आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फतव्यावर फतवं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यावर समाजाचे उपकार असत्यात, आणि त्यातून उतराई व्हायसाठी आपणही कायतर सामाजिक कार्य केलं पाहिजे, असं बऱ्याचदा ऐकायला मिळायचं. पुढपुढं जाईल तसं कळालं, की समाजसेवा करायला स्पेशल लोक असत्यात. त्यांना समाजसेवक म्हणटलं जातंय. आता समाजसेवक चिक्कार लोकं आजूबाजूला असत्यात. एखाद्या कार्यक्रमाला म्हणजे, वाढदिवस, जयंती, पुरस्कार प्रदान कार्यक्रम अशा ठिकाणी या समाजसेवकांना बोलावलं जातं. मग ते त्या त्या स्टेजवरून भाषनं देतात.

आता अलीकडं म्हणजे, डिजिटल बोर्ड लागायला लागल्यापासून ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून चिक्कार बोर्ड लागलेले बघिटले, ते बघून मनात विचार आलं, एवढी सामाजिक कार्यकर्ते हायीत तर देश कसं काय मागं राह्यला लागलाय? डिजिटल बोर्ड(फ्लेक्स) जिथं तयार केलं जातंय, तिथल्या डिजायनर लोकांनी म्हणटलं की, मोठ्या लोकास्नी कायतर असतंय म्हणजे मंत्र्याला मंत्री, सरपंचाला सरपंच, चेरमनाला चेरमन आणि कुणाला काय नसतंय, त्यला समाजसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हीच शुभेच्छुक लोकास्नी विचारून लावतो. तर अशानं बरीच समाजसेवकं घडवण्यात डिजिटल बोर्डवाल्यांचा हात हाय.
 
आता समाजसेवक लोकाबद्दल सगळीकडं लै म्हणजे लै आदर असतंय. अनेक समाजसेवकांबद्दल काही गोष्टी सारख्या असत्यात. त्यापैकी काही गोष्टी - समाजसेवक शुद्ध, नितिमत्ता असलेला, बऱ्याच वेळेला बिनलग्नाचा (हे एवढ्यासाठी की लग्न न झालेल्या लोकांवर समाजाचा विश्वास असतोय, म्हणजे ह्यला बायकापोरं नहीत तर हे कायबी केलं तर कुणासाठी म्हणून करंल?) असतो/ते, निर्व्यस्नी असतो. म्हणजे, एकंदरीत गावातला सगळ्यात चांगला माणूस. गावात अशी चारदोन माणसं असत्यातंच. गावात कायपण झालं की, त्यांना मध्यस्थी करायला बोलावलं जातंय, ही हरेक गावची कथा. का बोलावलं जातंय, तर तो माणूस कुठल्याच बाजूचा नही म्हणून, योग्य असं मत देईल म्हणून. बऱ्याच गावात अजून अशाच मुरुब्बी ज्येष्ठ लोकांना बोलवायची पद्धत हाय. मग ही लोकं आल्यावर जे काय म्हणतील, ते ऐकावं लागतंय म्हणजे, तसंच वागावं लागतंय. एखाद्याला ते नही पटलं आणि  तर त्यानं काहीततर वेगळं केलं तर त्याला गावापुढं कोणच कुठल्या तोंडानं विचारत नही (तो गावद्रोही ठरतो). हे त्यांच्याबद्दल असणाऱ्या आदरयुक्त भीतीतनं व्हायचं. कसली का असंना, भीतीच ती.

आता असे समाजसेवक मुळातच नीतिमान असल्यानं गावात दारूबंदी करायचं, गावात पोरापोरीस्नी बोलू द्यायचं नही, अशासाठी लढा देणारी. मात्र लढा म्हनन्यापेक्षा दबावाने गावात कायदाच करणारे समाजसेवक आज भरपूर हायीत आणि मनात नसलं तरीपण, झक मारत त्या मनमानीला माना डुलवणारी बैलंपण चिक्कार हायीत. त्यांचा दोष पण काय नही, कारण माणूस मुळातच समाजशील हाय. समाजात राह्यचं वाळीत पडायचं नही, ह्या भीतीतून विरोध करणं तर लांबचं, पण ‘ब्र’ काढायचा किंवा प्रश्न विचारायचं (जरी अधिकार असला तरी) धाडस सामान्य माणसाचं होत नही. ह्या अशा गप्प बसण्यातून, ह्या नीतिमान लोकांना मोकळीक मिळून, ते आपली मतं लोकांवर लादायला चालू करतात. 
 
अशांना स्टेज मिळालं, माईक समोर आला, की मतं मांडायला किंवा आपली मतं लादायला, हे सुट्टी देत नाहीत. त्यात स्त्रियांनी काय पद्धतीची कपडे घालायची ते नवऱ्याबरोबर कसं वागायचं, ह्या सगळ्याबद्दलचं ज्ञान वाटप हुतंय. पुढं बसणारी लोकं पण जोरदार प्रतिसाद देत्यात. भाषन झालं की देणगीचा कार्यक्रम येतोय. प्रत्येक जण आपल्या परिस्थितीप्रमाणं देतोय. बऱ्याच वेळेला मोठमोठ्या रकमा देणारे हे नेतेमंडळी आणि उद्योजक लोक असत्यात. सामान्य माणसं ऐकायला जास्त असत्यात. संस्थेला मिळणाऱ्या देणगीत सामान्यांचा वाटा पन्नास टक्के म्हणटलं, तरी लै झालं. आता जे मदत करतात त्यांची बाजू घेणं हे साहजिकच असतंय. भलेही ती चांगली असूदे, नाहीतर वाईट. कारण मदत आणि आधार या गुंतवणुकी हायीत. ज्याचं परतावा आला नहीतर माणूस दुःखी होतोय. त्यातून मदतीच्या बदल्यात बाजू घेण्याचं काम ह्या मंडळी इमानीनं करत्यात. 

त्यात होतंय असं की, चारित्र्यसंपन्न माणूस पाठिंबा देतोय, हे बघून त्याचा सामान्य माणसावर माफक असा परिणाम होतोच. एकंदरीत काय तर समाजातील माणसाची मतं ठरवायला, जसं लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी पत्रकारिता मदत करते, (पण ती निरपेक्ष असते) तसंच समाजसेवक हेही कोणा एकाची बाजू घेऊन व्यक्त होत असले, तर साहजिकच जनतेच्या मनावर परिणाम होवून तिथं मत ठरतात. म्हणून बऱ्यापैकी नेतेमंडळी समाजसेवकाला धरून असत्यात. कायमच्याच प्रचारामुळं त्या समाजसेवकाच्या मुलखातला एखादा तरुण तरुणी जर नव्यानं राजकारणात येत असला, तर त्याचं येणं हे अवघड काम होऊन बसतं, जसं गावात कोण आवाज उठवू बघत नही, तसंच हिथंपण होतंय आणि राजकीय पटलावर नव्यानं येणाऱ्याची अडवणूक होवून बसते. मग आपण ‘घराणेशाही’ ‘घराणेशाही’ म्हणून बोंब मारत बसतो. 
 
राजकारण सोडून दिलं तरी दारूबंदी करा, स्त्रीने अशीच कपडे घाटली पाहिजेत, मुलामुलींनी बोललं नही पाहिजे, ह्या असल्या फतव्यांकडं बघताना हासूच येतंय. आता नमुन्यासारखं बघा, दारू दुकानावरची पाटी काय असत्या? सरकारमान्य देशी दारू दुकान. आता सरकारला हे मान्य हाय, पण आमच्या समाजसेवक लोकास्नी हे मान्य नही. त्यांनी ठरवून टाकलंय की, दारू पिणारा माणूस हा बादगड असतोय दारू पिल्यानं वाटच लागत्या. त्यामुळं दारूबंदी. दारू नैतिक की अनैतिक ठरवण्याचा पतकूरा ह्यांना मिळालाय का? असा प्रश्न पडतोय. आज राज्यात गुटखाबंदी हाय, पानपठ्या बघिटल्या, तर त्या लाखांच्या संख्येत. गुटखा विक्री होत्या की नही ह्याबद्दल बऱ्यापैकी लोकांना माहिती असलंच. ज्याला खायचं तो खातोयच, प्यायचा तो पितोयच. पण बंदी असल्यावर कित्येकदा काळ्या मार्गाला बळ मिळतंय. त्यातून तस्करी, गुन्हेगारी, हप्तेगिरी येतेच ती वेगळी. पण नीतिमत्ता नितिमत्ता म्हणून समाजाच्या मनाला दबावात ठेवून आपलंच म्हननं रेंबटणारे काय कमी नहीत. त्यातून समाजाची मनं मारणाऱ्या, आपलंच खरं करणाऱ्या मंडळीनी जरा लक्ष देणं गरजेचं हाय. मुळात, हे सगळं संवेदनशील आणि नीतिमत्ता आल्यानं भीतीपोटी कोण बोलत नहीच नही. बोलला तर तो गद्दार ठरतोय किंवा तोंडावर अशी काही भावनिक उदाहरणं मारली जात्यात, की पुढचा गप्पच बसावा. दारूबंदी कार्यक्रम कसा तसाच स्त्रियांच्या कपड्याबद्दलचा संवेदनशील प्रश्न. त्यात संस्कार आणि बऱ्याच गोष्टी उकरून काढल्या जातात आणि तोंड झाकलं जातंय. 

पिच्चरात दाखवत्यात तसं नटनटी प्रेमात पडत्यात आणि गाण्यात जनता नाचत्या तसंच हिथंपण होत आलंय आणि आजपण जोरदारपणे अखंडपणे चालू हाय. वेळेवर सावरलं नही प्रश्नं विचारली नही, तर फतव्यावर फतवं निघतील, आणि त्या तालावर नाचायची पाळी यायची. 
ह्या सगळ्या गोष्टीत प्रसिद्धीची हाव नसलेला निरपेक्ष माणूस दुर्मीळ झालाय आणि दुर्लक्षित राहिलाय. त्याचं काम लक्षात येत नही, आणि तो लक्षात आणून द्यायच्या फंदात पडत नही. जिवंत शोभिवंत पुतळ्यांना मात्र मागणी भरपूर हाय आणि पुरवठ्याला पण खंड नही.
- श्रेणिक नरदे
संपर्क : ९९७५७२८६७१
 
 
बातम्या आणखी आहेत...