आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळीव इतिहास: राष्ट्राचे चिरंतन प्रेरणागीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसंग कोणताही असो, ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत ऐकताना, म्हणताना अंगावर रोमांच उभे राहतात. राष्ट्रगीतात व्यक्त झालेली एकता, अखंडता आणि बंधुत्वाची भावना बळकटी देत राहते; पण कट्टर राष्ट्रवाद रुजवू पाहणारे दुही निर्माण करणारा अजेंडा राबवून जनगणमन नव्हे ‘वंदेमातरम्’, असा बखेडा निर्माण करतात...

संविधान सभेच्या १४ ते २९ ऑगस्ट १९४७ या पाचव्या सत्रात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे ‘नियतीशी संकेत भेट’ (Tryst with Destiny) हे भाषण झाल्यावर, संविधान सभेतील सर्व सदस्यांनी देशाच्या एकतेच्या, अखंडतेच्या, सार्वभौमत्वाच्या संरक्षणाची शपथ घेतली आणि गानकोकीळ अशी उपाधी मिळालेल्या सरोजिनी नायडू यांच्या सुरेल आवाजातील गुरुदेव टागोरांचे ‘जन गण मन’ हे स्वर संविधान सभेच्या सभागृहात निनादले! भारतीय जनतेच्या स्वप्नातील भारताची निर्मिती करणाऱ्या जनमनातील अधिनायकाचे स्तवन या गीताच्या माध्यमातून केले गेले. मात्र, त्या वेळी ‘जनगणमन’ या गीतास अधिकृतरीत्या भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता प्राप्त नव्हती!
भारताचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याबद्दल सर्व प्रांतांना ७ मार्च १९४८ रोजी एक परिपत्रक काढण्यात आले. या पत्रकानुसार अद्याप भारताने राष्ट्रगीताचा दर्जा कोणत्याही गीतास दिलेला नाही, हे स्पष्ट करण्यात आले आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचे ‘वंदे मातरम’ हे गीत सर्वसाधारणपणे राष्ट्रगीत म्हणून वापरात असल्याचेदेखील नमूद केले गेले. मात्र हे गीत, त्यातील भाषा आणि त्याची धून सर्वसामान्य जनतेला समजण्यास अवघड असून राष्ट्रगीत केवळ देशांतर्गत नव्हे तर विदेशातही गायले-ऐकले जाणार असल्यामुळे, ते विदेशातील लोकांनाही आनंददायी वाटायला हवे, असा विचार या परिपत्रकात व्यक्त केला गेला होता. संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीयांच्या शिष्टमंडळाने १९४७च्या ऑक्टोबर महिन्यात न्यूयाॅर्कमध्ये एक प्रीतीभोजन आयोजित केले होते. त्यात ‘जनगणमन’ हे गीत सर्वप्रथम तिथल्या वाद्यवृंदाने ऐकविले, जे लोकांना खूप आवडले. भारत सरकारने त्या गीताचे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून, ते आकाशवाणीला आणि त्याचबरोबर सैन्यातील अनेक वाद्य पथकांना दिले. याचे कारण असे की, हे गीत लष्करी वाद्य पथकालाही (military band) वाजवता यायला हवे आणि त्यावर लष्करी संचलनदेखील करता यायला हवे. गव्हर्नर यांनी प्रांतिक सरकारांबरोबर चर्चा करून केंद्रीय सरकारकडे अभिप्राय कळवावा, असे या परिपत्रकात सांगण्यात आले होते.
राष्ट्रगीताचा अर्थ स्पष्टपणे देशाची संस्कृती, वैभव, अखंडत्व, सार्वभौमत्व, राष्ट्रवाद, देशभक्ती याचे प्रतीक असते. देशभक्तीचा चिरंतन स्रोत असते. प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत त्या देशातील जनभावनेशी संबंधित असल्यामुळे राष्ट्रगीत कसे असावे, याचे निकष अस्तित्वात नाहीत. देशाच्या झेंड्याचे वर्णन करणारे ध्वजगीत, देशाचे वर्णन करणारे, थोरवी सांगणारे गौरवगीत, सैन्याचे संचालन गीत, राजाची स्तुती करणारे राजगीत यापैकी कोणतेही गीत राष्ट्रगीत होऊ शकते. भारतात त्या काळी राष्ट्रगीत होण्यासाठी पात्र असलेल्या ‘जनगणमन’ आणि ‘वंदे मातरम’ या दोन्ही गीतांशिवाय ‘झंडा उंचा रहे हमारा’ हे ध्वजगीत, ‘कदम कदम बढाये जा’ हे संचलन गीत, ‘सारे जहांसे अच्छा’ सारखे गौरवगीत, अशी अनेक गीते होती.
‘जनगणमन’ या गीतास राष्ट्रगीत म्हणून सर्वप्रथम मान्यता दिली ती, सुभाषचंद्र बोस यांनी! त्यांनी २ नोव्हेंबर १९४१ रोजी या गीतास ‘आझाद हिंद’चे राष्ट्रगीत म्हटले. ११ सप्टेंबर १९४२ रोजी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून आझाद हिंद सेनेने ते हॅम्बुर्ग येथे गायले! मात्र आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार ही बेटे ताब्यात घेतल्यावर २१ ऑक्टोबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेअर येथे स्वतंत्र भारत सरकार स्थापन केले. या वेळी राष्ट्रगीत म्हणून ‘वंदे मातरम’ हे गीत गायले! मात्र ‘वंदे मातरम’ या गीतातील दुर्गेचे स्तवन आणि ‘आनंदमठ’ या कादंबरीतील कथानक आझाद हिंद सेनेतील मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असल्यामुळे, बोस यांनी वंदे मातरम या गीताच्या ऐवजी दुसरे गीत शोधण्याचे ठरवले. या वेळी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी ‘जनगणमन’ हे आझाद हिंद सेनेचे राष्ट्रगीत म्हणून मान्य करावे, असा प्रस्ताव मांडला. परंतु बोस यांना ‘जनगणमन’ हे गीत त्यातील संस्कृतप्रचुर भाषेमुळे अवघड वाटत होते. त्यावर पर्याय म्हणून ‘जनगणमन’ याच गीताचे हिंदी रूपांतर ‘शुभ सुख चैन’ या हिंदी गीतास सुभाषबाबूंनी पसंती दिली! विशेष म्हणजे, हे रूपांतर बोस यांच्याच निर्देशानुसार आझाद हिंद रेडिओच्या मुमताज हुसेन आणि कर्नल अबीद हसन अली यांनी केले होते. या गीतास कॅप्टन रामसिंग ठाकूर यांनी मिलिटरी बँडवर संगीतबद्ध केले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावला. तेव्हा कॅप्टन रामसिंग ठाकूर यांना विशेष आमंत्रित करून नेताजी बोस यांच्या सरकारचे ‘शुभ सुख चैन’ राष्ट्रगीत ध्वजारोहण सोहळ्यानंतर सलामी देताना वापरात आणले गेले होते. बंकिमचंद्रांचे ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ हे गीत रवींद्रनाथांचे अत्यंत आवडते गीत होते. या गीताला रवींद्रनाथांनी १८९६मध्ये डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वतः चाल लावून गायले होते, तेव्हापासून काँग्रेसच्या अधिवेशनाची सुरुवात याच गीताने होत असे.
संविधान सभा जोपर्यंत राष्ट्रगीताबाबत अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत ‘जनगणमन’ या गीताला अंतरिम राष्ट्रगीत म्हणून मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती पंतप्रधान नेहरूंनी २५ ऑगस्ट १९४८ रोजी सभेत दिली. त्यावर चर्चा होऊन २४ जानेवारी १९५० रोजी सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी ‘जनगणमन’ हे गीत ‘राष्ट्रगीत’ (National Anthem) म्हणून, तर स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणांचे प्रतीक असणारे गीत ‘वंदे मातरम’ हे ‘राष्ट्रगान’ (National Song) म्हणून जाहीर केले. ‘जनगणमन’ या गीताचा राष्ट्रगीत म्हणून अधिकृत कालावधी ५२ सेकंदाचा असून गायन किंवा केवळ धून यांनाही राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली गेली आहे.
‘जनगणमन’ आणि ‘वंदे मातरम’ ही दोन्ही गीते उत्कट देशभक्तीचे प्रतीक आहेत. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी कधीही ‘वंदे मातरम’ हा शब्द उच्चारला नव्हता, अशा काही हिंदुत्ववादी संघटनांना, ‘वंदे मातरम’ला मुस्लिम विरोध करतात म्हणून एका वर्गाला ‘वंदे मातरम’बद्दल आपुलकी वाटू लागली. या भूमिकेतून ‘जनगणमन’ या गीतावर शंका उपस्थित करण्यास सुरुवात झाली. वास्तविक ‘जनगणमन’ आणि ‘वंदेमातरम्’ या स्वातंत्र्य लढ्यातील दोन्ही प्रमुख गीतांशी देशातील संघ अथवा इतर हिंदुत्ववादी संघटनांचा अजिबात संबंध नाही. मात्र हेतूतः ‘जनगणमन’ हे गीत टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिले, असा दुष्प्रचार सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून केला गेला. कलकत्ता येथे २६ डिसेंबर १९११ रोजी काँग्रेसचे अधिवेशन होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी हे गीत गायले गेले. तत्कालीन पत्रकारांना गीताची भाषा न समजल्यामुळे दोन्ही गाण्यांतील फरक समजू शकला नाही. त्यांनी चुकीचे वृत्त दिले की, हे गीत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिले गेले आहे. अशीच अफवा सर्व कॉमनवेल्थ देशांत पसरवली गेली. वास्तविक रामभूज चौधरी यांनी हिंदी भाषेत लिहिलेले ‘बादशहा हमारा’ हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी लिहिले होते. ‘अमृत बाजार पत्रिका’ आणि ‘दि बेंगाली’ या वर्तमानपत्राच्या २८ डिसेंबर १९११ रोजीच्या अंकातील बातमीनुसार, त्या दिवशी दोन गीते म्हटली गेली होती. एक ईश्वर स्तुती करणारे टागोरांचे आणि ठराव पारित झाल्यानंतर पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी! काँग्रेस अधिवेशनाचा अहवालसुद्धा याच बाबीचा दुजोरा देतो. काँग्रेसच्या या अधिवेशनानंतर जानेवारी १९१२मध्ये ‘जनगणमन’ हे गीत ‘तत्त्वबोधिनी पत्रिकेत’ ‘भारत भाग्यविधाता’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यात ‘भाग्यविधाता’ ही संकल्पना दुष्कृत्यांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक युगात अवतरल्या जाणाऱ्या देवतेसंदर्भात आहे, हे या गीतातील भावार्थावरून समजून येते. स्वतः टागोरांनी १० नोव्हेंबर १९३७ रोजी पुलीन बिहारी सेन यांना पत्र लिहून भारताचा भाग्यविधाता पंचमच काय पण कोणताच जॉर्ज होऊ शकत नाही, या गीतातील ‘अधिनायक’ म्हणजेच भाग्यदेवता असल्याचे निक्षून सांगितले. यानंतरदेखील ‘जनगणमन’ या गीतात केवळ भारताच्या सीमावर्ती भागातील प्रांताचा समावेश केला असून पूर्वोत्तर राज्यांचा समावेश नसल्याबाबतदेखील वाद निर्माण झाले. या गीतात काश्मीर, राजस्थान, केरळ, हैदराबाद, म्हैसूर आदी प्रांतांचा उल्लेख नाही आणि पाकिस्तानचा भाग असलेल्या सिंध प्रांताचा मात्र समावेश आहे! म्हणून ‘सिंध’ हा शब्द वगळून त्या जागी ‘काश्मीर’ या शब्दाचा अंतर्भाव करावा, अशी मागणी करून, तशी याचिका २००५मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली.
भारतीय प्रजासत्ताकास अर्धशतकाहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. आज प्रत्येक भारतीय नागरिक हा ‘अधिनायक’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ आहे. गेल्या १०५ वर्षांपासून समस्त भारतीयांना ‘जनगणमन’ या गीतातून राष्ट्रभक्तीची चिरंतन प्रेरणा मिळत आहे. म्हणूनच देशबंधू चित्तरंजन दासांनी या गीताचे वर्णन ‘वैभव आणि विजयाचे शाश्वत प्रतीक’ असे केले होते!
राज कुलकर्णी
rajkulkarniji@gmail.com
बातम्या आणखी आहेत...