आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deepak Patwe Article About MP's And MLA's Duties And Responsibilities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार, खासदारांची नेमकी जबाबदारी काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करताना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत, आपण त्यांना कशासाठी निवडून दिलं आहे, हे मतदारांना कळायला हवं आणि निवडणूक लढविणाऱ्यांनाही आपण निवडून आलो तर आपली कामं कोणती असतील, याचं भान असायला हवं. कायदे करण्याव्यतिरिक्तही त्यांची काही संवैधानिक कामं आणि जबाबदाऱ्या आहेत. त्या ते पार पाडतात का, याकडे मतदारांचं लक्ष असायला हवं.

मदार आणि खासदारांच्या कामाचा संसदीय दर्जा राखला जायचा असेल तर त्यांना ज्या कामासाठी निवडून दिले आहे ते काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा आणि मतदारांनीही त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून अपेक्षा करायला हव्यात. याला पर्याय नाही; पण तसं होताना दिसत नाही. आमदार, खासदारांनी आपल्या मतदारसंघात किती विकासकामं केली, गटार बांधून देण्याची मागणी पूर्ण केली की नाही आणि तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या गावात आला की नाही, याची चर्चा मतदार करतात. गटार, रस्ते, समाजमंदिर बांधण्यासाठी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि त्या संस्थांसाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष द्यायचं असतं. मात्र, आपण आमदार, खासदारांकडून असल्या कामांची अपेक्षा करतो आणि त्यांचं निर्धारित काम करण्यापासून त्यांना आपण परावृत्त करीत असतो, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. मतदारांच्या इतक्या किरकोळ अपेक्षा असण्याला लोकप्रतिनिधीही कारणीभूत आहेत. एका आमदार किंवा खासदाराने त्याच्या मतदारसंघात किती किती लांबीच्या गटारी केल्या, किती रस्ते केले आणि किती समाजमंदिरे बांधली, हे सांगणारे कार्यवृत्तांत प्रसिद्ध केले तर त्याच्याकडून पुढच्या कार्यकाळातही मतदार तशीच अपेक्षा करणार, हे उघड आहे. किंवा, त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून, शेजारच्या मतदारसंघातूनही तेच अपेक्षित केले जाईल. दुसरीकडे मतदारांना आपण अशा स्वरूपाची किती कामं केलीत, यातच रस असेल तर तीच कामे दाखवून मत मागण्याचंच धोरण निवडणुकीत उमेदवार ठेवतील, हेही स्पष्ट आहे. त्यामुळे हे एक दुष्टचक्र तयार झालं आहे आणि ते भेदण्याची गरज आहे. त्याची सुरुवात कोणी करायची, हाच काय तो प्रश्न आहे.
सर्वसाधारणपणे आमदार आणि खासदार यांची कामं बहुतांशी सारखीच आहेत. कारण हे दोघेही कायदेमंडळाचे सदस्य असतात. कायदे करण्याव्यतिरिक्तही त्यांची काही संवैधानिक कामं आणि जबाबदाऱ्या आहेत. त्या ते पार पाडतात का, याकडे मतदारांचं लक्ष असायला हवं. काय आहेत ही कामं आणि जबाबदाऱ्या?
- कायदे बनविणे : भारतीय घटनेच्या सातव्या परिशिष्टातील कलम २४६नुसार आमदाराचे सर्वात महत्त्वाचे काम आहे ते कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी आवश्यक ते कायदे बनविणे, त्यात बदल करणे, ते रद्द करणे किंवा त्या अनुषंगाने चर्चा करणे. कोणत्या विषयांशी संदर्भात कायदे करायचे, याबाबत आमदार आणि खासदारांच्या कामात थोडा फरक आहे. जे विषय किंवा क्षेत्र केंद्र सरकारच्याच अखत्यारित आहेत, त्यासंदर्भात आमदार किंवा विधानसभेत कायदे बनत नाहीत किंवा त्यात बदल करता येत नाहीत. उदाहरणार्थ, रेल्वे, देशाचे संरक्षण, विदेशांशी संबंधांबाबतचे धोरण इत्यादी.
- आर्थिक नियंत्रण : राज्याच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवणे, हेही आमदारांचे महत्त्वाचे काम आहे. राज्याचे अर्थविषयक धोरण ठरताना, विविध करांची आणि त्यांच्या दरांची रचना होताना, नवे कर लावताना, काही कर रद्द करताना आमदारांनी धोरणात्मक चर्चा केली पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत भाग घेतला पाहिजे.
- योजना, कार्यक्रम अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे : राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते आहे की नाही, यावर लक्ष
ठेवणे हेदेखील आमदारांचे काम असते. अशा योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे काम आमदाराने
केले पाहिजे.
- निवड करणे : आमदारांना आवश्यक त्या वेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडणे, योग्य वेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करणे ही कामेदेखील करावी लागतात. ती कामे त्यांनी प्रामाणिकपणे आणि सदसद्विवेक बुद्धीने करावे, अशी अपेक्षा असते.
- घटनेत दुरुस्तीचा अधिकार : घटनेत काही दुरुस्त्यांच्या वेळी किमान निम्म्या आमदारांच्या संमतीचीही गरज असते. त्या वेळी मतदान करून योग्य उमेदवार निवडणे, हे आमदारांचे काम असते.
- वेतन व भत्ते ठरविणे : आमदारांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचे कामही आमदारांना करावे लागते. ही सर्व कामे लक्षात घेतल्यानंतर कोणत्या आमदाराने त्याचं कर्तव्य किती प्रमाणात बजावलं हे कसं ठरवायचं, ते आपण पुढच्या लेखात पाहू.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष आमदार पंकजा मुंडे यांना एका वृत्तवाहिनीवर नुकताच प्रश्न विचारला होता की, आजच्या परिस्थितीत राजकारणातली कोणती गोष्ट आवडत नाही आणि संधी मिळाली तर ती बदलायला आवडेल? त्यावर पंकजा यांचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी आपल्या घरी लग्नकार्यासाठी यावं, कोणाचा मृत्यू झाला तर दारावर यावं, ही मतदारांची अपेक्षा आवडत नाही. त्याऐवजी त्यांनी ज्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे ते काम ते प्रामाणिकपणे करतात की नाही, हे मतदारांनी पाहायला हवं.
deepakpatwe@gmail.com