आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथभ्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॉमरसेट मॉमसारखा प्रसिद्ध लेखक म्हणतो की परंपरा या पथदर्शक आहेत, त्या कैद करत नाहीत. हे वाक्य आठवले ते एका प्रसंगावरून. श्रावण महिना लागला. आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत. त्यांना सणावारांची जबरदस्त ओढ आहे. त्यांना श्रावणासारखा महिना अक्षरश: बांधून ठेवतो. मागच्या महिन्यात त्यांच्याकडे सहज गेले तेव्हा तिखटमिठाच्या आणि गोड पु-या समोर आल्या. ‘काय विशेष बुवा’ म्हणून माझ्या भुवया उंचावल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अगं, आषाढ तळला. शिवाय या वेळी गावाबाहेरच्या देवीला प्रसाद घेऊन गेले.’
माझ्या उत्सुक चेह-याचीच त्यांनी अपेक्षा केली असावी. म्हणाल्या, ‘आमच्यात नाही नेत देवीला प्रसाद. पण शेजारीण बाई नेमस्त आहेत. त्या दरवर्षी घेऊन जातातच. मग म्हटलं आपणही न्यावं. शेवटी आपल्या सगळ्यांची देवी आहेच. परंपरा आपण पाळतोच. एखादी दुस-यांची परंपरा पाळली तर काय बिघडतं?’
माझ्या घशात घास अडकून ठसका आला.
‘माझ्याच्यानं आपल्या घरच्याच परंपरा नीट पाळल्या जात नाहीत. मी काय बोलू?’
‘असं कसं?’ या त्यांच्या प्रश्नावर मी म्हणाले,
‘आमच्या घरी परंपरेबद्दल अनेक मतं आहेत. त्यामुळे घरात चांगल्या पण निरोगी चर्चा रंगतात. मग शेवट होतो तो विज्ञान आणि कार्यकारणभाव या कसोटीवर. उदाहरणार्थ, वटसावित्रीला वडाला दोरा गुंडाळायला जायचं नाही असं ठरवलं तर घरात कुंडीत फांदी रोवून पूजा करणा-या श्रद्धाळू बायका आहेत. तर तेही करायचं नाही.’
‘मग करायचं तरी काय?’ त्यांनी विचारलं. पण त्यांच्या स्वरातली नाराजी मी जाणली. वेळेअभावी नंतर बोलू असं मी म्हणाले खरी, पण माझ्या डोक्यात परंपरा शब्द घोटाळत राहिला.
परंपरा आणि पारंपरिक विधी या दोन वेगळ्या न होणा-या संकल्पना आहेत. निदान आपल्याकडे परंपरा म्हणजे त्याला जोडले गेलेले विधी हे एक मानले जाऊन त्यावर चर्चा-उपचर्चा झाल्यात आणि चालू आहेत. त्याचं शास्त्रीय महत्त्व शोधून काढणं आणि सांगणंही चालू आहे. एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण नव्या विज्ञानाचा आधार घेतो. उदाहरणार्थ गणपतीनं सोंडेने दूध प्यायलं तेव्हा विज्ञानाधिष्ठित बुद्धवाद्यांनी ताबडतोब संशोधनाला प्रारंभ करून ते खोटं ठरवलं. म्हणजे गणपतीत असलेलं जीवतत्त्व नाकारलं. तर कधी नव्या गोष्टींना आपण जुन्या विचारांचा आधार देतो. उदा. वृक्षांची पूजा, प्राण्यांची पूजा हे पर्यावरणशास्त्राला कसं अनुकूल आहे हे अनुमोदनार्थ वापरलं.
पण हे इथपर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. परवा बातमी आली की शांतिनिकेतन संस्थेच्या अखत्यारीत चालणा-या शाळेच्या होस्टेलमधल्या दहा वर्षांच्या मुलीला अंथरूण ओले केल्याबद्दल लघवीने खराब झालेली चादर चाटण्याची शिक्षा दिली तिथल्या वॉर्डनने. माध्यमांनी बातमी ठळकपणे दिली. एका लहान मुलीला या पद्धतीची शिक्षा क्लेशकारक होती. तेही इतरांसमोर केल्यानं त्या मुलीच्या मनावर मोठा आघात करणारी आणि घृणास्पद होती.
या बातमीचा बोलबाला झाल्यानं संस्था खडबडून जागी झाली. वॉर्डनला पोलिस कोठडी मिळाली. तिच्यावर केस दाखल झाली. त्याबरोबरच त्या विद्यापीठातून एक उत्तरही उडत उडत बाहेर आलं की या पद्धतीनं स्वमूत्र प्राशन करणं हा परंपरागत रोगावरचा इलाज आहे. शिवांबू पद्धतीतही हे मान्य आहे. आपले भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई हे स्वमूत्र प्राशन करीत होते ही गोष्ट सर्वप्रसिद्ध आहे. आता स्वामी अग्निवेश यांनीही या उपचार पद्धतीला अनुमोदन दिलं आहे.
मुद्दा लघवीत शरीराला आवश्यक कोणती रसायनं आहेत, ती प्राशन केल्यानं शरीरात कोणत्या प्रक्रिया होतात आणि त्याची उपयुक्तता काय हा नाहीये. जे लोक ते स्वच्छेने घेतात त्यांचाही नाहीये. मुद्दा आहे तो वरिष्ठ अधिका-यांनी जोर-जबरदस्तीनं ते करायला लावण्याचा. तुम्हाला मूत्रप्राशनाची आज्ञा देण्याचा आहे. इथे इच्छेचा प्रश्नच नाही. त्यातून तिचा पाणउतारा करण्याचा, तिला शिक्षा देण्याचा आहे. पुढे तर तिच्या आईची या उपचार पद्धतीला मान्यता आहे असेही सांगितले गेले. अर्थात तिने नाकारले. मुद्दा असा आहे की अशा परंपरांबद्दलची भूमिका कशी असावी? अंधश्रद्धा किंवा मुलांची मानखंडना होऊन त्यांच्या मनावर आयुष्यभर वाईट परिणाम होईल अशा परंपरांची कारणमीमांसा योग्य आहे का?
परंपरा आणि अंधश्रद्धा या हातात हात घालून चालणा-या गोष्टी आहेत. झारखंडमधील पुरो नावाच्या खेड्यात एका ज्येष्ठ नवराबायकोला स्वविष्ठा खायला लावली आणि स्वमूत्र प्राशन करायला भाग पाडलं ही घटनाही आताचीच आहे. ही शिक्षा ग्रामपंचायतीच्या लोकांनी दिली. कारण काय? तर गावातल्या गाई, म्हशी आणि मेंढ्या अचानक मरायला लागल्या. त्यांच्या मरण्यामागे या जोडप्याच्या मंत्रतंत्राचा भाग आहे. ही पंचायतमधल्या लोकांची खात्री होती. त्यांनी न्याय देऊन शिक्षा ठरवली. हे परंपरेत बसणारंच होतं. खरं तर युद्ध विज्ञान आणि अंधश्रद्धांचं आहे. हा संघर्ष शिक्षित किंवा अशिक्षितांचा नाही किंवा खेडूत आणि नागरी माणसातलाही नाही. उत्तर प्रदेशातल्या बागपत जिल्ह्यातल्या असारा गावच्या ज्येष्ठांनी आणि पंचायतीने घेतलेला स्त्रियांबाबतचा निर्णयही असाच आहे. चाळिशीच्या खालच्या वयाच्या स्त्रियांनी सोबतीशिवाय बाहेर पडायचं नाही. त्यांनी मोबाइल वापरायचा नाही. हे करण्यामागे त्यांचं मत असं आहे की ते स्त्रियांचं संरक्षण करू इच्छितात. पण कुणाबाबतचा निर्णय कोणी घ्यायचा? स्त्री ही वस्तू आहे हा विचार जरा इथे दिसतोच. तिच्या संरक्षणाची जबाबदारी तिनं इतरांवर सोपवली तर गोष्ट वेगळी. पण तिला मतच नाही किंवा तिचं मत विचारात घेण्याची गरजच नाही ही वृत्ती आहे. तिचा चेहरा पदराने झाकून तिचे संरक्षण केले जातेय की त्यानेच तिचे तोंड आवळून तिची बोलती बंद केली जातेय? आपल्या परंपरांच्या नावाखालची ही अधिकारवृत्ती आहे.
या परंपरांमुळे आरोग्यही धोक्यात येते याची जाणीव आपल्या आरोग्य संस्था वेळोवेळी देत आल्यात. नवजात बालकाला आईचे पहिले येणारे दूध न देण्याची पद्धत आहे. ते दूध पिळून फेकून दिले जाते. तसे करू नये म्हणून आपल्यासारख्या विकसित देशाला आजही जाहिराती द्याव्या लागतात. जखमांवर माती लावणे, डोळ्यात काजळ घालणे, कानात तेल टाकणे, नाकात बारीक पावडर टाकणे अशा कितीतरी पारंपरिक प्रथा आहेत. कदाचित त्या आजही खेड्यापाड्यात चालू आहेत. या पारंपरिक म्हटलेल्या कितीतरी रूढी, विधी किंवा जीवनपद्धतींवर अधिकार कोणाचा आहे? या कोणासाठी आहेत? या कोण राबवणार? राबवताना मोठा हात आणि मोठा सहभाग कोणाचा असणार? कित्येक पारंपरिक गोष्टी वाईट नाहीत तर त्या जीवन जगण्याचा भाग आहेत. त्यातही सुसह्य आणि जमलं तर सुखमय जगण्यासाठी तयार झाल्यात. पण त्यांचा उपयोग सोयिस्कर असा झाला तर त्या आपल्याच मानगुटीवर बसतात. पुरुषांइतकाच सहभाग असलेल्या स्त्रियांवरच परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आहे. कारण परंपरा संस्कृतीचाच एक भाग आहेत. ती संस्कृती संबंधित आणि संरक्षित राहण्यासाठी तिला असलेल्या बुद्धीचा वापर करण्याचे स्वातंत्र्य तर तिला मिळायला नको का?