आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युंजयचे निर्माण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेवीस वर्षांचा एक कोवळा पोर. शिक्षण सुरू असतं, उदरनिर्वाहासाठी नोकरीही. मात्र, मनाच्या युद्धभूमीवर नेहमी महाभारत सुरू असतं. या महाभारताचा त्याच्यापुरता नायक असतो कर्ण. या मुलाला कर्ण झपाटून टाकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या आपल्या जन्मगावी हायस्कूलमध्ये असताना अंगराज कर्ण या एकांकिकेमध्ये या मुलाला कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी मिळते; परंतु यातील कर्णाचे संवाद इतके बिनतोड असतात की तेच संवाद या मुलाच्या मनात घट्ट रुतून बसतात, कर्णाच्या चाकासारखेच. पुढं कोल्हापुरात मेन राजाराम हायस्कूलमध्ये टायपिंग आणि शॉटहॅँडचा शिक्षक म्हणून नोकरी करत असताना या मुलाने महाभारताविषयी अफाट वाचन केलं, टिपणं काढली. पुणे विद्यापीठाची बाहेरून हिंदीची एफवायबीएची परीक्षा देणा-या या मुलाला अभ्यासासाठी बिहारमधील पाटण्याचे हिंदीतील ख्यातनाम कवी प्रभात ऊर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं कर्ण हे खंडकाव्य होतं.

आज- यात ज्या कर्णानं त्याच्यावर प्रभाव टाकला होता तो कर्ण पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये उचंबळू लागला. त्यानं ते 100 पानी खंडकाव्य पाठच केलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या मुलानं कर्णाच्या जीवनावर कादंबरीच लिहायला घेतली. बंदुकीसाठी, आतषबाजीसाठी दारू पुरवणा-या एका सर्वसामान्य घरातील हा पोर महाभारतात ज्याच्यावर अन्याय झाला आहे, अशा कर्णाची वकिली करायला सिद्ध झाला होता. हाच मुलगा म्हणजे मराठी साहित्यामध्ये पहिल्याच साहित्यकृतीला उदंड लोकप्रियता मिळवणारे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत.

* कुरुक्षेत्राचा अभ्यास दौरा : शिक्षण आणि नोकरीसाठी कोल्हापुरात आलेल्या सावंत यांनी कांदबरीचं लिखाण सुरू केलं; परंतु केवळ वाचनातून महाभारताचा वेध घेण्यापेक्षा जिथं महाभारत घडलं त्या कुरुक्षेत्रावर जाण्याची निकड त्यांना वाटू लागली. याच दरम्यान बिहारच्या पाटणा येथील कवी प्रभात आणि कुरुक्षेत्र विश्वविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. बुद्धप्रकाशजी यांच्याशी त्यांचा पत्रव्यव्हार सुरू झाला. बुद्धप्रकाश यांनी शिवाजीरावांची कर्णाविषयीची तळमळ पाहून आपल्या विद्यापीठातर्फे त्यांना कुरुक्षेत्री आमंत्रित केले; परंतु प्रवास मोठा होता. दोन प्रश्न महत्त्वाचे होते. एक रजेचा आणि दुसरा पैशाचा.
साहित्यामध्ये रस असणा-या तत्कालीन सिव्हिल सर्जननी शिवाजीरावांना या प्रवासासाठी खोटं आजारी पाडलं आणि तसं प्रमाणपत्रही दिलं. रजा मिळाली; परंतु खिशात होते फक्त 50 रुपये. शिवाजीराव आपल्या मित्रासह थेट गेले चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे. त्यांना मनीचा हेतू सांगितला. त्याक्षणी भालजींनी 125 रुपयांचा धनादेश देऊन भवानी केली. कोल्हापूर आणि जवळच्या अनेक सहका-यांनी 1800 रुपयांची मदत गोळा केली आणि शिवाजीराव कुरुक्षेत्री निघाले.
मुंबईत प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मधुकरराव चौधरी यांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतला. लक्ष्मणशास्त्रींनी दिल्लीतील वास्तव्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना पत्र दिले. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यासह अनेकांच्या सहकार्यानं शिवाजीराव कुरुक्षेत्री पोहोचले. तिथल्या स्थानिक जाणत्यांशी, विद्वानांशी चर्चा करून येताना गोकुळ, वृंदावन, मथुरा इथं भेटी देऊन, आवश्यक ती टिपणं आणि फोटो काढून शिवाजीराव कोल्हापुरात आले.
*पोलिस क्वार्टर्समध्ये जन्मली मृत्युंजय : शिवाजीराव कोल्हापुरात आले ते भारलेपणानंच. कर्णाविषयी खूप काही त्यांच्या मनात दाटून आलं होतं. आधी जे काही वाचलं होतं त्याला पाहिल्याची जोड मिळाली. मनामध्ये महाभारताच्या प्रसंगांची माळ तयार झाली होतीच. दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये शिवाजीरावांचे पोलिस खात्यातील भाऊ विश्वासराव राहात होते. त्यांच्याच खोलीत बसून शिवाजीरावांनी आधी लिखाण सुरू केलेल्या कादंबरीचा प्रवास झपाटल्या अवस्थेत पूर्ण केला आणि चार वर्षांत 1500 पानांच्या मृत्युंजय कादंबरीचं हस्तलिखित तयार झालं. शिवाजीरावांचे मित्र आर. के. कुलकर्णी, कवी ना. वा. देशपांडे, चंद्रकुमार नलगे यांना अनेकदा शिवाजीरावांनी ही कर्णकथा टप्प्याटप्प्याने वाचून दाखवली. हे सगळं प्रकरण वेगळं आहे याची जाणीव या तिघांनाही त्या वेळी झाली होती.
* मृत्युंजयचे प्रकाशन : महाभारतासारख्या विषयावर कोल्हापुरातील युवक एवढं लिहू शकतो यावरच अनेकांचा विश्वास बसला नाही. भविष्यकाळात केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषिकांच्या हृदयात ही कादंबरी स्थान मिळवणार आहे याची भविष्यकालीन दृष्टी नसलेल्या कोल्हापूर आणि पुण्यातील काही प्रकाशकांनी ही कादंबरी प्रकाशित करण्यास असमर्थता दर्शवली. शिवाजीराव थोडेसे नाराज झाले. शिवाजीरावांचे जिवलग मित्र कोल्हापूरचेच आर. के. कुलकर्णी ज्यांना वाचून दाखवल्याशिवाय मृत्युंजयमधील एकही वाक्य अवतरलं नव्हतं असे दोघेजण पुण्याला गेले. तेथील एका प्रकाशकाला भेटले. त्यांनी त्या वेळचा हिशोब मांडून ही कादंबरी प्रकाशित करण्यासाठी 25000 रुपये खर्च सांगितला. 1966 च्या सुमारास हा खर्च म्हणजे आता लाखातील आकडा होईल. अखेर आर. के. यांना आठवण झाली आपल्या मित्राची. महाराष्‍ट्राचे आधुनिक वाल्मीकी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची.
हे दोघेही गदिमांकडे गेले. आर. के. यांनी शिवाजीरावांची ओळख करून दिली. सोबत नेलेलं मृत्युंजयच्या हस्तलिखिताचं बाड गदिमांकडे दिलं. आशीर्वाद मागितला. काही दिवसांत ते हस्तलिखित वाचून खुद्द गदिमांनीच स्थळ उत्तम आहे अशा शब्दात कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णी यांच्याकडे हे हस्तलिखित पाठवलं. यानंतर पुन्हा दोघेजण पुण्याला गेले. अनंतरावांना भेटले. ही कादंबरी वाचकांना पचली नाही तर पुन्हा हाती लेखणी धरणार नाही असं शिवाजीराव तिथं बोलून गेले आणि अनंतरावांच्याच घरी 1967 च्या गणेश चतुर्थीला गदिमांच्या हस्ते मृत्युंजयच्या पहिल्या प्रतीचं पूजन करण्यात आलं आणि इथून पुढं मराठी साहित्यविश्वात इतिहास घडत गेला.
* मृत्युंजयचा यशोलेख : 8 सप्टेंबर 1967 मृत्युंजयचे प्रथम प्रकाशन यानंतर आजतागायत आवृत्त्या प्रकाशित
1974 / ज्ञानपीठ, दिल्लीमार्फत मृत्युंजयचे हिंदीत भाषांतर
1990/ मृत्युंजयचे कन्नड भाषेत भाषांतर
1991/ मृत्युंजयचे गुजराती भाषेत भाषांतर
1995/ मृत्युंजयचे मल्याळम भाषेत भाषांतर
1989/ मृत्युंजयचे इंग्रजीमध्ये भाषांतर
1975/मोहन वाघांकडून चंद्रलेखातर्फे मृत्युंजय रंगभूमीवर
1996/ दूरदर्शनवरून मृत्युंजय मालिकेचे प्रसारण
*पुरस्कार : महाराष्‍ट्रशासन, केसरी मराठा संस्थेचे न. चिं.केळकर, ललित, कोल्हापूर व पुणे महानगरपालिका, कोलकाता येथील विवेक संस्थानचा पूनमचंद भुतोडिया पुरस्कार, 1995 मध्ये भारतीय ज्ञानपीठ संस्था दिल्ली यांचा मूर्तीदेवी पुरस्कार, गुजराथी भाषांतराला राज्य शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार, याच भाषांतराला केंद्रंीय साहित्य अकादमीचा पुरस्कार, अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद. 1983 सालच्या बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
* अन इंग्रजी मृत्युंजयची नोबेलसाठी शिफारस : कोलकाता येथील रायटर्स वर्कशॉप या संस्थेतर्फे पद्मश्री पी. लाल यांनी इंग्रजी भाषेतून मृत्युंजयचे भाषांतर केले आणि 1990 मध्ये त्याचे नोबेलसाठी नामांकनही करण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीनंतर साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी भारतातून शिफारस झालेला हा एकमेव मराठी गं्रथ असावा. आपल्या भाषेतील एखाद्या गं्रथाची नोबेलपर्र्यत मजल जाऊ शकते, हेच खरं म्हणजे खूप पे्ररणादायी आहे.
* मृत्युंजयमुळे मिळाली सहधर्मचारिणी : मृत्युंजय 1967 मध्ये प्रकाशित झाली आणि डिसेंबरच्या एका रात्री पुण्यातील कुंदा कामतेकर या युवतीच्या हाती ही कादंबरी मिळाली. तिनं झपाटल्यासारखं ही कादंबरी वाचून संपवली, पण ही कादंबरी वाचताना काही तरी वेगळं घडतंय असं तिला जाणवलं. तिनं अशा भारलेल्या अवस्थेतच शिवाजीराव सावंत यांना पत्र लिहिलं. यानंतर वर्षभरानं या मुलींन शिवाजीरावांना पाहिलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ब्राह्मण, मराठा अशा आंतरजातीय विवाहाला लगेचच संमती देण्याचा तो काळ नव्हता; परंतु वर्ष-दीडवर्षांनी या दोघांंचाही विवाह झाला. पुण्याची कुंदा कामतेकर मृणालिनी शिवाजीराव सावंत बनल्या. त्यांनीच मृत्युंजयचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. शिवाजीराव सावंत या वादळाशी सुखाचा संसार केला.
* सैनिकांनाही मृत्युंजयची प्रेरणा :हजरतबालच्या संघर्षावेळी दर्ग्याभोवती मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान बसले होते. थंडीमध्ये कुठल्या बळावर तुम्ही इथं अतिरेक्यांशी सामना करत आहात असा प्रश्न एका पत्रकाराने सैनिकांना विचारला. त्या वेळी त्याने आपल्या कोटातून एक पुस्तक काढून दाखवले. ही कादंबरी आमची प्रेरणा आहे, असं तो सांगत होता. कादंबरी होती मृत्युंजय.
*अन अटलबिहारी वाजपेयींनी केली जाहीर स्तुती : शिवाजीराव सावंत यांना दिल्ली इथं मूर्तीदेवी पुरस्कार प्रदान केल्यानंतर दुस-याच दिवशी दिल्लीतील मराठी संस्थांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. कार्यक्रम सुरू असताना खालून व्यासपीठावर चिठ्ठी आली. ‘मैं मृत्युंजयपर मेरे विचार प्रकट करना चाहता हूँ.’ खाली असलेली सही पाहून सावंत यांना आश्चर्य वाटलं. सही होती अटलबिहारी वाजपेयी यांची. अर्थात यानंतर वाजपेयी आपल्या लखनवी हिंदीमध्ये मृत्युंजयबद्दल जे बोलले ते ऐकून सर्व दिल्लीतील उपस्थित सर्व मराठीजनांची छाती अभिमानाने फुलून आली.