आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Construct Autobiography Who Do Something For Orphan

अनाथांसाठी झटणा-यांच्या चरित्राची मांडणी करणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत

एक मुलगा पंढरपुरातील अनाथालयात वाढतो, नंतर कोल्हापुरातील रिमांड होममध्ये राहून शिक्षण घेतो. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, आंदोलक, संस्थाचालक, समाजशास्त्रज्ञ, लेखक, अनुवादक, वक्ता अशा विविध भूमिकांमधून महाराष्‍ट्र भर डॉ. सुनीलकुमार लवटे या नावाने ओळखला जातो. स्वत: अनाथ म्हणून झालेली अवहेलना न विसरणा-या लवटे सरांनी आता अनाथांसाठी महाराष्‍ट्र भर झटणा-या सर्व कार्यकर्त्यांची चरित्रात्मक मांडणी करण्याचा संकल्प केला असून याच वर्षी त्यांचे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

एक माणूस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या क्षेत्रातील किती कामे झपाट्याने करू शकतो याचे प्रत्यंतर डॉ. लवटे यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. येथील महावीर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यानंतर लवटे सरांनी अनेक कामे हाती घेतली. शाहू स्मारक भवनपासून ते करवीर नगरवाचन मंदिराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. परंतु जेव्हा मतभेदाचे मुद्दे आले तेव्हा त्याच तडफेने सर्व संस्थांचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवून सरांनी आपले नियोजित लेखनकार्य अधिक वेगवान केले आहे. त्यामुळेच 2013 या एकाच वर्षात सरांची सहा ते सात पुस्तके प्रकाशित होणार आहेत.

त्यांच्या ‘खाली जमीन वर आकाश’ या आत्मचरित्राची मराठी साहित्यात मोठी दखल घेतली गेली. अनेक पुरस्कार या कलाकृतीला लाभले. हिंदी, गुजराती, बे्रलमध्ये भाषांतर झाले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांचे स्मारक त्यांनी ज्या पद्धतीने शिवाजी विद्यापीठामध्ये उभारले आहे त्याला खरोखरच तोड नाही. यासाठी अनेक वर्षे त्यांनी घालवली. खांडेकरांशी संबंधित ज्या वस्तू मिळाल्या नाहीत त्यांच्या प्रतिकृती त्यांनी संग्रहालयात मांडल्या. नंतर खांडेकर कुटुंबीयांनी मूळ वस्तू या संग्रहालयासाठी दिल्या. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात साने गुरुजींचे जे स्मारक उभे केले जात आहे त्यासाठीही लवटे सरांनी अनेक ठिकाणांहून साने गुरुजींच्या शाळेच्या दाखल्यापासून ते लेखनापर्यंतच्या अनेक गोष्टी मिळवल्या. अंनिस, गुटखाबंदी, व्यसनमुक्ती, मानवी हक्क या क्षेत्रामध्येही कार्यकर्ता म्हणून अग्रेसर असणा-या लवटे सरांनी खांडेकरांची 16 पुस्तके प्रकाशित केली आहेत.

1980 पासून लवटे यांनी विविध प्रकारचे जे लेखन केले त्याची पुस्तके आता 2013 मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. पुण्याचे डॉ. सागर देशपांडे हे सह्याद्री प्रकाशनच्या वतीने सरांच्या शैक्षणिक लेखांचे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. येथील अमेय प्रकाशन ‘कोल्हापुरातील स्वातंत्र्योत्तर समाजसेवक’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. अनाथ आणि निराधारांवर त्यांनी ‘निराळं आकाश’ ही लेखमाला लिहिली होती, त्याची दोन पुस्तके आता प्रकाशित होणार आहेत. ‘शब्दसोन्याचा पिंपळ’ या नावाने त्यांच्या ललित लेखांचा संग्रहही यंदा प्रकाशित होणार आहे. आकाशवाणीवर त्यांनी केलेल्या हिंदी आणि मराठी भाषणांचा संग्रहही यंदा पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे. याबाबत डॉ. लवटे म्हणाले की यंदा प्रकाशित होणा-या अनेक पुस्तकातील मजकूर हा याआधी प्रसिद्ध झालेला असेल. परंतु निराधार आणि अनाथांसाठी कार्य करणा-या कार्यकर्त्यांचे चरित्र हा संपूर्ण नवा विषय असून महाराष्‍ट्र भर आयुष्य गाडून घेऊन ज्यांनी हे काम उभं केलं, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून करणार आहे.