आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टवर्कचे अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे युग ‘हार्डवर्क’ पेक्षाही ‘स्मार्टवर्क’ करण्याचे आहे. आजच्या काळाच्या तरुणांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर यशस्वी करिअरची परिभाषा म्हणजे नाव, पैसे आणि चांगला हुद्दा हे तिन्ही कमी वेळ आणि कमी पैसा खर्च करून मिळविणे. पण योग्य प्लॅनिंगशिवाय स्मार्टवर्क होऊ शकत नाही. बारावीनंतरचे म्हणजेच डिग्री कॉलेज साधारणत: सकाळच्या वेळी असते आणि डिग्री कॉलेजला जाणा-या विद्यार्थ्यांना दुपारनंतर मोकळा वेळ मिळतो. या तीन वर्षात किंवा तिस-या वर्षात जरी क्लासेस किंवा अभ्यास जास्त असल्यास ते वर्ष सोडले, तरी एफवाय आणि एसवाय या दोन वर्षात कॉलेजनंतर मिळालेल्या वेळेत आपण निवडलेल्या करिअरशी निगडित डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केला, तर तो पुढच्या काळात नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.


याशिवाय अशा कोर्सेसचा फायदा बारावी केलेले इतर उमेदवारही घेऊ शकतात. कारण काही डिप्लोमा कोर्सेसमध्ये असलेल्या विषयांचा करिअरच्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यासक्रम तयार केला जातो आणि असे कोर्सेस केल्यानंतर चांगल्या करिअरची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते.


मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेद्वारा बारावी किंवा इतर महाविद्यालयाची बारावीला समान असलेल्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता फुल टाइम, पार्ट टाइम आणि काही सर्टिफिकेट कोर्सेसचे पर्याय उपलब्ध आहेत. गरवारे संस्थेद्वारे हे कोर्सेस फक्त मुंबईतच उपलब्ध आहेत, पण हे किंवा असे काही कोर्सेस महाराष्‍ट्रात इतर ठिकाणी आहेत. मात्र त्याचा अभ्यासक्रम आणि त्या संस्थेची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी.


गरवारेमध्ये दोन वर्षांच्या कालावधीचे चार कोर्सेस आहेत. अ‍ॅग्रिकल्चर अँड बिझनेस, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी, पेंट अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी, टुरिझम अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट. हे सर्व कोर्स दोन वर्षात चार सेमिस्टरमध्ये शिकविले जातात. व्यवसाय हा करिअरचाही एक भाग आहे. अ‍ॅग्रिकल्चर अँड बिझनेस हा कोर्स महाराष्‍ट्रात इतर ठिकाणी एमबीएच्या स्तरावर उपलब्ध आहे. म्हणजे हा एक मॅनेजमेंट कोर्सेसपैकी एक कोर्स आहे. हा कोर्स गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये बारावीनंतर डिप्लोमा कोर्सच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि हा कोर्स केल्यानंतर स्वत:चा व्यवसायही करता येतो. या कोर्सची तुलना एमबीएशी करू नये. या कोर्समध्ये शेतीचे मूलभूत ज्ञान दिले जातेच, पण बँकिंग, अकाउंटस्, फायनान्स, पब्लिक स्पीकिंग, आंतरराष्‍ट्रीय मार्केटचे ज्ञान, लँड मॅपिंगमध्ये सॅटेलाइटचा वापर, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, इंग्रजी किंवा/आणि फ्रेंच या भाषांचे लेखी आणि बोली ज्ञान हे आणि इतर विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.


कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी : गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये या कोर्समध्ये इंट्रोडक्शन टू कम्प्युटर्र्स, सिस्टम अ‍ॅनालिसिस अँड डिझाइन्स, प्रोग्रॅमिंग इन सी प्लस प्लस, प्रोजेक्ट प्रोग्रॅमिंग इन सी प्लस प्लस, सॉफ्टवेअर क्वालिटी आणि इतरही अनेक विषयांचा समावेश या कोर्समध्ये केला आहे. कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनचे ग्रॅज्युएशन कोर्सेस महाराष्‍ट्रात इतरत्र आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सही आहे, पण असा पदविका कोर्स मिळणे कठीण आहे.
पेंट अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी : हा कोर्सही एकमात्र पदविका कोर्स आहे, जो मुंबईत गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅप्लिकेशनच्या क्षेत्रात ज्या गतीने बदल येत आहे आणि या क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असल्यामुळे येथे डिप्लोमा होल्डर्स, म्हणजेच पदविका कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. कोर्सच्या अखेरीस (चौथ्या सेमिस्टरनंतर) सहा महिन्यांकरिता इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट ट्रेनिंग दिले जाते. यात अ‍ॅप्लिकेशन, ऑटोमोबिल्स अशा टेक्निकल विषयांचा समावेश होतो. या कोर्समध्ये कम्युनिकेशन स्किल्स हासुद्धा एक विषय आहे. राज्यात पेंट अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक आणि एमटेक हे पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेसच उपलब्ध आहेत.
डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन : बारावीनंतर फुलटाइम तीन वर्षांचा इंटिरियर डिझाइनचा पदविका कोर्स मुंबई महाविद्यालयाच्या गरवारे इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. पण राज्यात कोल्हापूर, अमरावती आणि वर्धा येथे डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन हा वर्षभराचा, तर पुण्यात इंटिरियर डिझाइन अँड डेकोरेशनचा सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे. वर्धा येथील डॉ. आर.जी. भोयर इन्स्टिट्यूट ऑफ टेकिनकल एज्युकेशन या संस्थेत काही विशिष्ट डिप्लोमा कोर्सेस चालविले जातात.


इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता वर्षभराचा अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर सेफ्टी अँड इंडस्ट्रियल एन्व्हॉयर्नमेंटल इंजिनिअरिंग, तर पॅरामेडिकल क्षेत्रात डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी अँड टेक्नॉलॉजी (डीएमएलटी), डिप्लोमा इन ब्यूटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग (1 वर्ष) आणि डिझायनिंगमध्ये पदवीधारकांकरिता एक वर्षाचा डिप्लोमा इन गारमेंट मॅनुफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी (ड्रेस डिझायनिंग) हे कोर्सेस उपलब्ध आहेत।


टुरिझम अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट : मुंबईमध्ये खूप ठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेतही हा फुलटाइम दोन वर्षांचा कोर्स आहे. महाराष्‍ट्रात नागपूर येथील किऑनी या संस्थेत टुरिझमचे बरेच कोर्सेस चालवण्यात येतात. येथील कोर्सेसबद्दल अधिक माहिती http://www.kuoniacademy.co.in/
या संकेतस्थळावर मिळेल।
याशिवाय टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट यावर पदविका कोर्स जळगाव येथील महाविद्यालयातही उपलब्ध आहे. पुण्यात या विषयावर सर्टिफिकेट कोर्स आणि पदवीधारकांकरिता पदविका कोर्स आहे.
मुंबईच्या गरवारे संस्थेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता काही विशेष पार्ट टाइम डिप्लोमा कोर्सेस आहेत.
1. फॉरेन ट्रेड मॅनेजमेंट - दीड वर्ष- भारतात काही ठिकाणी पदव्युत्तर पदविका कोर्स उपलब्ध आहे, पण महाराष्‍ट्रात असा एकमात्र बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहे.
2. ज्वेलरी मॅनेजमेंट - दीड वर्ष - या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता फक्त 24 आहे. राज्यात मुंबई सोडून इतरत्र असा हा कोर्स नाही. पण दिल्ली आणि बंगळुरू येथे या विषयात पदविका कोर्सेस आहेत.
3. टूर मॅनेजमेंट - एक वर्ष - एक नवीन विषय आहे. भारतात या विषयाचा समावेश पोस्ट ग्रॅज्युएट आणि एमबीएच्या इतर कोर्सेसमध्ये होतो.
4. कस्टम्स क्लिअरन्स अँड फ्रेट फॉर्वर्डिंग - दीड वर्ष - यात कस्टम्ससंदर्भातील कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो. महाराष्‍ट्रात असा एकमेव कोर्स आहे.
याशिवाय मुंबईच्या गरवारे संस्थेत तीन ते नऊ महिन्यांच्या कालावधीचे सर्टिफिकेट कोर्स आहेत. त्यातून सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल ट्रान्सक्रिप्शन हा फक्त येथे उपलब्ध आहे. देशभर मेडिकल ट्रान्सक्रिप्शन या विषयावर पदव्युत्तर पदविका कोर्स उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्स इन एन्व्हॉयर्नमेंटल क्वालिटी मॅनेजमेंट हा कोर्स मुंबई विद्यापीठाशिवाय दिल्लीत उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपल्या करिअरशी निगडित असलेले डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस विद्यार्थ्यांना करिअरमध्ये फायदेशीर ठरू शकतात.