आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dahale Priyanka Article About Celebrities General Knowledge

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटींचे सामान्य ज्ञान !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडील तरुण पिढीच्या सामान्यज्ञानाबाबत नेहमीच ओरड होत असते. तशी प्रत्येक पिढी कधी ना कधी तरुण असते आणि तरुण वयात कुठे तरी कमी पडत असते. अलीकडे मात्र माध्यमे याचा जरा अधिकच गवगवा करीत असतात. त्यात सेलिब्रिटी जर आपले असे (अ)ज्ञान दाखवायला लागलेत तर हा गाजावाजा नव्हे, बोभाटाच होतो आणि खिल्ली उडवणाऱ्या विनोदांना जन्म घालतो. हा प्रकार वाट्याला आलेल्या अलिया भट्टने नुकताच एक व्हिडिओ प्रत्युत्तर म्हणून अपलोड केला...त्यानिमित्ताने.....

लीकडेच अलिया भट्टने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ शैलीमध्ये यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला. कॉफी विथ करण जोहर या टीव्हीवरील शाेमध्ये करण जाेहरने तिला विचारलेल्या प्रश्नांवर तिने जे सामान्य ज्ञानाबाबत अज्ञान दाखवले होते, त्यावर गेले कित्येक दिवस अलिया भट्ट जाेक्सची मालिकाच ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांवर सुरू होती.
मात्र, यावर दुखावून थेट रिअॅक्ट हाेण्याची आणखी एक चूक न करता अलियाने यूट्यूबवर आपण आता राजकीय-सामाजिकदृष्ट्या भान ठेवायचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती कोण या प्राथमिक बाबी लक्षात राहतील, अशा अर्थाचा व्हिडिओ टाकून या जोक्सना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
सामान्य ज्ञान, सामाजिक-राजकीय बदलांविषयीची जागरूकता नसणारी अलिया खरे तर एकटी अभिनेत्री नाही. तिच्याच बराेबरीने वा थोडे मागे-पुढे काही अभिनेते आणि अभिनेत्रींनीही आपले नसलेले ज्ञान रिअॅलिटी शाेजमध्ये पाजळलेले आहे. पण विनोदाची मोठ्या प्रमाणात शिकार झाली ती केवळ अलिया. अलियाचे वडील महेश भट्ट हे आतापर्यंत अनेक सामाजिक-राजकीय घटनांवर विविध कार्यक्रमांमध्ये जाहीरपणे भाष्य करीत आले आहेत. त्यांच्या चित्रपटांबरोबर त्यांच्या सामाजिकदृष्ट्या सजग असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचीही चर्चा होत आली आहे. त्यामुळे साहजिकच अलियाकडून या वारशाची अपेक्षा प्रेक्षकांनी, तिच्या चाहत्यांनी करणे आलेच. पण आजच्या पिढीकडून सामान्य ज्ञानाची अपेक्षा करणे एक वेळ ठीक; पण त्यावर ते नाही म्हणून एका मर्यादेच्याही पलीकडे जाऊन खिल्ली उडविली जाणे हा माध्यमांच्या सर्रास वापराचा परिणाम आहे. माध्यमजगत आज एका क्लिकवर सगळ्यांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे रजनीकांतवरील विनोद असोत वा अलियावरील; प्रत्येकाकडे मोबाइलवर या दोहोंचा एक तरी विनोद आढळतोच आढळतो. शिवाय आपण ज्यांचे चाहते आहोत ते सर्वज्ञच असायला हवेत, हा अट्टहास धरणारा एक बहुतांश वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे. एखाद्या कलाकाराला एखाद्या क्षेत्रातले विशेष ज्ञान असते, त्याकडे अशा वेळी हेतुत: दुर्लक्ष केले जाते. बरे असे विनोद करणारेदेखील किती सजग असतात, हादेखील एक प्रश्नच आहे.
अलीकडे बॉलिवूडमध्ये आलेल्या तरुण पिढीकडे अभिनयाची, दिसण्याची गुणवत्ता निश्चितच आहे; पण आपल्याच विश्वात गुंतून राहणाऱ्या या पिढीला अवतीभवती, देशात काय महत्त्वाचे बदल घडताहेत, याबाबत अभावानेच माहिती आढळते. चित्रपट, जाहिराती, चित्रपटांचे प्रमाेशन, पार्टी याखेरीज या कलाकारांना भवतालच्या जगाशी काहीएक देणेघेणे नसते, असेही या पिढीचे चित्र दिसते. हे चित्र समोर आणायला कॉफी विथ करण जोहर या शाेने एक प्रकारे मदतच केली म्हणा. कारण याच शोमध्ये अलियासोबत आणखी काही कलाकार आपले (अ)ज्ञान दाखवून बसले आहेत.
उदाहरणेच द्यायची झालीत तर अलियाने ज्या शाेमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे भारताचे पंतप्रधान आहेत, असे सांगितले होते त्याच शाेमध्ये वरुण धवन याने तिची चूक सुधारता सुधारता भारताचे राष्ट्रपती मनमाेहन सिंग आहेत, असे सांगितले! वरुण आणि अलिया यांनी आतापर्यंत स्टुडंट ऑफ द इयर, हम्प्टी शर्मा की दुल्हनियां या दोन्ही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दाेघेही एकाच वयाचे आहेत. त्यामुळे वरुणचेही अज्ञान हे अलियाइतकेच म्हटले तर विनोदास पात्र आहे, म्हटले तर अाश्चर्य वाटण्यासारखे आहे. थोडे मागे व या दाेघांपेक्षा थोडे सीनिअर्सकडे वळायचे झाले तर ‘कॉफी विथ करण’मध्येच अनुष्का शर्मादेखील एका एपिसाेडमध्ये सहभागी झाली होती. तिलादेखील रॅपिड फायरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. अनुष्काने ‘अशोक चव्हाण’ असे उत्तर दिले होते. त्या वेळी आणि आताही पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्री आहेत, हे सुज्ञास सांगणे न लगे. अभिनेत्री सोनम कपूर जिचे वडील अनिल कपूर यांनी गांधीजींवर, त्यांच्या मुलावर (हरिलाल) चित्रपट काढला; तिलाही याच शोमध्ये करणने प्रश्न विचारला, ‘an eye for eye makes the whole world blind. हे विधान कुणा प्रसिद्ध व्यक्तीने केले आहे?’ साेनमने यावर ‘राॅबर्ट दि नेराे’ असे उत्तर दिले. अचूक उत्तर होते, महात्मा गांधी. या वाक्याचा वापर अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपटातही केला होता.
ही उदाहरणे द्यायचा हेतू हा की, सामान्य ज्ञानाचा असलेला अभाव हा एकट्या अलियाचा गुण नाही वा केवळ तिच्यात ही उणीव नाही. अलिया ही अात्मकेंद्री स्वभावाच्या पिढीचीच एक प्रतिनिधी आहे. कलाकारांचेच कशाला घ्या, चांगले शिकणाऱ्या, दिल्लीतील २०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील ९९ टक्के तरी विद्यार्थ्यांना भारताबद्दल प्राथमिक माहिती नव्हती. फिफामध्ये भारत सहभागी होता, आहे, की नाही, हेसुद्धा त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे केवळ अलियाकडून तिला सगळे काही ठाऊक असायला हवे, अशी अपेक्षा ठेवून तिच्यावर विनोद करीत त्याचा भडिमार करणे, ही बाबच मुळात विसंगत आहे, असेही मानणारा पण विनोद करणाऱ्यांच्या तुलनेने कमी संख्येने असणारा एक वर्ग आहे.
एक खरे आहे की, सेलिब्रिटींचा फार मोठा प्रभाव जनसामान्यांवर पडत असतो. विशेषत: तरुण वर्ग त्यांचे अनुकरणच करीत असतो. परस्परसंबंधाने दाेघांचे विश्व बदल चाेखाळत असते. त्यामुळे सेलिब्रिटींचे पडद्यावरचे सजग असणे पडद्यामागेही तसेच असावे, असे अपेक्षित धरणे साहजिकच आहे. किंबहुना केवळ उबग आला म्हणून नव्हे तर सजगतेचा एक प्रयत्न म्हणून अलियाने युट्यूबवर नवा व्हिडिओ अपलोड केला असावा. तिच्या त्यातील हावभावांवरून, उत्तरे देण्याच्या पद्धतीवरून तसे लक्षात येतेही. अलियाशी स्पर्धा असणाऱ्या परिणीती चाेप्रासारख्या अभिनेत्रींनीही या व्हिडिओमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
काहीही असाे, ‘हायवे’ चित्रपटातील भूमिकेची प्रशंसा झालेली अलिया या विनोदांपासून धडा घेऊन पुढे सामान्य ज्ञानाच्या बाबतीत सुधारेलही, पण तिच्या वयाची या क्षेत्रात आलेली पूर्ण पिढीच अपवाद वगळता अलियासारखीच आहे. त्यामुळे केवळ विनोद करायला, खिल्ली उडवायला याच पिढीतल्या सामान्य तरुण वर्गाला एखादा बकरा हवा असतो आणि मग ‘अ(ा)लिया भोगासी असावे सादर’ अशी त्या विनोदाची शिकार झालेल्या कलाकाराची व ते विनोद सहन करणाऱ्यांची स्थिती होते.

त्यामुळे सामाजिक-राजकीय भानाबाबत असलेली उदासीनता ही सर्वत्र, आजूबाजूला आढळत असतानाही केवळ एखादा त्यातला स्टारडम लाभलेला असतो म्हणून शिकार होणे, हे ओघाने आलेच. अलियावरील विनोद हा यातलाच एक प्रकार होता. अलिया शहाणी झाली तर माध्यमजगतातील प्राणी दुसरी अलिया शोधतील, हे आणिक वेगळे सांगायला नको.

dahalepriyanka28@gmail.com