आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा आत्मघातकी फॉर्म्युला!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमुळे शक्तिपात झालेल्या विरोधकांना अचानक च्यवनप्राश मिळाल्यासारखे झाले आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता 15 वर्षे ओरपल्यानंतर शिवसेना-भाजपच्या हातातून महापालिकेची सत्ता जाईल, असे वातावरण मुंबईत होते. मात्र काँग्रेस पक्षाच्या विरोधात इतरांना लढण्याची गरजच नसते. कारण प्रत्येक नेता आपल्याच सहका-याविरोधात इतका तन, मन आणि धन लावून लढत असतो, की विरोधकांना लढण्यासाठी तो जागाच शिल्लक ठेवत नाही. मुंबईकर जनता रस्ते, पाणी, कचरा विल्हेवाट, मैदानांची दुर्दशा अशा समस्यांनी त्रस्त झालेली असताना शिवसेना-भाजपने ही कमाल केली कशी?
काँग्रेस पक्षाने मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून कृपाशंकर सिंह यांची नियुक्ती केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले सर्वच जण कृपाशंकर यांच्या विरोधात एकत्र झाले. कामत यांच्या राजीनाम्यामुळे कृपाशंकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. मात्र राजीनाम्यानंतरही या पदावर आपला माणूस यावा हेच कामत यांचे उद्दिष्ट होते. मात्र हायकमांडने मुंबईतील उत्तर भारतीयांचा वाढता टक्का पाहून कृपाशंकर यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली. कृपाशंकर अध्यक्षपद स्वीकारत नाहीत तोच त्यांनी झारखंडमधील खाण घोटाळ्यात भरपूर माया गोळा केल्याचे ‘व्हिस्पर कँपेन’ कामत यांचे समर्थक मुंबईभर करू लागले. कृपाशंकर यांची परस्पर कणी कापली जात असल्याचे पाहून मुंबईतील काँग्रेसच्या इतर खासदारांनाही त्यामुळे हर्षवायू झाला. या कँपेनला संजय निरुपम, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड यांची थेट साथ मिळत गेली. कृपाशंकर यांच्या विरोधात या विरोधी गटाच्या समर्थकांनी न्यायालयातही खटले लावले. या कोर्टकचे-यांमध्ये गुंतलेल्या कृपाशंकर यांनी पक्षबांधणीकडे दुर्लक्ष केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजन टळले की जिंकणे शक्य होईल, असे कागदावरचे सोपे गणित मांडून कृपाशंकर मोकळे झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काँग्रेसचे तिकीट वाटप झाले. त्यात स्थानिक खासदार, मंत्री, शक्तिशाली आमदार या सगळ्यांनी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव टाकून नातेवाईक व पंटरांसाठी तिकिटे पदरात पाडून घेतली. शिवसेनेचा आत्मविश्वास हे सगळे होत असताना फारसा भक्कम नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने उत्तर भारतीय, मुस्लिम आणि इतर परप्रांतीयांमध्ये आघाडी सुसाट सुटणार, असेच त्यांना वाटत होते. त्यातच राज ठाकरे यांच्यामुळे मराठी मतांमध्ये मतविभाजन होणार हे सेना नेत्यांनाही वाटत होते. मात्र ते कासव आणि ससा शर्यतीतील कासवाप्रमाणे नेटाने पुढे जात राहिले. उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे अत्यंत बोचरी टीका करत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मराठी विभागांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली. उद्धव यांचे नियोजन कितीही व्यवस्थित असले तरीही जनतेची मने आणि मते जिंकण्यात आपण कमी पडणार, हे त्यांना माहीत होते. त्यासाठी त्यांनी अत्यंत योग्य वेळी बाळासाहेब ठाकरेंना प्रचाराच्या निमित्ताने बाहेर काढले. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाला दिलेल्या 29 जागांपैकी बहुतांश जागा पडणार हेदेखील चाणाक्ष सेना नेत्यांच्या लक्षात आल्यावर तेथे काँग्रेस निवडून येऊ नये यासाठी काँग्रेस बंडखोर अथवा समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची तजवीज केली गेली.
रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष दीपक निकाळजे यांच्याच हातात देऊन स्वत: शिवसेनेच्या मंचावर जाऊन ‘‘आता मला बाळासाहेब कळले, म्हणून माझे पाय ‘मातोश्री’कडे वळले’’ असल्या भंपक कविता म्हणायला सुरुवात केली. दीपकभाऊ निकाळजे हे छोटा राजन याचे बंधू आहेत. त्यांच्या भगिनी, त्यांचे भाचे यांना तर रिपाइंने तिकिटे दिली, मात्र रिपाइंचा मुंबईतून एकुलता एक विजयी झालेला उमेदवार हा छोटा राजन टोळीतील मोठा सूत्रधार डी. के. राव याचा भाऊ ठरला. आठवले यांनी रिपब्लिकन चळवळीचे ‘लुम्पेनायझेशन’ केले, असा आरोप त्यांच्यावर होत होता. मात्र आता तर त्याच्याही पुढेही जाऊन आठवले यांनी रिपाइंचे माफियाकरण केले. रिपाइंच्या एकमेव विजयी उमेदवाराच्या शेजारच्याच प्रभागात उभ्या असलेल्या त्यांच्या उमेदवाराला केवळ 194 मते मिळाली आहेत. रिपाइंकडे स्वत:ची मते उरली नाहीत व त्यांना सेनेची मते परावर्तित झाली नाहीत, हे रिपाइंच्या 29 उमेदवारांना मिळालेली मते पाहिली की लक्षात येते.
यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे योगदानही विसरून चालणार नाही. बाळासाहेब ठाकरे 15 दिवसांत ‘इनकॉन्सिक्वेन्शिअल’ होतील, असे बोजड इंग्रजीमध्ये त्यांनी व्यक्त केलेले मत सहज व्यक्त झाले होते का, मतदानाच्या एक दिवस आधी मराठी मतांमधील विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडेल, असे त्यांचे म्हणणे नक्की कुणाला फायदा पोचवणारे आहे, हे त्यांना कळले नसावे? मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बिल्डर लॉबीला स्वत:पासून दूर ठेवल्याने त्यांची प्रतिमा उजळली असेल. मात्र बिल्डरांना दूर ठेवताना सामान्य जनतेला जवळ करणे भाग होते. मुख्यमंत्र्यांच्या या बिल्डरविरोधी भूमिकेमुळे चिडलेल्या बिल्डरांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचंड आर्थिक शक्ती पणाला लावली होती. भाजपचे व्यवसायाने बिल्डर असलेले आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघात भाजपचे पाच नगरसेवक निवडून आले. या सगळ्याचा परिपाक म्हणजे मुंबईत पुन्हा सेना-भाजपचा झेंडा फडकला. ज्या मुंबईत काँग्रेसचे 5 खासदार व 17 आमदार निवडून येतात, तिथे अवघे 52 नगरसेवक निवडून आल्यावरही आपापसातील भांडणे थांबवण्यास काँग्रेसजन तयार नाहीत. त्यामुळेच दोन वर्षांनी येणा-या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलले जाऊ शकत असले तरी ते प्रत्यक्षात बदलले जाईल का, हा कळीचा प्रश्न काँग्रेसजनांच्या मानगुटीवर बसणार आहे.