आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रील अँड रिअॅलिटी: चुंबन, प्रेमाचा त्रिकोण आणि सिनेमाची आद्य फॅक्टरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वी ‘बॉम्बे टॉकीज’ नावाचा सिनेमा आला होता. या नावाचा कशाशी संबंध होता? ते नाव काय सूचित करत होतं? केवळ चमकदारपणा त्यात होता, की एका देदीप्यमान इतिहासाची ती रुपेरी आठवण होती?
भारतीय सिनेमाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संग्राह्यमूल्य असलेलं काहीतरी करावं, म्हणून अनुराग कश्यप, दिबांकर बॅनर्जी, करण जोहर आणि झोया अख्तर एकत्र आले. भाषा, धर्म, पंथ, आणि संस्कृतीचे अडथळे पार करून भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनलेल्या सिनेमाला आदरांजली म्हणून या चौघांनी एकत्र येऊन सिनेमा तयार केला. या सिनेमात आपल्या आयुष्यावर सिनेमाचा असणारा प्रभाव दाखवणाऱ्या चार शॉर्ट फिल्म्स होत्या. सिनेमाचे शीर्षक काय ठेवावे, असा प्रश्न उपस्थित झाला. चौघांनी सर्वसहमतीने ‘बॉम्बे टॉकीज’ हे नाव फायनल केलं. खूप लोकांनी तो सिनेमा पाहिला. अनेकांना आवडलादेखील. पण ‘बॉम्बे टॉकीज’ हे सिनेमाचं नाव का ठेवलं, असा प्रश्न अनेकांना पडला. हे नाव या चौघा दिग्दर्शकांना का पसंत पडलं?
हा बॉम्बे टॉकीज नावाचा इतिहास आहे. बॉम्बे टॉकीजचा इतिहास हा कुठल्याही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी रंजक नाही. त्यात काय नाहीये? सुंदर नायिका आहे, खळबळजनक विवाहबाह्य संबंध चित्तथरारक आहेत, कुठल्याही प्रेमकथेत आवश्यक असते ते चुंबन आहे, विरहदग्ध खिन्न-विमनस्क नायक आहे.
‘बॉम्बे टॉकीज’ हा फिल्म स्टुडियो हिमांशू राय आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी देविकाराणी यांनी १९३५मध्ये स्थापन केला. दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटसृष्टीचा पितामह म्हटलं तर हिमांशू राय यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या ‘कॉर्पोरेटायझेशन’चे भीष्माचार्य म्हणावं लागेल. हा स्टुडियो त्या वेळी जंगल समजल्या जाणाऱ्या मालाडमधल्या सतरा एकर जागेवर पसरला होता. मूळचे कलकत्त्याचे असणारे हिमांशू राय शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांचा ब्रिटिश रंगभूमीशी परिचय झाला. मुळातच रसिक असणाऱ्या राय यांना नाटकाचं माध्यम आवडलं. त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिका केल्या. नंतर त्यांचा सिनेमामाध्यमाशी परिचय झाला. राय या माध्यमाच्या प्रेमातच पडले. मग त्यांनी यापुढची कारकिर्द सिनेमामध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्कालीन जर्मन चित्रपटनिर्मितीगृहांशी हातमिळवणी करून दोन सिनेमे तयार केले. त्यांच्या सिनेमानिर्मितीवर जर्मन तंत्राचा ठसा कायमचा उमटला.
दरम्यान, लंडन वास्तव्यात राय यांची गाठ पडली, देविकाराणी यांच्याशी. सुंदर, बुद्धिमान देविकाराणी चित्रपटात काम करण्यासाठी राय यांना भेटल्या होत्या. पहिल्या भेटीतच राय देविकाराणीच्या प्रेमात पडले. खरं तर राय यांचा एक विवाह अगोदरच झाला होता. पण प्रेम काय अशा अडथळ्यांना जुमानतं? महत्त्वाकांक्षी देविकाराणी यांनी पण राय यांच्या प्रणयाराधनाला प्रतिसाद दिला. राय यांच्यासोबत सहजीवन सुरू केलं तर व्यावसायिकदृष्ट्या शिखरावर पोहोचू, याचीही त्यांना जाणीव होती. त्यातूनच आपल्यापेक्षा तब्बल सोळा वर्षं मोठ्या असणाऱ्या हिमांशू राय यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लग्न केल्यावर भारतात परत येऊन चित्रपटनिर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मालाडमध्ये उभारलेला ‘बॉम्बे टॉकीज’ हा स्टुडियो अत्याधुनिक आणि त्या काळचे सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरायचा. त्या विस्तीर्ण स्टुडियोमध्ये काय नव्हतं? रिहर्सल्स रूम, एडिटिंग रूम्स, मेकअप रूम्स, डान्स रूम्स, राय दाम्पत्याचा मोठा बंगला अशा गोष्टींनी तो सतरा एकरचा परिसर फुलून गेला होता. राय साहेब यासाठी लागणारा पैसा आपल्या जर्मन भागीदारांकडून आणि भारतीय लब्धप्रतिष्ठांकडून उभा करत. जयपूर आणि हैद्राबाद ही संस्थानं राय यांच्या पाठीशी उभी होती.
पण सिनेमाच्या क्षेत्रात निव्वळ पैसा उभा करून चालत नाही. त्याला जोड द्यावी लागते, सर्जनशीलतेची. ही सर्जनशीलता राय दाम्पत्याकडे होती, यात शंका नाही. त्यांनी भारतीय सिनेमात अनेक नवीन आणि काळाच्या पुढे असणारे प्रयोग केले. भारतीय जातिव्यवस्थेवर बोल्ड भाष्य करणारा ‘अछूत कन्या’ हा चित्रपट त्या वेळेस गाजला. तो चित्रपट पाहून पंडित जवाहरलाल नेहरू एवढे प्रभावित झाले की, त्यांनी देविकाराणी यांना पत्र लिहून त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. ‘बॉम्बे टॉकीज’चीच निर्मिती असणारा ‘किस्मत’ हा चित्रपट तिकीटखिडकीवर धो धो चालला. इतका की, त्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी ‘शोले’ प्रदर्शित व्हावा लागला. ‘किस्मत’ची खासियत म्हणजे, त्यातला नायक ‘अँटी हिरो’ होता. तो सिगरेट ओढायचा. मद्य प्यायचा. सर्वगुणसंपन्न. बुळे आणि नायिकेपेक्षा जास्त अश्रूपात करणारे नायक दाखवणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हे क्रांतिकारी पाऊल होतं. त्याचबरोबर ‘बॉम्बे टॉकीज’ आपल्या चित्रपटांद्वारे तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेला धक्के देण्याचेही काम करत होतं. देविका राणी आणि हिमांशू राय यांनी ‘कर्मा’ चित्रपटामध्ये भारतामधलं पहिलं चुंबन दृश्य (तब्बल दीड मिनिटाचे ते चुंबनदृश्य युट्युबवर पाहायला मिळेल) चित्रित केलं. त्या काळात या चुंबनदृश्याने किती गहजब झाला असेल, याची फक्त कल्पनाच करता येते.
‘बॉम्बे टॉकीज’चे चित्रपट चालत होते. हिमांशू राय आणि देविकाराणी ही नावं घराघरात प्रसिद्ध होती. ज्यासाठी विदेशातील आकर्षक करियर सोडून हिमांशू राय भारतात परत आले होते, ती सगळी उद्दिष्टं पूर्ण झाली होती. सगळं कसं सुशेगात चालू होतं. पण इतकी आदर्श परिस्थिती नियतीला कधीच मंजूर नसते. हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्या प्रतिसृष्टीला पण ग्रहण लागलं. त्या ग्रहणाचे नाव होते नजमल हुसेन. मूळचा लखनौचा असणारा देखणा, रुबाबदार नजमल ‘बॉम्बे टॉकीज’च्या चित्रपटात नायक म्हणून काम करायचा. अशा या तरुण देखण्या नजमलने देविकाराणींवर भुरळ घातली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दोघेही जवळ आले. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात पण आणला. दोघेही कलकत्त्याला निघून गेले. हिमांशू राय यांना दुहेरी जबरदस्त धक्का होता हा. त्यांची अर्धांगिनी तर त्यांना सोडून गेली होतीच, शिवाय त्यांच्या ‘बॉम्बे टॉकीज’ची सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री पण त्यांना सोडून गेली होती. राय हे या प्रकरणामुळे खचले. त्यांचा ताठ कणा मोडला. नंतर काही जवळच्या लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे देविकाराणी फिरून राय यांच्याकडे पुन्हा परतल्या. पण बराच उशीर झाला होता. काचेला तडा गेला होता.
संकटं आली की चारी बाजूंनी येतात. दुसरं महायुद्ध १९३९ला सुरू झालं. ब्रिटिश सरकारने ‘बॉम्बे टॉकीज’कडे येणारा जर्मन भांडवलाचा ओघ थांबवला. ‘बॉम्बे टॉकीज’चा कणा असणाऱ्या जर्मन तंत्रज्ञांना परत पाठवून दिले. चंद्रग्रहण पूर्णत्वाला गेलं. ‘बॉम्बे टॉकीज’ची रया जाऊ लागली. तशातच खचलेल्या हिमांशू राय यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देविकाराणी यांनी हा एकखांबी तंबू चालवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. पण अधोगती थांबली नाहीच. ‘बॉम्बे टॉकीज’ने शेवटचा आचका दिला. ‘बॉम्बे टॉकीज’ बंद पडलं!
फक्त चाळीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, या एका वाक्यात ‘बॉम्बे टॉकीज’चं कर्तृत्व सांगता येत नाही. बॉम्बे टॉकीजने काय केले? अशोककुमार आणि दिलीपकुमारसारखे दिग्गज नट भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. बाल्यावस्थेत असणारा भारतीय सिनेमा वयात आणला. अस्ताव्यस्त भारतीय चित्रपटसृष्टीला शिस्त लावली. साचलेल्या भारतीय मूल्यव्यवस्थेला भीमटोले दिले. मुख्य म्हणजे, वर्षानुवर्षे भांडवल उभारून सिनेमाचा धंदा व्यवस्थित चालवून दाखवला. आज इतकी अनुकूल परिस्थिती असूनदेखील यू टीव्ही आणि बालाजीसारखे स्टुडियो आर्थिक शिस्तीअभावी बंद पडताना दिसतात, तेव्हा हिमांशू राय आणि देविकाराणी या द्रष्ट्या लोकांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच हा बॉम्बे टॉकीज नावाचा इतिहास आहे, आणि तो खूप अभिमानास्पद आहे.
अमोल उदगीरकर
amoludgirkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...