आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशर्त प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवस उजाडताच ‘दिलासा’चा फोन खणखणला. महाराष्‍ट्रातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी बोलत होती. तिला तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक झाले होते. चर्चेसाठी भेटीची वेळ ठरवून ती भेटायला आली व तिने तिची समस्या माझ्यासमोर मांडली.


‘‘माझे वडील काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले. शिक्षण आटोपल्यानंतर इंजिनिअर असलेल्या माझ्या आतेभावाशी माझे लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. तीन महिन्यांपूर्वी त्याने माझ्यावरील प्रेम व्यक्त केले, पण माझ्याशी लग्न करण्यास संमती दिली ती काही अटींवर. एक वर्षाच्या आत माझा हाडकुळेपणा घालवला, बोलण्यात सुधारणा केली व आधुनिक फॅशनचा अंगीकार केला तरच तो माझ्याशी लग्न करणार; अन्यथा दुस-या मुलीशी लग्न करण्यास तो मोकळा आहे. आता मी काय करू? त्याच्या अटी मान्य करू की त्याला नकार देऊ?’’ प्रेमासारख्या उदात्त भावनेचे ‘महासेल’ आयोजित होऊ लागले की त्यात विकायला ठेवलेल्या प्रेम नावाच्या वस्तूबद्दल अनेक शंका येऊ लागतात. ‘एखाद्या कंपनीचा टीव्ही खरेदी करा व त्याबरोबर अनेक वस्तू भेट मिळवा,’ अशी एखादी योजना प्रेमाच्याही बाबतीत राबवता येईल असा तुझ्या त्या आतेभावाचा गोड गैरसमज झाला आहे का? कुणाच्या प्रेमात पडल्यानंतर त्यात अटीही असू शकतात? अटी पूर्ण केल्या नाहीत तर दुस-या मुलीशी लग्न करण्यास मी मोकळा आहे असं म्हणणा-या तथाकथित प्रेमवीरास ‘प्रेम’ या शब्दाचा उच्चार तरी करण्याचा अधिकार आहे का? आज काही अटी घालणारा माणूस बोहोल्यावर उभं राहण्याची वेळ आल्यावर हुंड्याची अट घालून अडवणूक करणार नाही याची काय शाश्वती? चार वर्षे एका मुलीशी प्रेमाचे नाटक केल्यानंतर हुंड्याची अट घालून संबंध तोडणा-या व तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या एका मुलाचे उदाहरण माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहे. ‘भरपूर हुंडा दिल्यास चांगला मुलगा मिळेल’ अशा पाट्या लग्नाच्या बाजारात दिसू शकतात, पण प्रेमाचा बाजार अस्तित्वातच नाही तर तर विविध अटींच्या पाट्या दिसतीलच कशा?


प्रेमाखातर मुली कोणत्याही अटी मान्य करू शकतात असा अनेक मुलांचा जो गैरसमज असतो तो त्यांच्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकण्याची जबाबदारी मुलींचीच आहे. प्रेमाच्या नावावर अटी लादून तरुणींनी तरुण मुलांना धोका दिल्याच्या घटनाही घडत असतात हे तरुणींनीही विसरू नये.


मी तिला एवढेच सांगितले की, मामाची मुलगी ही आपलीच संपत्ती आहे असं समजणा-या तुझ्या आतेभावाला ‘सशर्त प्रेम’ नावाचा प्रकार अस्तित्वात नाही हे निक्षून सांग व त्याची एकही अट मान्य न करता त्याला स्वच्छ नकार देऊन स्वत:चे भवितव्य उज्ज्वल बनविण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न कर.