आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepak Patwe 'prativad' On Articles Of Vinod Shirsath

न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन का मान्य होत नाही ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रसिकच्या १३ सप्टेबरच्या अंकातील विनोद शिरसाठ यांचा लेख एकूण त्यांच्या प्रतिमेशी विसंगत वाटला. अर्थात, त्यांची प्रतिमा काही हिंदुत्ववादी नाही; पण ज्यांना केवळ समाजवादी किंवा पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता वाटते आणि त्यासाठी तारतम्याशी त्यांनी कायमची फारकत घेतलेली असते, अशा वर्तुळातले ते नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र प्रा. शेषराव मोरे यांच्याविषयी त्यांनी लिहिलेल्या लेखातून काहीही ठोस मिळत नाही. उलट काही प्रश्न पडतात आणि ते अनुत्तरितच राहतात.

स्वत:ला पुरोगामी किंवा समाजवादी म्हणवून घेणाऱ्यांकडून प्रा. मोरे यांच्या वक्तव्यांची सकारात्मक दखल घेतली जाईल, अशी अपेक्षाही नाही. पण मोरे यांनी केलेल्या विधानांचे त्यांच्याच पद्धतीने खंडण केले जाणे स्वत:ला पुरोगामी आणि बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्यांकडून अपेक्षित आहे. कोणत्याही विचारांना बांधून न घेतलेला आणि सर्व विचारधारांचे परिस्थितीसापेक्ष विश्लेषण करू पाहणारा वाचकही मोठ्या संख्येने तयार झाला आहे. त्याच्या विवेकी बुद्धिप्रामाण्यवादाला पोषक असे वैचारिक खाद्य त्याला हवे आहे. प्रा. मोरे यांनी काही स्पष्ट आणि वादग्रस्त ठरू शकतील, अशी विधाने भाषणातून केली; तेव्हापासून अशा विवेकी वाचकांची भूक वाढली आहे. ती भूक भागवली जाईल, ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता विनोद शिरसाठ यांचा लेख वाचल्यानंतर मात्र दिसत नाही. शिरसाठ यांनीच नमूद केल्याप्रमाणे, पुरोगाम्यांनी प्रा. शेषराव मोरे यांना बहिष्कृतच केले असेल (परिघाबाहेर ठेवले असेल) तर ती अपेक्षा पूर्ण तरी कशी होणार? ‘पुरोगामी वर्तुळाच्या परिघावर जे दिसले त्याचे नोंदवलेले निरीक्षण’ असे आपल्याच लेखाचे वर्णन करून विनोद शिरसाठ यांनी स्वत:ची या संपूर्ण लेखातील मुद्द्यांपासून सुटका करून घेतली आहे. तरीही प्रा. मोरे यांच्या विधानांतील फोलपणा पटवून देणारे निरीक्षण नोंदवण्याऐवजी त्यांनी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आपली लेखणी अधिक खर्ची पाडावी, याचे आश्चर्य वाटते. डॉ. मोरे यांच्या लिखाणाची कोणताही पुरोगामी गट दखल घेत नाही, त्यांना व्याख्यानांना बोलवत नाही आणि त्यांचे लेखन वाचतही नाही(!), असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचे कारण डॉ. शेषराव मोरे यांच्या लेखनात दिलेले संदर्भ चुकीचे असतात, खोटे असतात, त्यांनी हाताळलेले विषय आणि मुद्दे तथ्यहीन असतात म्हणून असे होते की, कथित पुरोगाम्यांना डॉ. मोरे यांनी हाताळलेल्या विषयात टीका करायला काही सापडत नाही, त्यांचे मुद्दे खोडून काढता येत नाहीत आणि समर्थन करणेही त्यांच्या प्रतिमेला पटत नाही म्हणून असे होते? याचे उत्तर वाचकांना मिळायला हवे. प्रा. मोरे यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सावरकर वाचून काढला, म्हणून त्यांच्यात सावरकरांचा विचार भिनलेला असेल, असे पुरोगामी मंडळी गृहीत धरून चालत असतील (शिरसाठ यांच्या निरीक्षणानुसार) तर पुरोगाम्यांची ही अंधश्रद्धाच म्हणायला हवी आणि ती भंपक हिंदुत्ववाद्यांच्या अंधश्रद्धांइतकीच घातक आहे, हे मान्य करायला हवे. प्रा. शेषराव मोरे हे नरहर कुरुंदकरांचा वैचारिक प्रभाव स्वीकारतात, म्हणून तो नाकारण्यातही त्यांचे टीकाकार स्वत:ला का धन्य मानत आहेत, हेही कळत नाही. प्रा. मोरे फसवणूक करीत आहेत, हेच सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी त्यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानांतील फसवणूक सिद्ध करायला हवी. कारण सध्याचा संदर्भ तोच आहे. सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असेल आणि म्हणून प्रा. मोरे सावरकरांना पुन्हा गांधी हत्येचे सूत्रधार म्हणवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची भाषा करीत असतील, तर पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ते का मान्य होत नाही, याचेही कायदेशीर, संयुक्तिक आणि पटणारे उत्तर अजून कोणी दिल्याचे वाचनात नाही. ते उत्तर शिरसाठ यांच्या लेखातून मिळणे अपेक्षित होते. न्यायालयाने दिलेला निकाल कसा अन्याय्य होता, हे सिद्ध करण्यासाठी हे पुरोगामी का आपली लेखणी झिजवत नाहीत, असाही प्रश्न पडतो. या कथित पुरोगाम्यांना या देशातली न्यायव्यवस्थाच मान्य नाही, असा निष्कर्ष त्यातून काढला जाऊ शकतो. एखाद्या धर्मातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात असणाऱ्यांनाच पुरोगामी म्हटले जात असेल तर (शिरसाठ यांनीच सांगितलेली व्याख्या) ते तत्त्व सावरकरांना का लावले जात नाही? असाही प्रश्न पडतो. पुरोगामीत्वाची तीच व्याख्या असेल तर सावरकर हेदेखील पुरोगामीच ठरायला हवे. पण शिरसाठ म्हणतात त्यानुसार सावरकर हे केंद्र मानून ज्याचा अभ्यास आकाराला येतो, त्याला पुरोगामी वर्तुळातील लोक आपल्यातला मानत नाहीत. असे का, याचे उत्तर देण्याचेही शिरसाठ यांनी ते चांगले संपादक असूनही टाळावे, याचे आश्चर्य वाटते. हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे म्हणजे पुरोगामी असणे, ही प्रा. शेषराव मोरे यांनी केलेली व्याख्या असली तरी प्रा. मोरे यांच्यावर टीका करणे म्हणजे पुरोगामी असणे, अशीही एक धारणा समोर येऊ पाहते आहे, असे दिसते. टीका करणे चुकीचे नाही; पण ती टीका ज्या मुद्द्यामुळे केली जाते आहे, त्या मुद्द्याला बगल देऊनच ती केली जात असेल तर त्यातून काय साधले जाते कळत नाही. विवेकी वाचकांची भूक असल्या झापडबंद लेखनाने कशी भागणार?

deepakpatwe@gmail.com
श्री. शेषराव मोरे यांना काही प्रश्न...
— मधुकर डुबे, नाशिक.

रसिक, १३ सप्टेंबरमधला विनोद शिरसाठ यांचा ‘पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक’ हा लेख वाचला. शेषराव मोरेंनी महाराष्ट्रात ‘पुरोगामी दहशतवाद’ आहे, असे विधान केले आहे. खरे तर अलीकडच्या काळात ‘सांस्कृतिक दहशतवादाची’ अनेक उदाहरणे या पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहेत. पण शेषरावांनी या मुद्द्यांवर चकार शब्ददेखील काढलेला नाही.
उदाहरणार्थ, गोवंशहत्याबंदी. शेषराव मोरे स्वतःला सावरकरवादी, इहवादी मानतात. पण तरीदेखील या प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगतात. सावरकरांची या मुद्द्याबद्दलची कडवी मते लक्षात घेता आणि शेषरावांची सावरकर विचारांवरील निष्ठा लक्षात घेता, त्यांनी गोवंशहत्याबंदीविरुद्ध केवळ विधानच नव्हे, तर आणखी तीव्र राजकीय कृती करायला हवी होती. अंदमानचे संमेलन ही त्यासाठी अत्यंत मोठी संधी होती. कदाचित असे करण्याआड त्यांना मिळालेले अध्यक्षपद तर आले नसावे? आज महाराष्ट्राला परखड आणि स्पष्ट बोलणाऱ्या विचारवंतांची गरज आहे. पारितोषिक आणि मानसन्मानासाठी वैचारिक निष्ठा गहाण ठेवणाऱ्या स्युडोविचारवंतांनी महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीचे मोठे नुकसान केले आहे.
शेषराव स्वतःला नरहर कुरुंदकरांचे शिष्य मानतात. पण असे म्हणून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. नरहर कुरुंदकर हे हिंदुत्ववादाचे कट्टर विरोधक होते. कारण हिंदुत्व आणि भारतीय संविधान या गोष्टी एकत्र जाऊच शकत नाहीत. खरे तर कुरुंदकर आणि मोरे यांच्या विचारात मूलभूत पातळीवर मोठा अंतर्विरोध आहे. त्यांची भारतीय संविधानावर निष्ठा होती. त्या संविधानातील सेक्युलॅरिझमचे तत्त्व हे त्यांना अक्षरशः प्राणप्रिय होते. हिंदुत्वाची कितीही व्यापक व्याख्या केली, तरी ते घटनेतील या तत्त्वाला छेदच देते. कारण, घटना व्यक्तीची स्वायत्तता हे मूल्य केंद्रस्थानी मानते, तर हिंदुत्वाची संकल्पना ही विशिष्ट धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला खास दर्जा देते. असे नसते तर हिंदुत्व या कल्पनेचा उदयच झाला नसता. आपले हिंदुत्व हे कसे प्रागतिक आहे, हे सांगण्याचा चलाख प्रयत्न शेषराव आजवर करत आले आहेत. त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत. अशी सबगोलंकार भूमिका घेणे कोणत्याही ‘यशवादी’ व्यक्तीस आवश्यक असते. आज कुरुंदकर असते, तर त्यांनी शेषरावांच्या या दुटप्पीपणावर जोरदार हल्ला चढवला असता.
जेव्हा डाव्या, पुरोगामी विचारांना प्रतिष्ठा होती, तेव्हा शेषरावांनी स्वतःला कुरुंदकरांचे, अ. भी. शहांचे, हमीद दलवाईंचे वैचारिक वारसदार असल्याचे भासवले. त्या वेळेस हे तिघेही हिंदुत्वाचे कट्टर विरोधक आहेत आणि हिंदुत्व ही या देशाच्या गाभ्याला छेद देणारी गोष्ट आहे, असे मानणारे हे विचारवंत आहेत. या गोष्टीकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता केंद्रात आणि राज्यात हिदुत्ववादी विचाराचे सरकार आले आहे. अशा वेळेस दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचा खून करणाऱ्या दहशतवादी विचारांचा निषेध करण्याऐवजी, तसा निषेध करणाऱ्या पुरोगामी लोकांच्या ‘दहशतवादा’बद्दल बोलण्याचे महान काम शेषराव मोरे आज करत आहेत. धन्य शेषराव आणि धन्य त्यांची तत्त्वनिष्ठा.
dube.madhukar@gmail.com