आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम किल्ले राजदेरची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसजसा रविवार जवळ येत जातो, तसतसे आमच्या ट्रेकिंगवेड्या मित्रांच्या टोळीत, ‘या रविवारी कुठला किल्ला अथवा डोंगर पालथा घालायचा’ याचे बेत शिजायला लागतात. आजूबाजूला भरपूर गड, किल्ले लाभलेल्या आम्हा नाशिककरांना अशी ठिकाणे अजिबात दुरापास्त नाहीत. त्यातूनही जरा कुठे कोणाच्या कानावर एखादे नवीन ठिकाण आले की झालेच! सगळ्या ट्रेकची जबाबदारी, शिरसावंद्य मानून गडी कामालाच लागतो. नवीन ठिकाणाची माहिती मिळालेला गडी, मग फोनाफोनी (अथवा ई-मेलामेली) करून कुठे आणि किती वाजता भेटायचे, कोणी, काय सामान आणायचे याचे ऐलान करतो आणि मग आमच्यासारखे उत्साही मावळे, सांगितलेल्या रसदीचा जामानिमा करून, दिल्या ठिकाणी बरहुकूम हजर होतात. कधी दुचाकी, तर कधी चारचाकीतून रविवारी भल्या पहाटे ‘दौड’ सुरू होते ती ‘गड मारून यायचाच’ याच आवेशात!
एका रविवारच्या पहाटे आमच्या तीनच मावळ्यांच्या टोळीने किल्ले राजदेरच्या दिशेने कूच केले. मी, यजमान दीपक आणि मार्गदर्शक मावळा हृषिकेश, असे आम्ही पहिल्यांदाच राजदेर सर करणार होतो. राजदेरवाडी हे ठिकाण नाशिकपासून साधारणत: 70 किमी आहे. नाशिकपासून चांदवड या रेणुकामातेच्या राजमार्गासाठी भरभक्कम टोलही मोजावा लागतो. आम्हीही साधारण सकाळी 8 वाजता रेणुकामातेचे दर्शन घेऊन मंदिराच्या आवारातच भरपेट मिसळ हादडून किल्ले राजदेरची मोहीम फत्ते पाडण्यास सज्ज झालो.

चांदवड गावापासून साधरणत: 10 किमी डावीकडे आत गेल्यास इंद्राई-राजदेर ही ट्रेकर्सना नेहमीच भुलवणारी रेंज पसरलेली आहे. राजदेरवाडीपर्यंत चांगली पक्की सडक आहे. या 10 किमीच्या रस्त्यात आम्हाला इथल्या वैविध्यपूर्ण जैविकतेचे दर्शन झाले. अनेकविध पक्षी व शिंपी आणि सुगरण पक्ष्यांची अनेक घरटी दिसली. मग दीपकमधला फोटोग्राफर उचकला! त्याने दुर्बिणीला कॅमेरा लावून पक्ष्यांचे जास्तीत जास्त क्लोजअप व सुंदर फोटो घेतले. राजदेरवाडीतील शाळेजवळ आम्ही आमच्या होंडासिटी नामक घोड्याला आराम दिला आणि गावक-यांकडे किल्ल्यावर जाणा-या मार्गाची चौकशी करून त्या दिशेने आमचे ‘पायलट’ कामास लावले. आधीच कोण्या हौशी ग्रुपसाठी मारलेल्या पायलट ट्रेकमुळे किल्ल्यापर्यंत जाणा-या मार्गावर, ठिकठिकाणी पांढरी-पुणेरी निशाणेबाजी करण्यात आलेली होती. त्यामुळे मार्ग काढण्यास फारसा त्रास होत नव्हता. समोर निळ्या आभाळाच्या छातीवर रुंद पसरलेला राजदेरचा कातळी विस्तार पावलोपावली नजरेत भरत होता.

गावापासून सुरुवातीची खडी चढण पार करताना बरीच दमछाक होत होती; पण हसण्या-खिदळण्यामध्ये ही चढणही पार झाली. नंतर एक हलकी पठारी चढण सामोरी आली. पठारी मार्ग असल्यामुळे अंतर जास्त असले तरी दमछाक होत नव्हती. या पठारावरून किल्ले इंद्राई, गावातील आखीवरेखीव शेती, पाण्याची निळसर तळी, गावातील चिमुकला बंधारा अशी रम्य दृश्यं दिसत होती. ही चढण चढताना मात्र गुडघाभर वाढलेल्या नि सुकलेल्या पिवळसर गवतामधील लांडग्यांनी भारीच पिडले! सगळ्यांच्या पायावर, पायमोज्यांवर, पाठीवर, बॅगांना, जागोजागी लांडगे चिकटत होते. त्यांचा वेळोवेळी यशस्वी पाडाव करून अखेर आम्ही किल्ल्याच्या खड्या कातळापर्यंत येऊन पोहोचलो.


आता आमच्या डोक्यावर 50 फूट वर ख-या कातळात किल्ल्याचे प्रवेशद्वार होते. कातळही अगदी सरळसोट! त्यात ना खाचा ना भेगा; पण हे 50 फुटी सरळसोट अंतर आमच्यासारख्या नवयुगातील मावळ्यांना सर करता यावे म्हणून कोण्या किल्लेप्रेमी संस्थेच्या वतीने तेथे 50 फुटी लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. बरं, ही शिडीही सरळसोट असती तर? पण नाही! जिथेजिथे कातळ बाहेर आलेला आहे, तिथे तिथे शिडीबाईही उचकल्या आहेत. आणि तिच्या मजबुतीचा अंदाज यावा यासाठी, (त्यातल्या त्यात) कमी वजनाच्या माझी निवड झाली. मग भवानीमातेचे स्मरण करून हळूहळू चढण करत मी आणि नंतर दोघ्या ‘पक्क्या’ मावळ्यांनी हे आव्हान पार पाडले आणि आम्ही प्रवेशद्वाराशी प्रवेशते झालो!


या प्रवेशद्वारात, कातळात शिलालेख कोरलेला दिसतो. तिथून माचीपर्यंतची वाट ‘पाय-यांची’ असली तरी अत्यंत अरुंद व घसराळी होती म्हणून काळजीपूर्वक पार करावी लागली. नाही तर पुन्हा खाली 50 फूट! शिडीच्या पायथ्याशी. ती वाट कशीबशी पार करून पठारावर आलो. इथून सर्वदूर धुरकट, जांभळ्या रंगाच्या डोंगरांची एका मागोमाग एक अशी सुंदर आवरणे दिसत होती. इंद्राई उभा ठाकलेला दिसत होता, पठारावर सर्वत्र हिरवट-पिवळ्या गवताचे कुरण माजलेले होते. एके ठिकाणी खडकाळ गुहा नजरेस पडल्या. त्या गुहांमध्ये पाण्याचे तीनचार टाकही होते. पाण्यामुळे गुहांमध्ये सुखद गारवा पसरलेला होता. तिथे निनादत असलेल्या शांततेची अनुभूती घेऊन, पठारावर चक्कर टाकण्यास निघालो. एका लहानशा वडाखाली ‘हर हर महादेव’ त्यांच्या नंदीसकट विसावा घेताना दिसले. त्यांच्या साक्षीने चिवडालाडूचा फन्ना उडविला आणि पुढे चालू लागले. अनपेक्षितपणे एका ब-यापैकी मोठ्या तळ्याने दर्शन दिले. मग काय, घामाघूम झालेले आम्ही तिघेही धडक तळ्यातच! पाणी अतिशय नितळ आणि गारेगार होते. थकलेल्या पायांना थंडावा देऊन सुखावत होते. आजूबाजूच्या झाडांना, आकाशाला प्रतिबिंबित करत होते. आम्ही तिथे ब-याच वेळ रमलो. तिकडून विरुद्ध दिशेला चालत गेल्यावर भरभक्कम, पण लहानसे दगडी गढीवजा बांधकाम दिसले. ढासळलेला बुरूजही जवळच होता. या पूर्णच पठारावरून सध्या पर्वतांचे मनोहारी दर्शन घडत होते. कुठल्याही दिशेला पाहिले तरीही. वेगवेगळ्या रंगरूपाचे लहान, मोठे डोंगर नजरेत भरत होते. सर्वदूर दिसणा-या या नैसर्गिक नजराण्याने, कानात भणाणणा-या वा-याने आणि मनात जागृत झालेल्या शांत-तृप्त भावनेमुळे माझी तर ब-याच काळ समाधी लागली! या अनुभूतीमुळे राजदेर मोहीम सार्थकी झाल्यासारखे वाटले. पठार बराच वेळ पायदळी घातल्यावर आम्ही ‘उतरण’ करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा प्रवेशद्वाराजवळची, अरुंद-घसराळी वाट, पुन्हा पाठीला बाक आलेली शिडी यांची आव्हाने पार करत, आम्ही किल्ल्याखालच्या पठारावर आलो. तोपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते.


खाली गावात आल्यावर पुन्हा राजदेर किल्याकडे वळून पाहताना आपण केवळ 6-7 तासांत, इतके भलेमोठे अंतर व उंची गाठून परत आल्याचे आश्चर्य वाटत होते. थकलेले पायही तेच सांगत होते; पण निसर्गदर्शनाने फुललेले मन मात्र मोहीम फत्ते झाल्याचेच सांगत होते. असे प्रसन्न झालेले मन, पुढील आठवड्यात येणा-या कामाच्या धबडग्याला तोंड देण्यास सज्ज होऊन जाते. म्हणूनच तर म्हटले की, रविवार पुन्हा जवळ यायला लागला की पुन्हा नवीन ठिकाणाचे बेत शिजायला लागतात! मग, तुम्ही कधी आखताय तुमची राजदेरची मोहीम?