आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माफी मागण्‍यापूर्वीचा 'अपघात'मी टाळतोच..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा प्रसंग मी २२-२३ वर्षांचा असेन तेव्हाचा. एके सकाळी मी रस्त्यावरून सायकलवर जात होतो. समोरून येणा-या एका सायलकस्वाराशी माझी धडक झाली. दोघेही पडलो. पडलेले गृहस्थ वयाने मोठे होते, तरीही मी ‘दिसत नाही का, सायकल नीट चालवता येत नाही का’, असे रागारागाने बोललो. बाचाबाची सुरू झाली. नंतर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. घरी आल्यानंतर माझे मलाच चुकीचे वाटले. त्या रस्त्यावरून जाणारे ते नेहमीचे गृहस्थ होते. म्हणून मी दुस-या दिवशी, जरासा लवकरच निघालो आणि जिथं आमची धडक झाली, तिथं जाऊन थांबलो. काही वेळानं ते आले आणि थांबलेल्या मला त्यांनी ओळखले. डोळे वटारले. म्हणाले, ‘काय मारामारी करणार का?’ त्यांना मी बदला घेण्यासाठी आलोय, असंच वाटलं. मी त्यांना म्हटलं, ‘काल मी असं वागायला नको होतं, मी तुमची माफी मागतो. चुकलो.’ असं मी म्हटल्यावर ते खूपच नरमले. उलट मीच माफी मागायला हवी होती तुझी, असेही म्हणाले. ही गोष्ट मला खूप काही शिकवून गेली. आपण प्रामाणिकपणे बोललो तर समोरचा माणूसही आत्मपरीक्षण करतो, हे यातून मला कळलं. यानंतर कधी कुणाला टाकून बोलायचं नाही, अपमान करायचा नाही, दुखवायचे नाही, असा माझा स्वभावच झाला.

मी गांधी विचारानं जगणारा माणूस आहे. ‘हमला चाहे कैसा भी हो, हाथ हमारा नही उठेगा।’ हे ब्रीद मी पाळलं आहे. हमीद दलवाईंची तशी शिकवणही होती. ते म्हणायचे, ‘सय्यद आपण अपमान सहन केला पाहिजे. कारण आपल्याला समाज बदलायचा आहे. आपण समाजासाठी काम करतो, स्वतःसाठी आपण यातून काहीच मागत नाही. मग स्वाभिमान दुखावण्याचा प्रश्न येतोच कुठं?’ मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली आणि काही महिन्यांतच दलवाई गेले. मात्र त्यांची ही शिकवण मी तंतोतंत पाळली. सार्वजनिक जीवनात काम करताना माझे विरोधकही खूप होते. ते माझा वेळोवेळी अपमान करायचे; पण मी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला. यामुळे झाले असे की, ज्यांचा माझ्यावर राग होता, त्यांनी त्यांच्या रागाची कबुली दिली आणि आम्ही त्या वेळी चुकीचं वागलो, असेही सांगितले.

तलाक न्याय्य पद्धतीनं व्हायला हवा, या प्रश्नावर एकदा पुण्यात मुस्लिम मशिद कमिटीची बैठक बोलावली होती. बैठक होण्याआधी काही बाजूचे लोक ऐन बैठकीत माझ्या विरोधात गेले. सगळे एकत्र आणि मी एकटा, अशी परिस्थिती झाली. मी मुसलमानांना भडकवतो, नास्तिक आहे... आम्ही काही सय्यदभाईंना बोलावले नव्हते, असं म्हणत मला अपमानित केले गेले. मी काहीही न बोलता शांतपणे त्या बैठकीतून बाहेर पडलो. नंतर मला समजले की, त्या बैठकीतले एक जण खूप आजारी आहेत. त्यांचा पाय सुजला आहे. असे कळल्याबरोबर मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हाही ते माझ्या विरोधातच होते. त्यांना मी म्हटले, की माझ्या ओळखीचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. ते आधी तयारच नव्हते. मग कसेबसे तयार झाले. जायचे कसे म्हणाले; तर मी म्हटले, माझ्या कारने जाऊ या. त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता. त्यांना मी काही वाईट-साईट करेन, असे वाटत होते. म्हणून त्यांनी एक धट्टाकट्टा माणूस बरोबर घेतला. नंतर ते बरे झाले. मला भेटले आणि म्हणाले, ‘सय्यदभाई एक बात बोलनी थी। मैं उस दिन आप को बहोत गलत बोला, तभी भी आपने...’ मी त्यांना म्हटले, ‘एकतर्फी तलाक उठना चाहिये, मियाँ-बिबी की झगडेमें फैसला करनेवाली तिसरी हस्ती(व्यक्ती) चाहिए... अशी आमची भूमिका आहे. यात तुमच्या पायाचे दुखणे कुठे येते?’ असे मी म्हटल्यावर तो चकित झाला.

अजून एक प्रसंग आहे. एका मुस्लिम महिला परिषदेत महिलांना न्याय देण्याची भूमिका न पटल्याने करीम मिस्त्री नावाचा बिल्डिंग कॉन्ट्रक्टर माझ्या विरोधात गेला. तेव्हापासून तो उघडपणे अगदी रागारागाने मला तलवारीने मारायची भाषा करायचा. काही दिवस झाले आणि तो मंडळाच्या रास्तापेठेतल्या महिलांच्या समुपदेशन केंद्रामध्ये आला. आल्यावर त्याला मी विचारले, ‘तलवार कहाँ है?’ हे ऐकल्यावर तो ढसाढसा रडायलाच लागला. म्हणाला, ‘मेरी बेटी को उसने तलाक दिया... वो रस्ते पे आ गयी.. उस को मैं छोडूंगा नही...’ मुलीच्या नव-यालाही तलवारीने मारायची भाषा तो करत होता. मी त्याला म्हटले, ‘करीमभाई, ये तलवार की भाषा बार बार मत करो। इन्सान इससे नही बदलता...’ हे ऐकल्यावर तो म्हणाला, ‘मैने आपसे भी तलवार की भाषा की थी... मुझे माफ करना।’ ‘सिर्फ बोला था, किया नहीं ना कुछ’ असे म्हणत मी त्याला समजावले. विरोधात असलेल्या या करीमच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीतच हे घडल्यावर तो बदलला. त्याला कुणीतरी सांगितले की, सय्यदभाईंकडेच जा, दुसरे कुणीही यात लक्ष घालणार नाही. म्हणून तो माझ्याकडे आला होता.

माणसाचा समाज हा साखळीचा आहे. एकमेकांनी एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. उपासनेचा धर्म कोणताही असू दे, ऐहिक जीवनात माणूस म्हणूनच जगले पाहिजे, या तत्त्वाने मी काम करतो आहे. मी लहानपणी एका उर्दू पुस्तकात एक वाक्य वाचले, ‘रस्त्यात पडलेले दगड बाजूला करत जा. अगदी बारीक दगड असेल तरीही तो पायाने बाजूला करावा. कारण त्यातूनही अपघात घडू शकतात.’ मला वाटते, माझे काम हे असेच आहे. भविष्यात अपघात होऊच नये, यासाठी मी आधीच दगड बाजूला करतो आहे. म्हणून माझे वागणेही मी तसेच ठेवले आहे. चूक झालीच तर माफी मागण्याची तयारी माझी आहेच; पण माफी मागण्याची माझ्यावर वेळच येणार नाही, कुणी आपल्यामुळे दुखावले जाणार नाही, असेच मी वागतो. माफी मागण्यापूर्वीचा ‘अपघात’ माझ्याकडून होणारच नाही, याची मी पुरेपूर काळजी घेतो. कारण मला माझी, समाजाची जखम बरी करायची आहे.

शब्दांकन : अभिजित सोनवणे
abhi.pratibimb@gmail.com
(सय्यदभाई उर्फ सय्यद महबूब शाह कादरी हे मुस्लिम
सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष असून
सध्या ते प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
‘दगडावरची पेरणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.)