आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फेसबुक'चा वाद... 'फेसबुक'शी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘फेसबुक’ने जगाशी नाते जोडणारी ‘मॅजिक विंडो’ मिळवून दिली. परंतु याच फेसबुकच्या वापरावरून समाजाच्या एका वर्गात (मुख्यत: न वापरणांच्या) चिंतेचे काहूरही माजले. फेसबुकच्या अनिर्बंध वापरामुळे (न वापरणांच्या शब्दांत व्यसनाने!) नव्या पिढीतील आसक्ती, आत्मप्रेम, नैराश्य आणि एकटेपणात वाढ होऊन ही पिढी वास्तवापासून कोसो मैल दूर जात असल्याचेही तत्काळ निष्कर्ष निघाले.

फेसबुकने नुकतेच आपले समभाग विक्रीसाठी जागतिक बाजारात खुले केल्यानंतर त्याविषयी तर्कविर्तकांना, अंदाज-विश्लेषणांना, भविष्यवेधी आडाख्यांना जगभरातल्या माध्यमांत उधाण आले होते. किंबहुना त्याचे कवित्व अजूनही चालूच आहे. अजून पाच वर्षांनी फेसबुक टिकेल की नाही?, फेसबुकला लोक कंटाळले आहेत का?, फेसबुकचे व्यसन जडते का?, फेसबुक चळवळीचे वा लोकशाही क्रांतीचे सशक्त माध्यम आहे का? अशा स्वरूपाच्या चर्वितचर्वणांनी, जनमत चाचण्यांनी वृत्तपत्रांचे रकाने विश्लेषक भरत होते; काही तर चक्क फेसबुकवरच अशा स्वरूपाच्या चाचण्या प्रसिद्ध करत होते. जणू काही संपूर्ण जगाच्या मानसिक अधिष्ठानावर फेसबुकने अतिक्रमण करावे, असा सर्व चर्चात्मक गोंधळाचा फेसबुकी सूर होता. ‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही फेसबुक अंगा येत’, असे सहज म्हणता येऊ शकले असते.
जगभरातल्या यच्चयावत विचारवंतांना, पत्रकारांना आपल्या लेखणीची धार वाढवण्यासाठी (वा कमी करण्यासाठी) फेसबुक हा विषय का प्रिय वाटावा? खरे म्हणजे 2008मध्ये मार्क झुकरबर्गने आपल्या हार्वर्डमधल्या डॉर्म रूममध्ये फेसबुकची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, तेव्हा त्याला मर्यादित अर्थाने इंटरनेटला ‘चेहरा’ प्राप्त करून द्यायचा होता. आपल्या मित्रांचा व त्यातही जुन्या मित्रांचा संपर्क व संवाद असे त्याचे उद्दिष्ट होते. परंतु ‘इंटरनेट’च्या विश्वात्मकतेत असलेल्या फेसबुकच्या व्यक्तित्वाची ताकद त्याच्या लवकरच लक्षात आली. प्रथम संपर्क, मग संवाद, मग माहिती व मग माहितीतून संपर्काचा आभास, मग मैत्री यातील आभासदृश व प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालणारी वीण घट्ट आहे, हे त्याच्या लक्षात आले, आणि तो फेसबुकच्या विस्तारीकरणाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
प्रत्यक्ष जीवनाशी साधर्म्य सांगणारे बहुआयामी साधेपण आणि तरीही त्यातल्या गुंतागुंतीचे, संपर्काचे, नावीन्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनात कधी दुर्मीळ, तर कधी दुरवस्था झालेल्या अमर्याद ‘स्वातंत्र्याचे’ आकर्षण हेच फेसबुकचे सर्वात मोठे बलस्थान आहे. फेसबुकमध्ये ‘टाइमलाइन’ असते; जिथे तुम्ही अक्षरश: काहीही उद्धृत करू शकता; एखादे छायाचित्र लावू शकता; ‘एखाद्या हस्तलिखित पत्राप्रमाणे तुम्ही लोकांशी व्यक्तिगत संवाद साधत असाल, तर त्यातून मैत्री तयार होते; परंतु प्रत्यक्ष जीवनातील अधुरी मैत्री व प्रेम जर तुम्ही फेसबुकवर शोधत असाल, तर ती नैराश्य व दुभंगलेल्या मानसिकतेची नांदी ठरू शकते.’
दुस एखाद्या माणसाचा विचार ‘शेअर’ करू शकता; तुमच्या मनातला राग काढू शकता; कोणावर टीकाटिप्पणी करू शकता - अक्षरश: काहीही! तुमच्या मनात येणा एखाद्या विचाराचे अस्तित्व पापणी लवताक्षणी लुब्ध होण्याच्या आत फेसबुकच्या सायबरस्पेसमध्ये चिरकाल टिकू शकते. त्या विचारांच्या असंख्य विचारांच्या काहुरात तुमची एकाग्रता होण्याआधीच त्या विचारांचा डिजिटल अवतार अवतरलेला असतो आणि त्या दोन विचारांच्या अमर्याद शांततेत ध्यानमग्न होण्याआधीच तुम्ही आताच व्यक्त केलेल्या ‘टाइमलाइन’वर कोणी कोणी ‘कमेंट’ वा ‘लाइक’ केलेल्या निरंतर अस्वस्थतेने तुम्हाला पछाडलेले असते. तुम्ही जगत असलेले प्रत्यक्ष जीवन एका बाजूला त्याच्या वेगात चालू असते, तर दुस बाजूला हे सायबर जीवन तुमच्या फेसबुक प्रोफाइलवरचे असंख्य बिंदू जोडत तुमच्या टाइमलाइन वा ‘समयरेखेवर’ प्रकाशवेगाने अवतरत असते. त्या प्रत्यक्ष जीवनाचे या सायबरविश्वात कसे ‘मिलन’ झाले, याबाबत पूर्णत: अनभिज्ञ राहूनही एकाच वेळेस वेगवेगळ्या पातळ्यांवर जीवन जगण्याच्या कसरती करण्यास मेंदू सरसावतो, त्यात मिळणा या प्रतिक्रियेच्या ‘किक’मुळे, हजारो-लाखो मैल दूर असूनही तुमच्या मित्राच्या आयुष्याशी सेकंदागणिक ‘कनेक्टेड’ राहण्याच्या ‘वैश्विक’ आनंदापोटी!
फेसबुकच्या डिझाइन अभियंता अँड्र्यू बोसवर्थने या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. ‘माणसे फेसबुकवर येतात, ते फेसबुक अप्रतिम आहे म्हणून नाही. तुम्ही इथे येता कारण तुमचे मित्र येथे आहेत आणि ते तुमच्यासाठी अप्रतिम आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा किंवा व्यसनच म्हणा हवे तर आहे, म्हणून!’ त्या अर्थाने फेसबुक अर्थातच तुमच्या जीवनाचे ‘डॉक्युमेंटेशन’ होऊ शकते - तुम्हाला हवे तसे; किंवा तुम्ही घडवाल तसे!
आणि म्हणूनच त्याचे ‘अपील’ प्रचंड आहे. त्यात मिळणा स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ततेचा आनंदसुद्धा. शेअरिंगमधून तयार होणा धाग्यातून सद्विचारी असण्याचा. चव्हाटासदृश गॉसिपप्रमाणेच जगाला धडे देऊ पाहणा एखाद्या स्वयंभू विद्वानासारखा. रटाळवाण्या, आत्मकेंद्री बौद्धिकांतून देशोदेशीचे शहाणपण रिचवू पाहणा दीडशहाण्याप्रमाणे, काही सुंदर, अवचित व अनाहूतपणे घडू पाहिले तर पोस्ट करण्याच्या आत्मरहित आसेचा. यात आत्मप्रेम आहेच, पण त्याचबरोबर ‘स्व’विरहित प्रकटीकरणसुद्धा आहे. व्यक्ती आहे आणि समष्टीसुद्धा!
आणि म्हणूनच जग फेसबुकने काही बोअर होत नाही. साधारणपणे 85 कोटी प्रोफाइल, 800 कोटी मेसेजेस, 1 कोटीच्या आसपास फोटो. ‘द इकॉनॉमिस्ट’ने म्हटल्याप्रमाणे टेलिफोननंतरचा फेसबुक हा सर्वात मोठा आविष्कार आहे आणि वास्तवातल्या जगाप्रमाणेच त्याचे स्वरूप आहे : एकूण वापरापैकी, 60% वापर महिला, त्यातही तरुण महिला करतात; तर 70% फोटो त्याच शेअर करतात. सुमारे 80% फेसबुक युजर्स अमेरिकेच्या बाहेरचे आहेत. अरब देशांत झालेल्या उठावामध्ये फेसबुकचा मोठा वाटा होता. या सर्व युजर्सपैकी 30% युजर्स सकाळी उठल्या उठल्या प्रथम फेसबुक चेक करतात, यावरून फेसबुकची व्याप्ती मनात किती खोलवर रुंजी घालते, हे ध्यानात येऊ शकेल.
अर्थातच खासगी आयुष्यावर परिणाम करत असणा फेसबुकवर जागतिक पातळीवरील विचारवंतांचा आक्षेप आहे. तुमच्या मनातल्या सुप्त आवडीनिवडी, तुमचे जीवनातले पर्याय व त्यातून तयार होणारी तुमच्या मनाची जडणघडण याचा फेसबुक व्यावसायिक व व्यापारी वापर करत आहे, हा तो आक्षेप. त्यात काही अंशी तथ्यही आहे. किंबहुना फेसबुकने आपले समभाग जागतिक विक्रीसाठी खुले केले तेव्हा एका वृत्तपत्रात आलेले विधान फारच बोलके होते : "Value of desire meets the desire to value everything". ‘तुमच्या मनातील इच्छाआकांक्षांची किंमत करण्याच्या सामर्थ्याचे जगातील सर्वच गोष्टींची किंमत ठरवण्याच्या ईर्ष्येबरोबर मिलन झाले आहे.’ परंतु फेसबुकच्या लोकप्रियतेचे केवळ तेच एक कारण नाही. त्यातले अपील हे व्यावसायिकतेच्या पलीकडचे आहे. फेसबुक मानवी जीवनाचे इंटरनेटवरचे सळसळतेपण आहे - त्यातल्या गुणदोषांसहित. त्यात आनंद आहे, संगीत आहे, चित्रे आहेत, व्हिडिओ आहेत, गेम्स आहेत, गप्पा आहेत. प्रत्यक्ष मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, ग्रुप्स आहेत, ब्रॅण्ड्स आहेत. दु:खीकष्टी किंवा रिकाम्या मनाला विरंगुळा देण्याचे अचाट सामर्थ्य आहे. दोन क्षण त्रासलेल्या मनाला विश्रांती व पर्यायी जीवन जगू देण्याची मुक्ती आहे. जगाचा काल्पनिक आनंद निर्देशांक असेल तर फेसबुकने त्यात वाढच केलेली आहे. ते अस्तित्व मायाजालातले असले तरी त्यातले संबंध मानवी आहेत, मनाचा मनाशी थांग असलेले. ती एकविसाव्या शतकातील ‘बदलती नाती’ आहेत - त्यातल्या ‘गणगोत आणि व्यक्ती व वल्लीसहित!’
आणि तरीही प्रत्यक्ष जगावे लागणारे जीवन, त्यातला संघर्ष व फेसबुकवरचे जीवन यात फरक आहे. त्या आभासी व प्रत्यक्ष जीवनातील पुसट होत जाणा सीमारेषा मानसिक आरोग्यास घातक ठरू शकतात, यावर जगातील मानसशास्त्रज्ञांचे, न्यूरॉलॉजिस्ट्सचे व समाजशास्त्रज्ञांचे एकमत होत आहे. कार्नेजी मेलन विद्यापीठातल्या मोइरा बुर्क यांनी साधारण 1200 फेसबुक युजर्सचा अभ्यास केला. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष साधा होता : तुम्ही फेसबुकचा कसा वापर करता, यावर तुमचे मानसिक आरोग्य अवलंबून असते. जसे पेराल तसेच उगवते. एखाद्या हस्तलिखित पत्राप्रमाणे तुम्ही लोकांशी व्यक्तिगत संवाद साधत असाल, त्यांना व्यक्तिगत मेसेज पाठवत असाल, तर त्यातून मैत्री तयार होते. परंतु प्रत्यक्ष जीवनातील अधुरी मैत्री व प्रेम जर तुम्ही फेसबुकवर शोधत असाल, तर ती नैराश्य व दुभंगलेल्या मानसिकतेची नांदी ठरू शकते. त्यांच्या पाहणीत आलेला आणखी एक निष्कर्ष महत्त्वाचा होता. ‘प्रत्यक्ष जीवनात एकटी असलेली माणसे फेसबुकवरही एकटीच असतात. किंबहुना त्यांच्या एकटेपणात वाढच होते व ते धोकादायक आहे. त्याचबरोबर मित्रांच्या फेसबुकवरचे अपडेट्स सतत बघणे, आपण फेसबुकवर कसे असावे, काय करावे, या स्वप्रतिमांचा सतत विचार करणे अत्यंत घातक ठरू शकते.’ शिकागो विद्यापीठातल्या मेंदू व जाणिवा शाखेचे संचालक जॉन कॅसिपो यांनी फेसबुकच्या मानसिक आरोग्यावर होणा परिणामांसंदर्भात संशोधन केले आहे. फेसबुक तयार करत असलेला मैत्रीचा आभास खरा नाही. फेसबुकमुळे आपली खरी मैत्री तयार होते, त्यातले कनेक्टेडनेस खरे आहे, असे मानणे साफ चूक आहे. प्रत्यक्ष जीवनातील नातीच फेसबुकवर स्थलांतरित होत असतात. फेसबुक मैत्री तयारही करत नाही वा मोडतही नाही.’ स्टीफन मार्शे या शेक्सपिअर साहित्याचा अभ्यास करणा इंग्रजी साहित्यातल्या तज्ज्ञाने ‘अटलांटिक’ मासिकात लिहिलेल्या प्रदीर्घ लेखात वरील शोधनिबंधांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या स्वत:च्या मतानुसार ‘फेसबुक हे आत्मानंदाचे वा आत्मस्वातंत्र्याचे माध्यम होऊ शकत नाही. तत्काळ होणारा संपर्क म्हणजे मुक्ती वा जिवाभावाचे मैत्र नव्हे; किंवा त्याने जगदेखील अधिक चांगली जागा झालेली नाही. फेसबुक ‘स्वत:ला’ विसरून एकांतामधल्या आत्मभानातून आपल्याला पारखे करत आहे.’
भारतातही फेसबुकबाबत मतमतांतरे आहेत. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनीही फेसबुकवर आसूड ओढत ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन्स’ ही संस्था स्थापण्याचे योजिले आहे. कदाचित या धर्तीवर फेसबुक निर्मूलन समिती किंवा फेसबुक व्यसनमुक्ती केंद्रदेखील स्थापन होऊ शकेल; परंतु त्याचा प्रसार करण्यासाठीदेखील त्यांना फेसबुकचाच आधार घ्यावा लागेल! फेसबुकची व्याप्ती आता वाढतच जाणार आहे. एकविसाव्या शतकात जन्माला आलेली पिढी फेसबुकशिवायचे जीवन कल्पनाही करू शकणार नाही. त्यांच्या वास्तवातल्या जीवनाइतकेच फेसबुकवरचे जीवन महत्त्वाचे असेल, त्याची सरमिसळ अधिक गहिरी होत जाईल.
या बदलत्या नातेसंबंधांचा विचार फेसबुकच्या अनुषंगानेच करावा लागणार आहे. फेसबुक सामाजिक जीवनाचा पर्याय नाही; तर ते सामाजिक जीवनाचे एक अंग आहे. नातेसंबंध वा मैत्री वा प्रेमातून निर्माण होणारी पोकळी वा औदासीन्याचे मळभ वा जीवनातील अपूर्णता अर्थातच फेसबुकने निर्माण केलेली नाही. कधी सामाजिक जीवन अपूर्ण होते, आता ते उदंड वाहत आहे. त्यात प्रवाहात टिकून राहण्याचा कसोशीचा प्रयत्न आधीच्या पिढीप्रमाणे आताचीही पिढी करतेय. सुखाच्या निरंतर शोधात शतकानुशतके असणा मानवी मनाच्या अधांतरी अवस्थेत क्षणभर सुटकेचा मार्ग फेसबुकने मिळवून दिला आहे. जशी फेसबुकवरची नाती व माणसे बदलत जातील, तसे फेसबुकलाही बदलावे लागेल; आपले चिरतारुण्य व नावीन्य अबाधित राखण्यासाठी वारंवार कात टाकावी लागेल. अर्थातच ते आव्हान मोठे आहे. तोवर आपण फेसबुकच्या वारीत सामील व्हायला हवे. तूर्तास ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद, फेसबुकचा वाद फेसबुकशी’ असे म्हणण्यास हरकत नाही.
chinmay.borkar@gmail.com
www.facebook.com/cborkar