (मत्स्यरूपी) पोटची कन्या होती. पिता क्षत्रिय म्हणून सत्यवती क्षत्रियच ठरते. कोळी राजाने सांभाळली म्हणून शूद्र नव्हतीच. पराशर ब्राह्मण व क्षत्रियकुलोत्पन्न सत्यवतीचा पुत्र व्यास ब्राह्मण ठरला. ब्राह्मण व्यास, शूद्र दासी म्हणून त्यांचा पुत्र विदुर शूद्र ठरला. हाच त्या वेळचा धर्म होता.
राजा पटवर्धन
patwardhanraja@hotmail.com,
लेखक महाभारताचा व्यासंग असलेले अभ्यासक असून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील प्रतीच्या आधारे महाभारतकालीन सामाजिक
प्रथा-परंपरांचा वेध घेणे, हा या लेखमालेचा उद्देश आहे.
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...