आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसांना दुखावलं, तसंच झाडांनाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगताना मी जसं माणसांना दुखावलंय, तसं झाडांनाही दुखावलं असेल. म्हणून नातं टिकविण्यासाठी माणसं आणि झाडं या दोघांचीही माफी मागण्याची माझी तयारी आहे. आणि पुढेही असेल. नात्यांत झाडांसारखीच स्थिरता हवी, हे मला माझ्या झाडांनी शिकवलं. माझ्या आयुष्यात निर्माण झालेलं प्रत्येक नातं हे लावलेल्या झाडांप्रमाणेच आहे. आणि लावलेलं झाड हे जपलेल्या नात्याप्रमाणं आहे.

नातं टिकविण्यासाठी, माणसं आणि झाडं या दोघांचीही माफी मागण्याची माझी तयारी...
मी अगदी लहानपणापासून चुका करत आले आहे. अर्थात माझ्या दृष्टिनं माझं ते सहज वागणं असायचं; पण इतरांच्या दृष्टिनं त्या चुका असायच्या. मला माझ्या नेमक्या चुकाच काय, हे कळत नसल्यामुळं माफी मागण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण आज विचार करताना माझ्या तशा वागण्यामुळं मी अनेकांना दुखावल्याचं जाणवतं. तशी लहानपणापासूनच मी नादिष्टच होते.

एखाद्या गोष्टीचा नाद लागला, की त्यात रमायचे. मग कुणाचा विचार नाही करायचे. माझं गाव दुर्गळवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा.) वडील लष्करात होते. त्यामुळे माझे वडील, आई, बहीण नागपूरला असायचे आणि मी दुर्गळवाडीला चुलत्यांकडे. माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या, त्या चुलत्यांनी आणि या गावानं अक्षरशः पोटात घातल्या. मी लहानपणी मुलांच्याच ग्रुपमध्ये असायचे. माकडांसारखे झाडांवर चढणे, नदीत पोहणे, असे मुलांचे खेळच मला आवडायचे. त्यामुळे अनेकांच्या नजरेत मी बिघडलेली, मुलींचे खेळ न खेळणारी अशीच मुलगी होते. एकदा गावातल्या नदीला पूर आला होता. नदीला पहिला पूर आला, की मासे भुलायचे. म्हणजे एकदम आलेल्या पाण्याच्या प्रवाहाशी अॅडजस्ट व्हायला त्यांना वेळ मिळायचा नाही. या मासे भुलणीवेळी मासे नेहमीपेक्षा लवकर पकडता यायचे. अशाच एका पावसाळ्यात नदीला पूर आला आणि गावातली काही पोरं मासे पकडायला निघाली, मीही गेले त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर मीही माझ्या ओट्यात भरपूर मासे पकडून आणले. मी इतके मासे आणले, याचं मलाच खूप कौतुक होतं. मी कौतुकानं घरी गेले, तर मला बेदम मार बसला. ‘तू असलं काही करते आहेस, हे तुझ्या बापाला कळलं, तर ते आम्हाला फाडून खातील..’ अशीही वाक्य ऐकायला मिळाली. मला वाटलं की, चांगले मासे आणले आहेत, तरी मला मार का? बोलणी का? हे सगळं होऊनही, त्या दिवशी मी पकडून आणलेल्या माशांचेच मस्त जेवण घरात शिजले होते. लहान होते त्यामुळे मी असं मुलांबरोबर, त्यांच्यासारखं काही वागायला जाते, हे त्यांच्या दृष्टीनं चूक आहे, हे मला कळायचं नाही. माझी नेमकी काय चूक होते आहे, हेच मला समजायचं नाही. मुलांबरोबर त्यांच्यासारख्या गोष्टी केल्यामुळं मी लहानपणी खूप वेळा मार खाल्ला आहे. लहानपणी माझ्या डोक्यावर कुरळ्या केसांचं भलं मोठं टोपलंच होतं. त्यामुळं मला सगळे ‘जिंजुरी' म्हणायचे. एकदा आम्ही लपाछपी खेळत होतो. लपाछपी खेळताना नवनव्या जागा शोधणं, ही माझी खासियत असायची. त्या दिवशी मी अशीच गंजीच्या पेंड्यांमध्ये लपून बसले होते. सकाळपासून सतत काही ना काही खेळत असल्यामुळे दमले होते. त्यामुळे एकदा जेव्हा लपले, तेव्हा मला झोप लागली. खूप गाढ. सगळे बहुतेक मला शोधून दमले. सापडले नाही म्हणून त्यांनी गृहीत धरले की, मी कुठंतरी खेळ सोडून निघून गेले. संध्याकाळ व्हायला थोडाच वेळ होता. अंधार पडला. मी घरी आले नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली. मी गायब झाल्याची बातमी गावात पसरली. गावात एक आड होता.त्या आडाजवळ मी खेळायचे. त्यात मी पडले की काय, असे वाटून अगदी तळाशी बुड्या मारून माझा शोध घेतला. मी ज्यांच्या पेंड्यांमध्ये लपले होते, ते जनावरांना संध्याकाळचं शेवटचं वैरण टाकायला आले. त्यांनी वरची पेंडी काढली आणि झोपलेली मी त्यांना दिसले. मग मी सापडल्याचा शोध सगळ्यांना लागला. मी झोपेतच होते.
पण ज्यांच्या ज्यांच्या हाती मी लागले, त्यांनी मला बदडूनच काढलं. मला कळेचना मी झोपले तिथं, त्यात माझी चूक काय? पण नेमका काय प्रकार झाला होता, हे मला नंतर कळलं.

माझं एमएस्सी झाल्यावर आमच्या ग्रुपनं ठरवलं की, आपण एक ट्रिप काढू या म्हणून. कास पठारावर जायचं आणि संध्याकाळी पुन्हा यायचं, अशी ती ट्रीप होती. त्या वेळी वडील रिटायर होऊन नुकतेच दुर्गळवाडीला आले होते. दुसऱ्याच दिवशी मला बघायला पाहुणे येणार होते, आणि आदल्या दिवशी अशी ट्रीप. तेव्हा फोन वगैरेची काही सोय नव्हती. सकाळी दोन मुलं मला सहलीसाठी घ्यायला आले. मी त्यांना सांगितलं की, मला घरातून परवानगी नाही, मला सहलीला येता येणार नाही. पण वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तू जा पण संध्याकाळी लवकर ये. मी निघाले. पण आजूबाजूची हिरवाई (हिरवाई हा प्रकल्प माझ्या आयुष्यात नंतर आला) बघून माझं मन त्यात रमलं. कास पठार पाहिलं आणि सगळ्यांचं ठरलं की, बामणोलीला जाऊ या... माझ्या मनात द्वंद्व होतंच, की उद्या घरी आपल्याला बघायला येणार आहेत.

अर्थात, ही गोष्ट मी माझ्या ग्रुपला अजिबात सांगितली नव्हती, फक्त मला जायला लागेल उद्यापर्यंत, असं सांगितलं होतं. दिवसभर कासची हिरवाई डोक्यात होतीच, आता बामणोली.. मी अधिकच उत्सुक झाले. आम्ही त्या रात्री एके ठिकाणी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी बामणोली आणि आजूबाजूचा परिसर भटकलो. आपल्याला घरी जावं लागेल, हे मी विसरूनच गेले. इकडे घरी पाहुणे बघायला आले, आणि जिला बघायला आले, तीच घरात नाही. त्यामुळे अगदी गोंधळ माजला. संध्याला घ्यायला दोन मुलं येतात, याचा अर्थ तिनं हे मुद्दामच केलं, ती कुणाबरोबर तरी पळून गेली, असे तर्क-वितर्क लढवून माझी शोधाशोध सुरू झाली. वडिलांना मात्र संध्या अशी वागणार नाही, याची खात्री होती. त्यांना माझा असा निसर्गात रमण्याचा स्वभावही माहीत होता.

दुसऱ्या दिवशी मी जेव्हा गावात आले, तेव्हा घरासमोरच्या मैदानात गर्दी... हे असे का जमलेत सगळे, ते मला कळलंच नाही. गावातलं कुणी गेलं तर नाही ना, असाच संशय पहिल्यांदा माझ्या मनात आला. पण फक्त गर्दी, तसं काही चित्र तर दिसत नव्हतं. लगेचच माझी ट्यूब पेटली, आणि या सगळ्यांच्या अशा एकत्र जमण्यामागचा अर्थ लक्षात आला. मी घरी पोहोचले तेव्हा मीही शांत राहिले, संथ राहिले. कारण चूक माझीच होती. आजपर्यंत अशा अनेक चुका मी केल्या होत्या, दर वेळी मी त्यासाठी मारही खाल्ला होता. बोलणी खाल्ली होती. पण त्या दिवशी मला कुणीच काही बोललं नाही, की रागावलं नाही. नेमकी हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. माझी चूक असूनही मला कुणीही काही बोलले नाही, आणि त्या वेळी जमलेल्या सगळ्यांसमोर मला माफी मागण्याचं धाडसही झालं नाही...

चूक स्वीकारण्याची प्रत्येकाची पातळी वेगवेगळी असते. माझी एखादी चूक स्वीकारण्याची पातळी ही जरा जास्त आहे, असं मला वाटतं. म्हणजे माझ्या मुलानं एखादी चूक केली, की मी त्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहते. मग मला जाणवतं, की अरे आपल्या हातूनही हे झालं असतं ना.. मग माझ्या दृष्टीनं त्या चुकीचा अर्थ लावणं सोपं होतं.

मला झाडांची खूपच आवड. झाडं लावण्याचाही मला प्रचंड नाद. झाडं लावत गेले आणि ‘हिरवाई’ हा प्रकल्प साकार झाला. नंतर काही गावं बदलण्याचं मनावर घेतलं. दुर्गळवाडी या माझ्या गावात काम करताना तर मला खूप आनंद मिळाला. या सगळ्यात मला घरात वेळ देणं फारसं जमत नव्हतं. पण हे सगळं मुलांनी, नवऱ्यानं समजून घेतलं. मी हेच करावं, असाच माझ्या नवऱ्याचा हट्ट असायचा. मी माझ्या पोरांना कधी गरम खायला घालू शकले नाही. माझ्या घरात भात, भाजी, आमटी आणि चपाती हे चार पदार्थ एकत्र दिसले, की सगळे हरखून जायचे, की अरे आज सगळं आहे आपल्या घरात? कारण एकतर फक्त भात. म्हणजे आमटी भात खा आणि झोपून जा.. किंवा भाजी आणि चपाती.. जे शक्य असेल ते मी करायचे. आज विचार करताना वाटतं, की इथं मी कदाचित कमी पडले असेन; पण त्याला कधी कुणी कमी म्हटलं नाही.

नवऱ्यानंही कधी कमी लेखलं नाही. तो नेहमी पोरांना म्हणायचा, की अशी आई मिळायला भाग्य लागतं. असं प्रेम मला घरातूनच मिळालं. त्यामुळं मी बाहेर सगळ्यांशी प्रेमानं, कटुता न घेता वागू शकले. कारण माझं बरचसं आयुष्य हे झाडांना वाढविण्यात गेलं. त्यामुळं माझं वागणं आणि झाडं, यांचा माझ्या आयुष्यात थेटच संबंध मला वाटतो.

मी जेव्हा हिरवाईची झाडं लावली, तेव्हा माझ्या अवाक्याच्या पलीकडची ती संख्या होती. मी एकदमच हजार एक झाडं लावून बसले. माझ्याकडे इतकी सत्ता संपत्ती नाही, की हाक मारली, की दहा माणसं माझ्या कामासाठी हजर होतील, त्यामुळं जे काही करायचं ते मीच करायचं, असं काहीसं होतं. झाडं तर लावली, पण त्यानंतर माझ्या नोकरीची बदली झाली. इतरही काही अडचणी आल्या. पण जेव्हा मी झाड लावते, तेव्हा त्या झाडात आणि माझ्यात काही एक नातं तयार होत असल्याचं मला वाटतं. त्यामुळंच एखादं झाड मी लावलं, तर काहीही करून ते जगायलाच पाहिजे, असा माझा प्रयत्न असायचा. अनेकदा अर्धा तांब्याच पाणी मला झाडांना देणं शक्य व्हायचं. एवढंसं पाणी घालताना मी झाडांशी बोलायचे, ‘आज एवढंच, तेवढ्यावरच भागव.’ आणि तेवढ्या पाण्यावर ते झाड वाढायचं. मला वाटतं, झाडंही आपली त्यांच्याप्रती असलेली माया पाहात असतील, आणि मग वाढत असतील. जेव्हा त्यातूनही एखादं झाड मरायचं, तेव्हा मला फार वाईट वाटायचं. नवी झाडं जन्माला घालताना काही न उगवलेली झाडं, किंवा उगवल्यानंतर काही रोपांनी माना टाकल्या, तर ते खूप मनाला लागायचं. त्यांच्या अशा मरण्याला मी कारणीभूत आहे, असं मला वाटायचं.अजूनही वाटतं. मी त्या मेलेल्या रोपट्याला म्हणायची, की ‘तू खूप प्रयत्न केलास जगण्याचा; पण मी कमी पडले...’ मी लावलेल्या आणि माझ्यामुळं न जगू शकलेल्या झाडांची मला इथं माफी मागायची आहे.

माझ्या कामात बाई, मूल आणि झाड या तीन गोष्टी प्रामुख्यानं आहेत. माझ्या कामात अनेकांनी सहकार्य केलं आणि काहींनी जाणीवपूर्वक अडचणीही पेरल्या. मी या वर्षांत माणसंही लावली आणि झाडंही लावली. पण कालांतरानं माझ्या असं लक्षात आलं, की जोडलेली, लावलेली माणसं आपल्याला काही वर्षांनी सोडून जातायत, आपल्यापासून दूर जातायंत... काल होते आपल्याबरोबर पण आज बरोबर नाहीत. पण मी जिथं झाडं लावली, ती आजही तिथंच आहेत. ती मला सोडून गेली नाहीत. मी आणि माझ्या नवऱ्यानं मिळून काही झाडं लावली आहेत. आमच्या दोघांच्या आठवणींची ती झाडं आहेत. नवरा गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हा त्या झाडांपाशी गेले आहे, तेव्हा मला वाटतं, की माझ्या नवऱ्याजवळच आहे. मग त्या झाडाच्या बुंध्याला जवळ करून मी त्या झाडाला मिठी मारते. मला खूप आधार मिळतो.

मी नाती ही या झाडांप्रमाणंच जपते. झाडाला जसं खतपाणी लागतं, तसंच नात्यालाही लागतं. चुका होणं आणि झालेल्या चुका मोकळेपणानं कबूल करणं, हा नातं जपण्याचाच एक भाग मला वाटतो. झालेल्या चुका कबूल केल्या नाहीत आणि कुणी माफी मागायला आलं तर त्याला माफ केलं नाही, तर त्या नात्यांत दुरावा येऊ शकतो. नात्यांत झाडांसारखीच स्थिरता हवी, हे मला माझ्या झाडांनी शिकवलं. माझ्या आयुष्यात निर्माण झालेलं प्रत्येक नातं, हे लावलेल्या झाडांप्रमाणेच आहे. आणि लावलेलं झाड हे जपलेल्या नात्याप्रमाणं आहे, असं मला वाटतं. जगताना मी जसं माणसांना दुखावलंय, तसं झाडांनाही दुखावलं असेल, म्हणून नातं टिकविण्यासाठी माणसं आणि झाडं या दोघांचीही माफी मागण्याची माझी तयारी आहे आणि असेल.
(hirwai.satara@gmail.com)
शब्दांकन : अभिजीत सोनवणे
(संध्या चौगुले सामाजिक कार्यकर्त्या असून झाडं लावण्यातून साकारलेला त्यांचा साताऱ्यातील ‘हिरवाई’ हा प्रकल्प प्रसिद्ध आहे. तसंच साताऱ्यातील काही गावांचा त्यांनी कायापालटही केला आहे.)
बातम्या आणखी आहेत...