आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डक्कलवारांचे किंगरीवादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी डक्कलवारांचे किंगरी हे वाद्य बनवण्याचे कसब आणि ते वाजवून जातीपुराणकथा सांगण्याची पारंपरिक कलाही नामशेष होत चालली आहे. सध्या मराठवाड्यातील गेवराई, खुलताबाद, तुळजापूर या भागात या कलावंतांचे वास्तव्य आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील रामनगर भागात डक्कलवारांचे एक कुटुंब राहते. अमृता लिंबाजी कांबळे आणि किसन अमृता कांबळे या दोघा बापलेकांनी मात्र या कलेला अजून जिवंत ठेवलेय. मातंग समाजाचे मागते म्हणूनच ते महाराष्ट्रात परिचित आहेत. त्यांचे किंगरी वाद्य वादन आणि कथाकथन, गायन कलेचा परिचय करून करून देण्याचा हा प्रयत्न. डक्कलवार केवळ मातंगांसमोरच किंगरी वाद्याच्या साहाय्याने बसवपुराण सांगतात. हे पुराण सांगण्याच्या वेळेस डक्कलवारांचा विशिष्ट पोशाख असतो. धोतर, सदरा, कोट अन् डोक्याला फेटा असा हा पारंपरिक पोशाख असतो. कथा पुराण सांगताना कधी गद्याचा, तर कधी पद्याचा वापर केला जातो. त्याला पौराणिक कथांचा आधार असतो. विशिष्ट पद्धत, शब्दोच्चारातील चढ-उतार, चेहर्‍यावरील हावभाव व देहबोलीचाही ते लीलया वापर करतात. किंगरी वाजवताना होणार्‍या तंतुवाद्याचा व घुंगराचा आवाज तसेच किंगरीवरील मोराच्या हालचाली पाहण्यासारख्या असतात.
पुराणकथा सांगताना डक्कलवाराचा एक साथीदार मातंगाचे बाड उकलत असतो. बाडावरील चित्रे एका छडीने दाखवत असतो. त्याचे गद्य अथवा पद्य कथन आणि बाडावरील चित्रावरून छडी फिरवण्याचा योग्य मेळ साधला जातो आणि हे कथाकथन सजीव करायचा ते प्रयत्न करतात. हे बाड म्हणजे अडीच-तीन फूट रुंद व 15 ते 20 फूट लांब अशा पासोडीवर एकावर एक अशा दोन रंगीत चित्र मालिका असून त्या एका बांबूच्या काठीला गुंडाळलेल्या असतात. त्याच्या दुसर्‍या टोकालाही एक काठी बांधलेली असते. लाकडी रुळावर गुंडाळलेला नकाशा उलगडावा तसे ते बाड उलगडले जाते. या क्रियेला बाड उकलणे असे म्हणतात. हे बाड उकलून पुराणकथा सांगणे, हा एक पवित्र धर्मविधी मानला जातो. सर्व जातींच्या उत्पत्तीचे रहस्य या बाडात असते, असे ते मानतात. हे बाड ठेवण्यासाठी खास शिंदीच्या पानापासून तयार केलेली एक लांबट पिशवी असते. यातून बाड उघडण्यापूर्वी हळदी-कुंकू वाहून व नारळ फोडून त्याची पूजा केली जाते.
डक्कलवार ज्या वाद्याच्या साहाय्याने पुराणकथा सांगतात, त्या तंतुवाद्याला किंगरी किंवा मोर असे म्हटले जाते. तीन वेगवेगळ्या आकाराचे भोपळे एका बांबूच्या काठीवर विशिष्ट अंतरावर बांधून त्या काठीवर दोन किंवा तीन बारीक तारा पिळणीच्या साहाय्याने ताणून बांधलेल्या असतात. काठीच्या एका टोकाला लावलेल्या खुंटीमुळे या तारांचा ताण कमी-अधिक करता येतो. काठीच्या दुसर्‍या टोकाला एका भोपळ्यावर एक काडी असते. या काडीवर एक लाकडी मोर बसवलेला असतो. त्याच्या अंगावर मोरपिसे व पायाला घुंगरे बांधलेली असतात. किंगरी वाजवताना मोराची हलचाल झाली की ही घुंगरे भोपळ्यावर आपटून त्याचा मंजूळ आवाज येतो.
ज्या काठीवर मोर लावलेला असतो तिला एक दोरी बांधून ती भोपळ्याच्या आतून ओवून वाद्याच्या दुसर्‍या टोकाला नेलेल्या दोरीचे हे टोक किंगरी वाजवणारा कलाकार आपल्या हाताच्या बोटाला बांधतो. हे बोट हलवले की दोरी ओढली जाते व मोराची हालचाल होते. त्यामुळे घुंगरू भोपळ्यावर आदळून त्याचा आवाज येतो. त्याच वेळी दुसर्‍या हाताच्या बोटाने या किंगरीच्या तारा छेडल्या जातात, त्यातूनही तुणतुण्यासारखा आवाज निघतो. कथा पुराण सांगण्यापूर्वी डक्कलवार किंगरीवरील मोराशी संवाद साधतो. डक्कलवाराची वाजती किंगरी मातंगापाशी नाचतो मोर, असा काहीसा संवाद असतो. तीन भोपळ्यांतून निघणारे तीन आवाज, एका हाताने मोर नाचवणे, तर दुसर्‍या हाताने किंगरी वाजवण्याची ही कला अद्वितीयच म्हणावी लागेल.
डक्कलवार मूळचे आंध्र प्रदेश तेलंगणा भागातून आले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा ही तेलगू असते. मात्र, मराठी गद्य व पद्य वापरून ते पुराण कथाकथन करतात. त्यामध्ये प्रामुख्याने बसवपुराण कथांचा समावेश असतो. ते मौखिक स्वरूपात असल्यामुळे त्याची रीतसर कुठे लेखी स्वरूपात नोंद नसते. कथाकथन करण्याची पद्धत, त्यातील नाट्यमयता, वाचिक व कायिक अभिनय आणि किंगरी वाद्य व बाडाचा वापर करून सादर केलेले एक विधिनाट्य असाच त्याचा उल्लेख करावा लागेल. एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्याचे जतन होणे आवश्यक आहे. कारण आता डक्कलवाराच्या कुटुंबातील नव्या पिढीने आपल्या उदरनिर्वाहाचे अन्य मार्ग शोधले आहेत. त्यामुळे जुन्या पिढीतील डक्कलवार कलावंत अस्तंगत झाले तर त्यांच्यापाठोपाठ ही कलाही अस्तंगत होणार आहे.