आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी लढाई समाजाशी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिमानास्पद उंची गाठलेल्या महिलांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आणि शरीरभाषा परंपरावादी समाजाला अपेक्षित असल्यासारखीच असावी, हा योगायोग नाही. परिस्थिती अनुकूल करवून घेण्यासाठी चाणाक्ष आणि बुद्धिवान महिलांनी अवलंबिलेली ती एक रणनीतीच होती. युद्धाच्या मैदानात समोरून लढणार्‍या शत्रूपेक्षाही आपल्यातच असलेले फंदफितूर जास्त घातक असतात, असं युद्धशास्त्र सांगतं. राजकारणाच्या लढाईचंही तसंच आहे. त्यामुळेच राजकीय लढाईत यश मिळवलेल्या महिलांनी आधी आपल्या वर्तुळातल्या शत्रूंना (परंपरावाद्यांना) संधी मिळणार नाही, अशी व्यवस्था आपल्या वर्तणुकीतून केली आणि म्हणूनच राजकारणातल्या प्रतिस्पर्ध्यांशी त्यांना राजकीय पातळीवर लढून यश मिळवता आलं, ही बाब समजून घेण्यासारखी आहे.
महिलांनी परंपरावाद्यांच्या म्हणण्यानुसार वागावं, असं सांगणं म्हणजे स्त्रीचं कर्तृत्व नाकारणं, तिला बंधनात अडकवणं, तिला समपातळीवरून खाली लोटणं आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याचा मी प्रतिवाद करणार नाही.
मात्र, इथे प्राधान्य या सामाजिक लढाईला द्यायचं की राजकीय लढाईला, हा प्रश्न आहे. कारण, सामाजिक लढाईत अडकलेल्या महिला राजकारणात मात्र पराभूत, अयशस्वी झाल्याचीच नोंद आहे. म्हणून त्या मुद्द्यांना कमी महत्त्व दिलं पाहिजे, हे राजकारणातल्या यशस्वी महिलांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिलं आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष आणि भारतीय राजकारणात सध्या तरी सर्वात शक्तिमान असलेल्या राजकीय महिला म्हणून सोनिया गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचं उदाहरण घेऊ. त्या मूळ इटालियन आहेत. जागतिक पातळीवरच्या विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. काळाच्या पुढे विचार करणार्‍या राजीव गांधींसारख्या आधुनिक विचारांच्या नेत्याची त्या पत्नी आहेत. मात्र, भारतात आपल्याला राजकारणाचा वारसा चालवायचा असेल तर भारतीय असलेलाच वेष आपल्याला परिधान करावा लागेल, हे त्यांनी ओळखलं आणि म्हणून बहुतांश वेळा त्या साडीतच दिसतात, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तीच परंपरा त्यांची कन्या प्रियंका गांधी, मनेका गांधी यांनीही पाळली आहे. लोकसभेच्या सभापती मीरा कुमार, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी अशा आजच्या महिला राजकारण्यांकडे पाहा. त्या सर्वांनी समाजाच्या व्यक्तिमत्त्व आणि वर्तणुकीबाबतच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसतील.
महिलांना राजकीय रणांगणात युद्ध जिंकायचं असेल तर सामाजिक पातळीवरची लढाई टाळता आली पाहिजे; नव्हे, सध्या तरी ती टाळलीच पाहिजे, हे आतापर्यंत केलेल्या विश्लेषणावरून आणि दिलेल्या उदाहरणांवरून पुरेसं स्पष्ट झालं आहे. आता प्रश्न आहे तो ही लढाई कशी टाळायची, हा. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर महिलांना राजकारणात काम करताना सामाजिक बंधनं येऊ नयेत, असं वाटत असेल तर काय काळजी घेतली पाहिजे, हेही स्पष्ट असायला हवं. यालाच आपण आचारसंहिताही म्हणू शकतो.
अर्थात, ही आचारसंहिता म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नाही; जी बदलू शकत नाही. उलट या संहितेतले एकेक कलम कमी
होत जाणे, हेच भारतीय राजकारण प्रगल्भ होत असल्याचं लक्षण समजावं लागेल.
राजकारणात काम करू इच्छिणार्‍या महिलांकडून समाजाच्या काय अपेक्षा असतात, हे ढोबळमानाने सांगायचे झाले तर दिसणे आणि वागण्याशी संबंधित काही बाबी नक्की सांगता येतील. कारण महिलेचे दिसणे आणि वागणे या दोन बाबीच परपुरुषाला आकर्षित करतात आणि म्हणून त्यांचा संबंध चारित्र्याशी सरळ जोडला जातो. यातले 60 टक्के काम महिलेचे दिसणे करते, तर उर्वरित वागणे. वर ज्या महिला नेतृत्वाची उदाहरणे दिली आहेत, त्यांच्या दिसण्या आणि वागण्याकडे आजच्या पिढीतल्या महिला आणि तरुणींनी आवर्जून पाहिलं पाहिजे. निदान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास म्हणून तरी हे करायला हवं. हा अभ्यासच नव्या पिढीतल्या राजकारणेच्छुक तरुणींना आणि महिलांना बरंच काही शिकवून जाईल, याविषयी शंका नाही.
एक महिला कार्यकर्त्या मला खूप पूर्वीपासून माहीत आहेत. त्या विचारांनी अत्यंत ठाम, प्रामाणिक आणि निष्ठावान होत्या. विचारांमध्ये विकृतीचा लवलेश नव्हता; पण शिक्षण आणि अन्य कारणांनी त्यांना मुंबईत राहावं लागलं. अत्यंत सकारात्मक विचार करत असल्यामुळे त्या आशावादी होत्या. त्यामुळेच त्यांचा पेहराव काहीसा आधुनिक असे. सवयीचा वा सोयीचा भाग म्हणून त्या अनेकदा जिन्सची पँट वापरत. परंतु, त्यामुळे इतर महिलांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कधीच चांगला नव्हता, हे मी जवळून पाहिलं आहे. महिलांची ही अवस्था, तर पुरुषांचं काय? त्यांना तर गॉसिप करणं आवडतं. झालंही तसंच. पेहरावामुळे त्या महिला कार्यकर्तीची अवस्था पक्षात आणि समाजातही इतकी वाईट झाली की, ती एक दिवस गाव आणि स्वप्न सोडून निघून गेली.