आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितांजली: संवाद भाषेच्या कविता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जातात, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद भासतात...
भाषा कशासाठी? या प्रश्नाचं खूप साधं उत्तर आहे- भाषा असते, ती संवाद साधण्यासाठी. भाषा होती म्हणूनच मानवाला आपल्या भावना, आपले विचार यांची देवाणघेवाण शक्य झाली. भाषेला घडवता घडवता माणूस स्वतःलाही घडवत गेला. किंबहुना मानवाचा सगळा विकास भाषेमुळेच शक्य झाला.
भाषेमुळेच मानवाला संस्कृती मिळाली, भाषेमुळेच सभ्यता निर्माण झाली, भाषेमुळेच विज्ञान अवतरले, भाषेमुळेच तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे जतन शक्य झाले. भाषा नसती तर काहीच घडले नसते. शक्य नव्हते. जगभरच्या विविध मानवी समूहांनी विविध भाषा जन्माला घातल्या, जोपासल्या. भारतासारख्या देशात काही हजार भाषा आणि बोली बोलल्या जातात. भाषा केवळ भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन अथवा माध्यम नाही. भाषेचे अस्तित्व एका मानवी संस्कृतीचे अस्तित्व असते. उत्क्रांतीचा एक मोठा अवकाश भाषेमध्ये नांदत असतो. त्यामुळे भाषा मग ती कोणतीही असो, ती टिकवणे महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळ्या जगाला बाजारपेठ करण्याच्या ईर्षेने भाषिक सपाटीकरणाची प्रक्रिया मागच्या दोन-अडीच दशकापासून खूप गतिमान होत आहे. पाठोपाठ छोट्या-छोट्या समूहांच्या भाषाही नष्ट होत आहेत. त्या त्या भाषांसमवेत त्या-त्या भाषेतील ज्ञानाचाही अस्त होत आहे. भाषा मरते तेव्हा केवळ काही शब्द संपत नाहीत, तर एक संस्कृती संपून जात असते. एका मानवी समूहाचाच अंत होत असतो. ज्ञान-विज्ञानाच्या चर्चा ज्या काळात जोरकस पद्धतीने केल्या जात आहेत, त्या वेळी भाषांचे मृत्यू दु:खद आहेत. अात्यंतिक स्वभाषाप्रेमातून अन्य भाषांप्रती विद्वेशाची निर्मितीसुद्धा संवादाला घातक आहे. महत्त्वाचा आहे तो मानवी संवाद आणि म्हणून गरजेचे आहे जगातील प्रत्येक भाषेचे संवर्धन आणि तिची जोपासना करणे. या कविता आपणास भाषिक संवादाच्या सेतूवर घेऊन जातील अशा आहेत.
------------------
एका भाषेचा मृत्यू
एक आदिवासी बाई होती गरीब
अमेरिकेच्या अलास्का प्रदेशात राहायची
नव्वदीची. तिचं नाव मेरी स्मिथ जॉन्स

तिला तर काहीच माहीत नव्हतं
तिला येत नव्हती जादू
तिला ठाऊक नव्हती हातचलाखी
तिला भेटला नाही कोणताच पुरस्कार
तिला ओळखायचे नाहीत
तिच्या देशातील लोकसुद्धा

ती मरुन गेली, दोन हजार दहाच्या एकवीस जानेवारीला,
खरं तर यात काहीच विशेष नाही
या वयात मरुन जातात बहुतेक लोक
पण सांगतो तुम्हाला,
ती मेली आणि तिची खबर,
दुरातून उडत पोहोचली माझ्यापर्यंत
रेडिओवरुन, टीव्हीमधून, पेपरच्या पानांमधून
भाषा विज्ञानाच्या चर्चेत गाजत राहिलं तिचं नाव
नव्वदीची ती गरीब म्हातारी
शेवटची व्यक्ती होती, जिला माहीत होती
‘ईयाक’ नावाची भाषा
म्हातारी मेली आणि मरुन गेली एक भाषा
या जमिनीवरुन, अनंतकाळासाठी...
यादुमनि बेसरा (संथाली)
------------------
अस्थींमध्ये भाषा

माझ्या अस्थींमध्ये,
एक भाषा असेल
गाव-माळ,
शेत-शिवार
जंगल-झाडी,
लोक-रीत
आणि कृमी-कीटकांनी तयार झालेली

किती चिमूटभर आहे
ध्वनींचं जग,
शब्दांचं संगीत
आणि स्मृतींचं सत्य
आहे किती इवलुसं.
मी लिहू पाहतो,
त्या भाषेत प्रेषितासारखा
ज्या भाषेची शाई
अगदी वाळून गेली आहे
लीलाधर मंडलोई (हिंदी)
------------------

भाषा शिशिर

करते भाषा श्वासांचा अभ्यास
टोकदार काटेरी झाडांवर
फाटून जाते पतंगासारखी
भाषा माती आहे,
भाषा आहे हवा,
भाषाच आहे पाणी,
जीव आहे भाषा, परिपूर्ण
विव्हळणाऱ्या मुक्या अंकुरांतून

आज भाषा शोधत आहे
स्वतःची ‘वेषभूषा’
तडफडते भाषा मासळीसारखी
आज ग्रीष्मातील तलावात
‘इंडियन डायरी ऑफ अमेरिका’मध्ये
किडनॅप झालेली भाषा,
आज मिणमिणत्या आकृतीमध्ये
नावापुरतीच का असेना
पण विचारांची उदाहरणं
वाचवू शकली नाही भाषा
आज भाषा केवळ बडबड झालीय

रोडरोलर किंवा सूर्यबिंबाला
चालवणारी भाषा
उधार चुकवल्यासारखी
अक्षरांच्या दागिन्यांना
एक एक करत
विकून टाकतेय आज
अस्तित्व हरवलेली,
विधानसभेच्या अगदी जवळ बसून
भाषा झालीय समाधिस्त
पुढे जाऊन लोकसभेत

नैतिक व्यक्ती चालत जातो
भाषापरिसरात
सीमेवरच्या सैनिकासारखा
हेच सांगण्यासाठी की आता
शिल्लक नाहीय भाषा
पहाट भांबावल्या चेहऱ्याची
अनोळखी प्रदेशातील धुक्यासारखे
एकत्र येतात आणि
पसरत जातात शत्रू
अशी नखरेल भाषा कुठे आहे आज?
आपले सौंदर्य कुणालाही न देता
बदलत जाते रंग शरीर जाळून
एकाच स्वरात विलाप करण्यासाठी
सांगते आज भाषा
जाऊ नका विधानसभेच्या जवळ
जाऊ नका लोकसभेच्या पुढे
पाहात राहते टक लावून
नाकावर बोट ठेवून
डोळ्यातून अश्रू ढाळीत
मूकपणे सांगते
जवळ जाऊ नका विधानसभेच्या
पुढे जाऊ नका लोकसभेच्या
विसराल अस्तित्व विसराल विचार
विसराल काळीजही कोवळे, अलवार
ओब्बिनि (तेलुगू)
------------------
सभ्यतांची भाषा

मुक्या नव्हत्या
जमिनीतून निघालेल्या सभ्यता,
माणसांचा परिस घेतलेल्या पाषाणांनी
तोडले सगळे भ्रम
पण मोडले नाहीत
भाषाविदांच्या मुळाशी असणारे विभ्रम
मुक्या नव्हत्या,
जमिनीतून निघालेल्या सभ्यता

शतकांपूर्वी जमीनदोस्त झाल्या
त्या बोलू शकल्या नाहीत
इतिहासकारांना कळली नाही
त्यांची भाषा
भाषाविदांनी उघडले नाही
त्यांचे मिटलेले ओठ
वाचली नाही
दगडाखाली दबलेल्या
सभ्यतांची भाषा,
सभ्यता मुक्या नव्हत्या!
उत्खननात चमकताहेत
प्राचीन मानवी सभ्यता
पण मानवाला गवसली नाही
प्राचीन सभ्यतांची भाषा,
भ्रमीत आहे म्हणूनच माणूस
भ्रमित आहे त्याचं भाषाशास्त्र
भाषांच्या प्राचीनतेचं ज्ञान आहे भ्रमित
बी. एल. माली
‘अशांत’ (राजस्थानी)
------------------
भाषा
भाषांना नसतं आपलं घर
काश्मिरी -
झोप उडालेली, शरणार्थी
ग्रीनपार्कच्या रस्त्याशेजारी
झोळीत सुखी खोऱ्याचे स्वप्न सजवणारी.

पंजाबी-
निरक्षर, रक्ताळलेली,
आपल्याच आठवणीत रमणारी
डोकं स्टियरिंग व्हीलवरती ठेवून
थकलेली.

तामीळ-
घामेजल्या कपड्यात
अंगण झाडणारी, भांडी घासणारी

मल्याळी-
मोठ्या जगाची स्वप्नं सोडून
तुटकी स्लिपर फटफटवत
गोठत्या थंडीत कारखान्यांची काजळी
माखून घेणारी

तेलुगू-
केसात फुले माळून, प्रतीक्षेत
एका रात्रीचा प्रियकर पुलाखाली

भाषांना नाहीय आपलं घर

हरियानवी-
शेताच्या मध्यात उभी
बाहूत डोके खुपसून याचना करत
भिलेली आपल्याच मालकाला

मैथिली अजूनही वनवासात
घाबरुन गेल्या पिल्लांसारख्या
ब्रज आणि छत्तीसगडी
एकमेकींना लगटून उभ्या
टीव्हीच्या पडद्यावर उडणाऱ्या
जंगली पक्षासारखी
सावलीत थर थर थर.
केसांची बटा सोडून वस्त्रहिन वैष्णवी
बनवते वाळूचे सिंहासन.
जाहिरातीच्या खाली उभी उर्दू
गातेय आपली शेवटची गझल

या शरणार्थीनींसाठी
एक महाल बांधण्याची इच्छा आहे
पण मला तर एक घरही बांधता आलं नाही
अगदी स्वतःसाठीही

मी अडखळत राहतो तोकड्या शब्दांत
या विकृत शरीरात
कुठून कुठून वाजत राहात अनोळखी आवाज
कोणती आहे माझी भाषा
त्या तीस मधून जी मी बोलतो दिवसभर?
की तीच पवित्र रहस्यमय भाषा आहे माझी
जी मी बोलतो रात्रीच्या स्वप्नात
माझी गोष्ट सांगताना?

माझी भाषा येते रस्त्यावरुन
एका अनाथ शिशूच्या किंकाळीतून

मालकांनो, बघा ती येतेय माझी भाषा
ती चढत आहे पायऱ्या
तिच्या पायांना चिखल लागलेला आहे
बघा ती निघाली आहे
राजकारभार करायला
मार्गदर्शक व्हायला
बघा ती चढत जातेय संवादाच्या पायऱ्या
ती चढत जातेय बलीवेदीच्या पायऱ्या
के. सच्चिदानंदन (मल्याळी)
------------------
भाषांतर
ये रे, दे चुंबन
म्हण की आता जाणार नाहीस दूर
ये रे, मुठीत एकवटू ही गोधुली
हळूहळू उतरुन येईल अंधार
मिटून जाईल रस्ता, दृश्याचा आधार

ये रे, दे चुंबन
मग त्यानंतर सांग ती गोष्ट
उच्चार ते शब्द
जे केवळ तुझ्याच ओठांवर सुंदर दिसतात
त्याच्यासमोर रात्र नाही,
अख्खी दुपार शिल्लकंय.
जी ओळ खूप पूर्वी निघून गेली
माझ्या जिभेला सोडून
त्या उष्ट्या शब्दांचा
मी करणार नाही आदर सत्कार

ये रे, दे चुंबन
मग रोमारोमांत
शब्दाग्निने करु शांतता प्रज्वलित
पुन्हा पुन्हा उच्चारु, न उच्चारलेलं वाक्य
कानांत खोलवर सांगू
रक्ताचा रक्ताशी संवाद.
अडखळत नाहीय जीभ
तिला ठाऊक आहेत इतरही गूढ भाषा
ये रे, दे चुंबन
शिकवेल तुला ती भाषा
जिभेनं, ओठांनी, धमन्यांनी
जी नेहमीच राहिलीय ऐकायची
आणि रक्तातून वाहतेय अविरत
नवनिता देवसेन (बंगाली)
------------------
भाषा
१.
मला माहीत नाही
दगड विरघळतात की नाही
पण मला व्हायचंय एक संवेदना

संवेदना जी दगडांनाही जाणवेल.

२.
भाषाच उभी करेल मला स्वतःविरुद्ध
भाषासंपन्न होऊनच मिळणार मला
पुरस्कार किंवा एखादी शिक्षा.
भाषाच असणार आहे माझं कवच, भाषेच्या विरोधात
भाषेतच करायचा आहे मला माझा विस्तार
उडायचं आहे
भाषेच्या अवकाशात, भाषेचे पंख लावून
सिद्ध करायची आहे मलाही माझी शक्ती
हे ईश्वरा!
पुरे झालं आता निर्वात पोकळीतलं जगणं
भाषेचं व्हायचं आहे मला निर्झर जीवन!

३.
ज्याला केवळ अर्थच ठाऊक आहे
तो उघडत नाही सर्जनाचा दरवाजा
अर्थाचं एक शास्त्र असतं
आणि सर्जन-
प्रत्येक शास्त्राचं उल्लंघन

आकाशाच्या अनंत विस्तारात
सर्जन शोधतं प्रत्येक वेळी
एक नवी जागा
सर्जन, रचतं प्रत्येक रचनेत
प्रेमाचा एक नवा चेहरा
प्रत्येक वेळी


कुणीच नाहीय
आणि घडून येताहेत
सगळे चमत्कार
एक मलमली पडदा आहे अदृश्य
धरित्रीच्या आणि आकाशाच्या मधोमध पाण्याचा
आणि या पडद्याआडून वाकून पाहतय
इंद्रधनुष्य!


प्रत्येक स्वाहानंतरही शिल्लक राहतेच काहीशी राख
वितळल्यावर, गळल्यावर किंवा वाफ झाल्यानंतरही
शिल्लक राहतोच कुठे न कुठे
काही काळीज ठोक्यांचा श्वास!

अंतानंतरही शिल्लक राहते - भाषेचे सत्य
यातच असते कवितेचे बियाणे
अाख्यानांची शक्यता
सगळ्या अहंकाराला मोडीत काढणारा संकल्प
निर्मात्याचा!
निर्मितीचा!!
प्रमोद त्रिवेदी (हिंदी)
------------------

भाषामृत्यू

कृष्ण कुमार त्रिवेदी (हिंदी)
इतर अनेक बाबींप्रमाणं
भाषाही मरुन जातात
हळू हळू
पण गरजेचं नाहीय की
म्हातारी होऊनच मरावी एखादी भाषा

जेव्हा
शब्द अनोळखी होतात
अर्थहिन होतात,
जेव्हा पराभूत होतात
भाकरीच्या लढाईत,
जेव्हा तोंड फिरवतात
अगदी सख्खे,
जसं त्यांनी फिरवलं आहे तोंड
अर्थहिन स्वकियांपासून.
तेव्हा,
मरुन जाते भाषा !!
कवितांचा अनुवाद - डॉ. पृथ्वीराज तौर
संपर्क - ७५८८४१२१५३
drprithvirajtaur@gmail.com
बातम्या आणखी आहेत...