आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे दाऊदी बोहरा पर्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोहरी समाजातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात अथवा प्रवचनाच्या प्रारंभीच एक संदेश दिला जातो; तो म्हणजे, ‘तुम्ही ज्या राष्ट्रात असाल, ज्या भूमीवर राहत असाल, त्या राष्ट्राशी, भूमीशी प्रामाणिक असले पाहिजे.’ ही त्यांची शिकवण जगभरात त्यांचा समाज जेथे असेल तेथे आचरणात आणतो. या शिकवणीनुसार महाराष्ट्राशीदेखील दाऊदी बोहरा समाज प्रामाणिक आणि कृतज्ञ राहिला आहे. त्याच्या योगदानाची ही दखल...

पुण्यात बोहरी आळीत आताच्या घटकेला फेरफटका माराल, तर बोहरी व्यापाºयांची भलतीच लगबग चाललेली दिसेल. गणपतीची आरास, सजावटीचे व इतर साहित्य विकण्यात ते आता गुंग झाले आहेत. ही धावपळ केवळ गणेशोत्सवापुरती नसते, तर एरवीच्या काही सणासुदीतसुद्धा दिसेल. उदा. बैलपोळ्याच्या काळात बोहरींच्या हार्डवेअरच्या दुकानात व इतर दुकानात बैलांच्या गळ्यातील घंटा, शिंगांना लावायचे बेगड, आरसे, रंगीत कासरे (दावे), मण्यांच्या माळा, अशा किती तरी वस्तूंनी बोहरी आळी रंगीबेरंगी वाटू लागते. मुख्य म्हणजे, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या किंवा पाडव्याच्या दिवशी नवीन वह्या, खतावण्यांचे जे पूजन होते, त्या वह्या, खतावण्यादेखील बोहरींच्या दुकानातून वाजत-गाजत मोठ्या उत्साहाने नेल्या जातात. पुण्यातल्या अशा अनेक सणांच्या उत्साहाचा प्रवाह बोहरी आळीतून सुरू होतो...
महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी एकरूप झालेली ही बोहरी मंडळी सुसंस्कृत, सौम्य व मृदू वर्तणुकीसाठी प्रसिद्ध आहे. आपण भले आणि आपले काम भले, ही त्यांची जीवनशैली. ते काम प्रामाणिकपणे करायचे, व्यवसाय-व्यवहारातून उत्तम पैसे मिळवायचे आणि समाजजीवनाचे जे देणे असेल तेही द्यायचे, अशा समंजस वृत्तीमुळे बोहरी समाज कधीच वादग्रस्त ठरला नाही. बोहरी समाजाची संख्या संपूर्ण जगभरात अवघी दहा लाख आहे. त्यामुळे संख्येने अल्प असलेला हा समाज आहे. या अल्प समाजातला मोठा भाग भारतात आहे. साधारणत: चार हजार कुटुंबं पुण्यात. पंधरा ते वीस हजार कुटुंबं मुंबईत, तर औरंगाबाद आणि राज्याच्या इतर शहरांत तुरळक वस्ती. एवढ्याशा या छोट्या समाजाचे मुख्य केंद्र मुंबईत फोर्ट भागात, तर पुण्यात कॅम्पात आहे. मुंबईत त्यांचे मुख्य गुरू डॉ. सैदना मोहंमद बुºहानुद्दीन राहतात. आज त्यांचे वय एकशेदोन वर्षे आहे. बोहरी समाजातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात अथवा प्रवचनाच्या प्रारंभीच एक संदेश दिला जातो; तो म्हणजे, ‘तुम्ही ज्या राष्ट्रात असाल, ज्या भूमीवर राहत असाल, त्या राष्ट्राशी, भूमीशी प्रामाणिक असले पाहिजे.’ ही त्यांची शिकवण जगभरात त्यांचा समाज जेथे असेल तेथे आचरणात आणतो. भारताशिवाय हा समाज कराची (पाकिस्तान), युरोप, नॉर्थ अमेरिका, पूर्व आफ्रिका या देशांत आहे. तो तिथे तिथल्या राष्ट्रीय भावनांशी व मूल्यांशी प्रामाणिक आहे. हे बोहरी नक्की कोण? कोठून आले? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कारण अल्पसंख्य असलेला व निवडक शहरांतील वस्ती यांमुळे तो सर्वपरिचित नाही. मुस्लिमांत अनेक पंथ आहेत. त्यापैकी शिया आणि सुन्नी मुख्य. बोहरी हा समाज शिया पंथाचा उपप्रकार आहे. महंमद पैगंबरांना मानतानाच महंमद साहेबांची कन्या फातिमा आणि जावई इमाम हुसेन अली व त्यांच्या वंशजांना मानणारा हा समाज आहे. थोडक्यात, फातिमिक गटातून उगम झालेला हा समाज सुन्नींशी मतभेद झाल्यामुळे भारतात आला. 1592मध्ये उद्भवलेल्या विवादात या समाजाने दाऊद बिन कुतुबशाहला पाठिंबा दिल्यामुळे या समाजाला ‘दाऊद बिन बोहरा’ किंवा ‘दाऊदी बोहरा’ हे नाव पडले.
भारतात आलेल्या या दाऊदी बोहरा समाजाचे ‘येमेनी’ हे मुख्य उगमस्थान असले तरी इजिप्शियन, आफ्रिकन आणि भारतीय संस्कृतीच्या मिश्रणातून ही बोहरा संस्कृती आकारास आली आहे. बोहरींची मूळ भाषा लिसानुद-दवाद आहे आणि पर्सो-अरेबिक ही लिपी आहे. ही भाषा उर्दू, गुजराती व पर्शियन यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे. महाराष्ट्रात हा समाज पेशवेपूर्व काळापासून आला आहे. मुख्य उद्देश व्यापार हा असल्याने इतर राजकीय घडामोडींत या समाजाला स्वारस्य नव्हते व आजही नाही. मात्र, समाजसुधारणेच्या क्षेत्रात या समाजाने वेळोवेळी योगदान देऊन आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. पुण्यातील बरेच बोहरी हे गुजरातमधील पंचमहाल व इतर जिल्ह्यांतून स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे ते घरात व बाहेरही गुजराती बोलतात आणि हिंदूंचे अनेक रीतिरिवाज त्यांनी स्वीकारले आहेत. ‘बोहरा’ हा शब्द मूळ ‘वेहरू’ शब्दावरून आला आहे. वेहरू याचा अर्थ व्यापार. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित असलेले हे नाव, तर ‘दाऊदी’ हे नाव दाऊदी बिन कुतुबशाहशी निगडित असल्याचे वर सांगितलेच आहे. दाऊदी बोहरा यांचे गुरू, मशीद, कबरस्तान हे सुन्नी व इतर मुस्लिमांपेक्षा वेगळे आहेत. स्वच्छता, शिक्षण, आत्मविश्वास यावर भर असलेला हा समाज प्रगल्भ आहे. या समाजात स्त्रियांचा अतिशय सन्मान केला जातो. विधवा स्त्रियांना तसेच घटस्फोटित स्त्रियांना अतिशय प्रतिष्ठेने व प्रेमाने वागवण्याची परंपरा या समाजाने अंगीकारली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग व इतर दुर्बल व्यक्तींसाठी समाजाचा दृष्टिकोन अतिशय उदार व सहानुभूतीचा आहे. या समाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येकाला स्वत:चे ओळखपत्र आहे. आपल्याकडे आधार कार्ड वगैरे संपूर्ण ओळख असलेले कार्ड अलीकडे दिले जाऊ लागले आहे; परंतु बोहरा समाजात प्रत्येकाची माहिती केवळ त्याचीच नाही, तर त्याच्या अगोदरच्या वंशजापासूनची संगणकावर उपलब्ध आहे. एखादा बोहरी एका गावाहून दुसरीकडे स्थलांतरित झाला, तर तशी नोंद करणे अनिवार्य असते. आपण एका गावाहून दुसºया गावाला गेलो, तर जसे पहिले रेशन कार्ड, गॅस कार्ड, मतदान कार्ड जमा करून दुसरीकडचे नवीन घेतो, त्याप्रमाणे बोहरींना एका गावाहून दुसरीकडे गेल्यास संपूर्ण ओळखपत्र बदलून व नोंद करून नवे घ्यावे लागते. हा आदर्श इतर समाजातील लोकांनी घ्यावा असाच आहे. त्यामुळे प्रत्येक बोहरी त्यांच्या समाजाच्या मुख्य संस्थेशी संपर्कात राहतो. ही सगळी माहिती संगणकावर आॅनलाइन भरली जाते. एक समाज म्हणून एकोपा राखलेल्या, अल्पसंख्य असूनही देशाच्या, राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान दिलेल्या दाऊदी बोहरांबद्दल अधिक माहिती पुढील लेखातून घेऊ या.
arunjakhade@padmagandha.com