आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज विवाहपूर्व समुपदेशनाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याहून नागपूरला जाताना विमान प्रवासात माझ्या शेजारच्या खुर्चीवर एक पुणेरी आजीबाई बसल्या होत्या. मी समुपदेशक आहे हे कळल्यानंतर त्यांनी मला विचारलं, आजकाल लग्न होण्याआधी समुपदेशन करण्याचं जे फॅड निघालं आहे त्याच्याशी तुमचा संबंध येतो का हो? येतो की, पण त्याला तुम्ही फॅड का म्हणता? अहो, आमच्या काळी समुपदेशन वगैरे असल्या भानगडी नव्हत्या तरी आमची लग्नं टिकलीच ना आणि आम्हाला मुलंबाळं पण झालीच ना? काय गरज आहे त्या समुपदेशनाची? या भडिमाराने विवाहपूर्व समुपदेशनाबद्दल असलेले गैरसमज दूर करणं किती आवश्यक आहे याची मला तीव्रतेने जाणीव झाली.
या जगातील सगळ्या समस्यांचं व त्यातून निर्माण होणार्‍या दु:खाचं मूळ केवळ एकच असतं आणि ते म्हणजे वैचारिक स्पष्टतेचा अभाव. समाजातील स्थान (स्टेटस), आर्थिक परिस्थिती, पत्रिका, नाड्या व छत्तीस गुण जुळले की कोणाचाही विवाह अगदी हमखास यशस्वी होतो हा या पृथ्वीवरचा सगळ्यात हास्यास्पद गैरसमज आहे. कोणाच्याही वैवाहिक जीवनाचं यश ज्या अगदी मोजक्या गोष्टींवर अवलंबून असतं त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘तडजोड’, जी दोघांनीही करायची असते आणि याच तडजोडीचा म्हणजेच अ‍ॅडजस्टमेंटचा व तिच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींचा मूलमंत्र विवाहपूर्व समुपदेशनात दिला जातो.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरात आजी-आजोबा आणि आई-बाबा नावाची समुपदेशन केंद्रं होती. कुटुंबांचा आकार जसजसा आक्रसू लागला तशा आजी-आजोबा या संस्था लोप पावू लागल्या आणि अर्थार्जनात व्यग्र झाल्यामुळे आई-बाबा ही संस्थाही आपल्या मुलांपासून दुरावली. म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशनाची निकड भासू लागली. केवळ विवाह टिकवणे नव्हे तर वैवाहिक जीवनाचे नंदनवन कसे करावे याबद्दल भावी वधूवरांचे उद्बोधन करणे हा विवाहपूर्व समुपदेशनाचा खरा उद्देश असायला हवा.
वैवाहिक आयुष्यात मतभेद होणं, खटके उडणं हे अगदी साहजिक आहे. पण मतभेदांचं पर्यवसान टोकाच्या भांडणांमध्ये होऊ नये यासाठी दोघांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
दोघांपैकी कोणीही सतत एकमेकाच्या मनासारखं वागू शकत नाही हे एकदा लक्षात आलं की क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढते व वैवाहिक जीवनातील अनेक बाबी सोप्या होतात.
आपली मतं दुसर्‍यावर लादणं व आपल्या इच्छेनुसार वागण्यास दुसर्‍याला भाग पाडणं ही अत्यंत घातक वृत्ती आहे, जी सुखी संसाराला फार थोड्या अवधीत मूठमाती देऊ शकते.
दोघांपैकी कुणीही एकमेकांची तुलना इतर कोणाशी करणे कटाक्षाने टाळावे. दोन व्यक्तींची तुलना कधीच होऊ शकत नाही.
अत्यंत शांतपणे स्वत:च्या जगात रमायला, मनन-चिंतन करायला प्रत्येकाला चोवीस तासातून एकदा काही वेळ मोकळी जागा म्हणजेच स्पेस हवी असते व सहजीवनात ती एकमेकांना मिळवून देणे हे दोघांचेही कर्तव्य आहे.
निकोप लैंगिक संबंध हा यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया आहे याकडे दुर्लक्ष झाल्यास तो संसार कोणत्याही परिस्थितीत टिकू शकत नाही याची भावी वर-वधूंनी अगदी आवर्जून नोंद घ्यावी.
शेवटी कितीही पत्रिका जुळवल्या, कितीही व्रतवैकल्ये केली, कितीही जपतप केले आणि विवाहपूर्व समुपदेशनाच्या कितीही कार्यक्रमांना अगदी श्रद्धेने हजेरी लावली तरी ज्या पती-पत्नींना तडजोड कशाशी खातात हे माहीत नसतं, त्यांचे विवाह यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नसते!

(shrikantpohankar@gmail.com)