आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नात्यांची गुंतागुंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरावस्थेत मुला-सुनेबरोबर राहणा-या आईवडिलांपैकी एकाचं निधन होतं आणि दुसरा मागे राहतो, त्या वेळी एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती निर्माण होते. त्यांचं स्वत:चं जीवन सुसंवादपूर्ण असेल तर परिस्थिती अधिक बिकट बनते. याचं कारण असं की दोघंही एकमेकांवर अवलंबून राहिलेले असतात. आपल्याकडच्या जीवनशैलीत ब-याच वर्षांच्या सहजीवनानंतर पुरुषच स्त्रीवर अधिक अवलंबून राहायला लागतो. पत्नीच्या निधनाने तो एकटा तर पडतोच, पण पुष्कळदा लाचार बनतो. स्त्री रोजच्या जगण्यात स्वावलंबी-स्वाश्रयी असते. स्वयंपाकघरात जाऊन चहा किंवा स्वयंपाक करण्यापासून ती सगळी कामं करू शकते. पुरुषाला हे शक्य नसतं. शर्टाचं तुटलेलं बटण लावण्यापासून स्वत:ची लहानमोठी कामं करणं त्याला जमत नाही. पतिपत्नीमधील सुसंवादाचा हा एक नकारात्मक पैलू म्हणायला हवा.


कौटुंबिक संबंधांत सुसंवाद असेल तोवरच सगळ्या व्यावहारिक बाजू पूर्ण करणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. सुसंवाद काचेचं भांडं आहे. एकदा त्याला तडा गेला की अडचणीच अडचणी निर्माण होतात. आई-वडिलांनी या सुसंवादाच्या सोबतीनं, आपल्या आवडी-निवडी बाजूला ठेवून मुलांना त्यांच्या वाजवी मार्गानं जाऊ द्यावं. पुढच्या पिढीनंही हा संवादाचा स्तर अखंड असतानाच आपलं अहित होत असलं तरी आई-वडिलांच्या इच्छेचा मान ठेवायला हवा.


स्वत:ची मतं, आवडी-निवडी किंवा वर्तन याबाबत माणसाची परिवर्तनशीलता वयाबरोबरच कमी कमी होत असते. वृद्धावस्थेत स्वास्थ्य असलं तरी शक्ती क्षीण होत जाते. तारुण्यात जुळवून घेण्याची जी क्षमता असते ती वृद्धावस्थेत तितकीच राहत नाही. शिवाय तरुण पिढीसमोर काळाचा दीर्घ पट्टा असतो, त्यामुळे तडजोड केली तरी त्यांना फार सहन करावं लागत नाही. अट एकच, तडजोड करताना अहंकाराची भावना नको. वृद्धांपाशी आता असा दीर्घ काळही नाही आणि क्षमताही नाही. जी नवीन पिढी आधीच्या पिढीची ही उणीव लक्षात घेऊन वागेल, त्या पिढीला कधीच, काहीच गमवावं लागत नाही. माझ्या वडिलांच्या ज्या वक्तव्याचा मागच्या लेखात उल्लेख केला त्यातील निर्विवाद सत्यही लक्षात घेण्यासारखं आहे. आपणा दोघांच्या एकत्र राहण्याचा काळ जितका सरला तितका आता उरला नाही.


आपले आई-वडील आपल्या पसंतीचे नसतात आपली मुलंही आपण निवडलेली नसतात. त्याचप्रमाणे इतर नातेसंबंधही निसर्ग देतो तेच असतात, आपल्याला निवडीचा अधिकार नसतो. त्यामुळे जे आहे ते आहे हे लक्षात घ्यावं आणि जीवनयात्रा कमीत कमी कष्टदायी आणि अधिकात अधिक आनंदाची व्हावी यासाठी मनापासून प्रयत्न करावा. स्वभावभिन्नतेमुळे आई-वडिलांशी पटत नसलेल्या मुलांनी इतर नातेवाइकांपाशी त्याबाबत तक्रार करणं किंवा मुलांकडून आपल्यावर अन्याय होतोय असं वाटणा-या ज्येष्ठ पिढीने मुलांवर टीका करण्यातून काहीच निष्पन्न होत नाही. डोळे अधू झाले की माणूस चष्म्याचा वापर करतो, बहिरेपणा आला की श्रवणयंत्र बाळगतो, इ. त्याच पद्धतीने रक्ताच्या संबंधांतील भावना उणावतात तेव्हा अन्य कुणाच्या तरी आधाराने माणसाने आपला जीवनयात्रा चालू ठेवायला हवी. शाब्दिक नाराजीतून जेव्हा काही बदलणार नाही अशा वेळी मौन हे एकमेव औषध असतं.


काही काळापूर्वी वर्तमानपत्रात आतल्या पानावर कुठेतरी कोप-यात छापलेली ही बातमी उल्लेखनीय आहे. नव्वदीतली एक वृद्धा आपल्या घरात एकाकी जीवन जगत होती. मुली सासरी होत्या व मुलाचं निधन झालं होतं. या वृद्धेचे हातपाय अगदीच चालेनासे झाले तेव्हा शेजारी राहणा-या एका मुस्लिम कुुटुंबानं तिला आधार दिला. त्या कुटुंबातील ज्येष्ठानं तिला म्हटलं, ‘आजी, मी मुसलमान आहे, कित्येक वर्षांपासून तुमच्या शेजारी राहतो. तुम्हाला धर्माची आडकाठी नसेल तर मला तुमचा मुलगा माना व तुमच्या जेवणापासून सगळ्या गोष्टी करण्याची मला परवानगी द्या.’


आजींजवळ अन्य पर्याय नव्हताच. त्यांनी राजीखुशीनं ही व्यवस्था मान्य केली. पुढची तीन वर्षे या दत्तक मुलानं आईची सेवा केली आणि शेवटी डॉक्टरांच्या उपस्थितीत आजींनी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या मुलाला म्हटलं, ‘बेटा, माझा अग्निसंस्कार तूच कर.’ आणि तसंच झालं. म्हातारीचं निधन झाल्याचं या मुसलमान मुलानं तिच्या नातेवाइकांना कळवलं. सगळे हजरही झाले. मुलानं सगळ्यांना सांगून टाकलं, ‘स्मशानयात्रेला सगळे या पण आजीबार्इंच्या मृतदेहाला पहिला खांदा मी देईन आणि अग्निसंस्कारही मीच करेन.’ नातलगात थोडी चलबिचल झाली, हरकत घेण्याचे प्रयत्नही झाले, पण तो दत्तक मुलगा ठाम राहिला. त्यानं बेधडक अग्निसंस्कार केले आणि मग जमलेल्या नातेवाइकांना सांगून टाकलं, ‘बाबांनो, आजींच्या घरातल्या चीजवस्तूंचं तुम्हाला काय करायचं ते करा, मला त्यातला एक चमचाही नकोय.’
याला कर्मधर्मसंयोगाशिवाय दुसरं काय म्हणणार? ज्याला आपण रक्ताची नाती म्हणतो ती या ठिकाणी कुचकामी ठरतात, जोडलेल्या अशा नात्याच्या सावलीलासुद्धा उभी राहू शकत नाहीत.


अनुवाद : डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर