Home »Magazine »Madhurima» Confession

कबुली

अदिती कापडी | Feb 22, 2013, 08:06 AM IST

  • कबुली

अखेर तो दिवस उजाडला. मखमलीच्या कापडाने सज्ज झालेला रंगमंच, त्यासमोर साफसूफ केलेलं आणि सडा मारलेलं मैदान, पहिल्या पावसासारखा धुंद सुगंध, लाल गालिचा, रांगेत मांडलेल्या खुर्च्या, लाल बिल्ले लावून शिस्तीत उभे असलेले स्वयंसेवक, झिरमिळ्या आणि पताकांनी नव्या नवरीसारखी नटलेली शाळा, विविध प्रकारच्या फुलांनी सजलेलं प्रवेशद्वार, लिलीचा वास, पुष्पगुच्छ आणि मुख्य पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवीन साड्या नेसून तयार असलेल्या शिक्षिका...सगळं इतकं इतकं रम्य आणि उत्साही दिसत होतं की कुणाची नजर लागावी!
हळूहळू विद्यार्थी आले, मग पालक आले. एक एक करून खुर्च्या भरू लागल्या आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. टाळ्यांच्या कडकडाटात पाहुण्यांचं स्वागत झालं, आमचं स्वागतगीत, प्रतिमापूजन झालं. प्रत्येकाचे लांबलच्चक दोनदोन शब्द बोलून झाले. हस्तलिखिताचं प्रकाशन झालं.

आणि अचानक लाइट्स ऑफ! गर्द काळोख. प्रेक्षकांमधे एकच कुजबुज. काही टवाळ पोरं ओरडली, ‘अरे फ्यूज गेला रे, एकमेकांना त्रास देऊ नका.’ सगळ्यांना वाटलं, कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झालाय.

मी तर कावरीबावरी झाले. एकटीच होते स्टेजच्या मागे. म्हणजे गर्दी खूप होती. पण माझं असं कोणीच नव्हतं. राकेश कुठंय? जवळपास असेल? त्या विचारानेच माझं ऊर धप धप करायला लागलं. राकेश अजून भेटलाच नव्हता. त्याला न भेटताच आज जावं लागणार. अशा काळोखात थांबणं योग्य नव्हतं. बाहेर जाऊन आई आणि दादाला भेटावं. आई म्हणेल घरी चला.
चला, आता आपापल्या घरी निघा.
तेवढ्यात
तेवढ्यात अनाउन्समेंट झाली.
‘मायबाप प्रेक्षकहो, ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आलाय. आता तुमच्यासमोर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करतील आपल्या टिळक विद्यालयाचे विद्यार्थी...’
‘ओह! हा पब्लिसिटी स्टंट होता तर! लाइट आहेत म्हणजे.’ प्रेक्षक परत कुजबुजू लागलेत. आणि टाळ्यांचा पाऊस पडू लागला. काय मी! त्या एका सेकंदात किती विचार करून बसले!

प्रत्येक जण आपापला नाच, नाटक, भाषण अगदी जोशाने देत होतं. आम्ही आपले बॅकस्टेजवर एकेकाचे अवतार नीट करत होतो. कुणाचा मेकअप, कुणाचा ड्रेस, कुणाची ओढणी, कुणाचे केस. स्टेजच्या समोरचा प्रेक्षकांचा भाग जेवढा रंगांनी नटला होता तेवढाच बॅकस्टेजसुद्धा रंगला होता. चमचम चमचम. जणू रंगपेटीतून बाहेर येऊन सगळे रंग नाचतच होते. सगळीकडे! एक माधवदादा होता फक्त, जो त्याच्या नेहमीच्याच गणवेशात होता. तरीही त्याच्या चेह-यावर प्रचंड समाधान होतं. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तो मला येऊन म्हणाला होता, ‘बेबीताई, म्या कसा दिसू रहिलो? कालच नवीन शिवून आनलय ह्ये कापड ग्यादरिंगसाठी.’ माझ्या डोळ्यात नकळत पाणीच आलं होतं.
तेवढ्यात राकेश आला. ‘हे शारू,’ मी क्षणभर सातवीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत गेले. नकळत चेह-यावर हसू आलं.

‘ए, माझा कोट नीट दिसतोय ना? नाहीतर नाटक सोडून लोक माझ्यावरच हसतील,’ राकेश
‘नाही रे. मस्त दिसतोयस तू. छान एकदम,’ माझ्या नव्या ब्रेसलेटशी चाळा करत मी म्हटलं खरं; पण ऊर धाड धाड धपधपायला लागलं. घसा तर कोरडा झाला. गुलाबी वॉटरबॅगेतलं पाणी पिताना तेही अंगावर सांडतं की काय इतकी हाताची थरथर होत होती. म्हणून मी बाटली सरळ तोंडाला लावली.
‘खरंच? मनापासून सांगतेय ना? की असंच टर उडवतेयस?’ माझी पाण्याची बाटली ओढून घेत राकेश म्हणाला आणि तोंडाला लावून घटाघटा प्याला. मी ते वाक्य कित्ती मनापासून बोलले होते याचा राकेशला ठावठिकाणाच नव्हता.
मी राकेशला एक छानसं स्माइल दिलं.

‘ए, तुझा ड्रेसपण खूप छान आहे हं! तुला माहितीये, मला बदामी रंग फार आवडतो. आणि... तुझ्यावर तो उठून दिसतो एकदम!’ माझ्या चेह-यावरचं स्माइल अजूनच खुललं. मी डोळे खाली करून एकदम कोवळं कोवळं लाजले. तेवढ्यात पाठक सर आले.
‘कदम, तयार राहा. पुढचं तुझं नाटक आहे. ती परांजपे कुठेय? अरे जागेवर आण त्या भवानीला. कुठे भटकत असते कोण जाणे?’
‘आहे सर, ती इथेच बसली आहे.’ - राकेश.
‘ऑल द बेस्ट. दमदार होऊन जाऊ देत.’ मला ‘ऑल द बेस्ट राकेश,’ असं म्हणायचं होतं. पण का कोण जाणे त्याचं नाव उच्चारणंही अवघड वाटायला लागलेलं.
‘बस, आता एवढ्या चांगल्या मैत्रिणीने विश केलंय म्हटल्यावर दमदार होणारच्च!’
राकेशचं नाटक खूप सुरेख झालं. नवीनच आलेल्या विद्यार्थ्याने स्वत:हून रुची दाखवून एवढं सुंदर नाटक बसवल्याचं सारी मंडळी कौतुक करत होती.

खरंच राकेश अष्टपैलू आहे. म्हणूनच मला आवडतो...
‘अ‍ॅट ला ऽ ऽ स्ट, मान्य केलंस की तुला तो आवडतो,’ - मन
माझं मलाच काही कळेनासं झालं. पण खरं काहीतरी घडायचं बाकीच होतं. आता उत्सुकता होती ती आदर्श विद्यार्थी/विद्यार्थिनी पुरस्काराची. आम्ही सगळे पुढे प्रेक्षकांत जाऊन बसलो.
पाठक सर स्टेजवर आले.
‘या वर्षीचा आदर्श वर्ग आहे सहावी ब’
एकच जल्लोष झाला.
‘येऊन येऊन येणार कोण? सहावी ब शिवाय आहेच कोण?’
‘सहावी ब’चे विद्यार्थी मोठ्याने ओरडत होते. वर्गशिक्षिकेने आणि मॉनिटरने पुरस्कार घेतला.
‘आता आजच्या दिवसाचा सर्वात मोठा क्षण. आदर्श विद्यार्थी. आणि शैक्षणिक वर्ष 2007-2008चा आदर्श विद्यार्थी आहे... राकेश कदम.’

पुन्हा एकच जल्लोष झाला. कुणालाच वाटलं नव्हतं. मला तर आनंद पोटात माझ्या माईना, असं झालं होतं. मी खूप जोरात टाळ्या वाजवल्या. राकेश स्टेजवर गेला. एकदम स्मार्ट दिसत होता. चालण्यात ऐट होती. पण गर्व नव्हता. त्याने सगळ्यांना अगदी शहाण्यासारखा वाकून नमस्कार केला. ट्रॉफी घेतली आणि सही करायला खाली उतरला.
मी देहभान विसरून त्याच्याकडेच एकटक बघत होते. त्याच्या वागण्यात किती नम्रता आहे - मनाचे श्लोक परत सुरू झाले. राकेश सही करून मित्रांच्या घोळक्यात दिसेनासा झाला. ‘आणि आदर्श विद्यार्थिनी आहे शारदा भावे.’
माझं लक्षच नव्हतं. मी, माझं मन, माझे कान, माझे डोळे राकेशला शोधत होते. आधीच्या टाळ्या संपून आता माझ्यासाठी टाळ्या वाजत होत्या. पण मी अजून पहिल्याच टाळ्यांत होते.
‘अगं शारदा, जा की.’
‘शारदा, आय न्यू इट. काँगो...’
‘शारदे, पार्टी..?’
‘मिस शारदा. लवकर स्टेजवर या प्लीज.’
‘अगं जा. तुला बोलवतायत.’
मी एकदम जागी झाले. पळत पळत स्टेजवर गेले. एका पायरीवर अडखळले. ट्रॉफी घेऊन सही करायला उतरले. माझ्या नावाच्या वरतीच त्याचं नाव होतं. आणि त्याची सही! एकदम हीरोसारखी होती. इश्टाइल में. मला एकदम मोहरून आलं. स्वत:ची सही आठवेच ना.
इतर पुरस्कार जाहीर झाले. सोहळा संपला. माधवदादा नेहमीसारखा चुणूक दाखवून पटपट कामं करत होता. आताशा उशीर झाला होता. साडेआठ-नऊ वाजले असतील.
पेटी तर माधवदादाने नेली. मग मी तबला नेला.
जाता जाता मधेच राकेश भेटला. ‘शारू, अगं अभिनंदन! काय तू, मला काँग्रॅट्स पण नाही म्हणत. तुला मी बेस्ट स्टुडंट झाल्याचा आनंद नाही झाला का?’
‘अरे मी शोधलं तुला खूप. असो. अभिनंदन.’
आणि मी माझं वाक्य पूर्ण करणार तोवर... आनंद आला.
‘तुम्ही दोघांनी एकत्र पार्टी द्या. काय राक्या?’ ‘अरे मस्त आयडिया आहे. सांगतोच तुला. शारू, जाताना भेट मला.’ एव्हाना मला जो कोणी भेटला तो म्हणत होता, ‘अरे वा शारदा, राकेश आणि तू. आदर्श विद्यार्थी! व्वा... म्हणजे आदर्श जोडीच की!’आदर्श जोडी?
हे सगळं असं होऊन बसेल याची अजिबात जाणीवच नव्हती. पण मी असं केलं तरी काय होतं? मी पटकन तबला ठेवला आणि घाईघाईत निघाले. मागून राकेश ‘शारू, थांब. ए शारदा...’ आवाज देत होता. पण मी अजूनच भरभर चालायला लागले. आणि शाळेतून सटकले.

(क्रमश:)
avkpd08@gmail.com, esahity@gmail.com

Next Article

Recommended