आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान काम समान दाम: एक दिवास्‍वप्‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समान काम आणि समान दाम हे तत्त्व ग्रामीण भागातील स्त्रियांना फारसं अनुभवायला नाहीच मिळत. आज सर्वत्र ज्या कष्टकरी स्त्रिया, मजूर स्त्रिया काम करतात त्या प्रत्येक ठिकाणी काम समान किंवा जास्त कष्टाचं स्त्रियांवर लादलं जातं पण त्यासाठी मिळणाऱ्या दामामध्ये मात्र तफावत असते. याचा प्रत्यय देणारा लेखिकेचा हा जिवंत अनुभव...
 
आम्ही कुटुंबिय एकदा सौताडा, कपिलधार या बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्री गेलो होतो. श्रावण महिन्यात तेथील रमणीय परिसर पाहण्यासाठी जवळपासच्या पर्यटकाची गर्दी होते. सौताडा येथे प्रथमच जात असल्यामुळे मराठवाड्यातील चौसाळा जवळपासच्या रुक्ष आणि उजाड भागात रमणीय ठिकाण असू शकेल यावर सुरुवातीला विश्वासच बसेना. पसरट वाहनतळावर गाडी लावल्यानंतर अतिशय खोल भागातून डोकावणारी हिरवळ मनाला मोहून टाकली. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान भेट देण्यास गेल्यामुळे तेथील धबधबा अगदी अत्यल्प प्रमाणात आपल्या अस्तित्वाची चुणूक आम्हास दाखवत होता. तेंव्हाच माझ्या डोळ्यासमोर पावसाळ्यातील रिमझिम बरसणाऱया श्रावणातील कल्पनारम्य दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले.
 
सौताडा हे ठिकाण अंदाजे पाचशे ते सातशे फूट खोल अशा दरीत वसलेले आहे. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी खाली उतरू नये अशी सक्त ताकीदवजा सूचना वरच्या बाजूला लिहिलेली होती. अंदाजे साडेतीनशे पायऱ्या व एकेक पायरी दीड ते पावणेदोन फुटाची असावी. खरी कसरत त्या मंदिरापर्यंत पोहोचण्याची तर आहेच त्यापेक्षा जास्त मंदिरापासून वर चढत येण्याचीदेखील आहे. खाली उतरताना दगडी पायऱ्यांवरून थोडे जरी लक्ष विचलित  झाले तर काय होऊ शकेल याचा विचार मनात डोकावताच मन धास्तावून जाते. शंभर-दीडशे पायऱ्या उतरल्यानंतर पाय अगदीच लटपटू लागतात. अशा धास्तावलेल्या मनस्थितीत आम्ही खाली उतरलो. खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पाय भिजवून बसताच त्या थंडगार पाण्याने सारे श्रम हलके झाल्यासारखे वाटले. दर्शन घेऊन वर परतताना खरी कसोटी लागते. मांडीवर एका हाताने दाब देऊन चढणाऱ्या चाळिशीच्या पुढच्या लोकांना तर आठ दिवस सौताड्याची आठवण त्यांचे शरीर विसरू देत नाही, एवढे मात्र निश्चित.
 
हे सर्व विस्ताराने लिहिण्याचे कारण म्हणजे देवळाच्या जवळील झऱ्यावर/वाहत्या पाण्यावर पूल बांधण्याचे काम चालू होते. पुलाच्या बांधकामासाठी काही पुरुष व काही स्त्रिया काम करीत होत्या. एवढ्या पाचशे फूट खोल दररोज काम करणे म्हणजे दिव्य गोष्ट होती. मोठमोठे काळेकभिन्न खडक पुलाच्या बांधकामास अडथळा आणत असल्यामुळे छिन्नी, पहारींनी खडक फोडण्याचे काम काही पुरुष करीत होते. बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य वरून १५०-२०० फुटापर्यंत पोहोचविण्याचे काम दोरीमार्फत करण्याचा प्रयत्न केला जात होता. खडीची ट्रॉली, वाळू वरूनच निम्म्या वाटेपर्यंत पोहोचेल अशी तजवीज केली होती. तेवढ्यात आमच्या समोर काही ५० किलोची सिमेंटची गोणी तेथे येऊन पडली होती. ती गोणी नेण्यासाठी तेथील स्त्रियांना सांगण्यात आले. आमच्या पाठोपाठ त्या मजूर स्त्रिया थांबत, थांबत कदाचित आमच्यापेक्षा वेगाने वर चढत होत्या. त्या स्त्रियांमध्ये एक १५-१६ वर्षाची मुलगीदेखील काम करीत होती. त्यांचे कष्ट पाहून मला त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली.

त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्या घरचे धुणे, भांडे, स्वयंपाक करून दोन किलोमीटर अंतर चालून रोज कामावर येत होत्या. डोक्यावर ५० किलोचे सिमेंटचे पोते घेऊन कसरत करत दीड-पावणेदोन फुटाची एकेक पायरी उतरून खाली पोहोंचवित होत्या. एवढ्या दिवसभर होणाऱ्या श्रमाचा दाम मात्र त्यांना केवळ रु.१५० मिळतात, हा आकडा ऐकताच माझे मन विषण्ण झाले. तेथे काम करणाऱ्या पुरुषाला मिळणाऱ्या मजुरीच्या दराचा आकडा हा स्त्रियांना मिळणाऱ्या मजुरीपेक्षा जास्त होता. श्रमप्रतिष्ठा, स्त्रियांचे सबलीकरण, महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील मोठ्या प्रमाणावर दिसणारा विरोधाभास मनाला प्रचंड यातना करू लागल्या. पुरुषाच्या बरोबरीने आपण काम करतो तर दामही त्या प्रमाणात मिळाला पाहिजे असे या स्त्रियांना आजिबात वाटत नव्हते. या कष्टकरी स्त्रिया दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून काम करीत असल्या तरी त्या स्त्रियांसमोर असणारी परिस्थिती त्यांना हे सारं करायला भाग पाडत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे, पारंपरिक पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हे आपणावर लादलं जातंय, आपल्यावर अन्याय होतोय याचीही जाणीव त्यांना होत नव्हती. हे झाले केवळ एक प्रातिनिधीक स्वरूपाचे उदाहरण.
 
परंतु असंघटित क्षेत्रातील स्त्रियांचे श्रम आणि त्याचा मिळणारा दाम याचे असेच विषम प्रमाण आपणास सर्व पाहावयास मिळते. दूरचित्रवाणीवरील खुशीत वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या किंवा मजुरांच्या बायकांमार्फत शासनाच्या योजनांची जाहिरात आणि प्रत्यक्ष वास्तव यातला विरोधाभास वाचकाला नक्कीच जाणवेल. समान काम आणि समान दाम या उक्तीचा ग्रामीण भागातील स्त्रियांवर कधीच परिणाम झाला नही. आज सर्वत्र ज्या कष्टकरी स्त्रिया, मजूर स्त्रिया काम करतात त्या प्रत्येक ठिकाणी काम समान किंवा जास्त कष्टाचं स्त्रियांवर लादलं जातं पण त्यासाठी मिळणाऱ्या दामामध्ये मात्र तफावत असते. गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या स्त्रिया असोत, स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया असोत, हॉटेलमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया असोत किंवा शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या, या सर्व ठिकाणी आजही पुरुष आणि स्त्रियांच्या मजुरीच्या दराच्या आकड्यामध्ये फरक असतोच. यापाठीमागे पारंपरिक पुरुषप्रधान दृष्टिकोन, स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, ग्रामीण व अशिक्षित स्त्रियांची स्वतःकडे दुयमत्त्व घेण्याची वृत्ती, सामाजिक परिस्थिती अशी अनेक कारणे दडलेली आहेत.
 
kdeepali.8691@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...