आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृतीची घुसखोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलद-यापासून काही अंतरावरच असलेल्या मेळघाटातील एका आदिवासी पाड्यावर लगीनघाई सुरू होती. नागर संस्कृतीचे वारे आता या पाड्यांपर्यंत पोहोचले आहे, हे त्यांच्या पेहरावावरून तर दिसत होतेच; तरीही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेली एक वेगळी आदिवासी लग्न संस्कृती मात्र अबाधित राहिली असेल, हा माझा समज... आदिवासींची लग्नं मी यापूर्वीही पाहिली होती. आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. आदिवासींच्या एकूणच सगळ्या परंपरा या खूप आशयगर्भ असतात. सामूहिक आविष्कार असल्याने त्या देखण्या आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व टप्प्यांवर त्यांचा उत्सव सुरू असतो. आदिवासींची ‘गोंटुल’ संस्कृती अनेकांना आठवत असेल. आता ती नामशेष होत चालली आहे. तरुण मुले आणि मुली एकत्र येऊन आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडायचे... तर अशाच तीव्र भावना घेऊन मी या लग्नाला हजर होतो आणि मला क्षणोक्षणी आश्चर्याचे सांस्कृतिक धक्के बसत गेले. सर्वात पहिला धक्का बसला तो तिथे उपस्थित असलेला भटजी बघून. मंगलाष्टके म्हणत हा भटजी आदिवासी जोडप्यांचे लग्न लावत होता, हे दृश्य मला वारंवार खटकत होते. दुसरा धक्का होता आदिवासी तरुणींच्या उखाणे घेण्याचा, लाजण्या-मुरडण्याचा. मला का कुणास ठाऊक, ‘हिरव्या पानांत हिरव्या रानांत सावळं सावरं चालती, भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती...’ या गाण्याच्या ओळी आठवल्या. सारंच आश्चर्यकारक असल्याने उत्सुकतेपोटी मी तिथे एका कोप-यात बसलेल्या म्हाता-याला याचे कारण विचारले, तेव्हा त्याचे बोट आदिवासी पाड्यांच्या छतावर उगवलेल्या डिश टीव्हीच्या दिशेने गेले.


या टीव्हीने आमच्या संस्कृतीची पार वाट लावली आहे... आणि आता हे असंच सुरू राहणार!
म्हाता-याचे ‘आता हे असंच सुरू राहणार...’ हे वाक्य मनात घोळवत घोळवत मी पाड्यांवरून निघालो, तेव्हा मला उगीचच दुपारच्या जेवणाच्या वेळी आणि दिवेलागणीच्या वेळी आदिवासी चिमुरडी मुलं एका रांगेत उभी राहून एका सुरात ‘वदनी कवळ घेता’ किंवा ‘शुभं करोति कल्याणं’ म्हणत आहेत, असे चित्र दिसू लागले.


अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात आदिवासी तरुणींनाही आता डोहाळजेवण, उखाणे घेणे यांची भुरळ पडत चालल्याचे दिसून आले होते. लक्ष्मीहार, राणीहार, लग्नामध्ये वा रोजच्या स्वयंपाकात गोडसर पदार्थ म्हणून तांदळाची खीर वा रव्याचा शिरा करण्याची पद्धत आदिवासींमध्येही रूढ झाल्याचे, या सर्वेक्षणात म्हटले होते.
साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्यात इतर साडेशहाण्णव टक्के कसे आघाडीवर असतात, हे तर प्रत्येक ठिकाणी दिसत आहेच; परंतु जो समाज मुख्य प्रवाहात नाही, किंबहुना मुख्य प्रवाहात येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात, त्या आदिवासी आणि भटक्या समाजातही, ही साडेतीन टक्क्यांची संस्कृती कशी खोलवर रुजत चालली आहे, याचीच ही काही धक्कादायक उदाहरणे.


याचे कारण शोधण्यासाठी फार खोलात जाऊन वगैरे संशोधन करण्याची गरजच भासत नाही. पाड्या-पाड्यांवर दिसत असलेले डिश टीव्ही आणि या डिश टीव्हीच्या माध्यमातून दिसणा-या तू तिथं मी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, उंच माझा झोका, कुंकू, मला सासू हवी, लज्जा, वादळवाट, अग्निहोत्र यांसारख्या प्रामुख्याने साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणा-या (खरे तर उदात्तीकरण) मालिकांमुळेच ही संस्कृती इतकी खोलवर झिरपलेली दिसते.
साडेतीन टक्क्यांची संस्कृती चांगली की वाईट, हा मुद्दा नसून मुद्दा असा आहे, की इतर साडेशहाण्णव टक्क्यांपासून ते आदिवासी-भटक्या समाजापर्यंत सगळ्यांनीच आपली मूळ संस्कृती अडगळीत ठेवून या साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीचे अनुकरण केले आहे. हे अनुकरण इतक्या खालपर्यंत पोहोचले आहे की बोलीभाषेचे महत्त्व कमी होऊन अनेक मुली आता गिरिजा ओक, मृण्मयी देशपांडे, मृणाल दुसानीस, नेहा पेंडसे, नेहा जोशी या मराठी मालिकेतल्या नट्या जशा मराठी बोलतात तशा बोलायला लागल्या आहेत. घरामध्ये छोटेसे का होईना तुळशी वृंदावन असणे, हळदीकुंकू-मंगळागौरीचे महत्त्व वाढणे, गुढी उभारणे, इथपासून ते नाष्ट्यामध्ये कैरीभात, उपमा, पोहे, शिरा यांच्या पलीकडे न जाणे, कपाळावर चंद्रकोर लावण्यापर्यंत साडेतीन टक्क्यांची मालिकेमधील संस्कृती अगदी घराघरापर्यंत पोहोचली आहे. ‘उंच माझा झोका’मधली चिमुरडी रमा कधी नव-याचे पाय आपल्या हाताने धुऊन पदराने पुसते, तर कधी त्याच्या उष्ट्या ताटातून घास खाते. आणि कारण सांगते, माझी आई म्हणते याने नवरा-बायकोमधील प्रेम वाढते... अशा आचरट रूढींना या इतर साडेशहाण्णव टक्क्यांनीही इतके डोक्यावर घेतले, की टीआरपीमध्ये ही मालिका नंबर वनला जाऊन पोहोचली.


जरा कुतूहल म्हणून मराठी मालिकांवर बारकाईने एक नजर टाकली तर असे लक्षात येते, की सबंध छोटा पडदाच साडेतीन टक्क्यांनी व्यापला आहे. या मालिकेमध्ये काम करणारे कलावंत, त्यांच्या कॅरेक्टर्सची आडनावे, कथानकात दाखवण्यात येणारी कुटुंबे आणि त्यांची संस्कृती, कलाकारांची वेशभूषा-केशभूषा इथपासून ते प्रॉडक्शन हाऊस आणि दिग्दर्शकदेखील साडेतीन टक्क्यांचे प्रतिनिधित्व करणारे अतिशय पद्धतशीरपणे या सगळ्यांनी मालिकेच्या विश्वात आपला एक कंपू तयार केला आहे आणि इतर कुणीही त्यात सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही, याची काळजीही हा कंपू बरोबर घेत असतो. माध्यमांच्या या जमान्यात कलेला महत्त्व आले आहे. पण या कला सादर करणारा पारंपरिक कलावंत बाहेर फेकला गेलाय आणि ज्यांनी शूद्र म्हणून हिणवलं ते उच्चवर्णीय केंद्रस्थानी आले आहेत. जेव्हा शिक्षणाचे महत्त्व होते तेव्हाही तेच आणि आता कलेला महत्त्व आहे तर तिथेही त्यांचीच मक्तेदारी.


पण हे असं का होताना दिसतंय...
पुरोगामी महाराष्ट्रात कायमच विविध प्रकारच्या चळवळींचा जोर असतो. समाज अधिक प्रगल्भ होण्यासाठी चळवळींची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध झाली आहे. जातीपातीच्या चौकटी थोड्याफार सैल झाल्याने बहुजन वर्गाने मोकळ्या वातावरणात जगायला सुरुवात केली आहे. प्रगतीमुळे त्यांचा जीवनस्तर उंचावला आहे. ब्राह्मणांच्या बरोबरीने एक समांतर अभिजनवर्ग तयार होऊन तो सगळ्या क्षेत्रांत त्यांच्याशी स्पर्धा आणि बरोबरी करू लागला आहे. हा अभिजनवर्ग सगळ्या जाती-जमातींमधून निर्माण झाला, ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा अभिजनवर्ग आज आर्थिक प्रगतीतून निर्माण झालेल्या जीवनशैलीत रममाण झाला आहे. याला ब्राह्मण, मराठा, दलित या कोणत्याही वर्गजातीतील अभिजन अपवाद नाहीत. खालच्या वर्गजातीतील समाज उच्च नीतिमूल्ये स्वीकारतो व उन्नत होत जातो. हा आदर्श घेऊन बहुजनांनीही ज्ञानाची क्षेत्रे धुंडाळीत त्यांचे अनुकरण केले. पुढे भौतिक क्षेत्रात बरीच प्रगती झाली, जीवनशैली बदलली. बहुजनांच्या हाती सत्तेची सूत्रेदेखील आली. हे सगळं होत असताना बहुजनांची मूळ संस्कृती मात्र कुठेतरी हरवत चालली. ब्राह्मणी वर्चस्वाचे अप्रूप हे त्यामागचे कारण होते. मूळ संस्कृतीची प्रक्रिया थांबल्यानेच ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला आणि याला अभिजनच बळी पडत गेले. एका अर्थाने अभिजन झालेल्या बहुजनांचेही ब्राह्मणीकरण होऊ लागले. समाजापुढे काही आदर्श ठेवावेत, यापेक्षा त्यांनाही ब्राह्मणी वर्चस्वाचे अप्रूप वाटू लागले. ब्राह्मणी वर्चस्वात काही गैर नाही, असे वाटू लागले. सुस्थितीतील बहुजनांना ब्राह्मणी धर्म, त्यातली प्रतीके, संस्कृती, कर्मकांडे ही प्रतिष्ठा मिळवण्याची साधने वाटू लागली. ज्या गोष्टी सामाजिक चळवळींनी मोडून काढल्या होत्या, त्या पुन्हा उभ्या राहिल्या. आज मालिकांमार्फत घराघरात घुसलेली साडेतीन टक्क्यांची संस्कृती हे याचेच द्योतक आहे. आपण कशाचे अनुकरण करतो याचे त्यांचे भान सुटत गेले आणि अनुकरण हे एक ‘स्टेटस सिम्बॉल’ बनायला लागले.


याचे आणखी एक कारण म्हणजे साडेतीन टक्क्यांचे साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारताना उरलेल्या इतर साडेशहाण्णव टक्क्यांचे साहित्य, संस्कृती, परंपरा या संदर्भात भूमिका कोणती, यावर गांभीर्याने चर्चा होत नाही. ती लिखित स्वरूपात मांडली जात नाही. सदाशिवपेठी समीक्षा, सौंदर्यशास्त्र आकृतिबंध नाकारायचे असतील तर विद्रोही विचारांची समीक्षा, सौंदर्यशास्त्र आकृतिबंध यावर विचार आणि कृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याच संदर्भात एक उदाहरण द्यायचे झाले तर सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेचे देता येईल.
समीना दलवाई यांनी ‘उंच माझा झोका’ मालिकेच्या निमित्ताने मध्यंतरी एका दैनिकात विद्रोही विचारांची समीक्षा केली होती. आपल्या लेखात त्यांनी म्हटले होते की, ऐतिहासिकदृष्ट्या महात्मा फुले यांचा कार्यकाल हा रानडेंच्या आधीचा. वडलांच्या रोषाला घाबरून रानडेंनी वयाच्या 32व्या वर्षी दहा वर्षांच्या रमाशी विवाह करण्यापूर्वी फुले आपल्या वडलांच्या रोषाला सामोरे गेले होते. वडलांनी घराबाहेर काढले, तेव्हा ते आपल्या पत्नीसह एका मुसलमान मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. आपल्या तारुण्यातच आपल्या जीवनमूल्यांना मूर्त स्वरूप देताना त्यांनी जातीच्याच नव्हे, तर धर्माच्याही भिंती तोडल्या होत्या. रानडेंनी हे केले नाही. विधवेशी विवाह करता आला नाही हे मानले, तर परत विवाहच करणार नाही, असे त्यांना म्हणता आले असते. परंतु इतका निर्धार त्यांनी दाखवला नाही आणि मोठ्या वयाच्या पुरुषांनी लहान मुलीशी लग्न करण्याच्या भयंकर प्रथेत ते सामील झाले. फुलेंच्या समाजसुधारणेसमोर मग पुण्यातील ब्राह्मण सुधारक मंडळी फारच थिटी पडली. विधवा विवाह या विषयावर जो काथ्याकूट झाला तो विधवा विवाह फक्त बालविधवांसाठी मर्यादित होता. योनिशुचितेच्या संकल्पनेला धक्का लागेल या कारणास्तव नव-याशी लैंगिक संबंध आलेल्या विधवेचा पुनर्विवाह सुधारकांनाही मंजूर नसावा. याउलट बहुजन समाजात विधवा विवाह पाट लावणे, चादर टाकणे या स्वरूपात प्रचलित होता. नव-याला खुश करण्यासाठी रमाबाई लिहायला-वाचायला शिकल्या. इंग्रजीत भाषणेही करू लागल्या. पण नेहमीच आपल्याहून वयाने, मानाने, कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या पतीची ‘सावली’ बनून राहिल्या. सहजीवनाचा हा त्यांचा आदर्श युरोपातील ‘बूर्झ्वा वाइफ’सारखा होता. रमाबाई रानडेंच्या समकालीन पंडिता रमाबाई आणि लक्ष्मीबाई टिळक या तेजस्वी विदुषी असामान्य स्वयंभू जीवन जगल्या. मात्र ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे ब्राह्मण सुधारकांचा कायम त्यांच्यावर रोष राहिला व त्यांच्या कार्याची, विचार-आचारांची अवहेलना केली... ‘उंच माझा झोका’मालिकेमधून 19व्या शतकातील ब्राह्मणी परंपरांना गोड गोड स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या समीना दलवार्इंच्या परखड मतांवर स्वाभाविकच टीका झाली. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन ऊठसूट साडेतीन टक्क्यांना शिव्या घालण्याची सध्या फॅशनच सुरू आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. परंतु इथे महत्त्वाचे हे होते की, इतर साडेशहाण्णव टक्क्यांनी साहित्य, संस्कृती, परंपरा या संदर्भात ठोस भूमिका घेतली होती.


दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर ‘सारेगमप’ या संगीतविषयक स्पर्धेचे देता येईल. साडेतीन टक्क्यांचे वर्चस्व असलेल्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जेव्हा कोसंबी आणि गायकवाड ही नावे विजेते म्हणून झळकू लागली, तेव्हा कितीतरी मोठा गहजब उडाला होता. इथेही मला हेच म्हणायचे आहे की, ‘विद्वत्ता ही आम्ही जन्मजातच घेऊन येतो’ या साडेतीन टक्क्यांच्या गृहीतकाला इतर साडेशहाण्णव टक्क्यांनी छेद दिला होता.


एकूणच, पुढारलेल्या वर्गानेच ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघर्षाला सुरुवात केली पाहिजे. कर्मकांडे, अन्यायी रूढी, नव्याने निर्माण केलेल्या प्रथा मोडून काढल्या पाहिजेत. यासाठी व्यापक प्रबोधनाची चळवळ राबवणे, हाच मार्ग आहे. तरच भौतिक प्रगतीकडे निघालेल्या समाजातली विकृती नष्ट होऊन, विवेक आणि नैतिकतेच्या आधाराने सुसंस्कृतीचे रोपण होईल. यात अभिजनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मग ते अभिजन ब्राह्मण असोत वा ब्राह्मणेतर, पुढारलेला वर्ग या नात्याने त्यांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.


shivaprash@gmail.com