आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईफ बदल गयी पप्पीजी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौडी गढवाल ते मुंबई व्हाया दिल्ली... या प्रवासाचे वर्णन कसे कराल?
मी पौडी गढवालच्या (उत्तराखंड) सतपुली गावचा आहे. माझा जन्म तिथलाच. तुम्ही-आम्ही जिला देवभूमी मानतो, तिथले समृद्ध बालपण, जीवनाकडे बघण्याचा, ते जाणून घेण्याचा दृष्टिकोन सगळेच अविस्मरणीय आहे. तिथूनच नोकरीच्या शोधात माझे वडील दिल्लीला गेले आणि दिल्लीतच माझे प्राथमिक ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण झाले.

अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार कधी मनात आला?
मी अकरावीत असतानाची गोष्ट. एक मुलगा प्रार्थनेच्या वेळी मैदानावर शेकडो मुलांची हजेरी घेत असते. तो ज्याचा हजेरी क्रमांक घेई, तो मुलगा उठून पुन्हा बसत असे. साहजिकच त्या हजेरी घेणाऱ्या मुलाची इतर मुलांमध्ये जरब होती. काही दिवस हा मुलगा गैरहजर होता, म्हणून पीटीच्या सरांनी माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून मला ही जबाबदारी दिली. मी कितीतरी जणांच्या हुबेहूब नकला करून दाखवायचो, त्यामुळे मित्रांनी माझे नाव पुढे केले होते. पण समोर एवढ्या मुलांना बघून पहिल्या दिवशी माझी चांगलीच भंबेरी उडाली. पाय लटपटू लागले. पण दुसऱ्या दिवसापासून मला हे काम खूपच आवडू लागले. इतरांनी माझ्या या कामाची प्रशंसा केल्यामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. बस, तेव्हाच जाणवले की, मी अभिनय करू शकतो.

आपण नाटकाच्या माध्यमातून या क्षेत्रात पदार्पण केलेत, त्याविषयी सांगा.
मी त्या वेळी अभिनयाच्या क्षेत्रात काही करण्याचा गांभीर्याने विचार करत होतो. योगायोगाने सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या ‘बकरी’ या नाटकात कर्मवीर ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली. या भूमिकेने ‘अस्मिता ग्रुप’चे अरविंद गौड प्रभावित झाले आणि मी ‘अस्मिता’शी जोडला गेलो. सहा वर्षे मी या ग्रुपसोबत होतो. या दरम्यान मी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. तुगलक(गिरीश कर्नाड), अंधा युग(धर्मवीर भारती), कोर्ट मार्शल(स्वदेश दीपक), अंतिम समाधान(महेश दत्ताणी) ही त्यातील काही प्रमुख नाटके. त्यानंतर मी पं. एन. के. शर्मा यांच्या ‘अॅक्ट वन’ ग्रुपसोबत एक वर्षभर काम केले.

घरातून पाठिंबा कसा मिळवला?
माझ्या बरोबरची मुलं बारावीनंतर बऱ्यापैकी कमाई करत होती, तिथे माझी कशात काही नाही, अशी अवस्था! त्यामुळे साहजिकच माझ्यामुळे माझ्या वडलांना शेरेबाजी ऐकावी लागे. ‘दाढी वाढवून बैजू बावरा बनून भटकतोय...’ वगैरे. वडलांची चिंता अनाठायी नव्हती, कारण सरकारी नोकरीचे माझे वय निघून जात होते. पण हेही खरे की, कविता नागपाल, सुषमा चढ्ढा, रमेश चंद्रा, सुचिता नरुला आदी मान्यवर समीक्षकांनी माझ्याविषयी चांगले लिहिले, की ते वाचून वडलांना आनंदही होत असे. पण माझ्या आर्थिक अस्थैर्यामुळे ते काळजीत होते. पण सुदैवाने माझ्या काकांच्या मध्यस्थीमुळे वडील राजी झाले.

रुपेरी पडद्यावर येण्याची संधी कशी मिळाली?
माझा मित्र हनी त्रेहान विशाल भारद्वाज यांच्या प्रॉडक्शन कंपनीमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याने ‘मकबूल’चा उजवा हात म्हणजेच ‘थापा’च्या भूमिकेसाठी मला विचारले. हनी म्हणाला, ‘मला संकोच वाटतोय... कारण थापाला सिनेमात काही संवाद नाही. पण त्याची उपस्थिती इतकी महत्त्वाची आहे की, एखाद्या ज्युनियर आर्टिस्टला आम्ही ती भूमिका देऊ शकत नाही...’ मी मात्र ताबडतोब तयार झालो. या भूमिकेमुळेच मला पंकज कपूर यांनी ‘ओमकारा’मध्ये संधी दिली. यामध्ये मी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले, शिवाय मला फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाले.

हिंदी सिनेमांचा बदलता ट्रेंड लक्षात घेता भविष्यात तुम्हाला प्रियांका चोप्रा, दीपिका पडुकोन अशा ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळेल?
(हसून)कदाचित... तसे कथानक मात्र हवे. मी शाहरुख खान, अक्षय कुमार यांना पर्याय बनू इच्छित नाही. प्रेक्षकांनाही ते रुचणार नाही. पण कथानक जर असे असेल की या अभिनेत्रींसोबत मी योग्य वाटेन, तर हे शक्य होईल.

हिंदीतले दिग्गज अभिनेतेही तुम्ही आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारख्या कसलेल्या कलाकारांची साथ आवश्यक मानू लागले आहेत, हे खरे आहे का?
ही खरंच चांगली गोष्ट आहे. सिनेजगतात प्रस्थापित कुटुंबातील कलाकारांचेच एकेकाळी वर्चस्व होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. सपोर्टिंग अॅक्टर म्हणून कितीतरी नवख्या कलाकारांना संधी मिळत आहे. अभिनेतेही अशा कलाकारांना घेण्याबाबत आग्रही असतात. काही दिग्दर्शकही वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे माझ्यासारख्या कलाकारांना हा काळ समाधानाचा आहे.

याचा अर्थ, सामान्य रंगरूपाच्या कलाकाराला बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणे कठीण नाही?
नक्कीच. बस आपल्यात चौकट तोडण्याची क्षमता असली पाहिजे. तसेही इथे बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याची जास्त गरज असते. ‘आपण कसे दिसता’ यापेक्षा ‘आपण अभिनय कसा करता’ यावर सर्व निर्भर असते. म्हणूनच पंकज कपूर, ओम पुरी आणि इरफान खान यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. नसीर साहेबांसारखा अभिनेता विरळाच!

आता कोणत्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा आहे?
राजू हिरानी! मला वाटते, तुम्ही दहा कलाकारांना हा प्रश्न विचारलात तर आठ जणांचे हेच उत्तर असेल. ते प्रत्येकाचेच ड्रीम डायरेक्टर झाले आहेत. तसेच सुजॉय घोष, शिमित अमीन, नवदीप सिंह आणि श्रीराम राघवन यांच्यासोबत काम करण्याचीही माझी इच्छा आहे...
(dpsingh@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...