आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Communal Harmony Within Religious Festivals During Month Of Shravan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सण स्‍वातंत्र्याचा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्राशी आमचे नाते खूप भावनिक, आध्यात्मिक आणि आत्मिक आहे. म्हणूनच या समुद्राचे हे स्मरण, पूजन करणे आणि मध्येच उफाळणा-या या समुद्रास शांत राहून आम्हास साह्य कर, असे सांगण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. समुद्रकिनारी राहणारे लोक नारळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या साक्षीने समुद्रदेवतेची पूजा करून त्यास श्रीफळ अर्पण करतात, तर ब्राह्मण समाज याच दिवशी श्रावणी करतात. श्रावणी म्हणजे आत्मशुद्धी आणि नवीन यज्ञोपवीत धारण करणे. या पवित्र दिवसानेच या महिन्याची सुरुवात होत आहे.
याच दिवशी थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. या त्रिवेणी संगमावरून हलकेच रक्षाबंधनाची झुळूक मनाला रिझवते. या दिवशी बहीण भावाला एका नाजूक रेशीम धाग्याच्या सूत्राने जबाबदारीच्या भावनेत गुंफते. रक्षाबंधनाचा खरा उद्देश अनिष्ट गोष्टीपासून समाजाचे रक्षण व्हावे म्हणून विप्रवर्गाने मंत्रोच्चाराने पवित्र केलेले रेशीमबंध इतर जणांच्या मनगटी बांधणे, असा आहे; परंतु आम्ही हा दिवस फक्त भावाबहिणीच्या बंधनाचा समजतो. त्यातला मूळ अर्थ विसरतो.
जेव्हा जेव्हा धर्माला आणि समाजाला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा देव मानवरूपात पृथ्वीवर अवतार घेतो, समाजाची मानसिक, भावनिक घडी पुन्हा पूर्ववत आणण्यास्तव दुष्टांचे निर्दालन करतो. असेच दुष्टांचे निर्दालन करण्याकरता द्वापार युगात श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाने देवकीपोटी जन्म घेतला. अनेक अद्भुत घटनांनी श्रीकृष्णाचे जीवन व्यापलेले आहे. समाजातल्या सर्वच स्तरांतील लोकांना तो आपला वाटतो, कारण तो सर्वांभूती सामावलेला आहे. आबालवृद्धांच्या मनामनात त्याचे अढळ स्थान आहे. म्हणूनच आजही कृष्णजन्मोत्सव श्रद्धेने, आत्मीयतेने करतो. बंधुभाव आणि एकतेच्या जाणिवेतून कृष्णजन्माष्टमीच्या दुस-या दिवशी दहीहंडी आणि गोपाळकाला या कार्यक्रमातून आम्ही कृष्णसख्याच्या आठवणींना उजाळा देतो. उंचच उंच दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना व्यायाम, कवायती,सामाजिक ऐक्याचे धडे आपोआप मिळतात. (अर्थात, या स्पर्धा आता इतक्या निकोप राहिल्या नाहीत. कारण त्यात राजकीय हस्तक्षेप होत आहेत.) कारण कुठल्याही सवंगड्यांत आणि कोणत्याही खाण्यात कृष्णाने कधीच भेदभाव केला नाही. उलट सर्वांनी आणलेले खाद्यपदार्थ एकत्र करून आणि स्वत: आणलेले नवनीत (लोणी) त्यात मिसळून ते सर्व जण वाटून खात. तोच श्रीकृष्णजन्माष्टमीचा गोपाळकाला आहे. त्याचे स्मरण म्हणून दहीहंडीचे प्रयोजन.
सण, उत्सव हे पारंपरिक, पूर्वापार चालत आलेले आहेत; परंतु स्वातंत्र्याचा उत्सव हा 1947पासून सुरू झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 आॅगस्ट रोजी मिळालेले स्वातंत्र्य आम्ही तिरंगा उंच उंच फडकवत आनंदाने साजरे करतो, ते अनेक देशभक्तांच्या बलिदान आणि आत्मसन्मानाच्या लढ्यामुळेच. त्याचाच हा सण आणि उत्सव ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून अधिकच तेजाने उजळून निघतो.
हे तेज धवलवस्त्रांकित अहिल्याबाई होळकरांच्या राजवटीतही जनतेने अनुभवले आहे. अनेक धर्म, शास्त्र आणि लोककल्याणकारी कामे करून लोकांचे जीवन अधिकच समृद्ध करणाºया अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी म्हणजे ‘पुण्यश्लोक’ अहिल्याबार्इंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे ऋण स्मरण्याचा शुभ दिवस स्वातंत्र्य दिवसाची पाठराखण करत येतो. अहिल्याबार्इंच्या आठवणी आणि कार्याच्या स्मृतींना उजाळा देतो.
अशा निर्भेळ आनंदात पिठोरी अमावस्या येते. या दिवशी श्रावण निरोपाचे हितगुज करत ‘अतिथी कोण आहे’ ही साद देतो. पिठोरी हे व्रत असून ते कुंतीच्या वायनदान या संकल्पनेतून आजही चालू आहे. खीरपुरीचे वायनदान आई आपल्या मुलाला या दिवशी ‘अतिथी कोण आहे?’ हे मागे न पाहता विचारते आणि देते. ही प्रथा भारतीय ‘मातृदिन’ म्हणून पूर्वापार चालत आलेली आहे. या प्रथेचा मुख्य उद्देश आईने मुलाला चांगले आरोग्यवर्धक खायला देणे हाच आहे.
आणखी एका ऋणाची जाणीव आम्ही या दिवशी ठेवतोच. या दिवशी आम्हाला मुबलक अन्नधान्य मिळावे म्हणून वर्षभर शेतकरी शेतात राबत असतो. त्याला या कामात निष्ठेने सहकार्य करतो तो वृषभ राजा. हा वृषभ राजा म्हणजे आमचा आवडता बैल. त्याच्याशिवाय शेती ही संकल्पनाच चुकीची ठरेल. अव्याहत आणि अविरत कष्ट करणाºया या बैलांनाही वर्षातील एक दिवस विश्रांती मिळावी, त्यांचे कौतुक करावे म्हणून श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा करतात. बैलांना सजवून त्यांना सन्मानाने मिरवत घरी आणतात. घरातल्या सुवासिनी त्यांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा घास भरवतात. शहरी भागात मातीचे बैल आणून त्यांची पूजा केली जाते. ही पूजा संपन्न होत नाही तोच अधिक भाद्रपदाचे बिगुल वाजू लागतात. याच दिवशी ‘पतेती’ या पारशी नूतन वर्षाचाही जल्लोष सुरू होतो आणि समाजातल्या विविधतेचे दर्शन अशा विविध दिनमाहात्म्याने समाजातला एकोपा वाढवत राहते. हीच भावना या सर्व सण, उत्सव आणि प्रथा, परंपरेतून दिसते.
अधिकमास हा पुरुषोत्तममास, मलमास, क्षयमास म्हणूनही ओळखला जातो. हा असा अधिक महिना का येतो, हा प्रश्न मनात सहजच येतो. मराठी शक संवत्सर कालगणनेनुसार एक वर्ष हे 354 दिवसांचे असते. त्याला चांद्रमास म्हणतात, तर इंग्रजी कालगणनेप्रमाणे एक वर्ष हे 365 दिवसांचे असते. हा दोन्हीतला फरक आणि भारतीय सौरवर्षाचा ताळमेळ जुळावा म्हणून धर्मशास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी एक जास्तीचा महिना वर्षात घेतला. हा तेरावा जास्तीचा म्हणून याचे नाव अधिक महिना आहे. परंतु या महिन्यात सूर्य संक्रमण राशीतून होत नाही. हा महिना मंगल कार्यास उपयुक्त समजत नसले तरी या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. अधिक वाण, दानधर्म, दीपदान, देवदर्शन आणि जावयाला अपूप वाण हे या महिन्यातले महत्त्वाचे पुण्यकर्म आहे. या महिन्याला धोंड्याचा महिनाही म्हणतात. पुरणाचे धोंडे करून त्याचेही वाण जावयाला देतात. अपूप म्हणजे अनारसे. हे 33च्या संख्येने देव, ब्राह्मण आणि जावयाला दिल्याने अधिक पुण्य पदरी पडते असा समज आहे. धर्म आणि दान हे आपल्या इच्छा, आर्थिक स्थिती, वेळ आणि त्यामागच्या भावनेप्रमाणे प्रत्येकाने करावे. कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या भावना आणि दृष्टिकोनाचा आहे. भाद्रपद महिन्याच्या ठिकाणी हा अधिकमास आल्यामुळे आता भाद्रपद महिना अधिक भाद्रपद आणि निज भाद्रपद म्हणून असेल. (ज्या महिन्याच्या ठिकाणी अधिक येतो तो महिना अधिक आणि निज असा असतो.) भरगच्च आॅगस्ट महिन्यात इतके सारे धार्मिक उत्सव आहेतच, त्यात ‘रमजान ईद’मुळे अजून भर पडली आहे. समाजातल्या सर्वांमध्ये बंधुप्रेम वाढावे, त्यांनी सर्व धर्मीयांच्या भावना जपाव्यात, त्यातूनच एकतेचे पडसाद उमटतात आणि ‘तिरंगा’ अजूनच उंच उंच फडकतो.