आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य आरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्त्या गणेशाचा सण जवळ आला की आपल्या श्रद्धेचे मूर्त रूप मनात आकार घ्यायला लागते. निराकार ईश्वराला आपल्या कल्पनेनुसार विविध रूपांमध्ये पाहण्याची ताकद केवळ माणसालाच लाभली. चराचरात साठून राहिलेल्या या ईश्वराचे रूप चित्र, लेखन अशा वेगवेळ्या माध्यमांमधून मांडायचा प्रयत्न होत आला. याचेच एक देखणे माध्यम म्हणजे नृत्य. त्यातही कथकसारख्या शास्त्रीय नृत्यातून सावळ्या श्रीकृष्णापासून गणेशापर्यंत, दुर्गेपासून चंडिकेपर्यंत देवदेवतांच्या विविध मुद्रा, लीला परंपरेनुसार नेहमीच साकारल्या जातात. असाच एक अत्यंत तरल आणि देखणा नृत्याविष्कार वेगवेगळ्या प्रयोगांसह नाशिकच्या नृत्यांगण संस्थेच्या कीर्ती भवाळकर, सायली मोहाडकर आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी नुकताच येथील कालिदास कलामंदिरात सादर केला. कार्यक्रमास आलेला प्रत्येक रसिक मंगलमय पूजेत बांधलेल्या गणेशाचे, दुर्गेचे रूप मनात साठवूनच परतत होता हे या नृत्यसोहळ्याचे यश.
दुर्गे दुर्घट भारी या आरतीवर नृत्य करताना देवीची विविध रूपे या विद्यार्थिनी साकारत असताना नृत्यामधून या देवीवरच्या श्रद्धेचा किती सहजसुंदर आविष्कार होऊ शकतो याची तर जाणीव झालीच, शिवाय आपल्याच हातांच्या साध्या वळणांनी देवीचे एकेक रूप कसे उलगडत जाते, भावमुद्रा झरझर पालटत असताना आशीर्वाद देणा-या देवीपासून महिषासुरमर्दिनीपर्यंत कसे वेगवेगळे भाव प्रकट होतात आणि आपण अनाकलनीय ईश्वराला आपल्या सुलभ अशा अभिव्यक्तीतून कसे मांडतो याची प्रचिती आली. मग आरती दुर्गेची असो वा गणेशाची.
तराणा हा एक कथकनृत्याला लाभलेला एक अनोखा प्रकार. मुक्त पण तितक्याच शास्त्रोक्त अभिव्यक्तीतून आपल्या मनातील विविध रेखाटनांनुसार नृत्यसाधना व पर्यायाने ईश्वरसाधना करण्यासाठी तराणा हा एक योग्य नृत्यप्रकार कथकमध्ये वापरला जातो. कीर्तीताईंनी यातही प्रयोग केला. ‘तराणा एक कथकानुभव’ या संकल्पनेअंतर्गत त्यांनी कथकचे शास्त्रीय स्वरूप विविध तराण्यांमधून उलगडवत नेले. नृत्याची विविध अंगे, थाट्, आमद्, तोडे, उठान, परण, कवित्त, गिनती, तिहाया, तत्कार या वेळी त्यांच्या विद्यार्थिनींनी सादर केले, ज्यातून आधी ईश्वराचे मूर्त साकारले गेले होते. या तराण्यांनी सर्वांनाच एका वेगळ्याच विश्वात नेले.