आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षांचे जंजाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेला बसलेली तरुण मुले-मुली आणि त्यांचे पालक; हा विषय एकाच वेळेस अतीव अभिमानाचा, नि एकाच वेळेस तीव्र नैराश्याचा. परीक्षा सेट-नेटची असो की यूपीएससी-एमपीएससीची असो; घर तणावात असते. आजकाल बारावीनंतर शंभरपैकी सत्तर जण तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला उत्सुक असतात. त्याची कारणे त्यांनाही माहीत नसतात. एखादा पीएसआय व्हायचे म्हणतो. बारावीत विशेष गुण नसले तरी या परीक्षा द्यायच्याच, असे ठरवणारे अनेक जण. विशाल एक आनंदी तरुण. आईवडील नोकरी करणारे. पदवीधर झालेल्या आपल्या मुलाने वेगवेगळ्या परीक्षा द्यायला हव्यात, त्याने वेळ घालवता कामा नये; म्हणून सेल्सटॅक्सच्या परीक्षेला बसण्याचा आग्रह त्याला केला गेला.

वडलांना वाटतं, आपल्या मुलाने सर्व त-हेच्या परीक्षांचा अनुभव घेतला पाहिजे. एम. कॉम. करत असलेला विशाल अभ्यास करू लागतो. तलाठ्याची परीक्षा, बँक, राज्य सेवा, जवळपास 14 ते 16 पेपरचा अभ्यास एकाच वेळेस तो करू लागतो. आपण हे सर्व कसे करावे, पेपर्सचा कशा पद्धतीने अभ्यास करावा, त्याचे नियोजन, याबद्दल आईवडलांचे मार्गदर्शन मात्र मिळण्याचा संभव नसतो. त्यांनी स्वप्न पाहिलेले असते; ते पूर्ण करण्याची जबाबदारी विशालची असते. विशाल मदत घेतो ती मित्रांची. हा ग्रुपच वेगळा. झपाटलेला; काहीतरी करून दाखवायचे म्हणून एकत्र आलेला. यात वैद्यकीय, विधी, अभियांत्रिकीपासून कला, वाणिज्य, विज्ञान सर्व शाखांचे विद्यार्थी असतात. अभ्यास एके अभ्यास! रात्रंदिवस केवळ एकच ध्यास. विषयाचा अक्षरश: फडशा पाडणे. मूलभूत संकल्पनांत शिरणे. प्रश्न आणि उत्तरे. सखोल वाचन, तर्कसंगत उत्तरे, पर्याय, प्रतिवाद, मुद्दे आणि मांडणी. नागरी सेवा परीक्षांना बसणारी मुले जणू वेगळ्या जगात वावरणारी. त्यांना छोट्याशा परीक्षांची भीती मुळी नसतेच.

समीरला विशालच्या व्यक्तिगत बाबींमध्ये रुची नसते. बँकेमध्ये अधिकारी बनण्याचे विशालचे स्वप्न आहे की सनदी अधिकारी होण्याचे? एवढा प्रश्न विचारण्यापुरता समीर त्याला वेळ देतो. समीरचे ध्येय निश्चित असते. व्यवस्थेला दोष देत लोकशाही भंपक आहे, प्रजासत्ताक झूठ आहे, सगळे पोखरून निघाले आहे, राजकारणी वाईट आहेत, अशा मतांना त्याने कधी थारा दिलेला नसतो. आपण हे सगळे बदलू, असा फिल्मी आवेश त्याच्याजवळ नसतो. त्याच्या आईवडलांनी अनेक मार्ग त्याच्यासमोर ठेवलेले असतात. सुसंस्कृत घराने त्याला व्यवस्था महत्त्वाची असते आणि बुद्धीचा व सर्जनशीलतेचा कस लावणारी परीक्षा त्याने द्यावी, असे सुचवलेले असते. मात्र हा अभ्यास करताना, एका वेळेस स्वत:ला दावणीला बांधण्याचा वेडेपणा तो करणार नाही, यावर दोघांचा कटाक्ष असतो.

समीरचा प्रश्न विशालला समजतो. पण आपल्याला कोण व्हायचेय, याचे उत्तर देता येत नसते. सकाळपासून रात्रीपर्यंत लायब्ररीत गाडून घेणार्‍या विशालसमोर कायम कैक पुस्तके असतात. कोणती परीक्षा कधी, त्या क्रमाने पुस्तके उघडून वाचणे एवढेच त्याचे काम. मित्र पुस्तके देतात, नोट्स देतात. पण त्याचा संभ्रम दूर करू शकत नाहीत. ‘एम. कॉम. करतोय नं, तर कर मन लावून अभ्यास; कशाला स्वत:ला पिडतोय’, असे येथे कोणीच कोणाला म्हणत नसते. एखाद्याच्या घरी ‘शिपायाची पदे निघालीत, बैस परीक्षेला’, ही जबरदस्ती केली जाते. त्याला नकार देता येत नाही. खरे तर नोकरी चौथी वा सातवी पास झालेल्याला मिळणार, पण पदवीधर मुलगा या परीक्षेला बसावा म्हणून आग्रह धरला जातो.

विशाल सोळा पेपरच्या ओझ्याखाली वाकलेला. प्रश्नोत्तरे तोंडपाठ करताना झोप नाही. शब्द नजरेसमोर सतत फिरणारे, पास व्हायचे; पण नंतर काय, किंवा आपण हे का, कशासाठी करतोय, याची कल्पना नसल्याने करवादलेला विशाल एम.कॉम.देखील होऊ शकला नाही. सर्वच परीक्षांमध्ये नापास झाल्याचा धक्का. घरात तर तो तासन्तास काय करायचा, इतके साधे यश मिळू शकत नाही, यावर संताप, चिडचिड. त्याच काळात टीव्हीवर चाललेली कुठलीशी मालिका; ज्यात निर्णय न घेऊ शकणारा तरुण. अख्खे घर त्याला नाव ठेवणारे, समजून न घेणारे. आईवडलांच्या डोळ्यात मालिका पाहताना मात्र पाणी. अर्थात, त्यामुळे विशालला समजून घेतले जाते असे मात्र नाही. त्याने या नाहीतर दुसर्‍या वर्षी किंवा तिसर्‍या वर्षी परीक्षा द्यावी, पास व्हावे; इतकीशी इच्छा त्याला पूर्ण करता येऊ नये?

आनंदी विशाल आता फक्त बी.कॉम.पाशी थांबलेला असतो. त्याचा अनेक गोष्टींमधील रस संपून गेलेला. न कळणारे विषय, आकलनापलीकडील अनेक बाबी, तालुक्यापासून जगापर्यंत... या बारीकसारीक तपशिलांचे करायचे काय, हे न कळल्याने निराश झालेला विशाल.

जीवनात रंग संपले, उरले काळेकुट्ट ढग, असे म्हणणार्‍या विशालला समीरच्या पास होण्याचा मात्र मनस्वी आनंद झाला. समीर अभ्यासात कल्पकता शोधत होता, रात्री जागण्यात नि दिवसातील क्षणन्क्षण वेचण्यातली त्याची अनावर ओढ विशालला दिसत असायची. ही आस आपल्याला नाही तोपर्यंत यश नाही, हे त्याने ओळखले होते. आपल्या घराने आपण समीरसारखे व्हावे, असे स्वप्न पाहणे गैर नव्हे; परंतु त्याच्या आई-बाबांप्रमाणे आपल्या आईवडलांनी ‘परीक्षेतील स्पर्धा आणि स्पर्धेतील परीक्षा यांना सामोरे जायला हवेच’, हे सांगण्यापेक्षा ‘तुझ्या जगण्यात हे परीक्षेचे दिवस आले आहेत खरे; पण ते तुला बळकट करण्यासाठी, मनोधैर्य उंचावण्यासाठी. तू फक्त त्यात रम. आम्ही आहोत बरोबर...’ असे म्हणायला हवे होते. विशालला अतीव तीव्रतेने हेच सांगावेसे वाटते.