आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिरांची आई उंबरठ्यापल्याड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुभव सारं काही शिकवतो असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. कारण एखाद्या गोष्टीचा स्वत: अनुभव घेतल्याशिवाय त्या गोष्टीचे मर्म आपल्याला कळत नाही. असा काहीसा अनुभव अनघा ओक यांना आला. पण हा अनुभव क्षणिक नव्हता, तो जन्मभरासाठीचा होता आणि याच विलक्षण अनुभवातून त्यांचं आयुष्य घडत गेलं, विस्तारत गेलं. या अनुभवातून त्या स्वत:च फक्त घडल्या नाहीत तर त्यांनी समाजही घडविला.


मूळचं नाशिक माहेर असलेल्या अनघाताई लग्न झाल्यानंतर धुळे शहरात आल्या. पेशानं व्यावसायिक असलेल्या पतीसोबत त्यांचं आयुष्य बहरत होतं. या बहरलेल्या आयुष्यात एका मुलाच्या रूपानं एक सुख आलं. पण काही दिवसांत अनघातार्इंना आपला मुलगा मूकबधिर असल्याचं कळलं. पण त्यामुळे त्याचा राग, चिडचिड न करता या माउलीने या मुलाला घडविण्याचा जणू विडाच उचलला. काहीही करून मुलाला सामान्यांच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्या धडपडू लागल्या. त्यासाठी त्यांना धुळ्यातील डॉ. पुराणिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यानुसार मूकबधिरांसाठीचे विशेष शिक्षण पुण्यात घेऊन त्या धुळ्यात पूर्वी रेडक्रॉसच्या जागी असलेल्या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आपल्या मुलासोबतच समाजात असलेल्या अन्य मूकबधिर मुलांचा त्या शोध घेऊ लागल्या. आजूबाजूला अनेक मूकबधिर मुलं असूनही त्यांना मूकबधिरांच्या शाळेत घालण्याचं धाडस त्यांच्या पालकांत नव्हतं. अशा पालकांची समजूत घालून मुलांना शाळेत दाखल करवून घेण्याचं काम अनघातार्इंनी केलं. हे काम करताना अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. तरीही त्या खचल्या नाहीत. या कामात पती अरुण ओक यांचे पदोपदी सहकार्य मिळाले.


धुळे शहरात मूकबधिरांची शाळा सुरू केली ते दशक 1980चे होते. 1981 मध्ये भारत सरकारने राज्यातील सर्व मूकबधिर शाळांना मान्यता दिली. त्यानुसार धुळ्यातील अनघाताई कार्यरत असलेली शाळाही अनुदानित झाली. त्यानंतर धुळ्यातील केले परिवाराने या शाळेसाठी एक प्रशस्त इमारत दान केली. त्यानुसार रेडक्रॉसच्या छोट्याशा वर्गात भरणारी शाळा या प्रशस्त इमारतीत आली. शाळेला हक्काची जागा मिळाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. धुळे शहर नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील मूकबधिर विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येऊ लागले आहेत. सातवीपर्यंत मूकबधिर विद्यार्थ्यांना येथे शिक्षण दिले जाऊ लागले आहे. 1980 मध्ये चार-पाच मुलांपासून सुरू झालेली शाळा 2013 मध्ये 120 विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ लागली. आजपर्यंत साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांना या शाळेने शिक्षण दिले आहे. याशिवाय मूकबधिरांसाठी या शाळेत वसतिगृहही आहे.


दरम्यान, अनघातार्इंचा मूकबधिर मुलगा केतनही याच शाळेत शिकून जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस लागलेला आहे. तार्इंनी सूनही त्याला साजेशी आणण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार डोंबिवलीतल्या नंदिनीच्या रूपाने ती मिळाली. तीदेखील आता यशवंतराव चव्हाण महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठातून बीए करीत आहे. केतन-नंदिनीला मानस हा सर्वसामान्य मुलगा आहे.


दरम्यान, ताईंचा आदर्श घेत धुळे शहरातील स्टेट बँकेत उपप्रबंधक पदावर कार्यरत असलेले देवीदास मोरे व हिराबाई मोरे यांनीही आपल्या मूकबधिर मुलींसाठी आयुष्य प्लॅन केले. त्यानुसार त्यांच्याही मुली आज सर्वसामान्यांसारख्या आयुष्य जगत आहेत. त्यांच्याकडे पाहून मोरे दांपत्यही तितकेच आनंदी आहे.


आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांविषयी माहिती देताना अनघाताई सांगतात की ही मुलं उपजत खूप हुशार असतात. त्यांना वाचा नसते, मात्र ते कृती खूप छान करतात. आपला राग, लोभ, प्रेम हे सारं ते कृतीतून व्यक्त करतात. त्यामुळे या मुलांना कृतीतून घडवावे लागते. आम्ही सातवीपर्यंत यांना शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी सामान्य मुलांमध्ये पाठवतो. ती मुलं शिकतात. पदवीधर होतात. व्यवसाय करतात. त्यांनी हिंमत कोळीचं छान उदाहरण दिलं. या हिंमतने हिंमत करत मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठून त्यांची भेट घेतली. त्याने मला नोकरी मिळालीच पाहिजे असा हेका धरला. मुख्यमंत्र्यांनीही त्याला लगेचच पत्र लिहून यांना विशेष जागांमध्ये सामावून घ्यावे असे पत्र दिले. त्यानुसार तो आता शिरपूर येथे नोकरीस आहे. याशिवाय तुषार रोकडे, मंदार सावंत हे विद्यार्थीही नोकरी करीत आहेत. 34 वर्षे नोकरी केल्यानंतर अनघाताई पुढे लिखाण करणार आहेत. भविष्यातही त्या मूकबधिरांसाठी कायम कार्यरत राहणार आहेत.