आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepak Patave Article About Member Of Parliament

खासदारांचा 'आवाज' वाढायला हवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसद सुरू असते तेव्हा प्रत्येक मिनिटाला देशाचे अडीच लाख रुपये खर्च होत असतात. अशा परिस्थितीत गैरहजर राहणारे आणि अभ्यास न करता बोलत राहून संसदेचा वेळ खर्च करणारे खासदार किती मोठ्या प्रमाणात देशाचं नुकसान करतात, याची कल्पना येते.

खासदारांनी संसदेत वेळेवर आले पाहिजे, नियमितपणे उपस्थित राहिले पाहिजे, एखाद्या विषयावर बोलायला उभे राहण्याआधी त्या विषयाचा अभ्यास करून आले पाहिजे, अशा शिक्षकी धाटणीच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींना हे सांगायची वेळ का आली? हा खरा यातला मुद्दा आहे. सप्टेंबर 2012च्या आकडेवारीनुसार संसद सुरू असते तेव्हा प्रत्येक मिनिटाला देशाचे अडीच लाख रुपये खर्च होत असतात. ही रक्कम वाढत्या महागाईच्या आलेखाबरोबर किती वाढली असेल, याचा अंदाज करा. अशा परिस्थितीत गैरहजर राहणारे, उशिरा सभागृहात जाणारे आणि अभ्यास न करता बोलत राहून संसदेचा वेळ खर्च करणारे खासदार किती मोठ्या प्रमाणात देशाचं नुकसान करतात, याची कल्पना येते. अर्थात, हा झाला आर्थिक विचार. यापेक्षाही महत्त्वाचा विचार आहे तो लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीचा. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम गांभीर्याने करीत नसतील, त्यासाठी वेळ देत नसतील, तर या राज्यव्यवस्थेचं मोलच राहत नाही, ही खरी भावना आहे.

जे मोदींना वाटतं ते खासदारकीसारख्या उच्च पदावर निवडून येऊ शकणाºया व्यक्तींना कळत नसेल, असं समजायचं का? जर त्यांना समजत असेल तर संसदेतल्या उपस्थितीवर नेहमीच परिणाम का होतो? खासदार संसदेत कमी का बोलतात? जे बोलतात त्यातले खूपच कमी खासदार अभ्यास करून बोलतात आणि इतर केवळ बोलायचे म्हणून बोलतात. असे का होते? कारण संसदेत अभ्यास करून बोलण्यापेक्षा इतर बाबीच त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. कारण त्यांच्या मतदारांना त्या महत्त्वाच्या वाटतात. संसदेत अभ्यास करून बोलले नाहीत म्हणून त्यांचे मतदार त्यांना जाब विचारत नाहीत. कायदे बनत असताना किती मसुद्यांचा अभ्यास करून त्यावर तुम्ही मत मांडले, अशी विचारणा कधीच मतदार करत नाही. जर मतदाराला या कशाचेच पडलेले नसेल तर खासदार कशाला असल्या गोष्टींसाठी मेहनत करतील? ते त्यांच्या मतदारांना जे हवं असेल तेच करण्यासाठी वेळ देतील आणि पुन्हा पुढच्या वेळी निवडून येतील; नव्हे, निवडून येत आहेत.

मतदारांना खासदाराकडून अशा कामाची अपेक्षा नसते. मतदारांना हवा असतो खासदार आपल्या घरी असलेल्या लग्नसमारंभात. आपल्याकडे कोणाचं निधन झालं तर खासदाराने भेटायला यावं, ही मतदाराची अपेक्षा असते. कधी तरी काही काम घेऊन आपण खासदाराकडे गेलो तर खासदाराने त्यासाठी शिफारस करणारं पत्र आपल्या लेटरहेडवर द्यावं, असं मतदाराला वाटत असतं. त्याला ते मिळालं की तो खुश असतो आणि तेवढ्या शिदोरीवर तो त्या खासदाराला पुन:पुन्हा निवडून देतो, असाच बहुतेकांचा अनुभव बनला आहे. असेच असेल तर संसदेत उपस्थिती कशी वाढेल आणि प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी कशी होईल? हे चित्र बदलावं लागेल. खासदारांना त्यांच्या निवडीमागचा लोकशाही राज्यव्यवस्थेचा, घटनाकारांचा हेतू लक्षात घेऊन संसदेत कामगिरी करावी लागेल.

लग्न आणि मरण यांना कमी आणि संसदेला अधिक दर्जेदार वेळ द्यावा लागेल. अर्थात, मोदींनी आवाहन केलं म्हणून नाही, तर या देशासाठी, लोकशाही राज्यव्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी खासदारांना ते करावं लागेल. असं केल्याने लोक निवडून देतील का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. असं करूनही निवडून येता येतं, हे त्यासाठी लक्षात घ्यावं लागेल. अर्थात, कसं निवडून येता येतं, हे आपण पुढच्या लेखात पाहू.
(deepakpatwe@gmail.com )