आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोड महत्त्वाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसानं शांत सुखी, समूहजीवन जगावं यासाठी लग्न ही संस्था काढली. सर्व संस्थांप्रमाणे यातही भ्रष्टाचार शिरण्याची शक्यता असते. लग्न म्हणजे केवळ एक घटना नसते, तर ती एक भावना असते, याचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींबरोबरच दोन भिन्न घरं, तिथलं वातावरण, संस्कार, आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता, जडणघडण, स्वभाव यांचं एकत्र येणं असतं. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी लग्न म्हणजे काय संसारामध्ये कोणकोणत्या गोष्टींना आपल्या जोडीने सामोरे जायचे आहे, एकमेकांशी जुळवून घ्यायचं म्हणजे काय याचा विचार करणं आवश्यक आहे; परंतु तो विचार करणारी जोडी शंभरात एखाद्दुसरीच असते. लग्न ही संकल्पना पती-पत्नीच्या नात्यावर अवलंबून असल्यानं हे नातं जपण्याचा प्रयत्न होणं अतिशय आवश्यक आहे. सहजीवनात या नात्यामुळे आनंद मिळावा. हळुवार एकमेकांना सांभाळत त्यामधला जिव्हाळा, मैत्री, विश्वास कायम ठेवून हे नातं अलगद जोपासायला हवं. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. दोन घरांमधील आचारविचार, संस्कृती, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी भिन्न असल्याने त्या समजावून घेऊन अंगवळणी पडायला मुलींना वेळ लागतो. लग्नानंतर पहिली दोन वर्षं समायोजनाची असतात; परंतु यामध्ये जर एकमेकांमध्ये समजून घेण्याची व तडजोडीची भूमिका नसेल तर औट घटकेचा संसार होण्याला वेळ लागत नाही.


मुलांच्या बदलत्या गरजांचा विचार पालकांनीही करायला हवा. लग्न झाल्यावर मुलगा बदलला हा गैरसमज काही वेळा निर्माण होतो. तेव्हा त्यांच्या नैसर्गिक भावना, प्रेरणांचा विचार महत्त्वाचा ठरतो. हेही लक्षात घेतले पाहिजे की आधी कितीही चर्चा केल्या तरी प्रत्यक्ष प्रसंगातून गेल्याशिवाय शहाणपण येत नाही. एका एका अनुभवातून जात असताना आपण जगणं समजून घेत असतो, मग तो ठरवून केलेला विवाह असो किंवा प्रेमविवाह. काही काही वेळा निर्णय घेताना यात आंधळेपणाही असतो.


स्त्रीसाठी विवाह म्हणजे केवळ नवरा नव्हे. त्याच्याबरोबर त्याचे आईवडील, बहीणभाऊ, इतर नातेवाईक, एकत्र घर, वातावरण हे सगळं स्वीकारावं लागतं. काही अनुभव असेही असतात की पत्नीच्या चांगल्या स्वभावामुळे सासरच्या मंडळींशी जुळवून हितसंबंध चांगले ठेवून ती उत्तमरीत्या वाटचाल करीत असते; परंतु केवळ पतीच्या विचित्र स्वभावामुळे पत्नीला नातेवाइकांत वाईटपणा येतो व सासरची माणसे तिलाच दोष देतात. वास्तविक तिचा यात काही दोष नसतो. कारण याला फक्त स्वभाव जबाबदार आहे. कारण स्वभाव प्रत्यक्ष सहजीवन जगल्याशिवाय समजत नाही.
अशा वेळी तिच्या सगळ्यात जवळचा व हक्काचा जर कोणी असेल तर तो नवरा! ‘नवरा’ म्हणून घेण्यापेक्षा तिचे मित्र व्हा! सुरुवातीच्या दिवसांत तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालात तर आयुष्यभर सुखी राहण्यास मदत होते कारण स्त्री-पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यात संवाद नसेल तर संसाराच नाणं बद्द वाजतं; पण ज्या जोडप्यात सामंजस्य, परस्परांविषयी जाण आहे, त्यांच्या नात्याला खणखणीत बंद्या रुपयाची किंमत येते.