आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'येरवडा स्टुडिओ'तील दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(संजूबाबाच्या आगामी
आत्मचरित्रातील काही अंश)

दिवस कोणता तरी : अगं आई गं! कंबरडं मोडलं पार काम करून. तरी बरं, मागच्या वेळची थोडी तरी सवय आहे. नाही तर वाटच लागली असती. कारण अजूनही मला इथे आपण सिनेमातच काम करत असल्याचा भास होतो. बराच वेळ आपण एकच शॉट देतोय आणि कोणी काही बोलत नाही, तेव्हाच शंका आली होती मनात. नंतर म्हटलंही की, पॅकअप करा आता; कंटाळा आलाय रिटेकचा. तर एका दंडुक्यानं आठवण करून दिली मला आपल्या जागेची आणि मी जागा झालो. आपण आता तुरुंगात आहोत, स्टुडिओत नाही. मुंबईत नाही, पुण्यात आहोत. चला, मीही आता पुणेकर झालोच तर. या पुण्याची खूप तारीफ ऐकली होती, मराठी अ‍ॅक्टर्सकडून. आता नाव नाही आठवत त्यांचं. पण कोणी शेवटी ‘कर’ असलेलाच असेल. हे कधी कोणता कर भरत नसतील, पण नावात मात्र कर असतो. नावावरून आठवलं की, पुणेकर नावं ठेवण्यात एकदम वस्ताद. मी इथं आल्या आल्या एक जण म्हणालाच, ‘मुन्नाभाई प्रिझनर’ आला म्हणून. आणि इथल्या पाट्या... जेलच्या बाहेरच एक पाटी होती- ‘बाहेरचे नियम मोडलेत म्हणून तुम्ही इथं आला आहात; पण इथले नियम मोडले तर बाहेर जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा.’
असाच एक दिवस : सध्या माझ्याकडे अन्नवाटपाचं काम आहे. खरं तर भाजी-भाताची पातेली काउंटरवर न्यायचं काम आहे. कसली मोठाली भांडी असतात ती. मला उचलणंच जमेना. एका दंडुक्याला म्हटलं, डबल मिळेल का एखादा माझं काम करायला. तर तो दंडुका आपटत म्हणाला, ‘काही डब्बल मिळणार नाही. काम नाही केलं तर डब्बल काम मात्र मिळेल. काय करतो बोल?’ काय करणार, उचलली मग मुकाट्याने एकट्यानेच सारी भांडी. याला स्वावलंबन म्हणतात, असंही म्हणाला तो जाता जाता. मला आलिंगन, चुंबन माहीत आहे; हे स्वावलंबन काही माहीत नव्हतं. पण आता चांगलंच कळतंय ते.
तसाच एक दिवस : इथं आल्यावर अनेक प्राण्यांशी ओळख झाली माझी. माशा. जिकडं पाहावं तिकडं या माशा घोंघावत असतात इथं. माझ्याभोवती फॅन्स आणि मीडियावाले या माशांसारखेच कायम घोंघावत असायचे, त्यामुळे त्यांचा मला त्रास झाला नाही; पण ही ढेकणं. त्यांची भीतीच बसली आहे मनात. सीबीआयच्या अधिका-यांची वाटली नव्हती, एवढी भीती या ढेकणांची वाटते.
वैतागवाणा दिवस : भांडी उचलण्याचं काम जमत नाही म्हणून जेलरनं मला हिशेब लिहिण्याचं काम दिलं. म्हटलं, चला सुटलो. पण कसलं काय. मला लिहिताच येईना. म्हणजे, पेन हातात धरता येतो मला; पण कागदावर तो कसा चालवायचा, तेच कळलं नाही. लिहितंय कोण आजकाल तसंही. आणि मला तर चेकवर सह्या करण्यापलीकडे लिहिण्याचं कामच पडत नाही कधी. असली फजिती झाली. सारे हसत होते. जेलरनं मग मला एक मदतनीस दिला. मी हिशेब सांगायचा आणि त्यानं तो लिहून काढायचा. तर तिथंही बोंबच. कोटीकोटीचे हिशेब करायची सवय मला, हे चहापाण्याचे किरकोळ हिशेब काही केल्या जमेचना. तर आता जेलरनं सक्तीनं मला दररोज पाटीवर अक्षरं गिरवायला सांगितलंय. शिक्षा परवडली, पण हे गिरवणं नको असं झालंय. सारे दंडुके हसत असतात सारखे. वैताग साला.
भेटीचा दिवस : भेटीचा दिवस आला की बरं वाटतं त्यातल्या त्यात. पण इथं आता, फारसे कोणी फिरकत नाहीत. माणूस आत गेला की बाहेर त्याची कोणी किंमत ठेवत नाही, हे आता चांगलं कळतंय मला. त्यामुळे रामू मला भेटायला आला, हे पाहून धक्काच बसला. पण बरंही वाटलं की, कोणीतरी आठवण ठेवली आपली. पण तो आला ते माझ्याकडे न पाहता इकडेतिकडेच बघत होता. आणि बोलतानाही माझी विचारपूस करण्याऐवजी तुरुंगाचीच माहिती विचारत होता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं लगेच, की याला बहुतेक पुढचा पिक्चर माझ्यावरच काढायचा असणार. तसा कटवला त्याला; पण जाताना त्यानं चांगला सल्ला दिला. म्हणाला की, तुला इथं करमत नाही तर हा तुरुंग एक स्टुडिओच आहे असं समजत जा. कोणी काहीही सांगितलं की, तो शॉट आहे असं समजून ते काम करत जा. त्याच्या सांगण्यानुसार वागतोय आता. तेवढाच त्रास कमी होतो. आता फक्त फायनल पॅकअप कधी होतंय, त्याची वाट बघतोय.
त्रासाचा दिवस : मी तुरुंगात आहे आणि माझी पोरगी तिकडे अमेरिकेत पार्ट्या करत फिरतेय. पेपरमध्ये बातमी वाचली आणि हबकलोच. काय कमी केलं होतं या पोरीसाठी; म्हणून तिनं असं वागावं? आई गेली लहानपणी म्हणून काय झालं, मी तर काळजी घेतलीच ना तिची. आपला बाप तुरुंगात आहे आणि कार्टी पार्टी करतेय. एक गोष्ट ऐकेल तर शप्पथ. पण तिला तरी काय दोष द्यायचा. मी तरी माझ्या बापाचं कुठं काय ऐकलं होतं! ऐकलं असतं तर आज इथं थोडीच आलो असतो?