आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर महिलांनाही राजकारणात बदनामीचा फेरा टाळणे शक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीयदृष्ट्या काळ बदलला आहे. हा बदल जाणून घेताना काही खबरदारी घेऊन वाटचाल केल्यास महिलांसाठी राजकीय मैदान कर्तृत्व गाजविण्यासाठी खुलं आहे, असं विधान मागच्या लेखात केलं होतं. परंतु महिलांनी काही खबरदारी घ्यायची म्हणजे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भारतीय समाजमनाची घडण पुरुषप्रधान संस्कृतीशी नाते सांगणारी आहे. तिला संस्कृती म्हणायचं की नाही, या तात्त्विक चर्चेची ही जागा नाही; पण त्याचा मोठा परिणाम राजकारणात स्त्रियांचं प्रमाण कमी असण्यात झाला आहे, हे मात्र खरं. आता महिलांसाठी राजकारणातल्या, विशेषत: लोकशाही व्यवस्थेतल्या काही (स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या 50 टक्के) जागा आरक्षितच झाल्यामुळे राजकारणातल्या पुरुषी प्राधान्याला छोटीशी टीच गेली आहे. ही टीच मोठी होऊ नये, आणि पर्यायाने पुरुषी सत्तेला हानी पोहोचू नये, यासाठी संसदेत सर्वच पुरुष खासदार जिवाच्या आकांताने लढताहेत. याच लढाईच्या प्राथमिक टप्प्यातला गनिमी कावा म्हणून राजकारणातल्या स्त्रियांच्या बदनामीकडे पाहता येईल.
सत्तेतूनच आलेली उपभोगाची लालसा आणि काहीतरी देण्याआधी याचकाकडून काहीतरी मिळवण्याची भ्रष्ट मानसिकताही स्त्रियांच्या चारित्र्यहननामागे असते. अर्थात, ही मानसिकता ज्यांच्या-ज्यांच्याकडे काही तरी देण्याचे अधिकार आहेत, त्यातल्या बहुतांश मंडळींमध्ये आढळते. महिला अपवाद नाहीत. केवळ राजकारणी पुरुषच नव्हे, तर प्रशासनातले पुरुष आणि महिला अधिकारीही ज्याला काही द्यायचे आहे, त्याच्याकडून आधी कशाची तरी अपेक्षा करताना दिसतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात सापडणाºया महिला अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रमाण पाहिले तर वरच्या विधानाचा अर्थ आणखी स्पष्ट होऊ शकेल. राजकारणात काम केलेल्या इंदिरा गांधींसारख्या धारिष्टवान आणि राजकीय आगमनापासूनच सत्ताधीश असलेल्या महिलेचा अपवाद वगळला तर अन्य महिला सत्ताधीशांच्या तसल्या मानसिकतेतून वाचूच शकत नाहीत, असाच विचार समाजातले अन्य घटक करतात आणि त्याच दृष्टीने राजकारणातल्या स्त्रियांकडे पाहतात. एकदा हे सूत्र समजलं की समाजाच्या विशिष्ट दृष्टिकोनाबाहेर कसं राहायचं, हे सहज समजायला लागेल.
सत्तेचा आणि अधिकारांचा गैरफायदा घेणे, ही जर भारतीय मानवी प्रवृत्ती म्हणूनच समोर आली असेल तर तिला पायबंद घालणे मुळीच अशक्य नाही. राज्य आणि केंद्रीय प्रशासकीय सेवांकडे पाहा. आज मोठ्या संख्येने महत्त्वाकांक्षी तरुणी या सेवांकडे वळताना दिसताहेत. कोणत्या कुटुंबातले पालक आपल्या मुलींना शासकीय अधिकारी होऊ नका म्हणून सांगतात? या व्यवस्थेतले समस्त पुरुष पिढ्यान्पिढ्या रुजलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेला तिलांजली देऊन या सेवेत आलेले असतात का? शासकीय कार्यालयांचे राहू द्या, अगदी ताजं उदाहरण ‘तहलका’ फेम तरुण तेजपाल नावाच्या संपादकाने साºया देशासमोर ठेवले आहे. क्षेत्र कोणतंही असो; सत्ता आणि अधिकार धारण करणाºया पुरुषाच्या मानसिकतेवर साºया बाबी अवलंबून असतात, हेच तेजपालने दाखवून दिले आहे. या मानसिकतेला जर क्षेत्राचं कोणतंही बंधन नसेल, तर राजकीय क्षेत्राच्याच बाबतीत चर्चा अधिक का होते, आणि ती कशी टाळता येईल, हे पाहणे इथे महत्त्वाचे आहे.
महिला अशा क्षेत्रात काम करायला किंवा करिअर करायला टाळत आल्या आहेत, जिथे रात्रीही वेळ द्यावा लागतो. अशाच क्षेत्रातल्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कलुषित असतो. अर्थात, त्या क्षेत्रात कमी अधिकार किंवा कमी सत्ता असलेल्या महिलांच्या बाबतीतच समाज तसा विचार करतो, असंही आढळून येतं. उदाहरणार्थ, पोलिस खात्यातील महिला कॉन्स्टेबल, दवाखान्यांमध्ये सेवा देणाºया नर्सेस इ... खरं तर या दोन्ही पदाची कामे करणाºया महिला समाजाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे सेवाकार्य करीत असतात. तरीही समाजाच्या दूषित दृष्टीच्या त्या बळी ठरतात. त्याच पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक किंवा आणखी उच्चाधिकारी पदावर महिला असेल आणि तिलाही रात्रीची ड्यूटी करावी लागत असेल, तर तिच्याकडे समाज तसल्या दृष्टीने पाहत नाही. अनेक महिला डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये रात्रीची सेवा बजावावी लागते. त्यांच्या बाबतीतही समाजाची दृष्टी तितकीशी कलुषित नसते, असे अनुभवायला येते.
राजकारणाचेही तेच आहे. यात रात्रीचा प्रवास करावा लागणारी, बाहेर राहावं लागणारी महिला जर कार्यकर्ती किंवा तत्सम पातळीवर असेल तर तिच्याविषयी अधिक चर्चा होते, आणि ती महिला उच्चपदस्थ, सत्ताधारी असेल, सत्ताधारी पुरुषाची कोणी नातलग असेल, तर तिच्याविषयी शक्यतो बदनामीकारक चर्चा होत नाही. म्हणजेच, बदनामीकारक कृत्याला विरोध करण्याची क्षमता नाही, असे ज्या महिलांविषयी समाज गृहीत धरतो, त्यांच्याचविषयी अशी बदनामीकारक चर्चा परस्पर केली जाते. यातून एक सूत्र समोर येतं की, महिलांच्या विरोधाची क्षमता समाजाने गृहीत धरली नसली, तरी ती महिलांनी दाखवली तर सत्ता, अधिकार नसलेल्या महिलांनाही राजकारणात बदनामीपासून दूर राहणे फारसे कठीण नाही.
deepakpatwe@gmail.com