आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोबत (दीक्षा येरगट्टीकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचानक त्या छोटीच्या हातून सायकल निसटली. ती खूप जोरात पडणार, इतक्यात तिच्या मागे उभारलेल्या मोठीने त्या छोटीसकट सायकललादेखील सावरलं. छोटी रडू लागली तर त्या मोठीने तिला जवळ घेतलं आणि समजावू लागली, “अगं, तू खूप छान चालवलीस सायकल. उद्या पुन्हा चालवू आपण.” “तू खूप छान चालवलीस सायकल!” हे ऐकून/पाहून एक घटना आठवली. शेवटच्या वर्षाचा कॉलेजचा शेवटचा कार्यक्रम आणि प्रचंड घाबरलेली मी. आवडतं काम खरंच जास्त टेन्शन देतं, हे त्या दिवशी कळलं. आणि कार्यक्रमाच्या दोन मिनिटं अगोदर फोन आला, “मला माहितीये, तुझा कार्यक्रम छान होणार आहे आणि तुझी तयारी छान झालीये.” साक्षी होती. मैत्रीण आणि धाकटीसुद्धा. पण त्या क्षणासाठी मोठी बनून गेली ती. आणि मग कार्यक्रम मस्त झाला. त्या दिवशी एक गोष्ट कळली की, काही व्यक्तींचं फक्त सोबत असणंसुद्धा आपल्या आयुष्यात खूप मोठा आधार असतो. त्यामुळेच त्या धाकटीने अगदी बिनधास्त त्या मोठीच्या अंगावर पायडल निसटलेली सायकल सोडून दिली. आपण वयाने मोठे होतो. बुद्धीने, अकलेने, अगदी सगळ्याने परिपूर्ण होतो, पण आपल्या आयुष्यात एक जागा अशी असतेच जिथे मोठे असलो तरी लहान होता येतं आणि लहान असलो तरी मोठं. एक जागा जिथे आपल्याला मोकळं होता येतं. बोलता येतं. व्यक्त होता येतं. जिथे आपल्याला ऐकवण्याअगोदर आपलं ऐकून घ्यायला प्राधान्य असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक जागा अगदी हमखास असतेच. पण आपण मात्र वेड्यासारखे ती सगळीकडे शोधत असतो. सोबत कुणीच नाहीये, असं म्हणत. पण उत्तरं आपल्या आतच दडलेली असतात, ती शोधायला हवीत.
त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींना समजून घ्यायला शिकायला हवं. नवीन सोबत शोधण्यापेक्षा. इतक्यात पुन्हा मेसेज आला, “उद्या कार्यक्रम आहे. खूप काम आहे. लवकर घरी जा.” पुन्हा तीच होती. सोबत लागतेच. आणि सोबत असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात.
diksha.yergattikar5@gmail.com
बातम्या आणखी आहेत...