आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination: Reasoning Test Concept And Scop

तयारी स्पर्धा परीक्षा : बुद्धिमत्ता चाचणी-संकल्पना व व्याप्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. शालेय स्तरावरील स्पर्धापरीक्षा असो वा वेगवेगळ्या अभ्यासक्षेत्रात घेतल्या जाणा-या प्रवेशपरीक्षा किंवा विविध क्षेत्रातील अधिकारी पदांसाठी होणा-या निवड परीक्षा असो, अशा परीक्षांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीविषयक प्रश्न विचारले जातात. बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरविता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. (1) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning
) व (2) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning).
शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
शाब्दिक बुद्धिमत्ता
(अ) सामान्य क्षमता चाचणी : या विभागावर विचारल्या जाणा-या प्रश्नांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो, हे लक्षात येते.
(1) मालिका पूर्ण करणे. (2) समान संबंधांची जोडी पूर्ण करणे. (3) दिलेल्या घटकातील विसंगत घटक शोधणे. (4) सांकेतिक भाषेतील सांकेतिकीकरण व नि:सांकेतिकीकरणावरील प्रश्न. (5) आकृत्यांमधील रिकाम्या जागा शोधणे. (6) वेन आकृत्यांचा वापर करून विविध घटकातील परस्पर संबंध स्पष्ट करणे. (7) आकृत्यांची (त्रिकोण, चौकोन, चौरस, आयात इ.) संख्या मोजणे. (8) दिशाबोध (दिशाज्ञान चाचणी) (9) नातेसंबंधांवर आधारित प्रश्न. (10) रांगेतील क्रम व मोजणी यांवरील प्रश्न. (11) दिनदर्शिका, घड्याळ, वय यांवरील प्रश्न. (12) अधिक काठीण्य पातळी असलेले कूट प्रश्न.
(ब) अंकगणितविषयक प्रश्न : राज्यसेवा पूर्वपरीक्षेत या विभागावर 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये उमेदवारास प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कशाप्रकारे करता येतो यावरील प्रश्नांचा समावेश होतो. त्यासाठी त्याला काही मूलभूत संकल्पनांची माहिती असणे गरजेचे असते. त्यावरून या विभागातील प्रश्नांमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
(1) संख्यापद्धती : संख्यांची निर्मिती, संख्यांचे प्रकार, संख्यावरील क्रिया - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
(2) अपूर्णांक : संकल्पना, त्यांचे प्रकार, तसेच त्यावरील शाब्दिक उदाहरणे.
(3) वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ यांच्या संकल्पना व ते करण्याच्या पद्धती.
(4) शतमान व त्यावरील उदाहरणे, तसेच या घटकाशी संबंधित व्याज आणि नफा-तोटा यांवरील प्रश्न.
(5) गुणोत्तर व प्रमाण : मूलभूत संकल्पनेवरील उदाहरणे व एकमान पद्धत, तसेच आलेखांवरील प्रश्नांमध्ये होणारा वापर.
(6) काळ, काम, वेग, अंतर यांवरील प्रश्न, आगगाड्या,आगबोटींवरील प्रश्न.
(7) शाब्दिक उदाहरणे (समीकरणांवर आधारित).
(क) विश्लेषण क्षमता चाचणीत : उमेदवाराच्या विश्लेषण क्षमतेवर प्रश्न विचारले जातात त्यात पुढील उपघटकांचा समावेश होतो.
(1) वर्गीकरण : दिलेल्या माहितीचे पृथ्थकरण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
(2) तुलना : काही वस्तूंच्या विशिष्ट गुणधर्मानुसार दिलेल्या माहितीत योग्यक्रम लावणे.
(3) बैठक/आसन व्यवस्था : काही व्यक्ती अथवा वस्तूंची ओळीत किंवा वर्तुळाकार रचनेतील बैठक व्यवस्थेबाबत
गोंधळून टाकणारी माहिती दिलेली असते. त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे देणे.
(4) घटनाक्रम : एखाद्या ठिकाणी काही घटना ज्या क्रमाने घडल्या आहेत त्यांची ओबडधोबड माहिती दिलेली असते. त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे देणे.
(5) निर्णयक्षमता : बिकट प्रसंगी उमेदवार प्रसंगावधानाने कोणता निर्णय घेऊ शकेल यावर आधारित प्रश्न.
(ड) तर्कशात्रीय युक्तिवाद : यात पुढील बाबी समाविष्ट होतात.
(1) तर्क व अनुमान : यांमध्ये उमेदवारास विधानांमध्ये माहिती दिली जाते. ही माहिती पूर्णपणे सत्य मानून निष्कर्ष काढावयाचे असतात. त्यासाठी सायलोझिझम पद्धतीनुसार निष्कर्ष काढण्यावर प्रश्न विचारले जातात.
(2) विधान - गृहीतके : यांमध्ये दिलेल्या विधानामागे दडलेल्या गृहीतकावर प्रश्न विचारले जातात. त्यावरून विधानासाठी कोणती गृहीतके अध्याहृत आहेत ते तपासण्यावर प्रश्न विचारले जातात.
(3) विधान-विवाद : यात एका विषयासंदर्भात दोन किंवा तीन मुद्दे मांडलेले असतात. त्या मुद्द्यांच्या पुष्ट्यर्थ दिलेले कारण किती सबळ आहे यावर प्रश्न विचारले जातात.
अशाब्दिक बुद्धिमत्ता
(1) मालिकापूर्ती : यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. त्या मालिकेतील आकृत्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधावयाची असते.
(2) समान संबंध : यामध्ये चार आकृत्यांपैकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुस-या आकृतीत जो संबंध असतो तोच संबंध तिस-या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीतील आकृत्यांमधील संबंध पाहावयाचा असतो. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.
(3) विसंगत आकृती शोधणे : यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो त्यापैकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्मास अपवाद असणारी आकृती हे आपले उत्तर असते.
(4) आरशातील प्रतिमा व जलप्रतिबिंब : एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल यावर प्रश्न विचारले जातात.
(5) अपूर्ण आकृती पूर्ण करणे : यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधावयाचा असतो.
(6) लपलेली आकृती शोधणे : यात पर्यायातील एक आकृती प्रश्न आकृतीत असते ती शोधण्यावर प्रश्न विचारतात.
(7) घन व सोंगट्यावर आधारित प्रश्न मोठ्या घनास रंगवून लहान घनात तुकडे करणे व सोंगट्यांच्या स्थितींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
या आधारे आपल्या अभ्यासाची व्याप्ती ठरवून त्यातील एकेका घटकांची प्रभावीपणे तयारी करता येईल.त्यामुळे पुढील लेखात या घटकाची तयारी नेमकी कशी करायची? त्यासाठी कोणती अभ्यासपद्धती अवलंबायची याची चर्चा करणार आहोत.