आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची भूमिका महत्‍त्‍वाची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच अनेक ठिकाणी जागतिक ऑटिझम डे साजरा करण्यात आला. औरंगाबादमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर, थेरपिस्ट आणि समाजसेवक या विषयावर मोठ्या प्रमाणावर मेहनतीने काम करत आहेत. पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, त्यामुळे समाजानेही अशा मुलांना मदत होईल असे कार्य केले पाहिजे.
 
सर्वप्रथम तर पालकांमध्ये असलेला आत्मविश्वासाचा अभाव. आपण पाहतो की, कित्येक पालक आपला/ली पाल्य ऑटिस्टिक आहे, हे स्वीकारतच नाहीत. आणि या त्यांच्या वर्तणुकीमुळे अनेक वर्षे निघून जातात आणि तो पाल्य उपचार व थेरपीपासून वंचित राहतो. पालकांना अशी विनंती आहे की, हे सत्य स्वीकारून त्वरित उपचार सुरू केले पाहिजेत. मान्य आहे, अनेक पालकांच्या मनात असंख्य विचार असतात. हे माझ्या पाल्याच्या बाबतीतच का? किंवा माझ्याच नशिबी का? अशा अनेक प्रश्नांमध्ये गुंतून न पडता आपण काय केले पाहिजे, तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, समाजाबरोबर उभं राहण्यासाठी आपण योग्य प्रकारची थेरपी देऊन त्याला पुढे कसं आणता येईल, याचा विचार केला पाहिजे.
 
पालक म्हटल्यानंतर आई व वडील या दोघांनीही ती जबाबदारी स्वीकारून यातून मार्ग काढला पाहिजे. बऱ्याचदा पालकांमध्ये वडिलांची भूमिका फारच वेगळ्या स्वरूपाची दिसून येते. जसे “अर्थार्जनामुळे आमच्याकडे वेळ नसतो. थेरपी, डॉक्टरसाठी आर्थिक परिस्थिती भक्कम ठेवावी लागते,” किंवा “ही आईचीच जबाबदारी असते, हे आईनेच केले पाहिजे, तिच्यामुळेच हे झाले,” इ. अशा अनेक पळवाटा काढून त्या आईवरच सगळी जबाबदारी ढकलली जाते. आर्थिक परिस्थिती भक्कम असली पाहिजे, ही बाब जरी खरी असली तरी आईला समजून घ्यायला हवं. नोकरी करत असल्यास नोकरी, घर आणि पाल्याची जबाबदारी या गोष्टींमुळे होणारी तारेवरची कसरत समजून घेऊन त्यावर उपाययोजना करावी. कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणून कौटुंबिक जबाबदारी पेलावी. समाजातील रूढी, परंपरा, धार्मिक कार्य याकडे दुर्लक्ष करून मुलांना अधिकाधिक वेळ कसा देता येईल आणि कसा त्यांचा सर्वांगीण विकास करता येईल, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मूल जास्तीत जास्त काळ कुटुंबातील सदस्यांबरोबरच राहते व डॉक्टर, थेरपिस्ट यांच्याबरोबर अल्प प्रमाणातच राहते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे.
 
त्यासाठी आपले मूल स्वावलंबी असले पाहिजे. समाजात वावरताना त्याने कुणावरही अवलंबून राहता कामा नये, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी आईवडिलांनी खंबीरपणे व शांतताप्रिय राहून या मुलांना वाढवले पाहिजे. आईने आपल्या मुलांना वाढवताना एक गोष्ट आत्मविश्वासाने ठरविली पाहिजे की, माझ्या पाल्याला मी समाजात आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगण्यास तयार करणारच! माझे प्रयत्न मी सोडणार नाही. मी रडतही बसणार नाही आणि कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. असा विचार सगळ्या पालकांनी करायला हवा. तरच एक दिवस ही विशेष मुले समाजात आपले योग्य स्थान निर्माण करतील.
बातम्या आणखी आहेत...