आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारेवरची कसरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही घटनांनी मिळून बनते. त्यातले दृश्य घटक कोणते, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. आता अदृश्य घटक कोणते, ते पाहू या. अदृश्य याचा अर्थ जे दिसत नाहीत ते. दृश्य बाबींपेक्षा या अदृश्य बाबी अधिक परिणामकारक असतात. कारण त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची तयार होणारी प्रतिमा दीर्घकालीन असते, आणि ती बदलविणे अधिक कठीण असते.
कोणत्या असतात या अदृश्य बाबी? आपली वृत्ती किंवा प्रवृत्ती आणि आपलं चारित्र्य. आपल्याला प्रत्यक्ष न पाहता आणि आपल्याला कधीच न भेटताही लोक आपल्या वृत्ती, प्रवृत्तीविषयी आणि आपल्या चारित्र्याविषयी बोलू शकतात आणि ख-या, खोट्या गोष्टी पसरवू शकतात. जोपर्यंत आपल्या वृत्ती/प्रवृत्तीविषयी चांगलं बोललं जातं, तोपर्यंत प्रश्न नसतो; पण जेव्हा वाईट बोलायला कोणी सुरुवात करतो, तेव्हा मात्र त्यातून वाचणं कठीण होऊन बसतं. विशेषत: महिलांच्या बाबतीत ही काळजी विशेषत्वे घेतली जायला हवी. आपल्याकडे अजूनही महिलांनी वागता-बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, अशी अपेक्षा असते. त्या मर्यादेचं कुंपण अनवधानाने का असेना; थोडंही ओलांडलं गेलं, तरी महिलांकडे संशयाने पाहिलं जातं किंवा त्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. मोठ्या शहरातलं वातावरण थोडं बदलताना दिसत असलं, तरी त्याचं सार्वत्रिकीकरण व्हायला अजून बराच काळ जावा लागणार आहे, हे नाकारता येत नाही.
अदृश्य बाबी अर्थात वृत्ती-प्रवृत्ती आणि चारित्र्य या दोन संकल्पना थोड्या विस्ताराने पाहूया. एखादी व्यक्ती त्याच्या जवळच्या माणसाचा केव्हा केसाने गळा कापेल, हे सांगता येत नाही, असं अनेकांच्या बाबतीत म्हटलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीची वृत्ती कपटी आहे, असं म्हणता येतं. एखादी व्यक्ती कोणत्याही काळात आणि कोणत्याही परिस्थितीत कशी वागेल, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या माणसाची वृत्ती, असंही थोडक्यात स्पष्टीकरण देता येईल. प्रवृत्तीच्या बाबतीत सांगायचं, तर विशेष प्रसंगी, विशिष्ट वेळी जाणवणारी ती वृत्तीच असते. विशिष्ट वेळी मोह आवरला न जाणे, संयम गमावून बसणे, चागलं-वाईटाचं तारतम्य गमावून बसणे, अचानक टोकाची भूमिका घेणे, ही एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती असू शकते. अर्थात, वृत्ती-प्रवृत्तीचं वर्गीकरण हे व्यक्तिसापेक्ष असू शकतं. एखाद्याचं संयम गमावून बसणं, हे एकाला त्याची प्रवृत्ती वाटू शकते; तर तीच दुस-याला स्वाभाविक प्रतिक्रिया वाटू शकते. त्यामुळेच वृत्ती-प्रवृत्तीविषयी गॉसिप केलं जाण्याची शक्यता अधिक असते. सर्वात संवेदनशील असते ती चारित्र्य ही संकल्पना. तिला चटकन तडा जाण्याची शक्यता असते आणि हा तडा सांधणं सर्वात कठीण असतं. महिलांना राजकारणात यायला सर्वात मोठा अडथळा आहे तो याच संकल्पनेचा आणि म्हणून त्यावर आपण अधिक भर देणार आहोत. एखादी व्यक्ती ही दुस-या कोणत्याही एकाच व्यक्तीशी निष्ठावान असणे म्हणजे चारित्र्य, असं अत्यंत ढोबळमानाने म्हणता येईल. या व्याख्येनुसार वर्तन असलेली व्यक्ती चारित्र्यवान; आणि निष्ठा थोड्याही ढळल्या तर चारित्र्यावर डाग पडले, असं समजायचं; इतकं सोपंही करून सांगता येईल. याच व्याख्येच्या अनुषंगाने आत शिरत गेलं, तर कंगोरे अधिक स्पष्ट होत जातील. उदाहरणार्थ, राजकारणात येऊ इच्छिणा-या एखाद्या महिलेने राजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरताना पती वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीप्रती मानसिक वा शारीरिक जवळीक करता कामा नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. आणखी स्पष्ट करायचं झालं, तर अन्य कोणत्याही पुरुषाला त्या स्त्रीविषयी आकर्षण वाटेल असेही तिचे वर्तन असता कामा नये, अशीच पुरुषी मानसिकतेची अट असते. यातल्या ‘जवळीक’ आणि ‘आकर्षण वाटेल अशी वर्तणूक’ या बाबींना इतक्या बाजू आहेत की त्यामुळेच राजकारणातल्या स्त्रीला चारित्र्य
जपणं म्हणजे तारेवरची कसरतच वाटत
आली आहे
deepak patwe@gmail.com