आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकांबद्दलचा मोकळेपणा शांतता देतो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे वडील बाळासाहेब सरोदे. सर्वोदयी चळवळीतले नेते. सतत लोकांसाठी, समाजासाठी झटत राहणं, हा त्यांचा स्वभाव. पहिल्यापासून. लोकांमध्ये मिसळावं, माणसं वाचावीत, आपल्याला जितकं जमेल तितकं देत राहावं, अशी त्यांची शिकवण. पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा ते म्हणायचे, ‘असीम, एक सायकल घे. सायकलनं फिर पुण्यात. लोकं कळली पाहिजेत. परिसर कळला पाहिजे. सायकलवरून तुला तो जास्त चांगला समजेल.’ पण कॉलेजच्या वयात असल्यामुळे तेव्हा ते फारसं पटायचं नाही. मी पुण्यात येण्याआधीचा एक प्रसंग आहे.

यवतमाळला दाते महाविद्यालयात मी शिकायला होतो. माझे काही मित्र श्रीमंत घरातील होते. ते त्या वेळी मोटरसायकलनं कॉलेजला यायचे. त्यांच्यासारखं मोटरसायकलवरून कॉलेजवर यावं, त्यांच्यासारखं राहावं, असं मला वाटायचं. त्यामुळं मी बाबांना नेहमी पैशाशी संबंधित मागण्या करायचो. ‘हे घेऊन द्या...ते घेऊन द्या.’ बाबा म्हणायचे, अरे मोटारसायकल घेतली की, पेट्रोलचा खर्च होईल... वगैरे वगैरे. आपल्या कुठल्याच मागण्या पूर्ण होत नाहीत, हे लक्षात आल्यावर एकदा मी त्यांच्यावर चिडलो, ‘तुम्ही सामाजिक काम करता; लोकांसाठी. मग तुम्ही आमच्यासाठी काय केलं?’ असं म्हणत मी त्यांना खूप बोललो. माझं त्यांनी ऐकून घेतलं. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. एका शब्दाचीही प्रतिक्रिया न देता ते आत निघून गेले. हा प्रसंग घरात घडल्यावर आई मला नंतर म्हणाली, ‘अरे, तू त्यांना असं का बोललास? त्यांना खूप वाईट वाटलं. बाबा आज जेवलेही नाहीत.’ असं आईनं सांगूनही मी माघार घेतली नाही की त्यांची माफी मागितली नाही. आणि अजूनही मागितलेली नाही. आज मात्र त्याची
जाणीव होते आहे.

पुढे मी कायद्याच्या क्षेत्रात काम करायला लागलो. आम्ही तुरुंगातल्या कैद्यांसाठी मोफत कायदेविषयक अभियान राबवलं होतं. मला स्वतःला विडी, सिगारेट ओढायला आवडत नाही; केवळ मला आवडत नाही, म्हणून काही कैदी ते टाळायचे. एकदा एक कैदी मात्र मुद्दामहून विडीचा झुरका घेत होता. दुस-या कैद्यानं त्याला विडी न ओढण्याबद्दल सांगितलंही, पण तो ऐकतच नव्हता.

हे मी बघत होतो. जरा वेळानं तो माझ्याजवळ आला आणि माझ्या तोंडावर त्याने धूर सोडला. त्याचं असं वागणं मला अजिबात आवडलं नाही. मी रागात त्याच्या कानाखाली मारली. कैद्यांनाही थोडा वेळ काय झालं, ते कळलंच नाही. त्यातला एक जण म्हणाला, ‘तुम्ही कुणाला मारलंत ते कळलं का?’ तो अमुक अमुक कंपनीचा मालक आहे. मीही घाबरलो होतो. कारण मी इथं कायदेविषयक काम करायला आलो होतो आणि स्वतःच कायद्याचं असं उल्लंघन करणं बरोबर नाही, असंही मला जाणवलं. नंतर काही दिवसांनी हा कैदी माझ्यासमोर आला. त्याच्यासोबत आणखी काही जण होते.
त्यानं समजा मारलं तर शांतपणे मार खाऊन घ्यायचा, अशी मी माझ्या मनाची तयारी केली होती; पण झालं वेगळंच. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि दुस-या क्षणाला त्यानं मला चक्क मिठीच मारली. म्हणाला, ‘अपने को आज तक ऐसा किसी ने भी मारा नही। किसी ने गुस्सा भी किया नही। आप ने मुझे अच्छे काम के लिए मारा।’ त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. एवढं बोलून तो त्याच्या बरोबरच्यांना म्हणाला, ‘ये अच्छा आदमी है, इनको कभी भी कोई तकलीफ नही होनी चाहिए।’ इतकं बोलून तो हसून निघूनही गेला. हे सगळंच माझ्यासाठी अनपेक्षित होतं.
मला आनंदही झाला; पण आपणही त्याची माफी मागायला हवी होती, अशी खंतही वाटली.
एखाद्याला चटकन माफ करणं, अपमान झाला तरी तो अपमान न समजणं, याबाबत माझे बाबा माझे आदर्श आहेत. त्यांना हे कसं जमतं, याचं मलाच आश्चर्य वाटतं. मलाही वाटतं की, आपण जे सामाजिक-कायदेविषयक काम करतो आहोत, ते करण्यासाठी मान-अपमानांच्या पलीकडे गेलं पाहिजे. आपल्या कामाला कुणी वाईट म्हटलं, अवमूल्यन केलं, तर त्याबद्दल राग, पूर्वग्रह बाळगून कसं चालेल? कारण आपण जे करतो त्याला सगळे चांगलंच म्हणतील, असंही काही नसतं. मी ‘सेक्शुअल हॅरॅसमेंट अॅट वर्कप्लेस’बाबत काम सुरू केलं, तेव्हा मला माझ्यातलीच एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे, चेष्टा करण्याच्या निमित्ताने मी लहानपणी शाळेत-कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्यंगावरून चिडवायचो. एका मित्राच्या पाठीला थोडा बाक होता, त्याला त्यावरून चिडवायचो. कुणाला जाडेपणावरून चिडवायचो. दोघी मैत्रिणी कुठेही जा सोबतच दिसायच्या, त्यांना मी अॅटॅच्ड लॅटरीन-बाथरूम असं नाव पाडलं होतं. मजा म्हणून माझं चिडवणं त्यांनीही स्वीकारलं होतं; पण मी त्यांच्याशी असं वागायला नको होतं. आता इतक्या वर्षांनंतर ते माझ्या संपर्कातही नाहीत. कोण कुठे गेलं, माहीत नाही. मी जे करत होतो, ते चुकीचं होतं, हे आता त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कसं?

चुका होतात; आपल्यामुळं माणसं दुखावलीही जातात. पण ज्या माणसाला आपण दुखावलं आहे, त्याच्या नजरेला नजर भिडवून माफी मागणं, हेच योग्य आहे. पण माफी मागितली पाहिजे. चूक कबूल करण्याचं धाडस केलं पाहिजे. आणि तो माफ करेल न करेल, याची कोणतीही अपेक्षा न ठेवता कबुली दिली पाहिजे. आणि असं करण्यात लाज न बाळगता अभिमान बाळगला पाहिजे, हे सगळं माझ्या बाबांचं तत्त्वज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलेलं; पण हे तत्त्वज्ञान मी अजून पूर्णपणे पचवू शकलो नाही. त्याबाबत मी लहान आहे, कमजोर आहे, असं मला वाटतं. कारण सध्याच्या आपल्या आयुष्यात कामाच्या निमित्तानं येणारा ताणही आहे. या ताणाबरोबर चिडचिडही होते. माझं हे चिडणं, रागावणं हे माझ्या ऑफिसमधल्या संजयच्या बाबतीत नेहमी होतं. ब-याचदा मी त्याला गृहीत धरतो. त्याला ‘सॉरी’ही म्हणतो. कधी कधी हे ‘सॉरी’ म्हणणं उगाचच ओढून ताणून होतंय का, असंही वाटतं.

आपण चुकलो, आपण अशा पद्धतीनं वागायला नको होतं, याचं ‘कन्फेशन’आधी आपल्या मनात होतं आणि नंतर ते एखाद्यासमोर. माझ्या बाबतीत अशी एखादी गोष्ट मला जाणवल्यावर सगळ्यांत आधी माझा ‘कन्फेशन बॉक्स’ होते, ती माझी बायको रमा. यात बाबाही असतातच. बाबांनाही मी माझ्या चुकांबद्दल मोकळेपणानं सांगू शकतो. चुकांबद्दलचा हा मोकळेपणा शांतताही देतो.

asim.human@gmail.com
(ज्येष्ठ विधिज्ञ, मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते)
शब्दांकन : अभिजित सोनवणे